Thursday 23 August 2018

फुलले रे क्षण माझे

या आठवड्यातले  दोन दिवस अगदी नीट घडी करून ठेवावे असे गेले. म्हणून नमूद करावेसे वाटतात . रोजच्या पेक्षा आयुष्यात वेगळं काही घडावं  अस नेहमी वाटतं
प्रसंग १-
 १५ ऑगस्ट ला अनाथाश्रमात जाण्याची संधी मिळाली,किंवा घडवून आणली . नुसतं झेंड्याबरोबर सेल्फी काढून स्टेटस ठेऊन स्वतंत्रता दिवस साजरा करावा हेच मुळात रुचत नव्हतं .नेहमी किट्टी ला  एकत्र भेटणाऱ्या आणि स्वतःची स्पेस जपणाऱ्या  आम्ही सगळ्याजणी अनाथाश्रमासाठी जाण्यास सज्ज होतो .  फळांनी भरलेले २ खोके , स्पोर्ट्स चे सामान  ,मिठाई आणि चित्रकलेच्या वह्या आणि रंग हे सगळं एका  कारच्या डिक्कीत कोंबून आम्ही टू व्हिलर घेऊन निघालो ,अंतर फार नव्हतं . १५ मिनिटामध्ये सगळे पोहचलो . संतुलन भवन ,असे  अनाथाश्रमाचे नाव होते  एकूण  वेगवेगळ्या वयातील ६० मुले तिथे राहत होती ,सगळी अनाथ होती अस नाही पण परिस्थितीमुळे राहायला आलेली होती  .तिथे जाऊन नक्की काय करायचं हे ठाऊक नव्हतं .आणलेल्या  वस्तूंचे वितरण करून निघून यायचे हे मनाला पटेना. थोडा सार्थक वेळ त्यांच्यासोबत   कसा घालवता येईल ह्याचे विचार  मनात चालू होते. एक दिवस का होईना आपण त्यांच्यासोबत ,त्यांच्यासारखं  होऊन जगूया . कृत्रिमपणा ,औपचारिकता दूर लोटून थोडासा आनंद वाटून घेऊया . लगेच सगळ्यांपुढे विचार व्यक्त केला,आणि आम्ही सरसावलो आयुष्याचा एक नवीन पैलू अनुभवण्यासाठी. 
सगळी मुले एका रांगेत बसली होती . आपल्याला काहीतरी वस्तू  मिळणार ह्या आशेने बघत  होती. नक्की सुरवात कुठून करावी ..ह्या मुलांना मोकळं कस करता येईल ???बरीचशी मुले ग्रामीण भागातून आलेली होती .त्यामुळे मराठी भाषाच संवांदासाठी माध्यम होत.  शेवटी कोण देशभक्तीपर गाणे म्हणून दाखवणार ????एकमेकांकडे बघून "तू म्हण तू म्हण " चालू होत. शेवटी ५-६ मुली लाजतच उठल्या "ए वतन ए वतन...  "सुरु झाले. आम्हीही आमच्या मुलांसोबत सामील झालो आणि एक  छान मैफिल रंगली. मुलांच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी आपली ओळख करून द्यायला सुरवात केली "जिंदाबाद .... माझं नाव .... मी या शाळेत शिकतो .... मला इंजिनियर ,डॉक्टर ,पायलट  व्हायचंय " पाठ करून घेतलेले उत्तर ऐकायला आले. हे बहुतेक त्यांच्यासाठी रोजचंच असावं . रोजच्या सामान्य गरजा जरी पूर्ण झाल्या तरी ध्येय  गाठल्यासारखा आनंद ह्या मुलांना होत होता. पायलट ,इंजिनियर हे तर फक्त  मोठे मोठे शब्दच होते ह्यांच्यासाठी. मोबाइल,आय फोन घेऊन मिरवणारी श्रीमंत परिवारातील मुले आणि आज अंघोळ करायला साबण मिळालं म्हणून आनंद मानणारी मुले. किती हा एकाच समाजामध्ये आढळणारा विरोधाभास !!!
३ ग्रुप मध्ये ६० मुलांचे विभाजन केले. एका ग्रुप ला  डान्स ,दुसऱ्या ग्रुपला स्पोर्ट्स ,याचा माझ्या बाकी मैत्रिणींनी ताबा घेतला .. तिसऱ्या ग्रुपला  वारली चित्रकला मी शिकवणार होते.मुलांना  चित्रकलेची वही आणि रंगाचे वाटप केले  आणि अक्षरशः मुलांनी त्यांची प्रतिभा  रंगांसोबत कागदावर रेखाटली .त्यांचा आनंद रंगासोबत एकरूप झालेला मी जवळून बघितला . मुलींना मेहंदी लावली ,लिंबू चमचा खेळला . मिठाई वाटप  ,फळे वाटप केले आणि दिवस संपला . काही क्षण का होईना पण आनंद वाटायला जमलं . जाताना बरीच मुले फाटकापर्यंत सोडायला आली  होती,टाटा करून आम्ही निघालो ..परत नक्की येऊ ही आशा दाखवून .. जाताना सहज मागे बघितलं दोन मुले अजूनही त्या चित्राशी सवांद करताना दिसली . आणि खरंच आजचा स्वतंत्रता  दिवस साजरा झाल्यासारखा वाटला .ह्यानिमित्ताने एकच सांगावस वाटत

"हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे .""



प्रसंग २
 तारीख १९ऑगस्ट वेळ सकाळची ६:०० वाजता आज मी पहिल्यांदा मॅरेथॉन मध्ये धावणार होते. १८ तारखेलाच टी  शर्ट  ,बॉब घेऊन आले होते. ३ किमी RUN ,walk or  dance ह्यापैकी काहीही करा अस ठरलेल होत. जे जमेल ते स्वतःशी प्रामाणिक राहून करू असं ठरवून  झोपले  . सकाळी लवकरच जाग आली ,कारण स्वप्नात च मॅरेथॉन धावून दमायला झालं होत. लवकर आवरून नमूद केलेल्या ठिकाणी वेळेत पोहचले. २१ किमी आणि १० किमी धावणारे ,५ वाजताच निघाले होते. सगळी मिळून १७०० माणसं /मुले पळणार होती. सगळे घोडे जसे रेस साठी तयार असतात तशी सगळे जण तयार होते .  .आणि ५-४-३-२-१ शिट्टी वाजली आणि माणसांचा झुंड धावायला लागला. ओहोहो काय दृश्य होत छोटी मुले ,मुली,पुरुष वर्ग,महिला वर्ग, वयस्कर मंडळी सुद्धा ह्यामध्ये मागे नव्हती . पांढरा टी शर्ट घालून सगळी जण आपापल्या परीने अंतर कापत होती . एकच मिशन, एकच संदेश "clean  kharadi ,Green Kharadi " . रोजच्या मॉर्निंग वॉक पेक्षा हे नक्कीच  उत्साहाने परिपूर्ण होत . काही चालून काही धावून ३ किमी पूर्ण केले . डेस्टिनेशन ला कौतुक करायला ,फोटो काढायला ऑरगनायझर टीम उभी होती ३ किमी पूर्ण करणे खूप मोठी गोष्ट नव्हती पण माझ्यासारख्या पहिल्यांदा हे अनुभवणाऱ्या अनेक व्यक्ती होत्या.  सहज वाटणारी  गोष्ट पण आनंद देऊन गेली. आणि खरंच सगळं करतांना खूप मज्जा आली . फक्त ह्याची कसर २ दिवस मात्र नंतर निघत राहिली. पण आलेला अनुभव दुर्मिळ होता .   शेवटी  केळी ,नाश्ता देऊन  थकवा दूर करण्यात आला.  मेडल घेऊन फोटो बूथ वर जाऊन फोटो सेशन पार पडलं. आणि यथासांग व्हाट्स अप वर स्टेटस अपलोड झालं.  पुढच्यावेळी ५ किमी चा प्रयत्न करायला हरकत नाही. ... अशी  गाठ सध्या बांधली आहे पुढच्या मॅरेथॉन साठी.


5 comments:

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...