Thursday 2 November 2017

माझी आजी ......... एक ठसठशीत व्यक्तिमत्व


आमची आजी म्हणजे शांताबाई ओंकारदास चवरे . माझ्या आईची आई . माझं बालपण आजीच्याच संगतीत गेलं म्हणून तीच व्यक्तिमत्व फार जवळून बघायला मिळालं. आजी म्हणजे  वडाच्या खोडासारखी मजबूत बुंधा असलेली आहे .तिच्या सावलीत आम्ही सगळे भावंडं मोठी झालो. तिची मुले मुली म्हणजे वडाच्या झाडाला असलेल्या पारंब्याप्रमाणे  आहे . ५मुली २ मुले एवढा मोठा पसारा या वडाच्या झाडाचा आहे .आजीने आयुष्यात बरच काही पहिल. नातवंडाची मुलं बघायला मिळालेली माझी आजी वयाच्या ८७ वर्षी देखील ठणठणीत आहे. एक प्रकारचा प्रचंड शहाणेपणा आणि समजूतदारपणा तिच्याकडे होता. खूप भयंकर अनुभव तिच्या समोर आले पण आजीने कधीच मान टाकली नाही . हे तीच जगण्यावरच प्रेम होत की  जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे लक्षात आल नाही पण आजोबा असूनही त्यांची पाहिजे तशी साथ आजीला संसाराचा गाडा ओढताना मिळाली नाही. सगळा गाडा तिने एकटीनेच ओढला,आपण जर काही केलं नाही तर मुले रस्त्यावर येतील हे जाणून तिने जगायचं थांबवलं नाही किंवा कोणी मदतीला येईल याची वाट पहिली नाही. पदर खोचून कमी वयात कर्तबगार झाली. आजच्या काळातलं वातावरण जर आजीला मिळालं असत तर ती कुठल्या कुठे गेली असती. पण तिची ही मेहनत मात्र मुलांना उभी करण्यात दिसली. 
आजीचं मुळच माहेर  अचलपूर अमरावती जिल्ह्यातील , भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हाचा  तिचा जन्म ,घरातील परिस्थितीमुळे आजीला कारंजा येथील कंकूबाई आश्रमात शिकायला ठेवले. आजीचं शिक्षण १० वि पर्यंत झालं . लगेच आजीला जिल्हा परिषदच्या शाळेत नोकरी मिळाली होती . तीच व्यक्तीमत्व देखील शिक्षिका म्हणून शोभून दिसत होत . आजी  दिसायला विलक्षण तेजस्वी होती तिच्या चेहऱ्यवरच तेज आजही अंगावर आलेल्या सुरकुत्या मधून  झळकत. आजोबानी आजीला पाहताच क्षणी पसंत केलं होत हे आजोबांकडूनच ऐकलेलं आठवत . एका ठराविक लयीमध्ये आजोबा आजीला "मास्तरीण बाई SSSSS " म्हणून हाक मारायचे. आजी कायम नऊवारीत दिसायची आता मात्र अघळ पघळ गाऊन घालते पण कोणी बाहेरचे लोकं  आले कि तिची पदर सावरण्यासाठी घालमेल होते.
अंघोळ करून झाली की  तीच वेणी फणी करून लांबसडक केसांचा रिबन लावून अंबाडा पाडणं  ,आणि कपाळावर ठसठशीत कुंकू अजूनही स्मरणात आहे. आता मात्र कुंकूंची जागा टिकलीने घेतली तेवढाच काय फरक बाकी अजूनही सगळं जसच्या तस. तिची एक संदूक होती लोखंडाची त्याला कायम कुलूप  असायचं,त्याची चाबी तिच्या गळ्यात एका काळ्या दोराला अडकवलेली असायची ,आम्हा भावंडाना कायम उत्सुकता असायची कि यामध्ये काय बर असेल?एकदा पेटी उघडायचा मला मौका मिळाला तिच्या हिशेबाच्या वह्या,पेन्सिल,रब्बर,गळ्यातील पोत ,एका वहीमध्ये पैसे अस बरच काय काय कामाचं आणि बिनकामाच सगळंच असायचं . हि सवय तिला आश्रमात असल्यापासून  होती . आजोबा पंडित होते ते कायम फिरस्तीवर असायचे . त्यामुळे सगळंच आजीला करावं लागायचं.