Monday 19 February 2018

चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे

अनुभवी प्रधानमंत्री  आधीच घरी असतांना नवीन येणाऱ्या गृहमंत्र्यांचे स्वागत आनंद आणि दुःख अशा  सरमिसळ भावनांनीच होत असतं . "सुनबाई आलीय आता तुम्ही मोकळ्या व्हा "मैत्रिणींनी दिलेला टोला ,हसून टोलवावा कि झेलावा हेच कळत नाही . मोकळे व्हा पण नेमके कोणत्या कोणत्या प्रकरणातून ?हे मात्र  ठरत नाही . मुलगा शिकून मोठा झाला चांगल्या उच्च पदावर नोकरी सुद्धा आहे. भरभक्कम कमावतो ,आणि आईच्या शब्दाबाहेर नाही हं ,बापरे केवढं ते सुख सासूबाई या समस्त वर्गाला  .आयुष्याची शर्यंत जिंकलेच समजावं ह्या घडीला. मग काय तोऱ्यात शोध सुरु होतो तो सुनबाईंचा ,प्रत्येक सार्वजनिक प्रसंगाला हळदी कुंकापासून ते दूरच्या नात्यातल्या लग्नापर्यंत हजेरी लावणे सुरु होते.आधीच जाड काच असलेल्या चष्म्यातून योग्य ती मुलगी टिपण्याचा कार्यक्रम कोपऱ्यात बसून चालू असतो, आणि न जाणे लग्नात अशा किती समस्त भावी सासूबाई बसल्यात हे ओळखूनच सगळ्या मुली वावरत असतात. कमाल आहे नाही!!सुंदर नटून थटून ,चेहऱयावर जमेल तेवढं स्मित ठेऊन ह्या भावी सुना बागडत असतात . त्या जाड काचातुन  नजर बरोबर कोणावर तरी खिळून जाते ... ... आणि मग काय विचारपूस चालू. तिच्या घरी जाऊन  केवळ लोकांनाच नाही तर घरातील वस्तू बारकाव्याने बघितलेल्या असतात  आणि कुठल्या गोष्टी रीतील सोडून आहे आणि कुठल्या धरून हे अचूक  टिपलेलं असतं  . आपल्या साच्यात बसणारी निघाली तर सोन्याहून पिवळं नाहीतर शोध अभि जारी है !!!!

   बऱ्याच मुलींना नाकारून एक पसंत केली जाते .  सोनारयाच्या दुकानात जाऊन संपूर्ण दागिने बघून सुद्धा मनासारखं नाहीच मिळालं असा म्हणून एकाचा स्वीकार होतो अगदी त्याचप्रमाणे,पुढची अवघड असणारी पण समर्थपणे पेलणारी क्रिया म्हणजे आपल्या शब्दाबाहेर नसणाऱ्या मुलाला शब्दात अडकवणे. तिच्याबद्दल ऐकलेलं ,न ऐकलेलं उत्तमच सगळ्यांना ऐकवणे.आणि आपली आई आपल्यासाठी योग्यच करत आहे असा म्हणून मुलाने दिलेला होकार  म्हणजे संस्काराची पावतीच !!!!अशाप्रकारे घरातील प्रधानमंत्री खरंच  प्रधान बनून सगळं पार पडतात. आणि सासूच्या भूमिकेत शिरतात . मनात मात्र धाकधूक कायम असते ,एक अनोळखी चेहरा ,अनोळखी घराणं  आपल्या काळजाच्या तुकड्याशी कायमच  जोडणं . आणि आपल्या भविष्याची मदार काहीप्रमाणात त्या मुलीच्या खांद्यावर टाकणं ."आजकालच्या या नवीन मुलींचं आपल्या सारख्या सासवांसोबत जमणं  सोपं नसत. त्यांचं शिक्षण,त्यांचं स्वतंत्र ,त्यांची कमाई मोठी मोठी होत चालीय ना " महिला मंडळाच्या एका सूनग्रसित सासूचा टोला आठवतो. आणि आपल्या वाट्याला आलेला वाण हा उत्तमच असेल आणि नसला तरी जे बाकी जगाच होत तेच आपल्यासोबतही होईल अशी  अशी शंका वजा  समजूत काढून पुढला प्रवास ठरतो. हे झालं सासूबाईंच्या मर्जीप्रमाणे ठरलेल्या  लग्नाबद्दल . पण जे लग्न नवरा मुलाच्या पसंतीप्रमाणे ठरतं त्यातही सासूबाई ह्या नटाची कहाणी वेगळी नसते. 

आधीची गोष्ट वेगळी होती लग्नामुळे एक मुलगी अख्या कुटुंबाशी जोडल्या जायची .कितीही आवडो किंवा न आवडो जन्मभर ते ओझं वाहायची पण आता मात्र लग्न दोन व्यक्तीच होत आणि निम्या लोकांना तेही धड सांभाळणं अवघड जात . मुलाने पसंत केलेली मुलगी पदरी पाडून घेणं तिचा स्वीकार करणं हे पण एका दिव्यातून जाण्यासारखंच आहे. आपल्या सुनेला काय निक्षून सांगायचं ,काय बजावायाच ,काय मनावर ठसवायचं  याची यादी सासूबाई मनात घोळवत असतात. मुली सासरी जातात तेव्हा तिची आई अस्वस्थ होतेच पण सून येणार म्हणून मुलाची आई देखील अस्वस्थच असते. शेवटी काय "चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे " . 


सध्या माझी भूमिका सुनेची आहे. सुनेबद्दल नंतर कधीतरी !!!

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...