Friday 28 June 2024

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

  भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ... 

AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता )


हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ?संध्याकाळी जेवायला  काय बनवायचं हे जर सुचत नसेल तर पटकन जाऊन चॅट जिपीटी ला विचारायचं . गमंत नाही!! मी खरंच करून बघितलं आणि त्याने रेसिपी सकट अख्खा  धडा समोर लिहला आणि शेवटी एक वाक्य लिहलं  "आपला स्वयंपाक रुचकर होऊ दे " . आता फक्त "तू येणार का जेवायला  ?" एवढंच मी चॅट जिपीटी ला विचारायचं शिल्लक होत . 



काल शाहिद कपूर चा सिनेमा पहिला सिफरा कृत्रिम रित्या बनवलेली रोबोट तिच्या प्रेमात शाहिद पडतो . सिफरा समोरच्याचे फेशिअल एक्स्प्रेशन बघून ठरवते त्याला काय होत असेल आणि फीड केलेल्या codes वरून काय action घ्यायची  हे स्वतः ठरवते . "रोबोट च्या प्रेमात पडणे आणि भावनांना एकतर्फी वाट करून देणे " हे लवकरच येणाऱ्या पिढी मध्ये बघायला मिळेल ह्यात काही खोटे नाही. आता प्रेम पण विकत घेण्याची सोय झाली . 



मला माझ्या कन्टेन्ट साठी काही इमेज बनवायच्या होत्या ,मी पेन आणि पेन्सिल घेऊन अख्खी रात्र जागून ४ ते ५ वेळा खोडून एक आराखडा तयार केला. काम मनासारखे झाले म्हणून खुश होऊन पहाटे झोपले. आता तो आराखडा डिझायनर कडे देऊन सुंदर ,बोलके चित्र कधी येते ह्याची वाट पाहू लागले , इतकी किचकिच कशाला ?AI ला सांगितलं तर तो देईल कि चित्र २ सेकंदात काढून . आणि खरंच चित्र आले देखील अगदी हुबेहूब . 

पण कोरडेच होते ते . भावनाशून्य !! कारण त्या मागच्या भावना AI वाचू शकले नाही . 


माझी आई ची एक पिढी आहे ,जी अजूनही मराठी भाजीवाल्या शी अस्खलित हिंदी मध्ये बोलते (दूधवाले भैया आणि भाजीवाले ह्यांच्याशी हिंदी बोलावं लागते असा तिचा गोड समज आहे) आणि पर्स मधून कॅश किंवा चिल्लर काढून ती त्याला किमान दोन वेळा  मोजून देते . आत्ता अलीकडेच खूप प्रयत्नांनी  ती गूगल पे हाताळायला शिकली .  लाईट बिल , मोबाइल चे बिल इतके विश्वासाने भरते आणि मला नवीन तंत्रज्ञान जमले ह्यावर खुश होतांना मी तिला पाहिलंय. नवीन अँप आता ती स्वतः download करून हाताळून बघते. पण पैसे देतांना जी शब्दांची देवाण घेवाण व्हायची ,नवीन लोक जोडली जायची ,भावना पोहचायच्या ते समाधान वेगळं होत . ह्या अँप मधून लोक भेटत नाही ग, काम झटपट होत बस  . असं ती सारखं म्हणते . आता ह्या नवीन अंगावर येणाऱ्या टेकनॉलॉजि शी जुळवून घेणं तिला परत किती अवघड जाईल ह्याची कल्पना देखील  करवत नाही. 


माझी पिढी केवळ आपली सोय बघते .आम्हाला फक्त कोड किंवा कमांड कश्या द्यायच्या हे चांगलं ठाऊक आहे. हातात गॅजेट्स घेऊन आपली एकाकी जागा शोधायची आणि ह्या virtual दुनियेमध्ये रमायचं . तू हे असं का केलंस ?नियम का तोडले ? ह्या प्रश्नांची सरबत्ती करायला ह्या virtual दुनियेत कोणी नाही.आपली प्रायव्हसी आपल्याला मिळणार आणि जगात कुठे हि हिंडून येण्याची मुभा सुद्धा . शिवाय पर्सनल आयुष्यात डोकावायला इथे कोणाला वेळ नाही . लगाम नसलेले स्वातंत्र्य !! तेच हवे ना आम्हाला . 


हे असेच चालू राहणार  ह्याच्याशी जुळवून घेणे च म्हणजे स्वतःला ह्या विश्वात टिकवून धरणे . भावनांना सांभाळा ,मनाला आवरा हे  outdated होऊन  कोडींग रिफ्रेश करा ,कमांड change करा म्हणजे जमले . जो ह्या AI शी जुळवून घेईल तो राज्य करेल . नवा गडी नवा डाव . 


तुमचे काय ?भावनांना घेऊन बसणार कि ह्या बदलणाऱ्या जगात स्वतःला बदलणार ?

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...