तिची खूप ओढाताण व्हायची . ज़िल्हा परिषद ची नोकरी असल्यामुळे तिच्या सारख्या बदल्या व्हायच्या ,नवीन ठिकाणी घडी बसायला वेळ लागत होता . पण तिने सगळंच धीराने केलं . समाजात मिसळणं , लग्नाला जाणे,आला गेला पै पाहून बघणे यामध्ये तिला खूप उल्हास नव्हता . परिस्थिती पण तशी नव्हती. सगळ्यात  पहिली गरज तिला मुलांचे पालनपोषण करणे ही होती .  नोकरीमध्ये पण आजी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली , तिचा शाळेमध्ये,विद्यार्थ्यांमध्ये आणि घरीही धाक होता. आम्ही नातवंड सुद्धा आजीच्या एका आवाजात गपगार व्हायचो . आजोबा सुद्धा आजीचा आवाज वाढला कि शांत बसलेले मी पाहिलंय . नशीब ,प्राक्तन,देव हे शब्द मी कधी आजीच्या तोंडून ऐकले नाही. फार देव देव करणं तिला आवडायचं नाही ,तिचा विश्वास आपल्या पुरुषार्थावर आहे.चांगले वागणे म्हणजेच देवाची पूजा आहे असा ती म्हणायची , दणकून कष्ट करावे ,ह्यावर तिचा विश्वास आहे. तिच्या नातवंडांना परीक्षेत कितीही मार्क पडू देत ती आवर्जून पेढे आणायला लावायची . आजीची पेंशन काढायला मी रिक्षात तिला घेऊन जात असे . तिकडून येताना मला नेहमी खाऊ मिळायचा ,आता आजीचं वय झालाय ,तिची स्मरणशक्ती खूप कमी झालीय पण मधेच तिला जुन्या गोष्टी आठवतात . माझी मोठी मावशी म्हणजे तिची मोठी मुलगी आणि जावई दोघेही आता या जगात नाही ,पण शरयू कडे जायचं असे ती  बरेचदा म्हणते. आम्ही सगळे नातवंड जमलो कि तिला आनंद होतो ,आम्ही तिथेच राहावं असा तिला कायम वाटत ,माझं लग्न झालाय हे सुद्धा ती बरेचदा  विसरते. एक मजेशीर प्रसंग मला आठवतो, आईच्या दूरच्या नात्यातला एक व्यक्ती एकदा घरी आला होता,त्याचे चारित्र्य  तरुण असताना चांगले नव्हते (आजीच्या भाषेत लंपट ) पण साधारण त्याचे वय ४२ वगैरे असेल तेव्हा तो घरी भेटायला आला होता . पण आजीच्या डोक्यात अजूनही जुन्या आठवणी असतील त्याच्याबद्दलच्या , आईला आजीने त्याला बाहेर काढ म्हणून सांगितले,पण एक्दम कोणाला जा म्हणून कस  सांगणार म्हणून आई विचार करत होती , आई बाहेर काढत नाहीय म्हणून आजी तिची काठी टेकवत बाहेर आली ,आणि त्या बिचाऱ्या व्यक्तीला घालून पडून बोलून हाकलून लावलं . आता तो तसा नसेलही पण आजीच्या   जुन्या आठवणीतुन तो विसरल्या गेला नव्हता . आम्हाला मात्र तोंड लपवायला जागा नव्हती. आजीचा एक भाऊ न चुकता भाऊबीजेला ओवाळायला  येतो,तेव्हा आजीच्या सगळ्या आठवणी दाटून आलेल्या मी पाहिलंय . ,तिच्या या आग्रही स्वभावानं माझे मामा ,आई,मावशी सगळ्या उच्च  पदावर नोकरी करू शकत आहे,तेव्हा जर आजीने मूलं  आणि मुलींना  बाहेर पडू दिल नसत तर आज त्यांनी इतकी प्रगती केली नसती. समाजात अंधश्रद्धा असताना  देखील आजीचे विचार बुरसटलेले नव्हते. तिने यासाठी बऱ्याच लोकांचा वाईटपणा ओढवून घेतलाय. .कसलं आणि कुठून आलेलं शहाणपण तिच्याकडे होत ठाऊक नाही पण कोणी आजीचं ऐकलं नाही असा कधी झालं नाही . 
आजोबा गेल्यानंतर देखील तिने स्वतःला सावरलं. आज तीच शरीर कृश झालाय,असंख्य सुरकुत्यांनी व्यापलाय ,पण स्वतःच स्वावलंबीपण मात्र अजूनही तसाच आहे. तिच्या भिंगाच्या चष्म्यातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला अजूनही मोहवून टाकतो . म्हणून आजीवर लिहण्याचा माझा हा प्रयास!!!  
  




No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...