Friday 18 May 2018

माझी भटकंती .... निसर्गरम्य कोंकण


नुकतीच कोंकण मधील मालवणला जाण्याची संधी मिळाली . सकाळी ६ वाजता पुण्यावरून निघालो .कोल्हापूर पर्यंत उन्ह आपला मीपणा सोडायला तयार नव्हतं .आपली कोकणात जाण्याची वेळ चुकली बहुदा हे रुखरुख मनाला जाणवत होती. थोडे अंतर कापल्यानंतर एक वेगळच वळण रस्त्याने घेतलं .आणि निसर्गरम्य दृश्य दिसायला सुरवात झाली. शहरात न अनुभवता येणाऱ्या बऱ्याच गोष्टी मन वेधून घेऊ लागल्या . वळणावळणाचे रस्ते ... कौलारू घरे ,समोर आणि मागे दोन्ही बाजूनी अंगण ,अंगणामध्ये आंबा ,फणस,काजू सुपारी ह्यांच्या बागा ,समुद्र किनारे हे निर्सगरम्य दृश्य बघायला डोळे आणि मन दोनीही उघडे ठेऊन बघायला लागतं . निसर्गाची मुक्तहस्ताने केलेली उधळण इथेच बघायला मिळते. नारळाच्या झाडांमधून दिसलेले निळं आभाळ म्हणजे  जणु  निळ्या कोऱ्या कागदावर  हिरव्या रंगानी रेखाटलेली ठिपक्यांची रांगोळीच . छोटे छोटे टुमदार कौलारू घरे सगळीकडे विखूरलेलेआहे. मासेमारी,पर्यटन हाच येथील लोकांचा प्रमुख  व्यवसाय.  सगळं दृश्य डोळ्यात साठवत वळणदार रस्त्यावरून लाल माती उडवत आमची गाडी गंगनबावडा घाट ,कणकवली ला वळसा घेत मालवणला पोहचली .  

नुकतीच संध्याकाळ होत होती . प्रवासाचा शिण  आलेला होता . बाजारपेठ मधून वाट काढत गाडी "वासंती निवास "ला पोहचली . स्वागताला शैलजा ताई उभीच होती. आम्ही हॉटेलचे बुकिंग केले  नसून होम स्टे ला पसंती दिलेली होती. आणि खरंच पाहुण्यांचं स्वागत करतात तसच स्वागत  आमचं वासंती निवास आणि चिवला बीच वर समुद्राच्या लाटांनी केलं . निळेशार पाणी ,दुधासारख्या उसळणाऱ्या लाटा क्षितिजा पर्यंत पसरणारा मावळत्या सूर्याचा प्रकाश सगळं प्रवासाचा शीण निघून गेला . आणि आम्ही सर्वात अगोदर धाव घेतली ती समुद्राकडे ..... माझा मुलगा सक्षम वय वर्षे ४  त्याच्या आयुष्यात प्रथमच इतका विशाल समुद्र पाहत होता . त्याच ते निरागस ,लोभस रूप आणि त्याला मनमुराद दाद देणारा अथांग सागर ...हे दृश्य अवर्णनिय होत . स्विमिन्ग पूल मध्ये पहिल तेवढंच पाणी पण त्याहीपलीकडे जाऊन इतका अथांग ,विशाल ,दूरवर पसरलेला समुद्र पाहून तो हरखून गेला. मनसोक्त आनंद घेतल्यावर आम्ही घराकडे परतलो. आणि वासंती निवास आणि तेथील लोक खरोखरच सागरासारखीच विशाल हृदयाची आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी मोजक्याच पण नीटनेटक्या केलेल्या सोयी आम्हा पुणेकर लोकांना लाजवून सोडतात . वासंती निवास पासून चिवला बीच हाकेच्या अंतरावर आहे. खिडकीचे तावदाने उघडली तर समोर फक्त समुद्र आणि फक्त समुद्र दिसतो.   दिवस मावळला आणि रात्रीचा समुद्र परत वेगळाच भासू लागला. रात्रीचे जेवण आटपून आम्ही परत किनाऱ्यावर वाळूत जाऊन बसलो. रात्रीचे समुद्राचे रूप हे केवळ त्याचे स्वतःचे असते ,कारण सूर्याची चमक त्याला रात्री येत नाही. संध्याकाळी चकाकणारे समुद्राचे तेच पाणी रात्री शांत ,निश्चल ,सावरकरांच्या ओळी  सार्थक करत होता 
                                                              सुंदर नभ हे , नभ हे अतलची हा 

                                                      सुनील सागर , सुंदर सागर , सागर अतलची हा 


.                                                                 

आणि मला माझा मीपणा विसरायला भाग पाडत होता . आकर्षणासाठी लावलेला वर्ख फार काळ टिकत नाही. रात्रीचा मूळ रूपात आलेला समुद्र आणि त्याच्यामुळे उठून दिसणारं चांदणं हे गणित मला जास्त भावलं . शांत वातावरण ,थंडगार वारा , फक्त लाटांचा आवाज , काळोखाची शाल पांघरून आलेली निशा , आणि पांढर शुभ्र चांदणं हे वसुंधरेचे रूप पाहून मी परत एकदा प्रेमात पडले. आणि निद्रेच्या स्वाधीन झाले . 
पश्चिम किनारा असल्यामुळे सकाळचा सूर्योदय बघायला मिळाला नाही . सकाळचे आन्हिक आटपून आम्ही भटकंतीला निघालो . दीपक भाऊ आम्हाला घेण्यासाठी आलेच होते. स्कुबा डायविंग हा एक अफलातून अनुभव घेण्यासाठी आम्ही सज्ज होतो. सिंधुदुर्ग पाहून,शिवाजीमहाराजांना नतमस्तक होऊन आम्ही निघालो . बुलंद असा तो गड समुद्राच्या लाटांना अंगावर झेलत तटस्थ उभा आहे . जिथे समुद्राचे पाणी शांत होते तिथे समुद्रात असलेल विहंगम विश्व आपल्याला जवळून अनुभवता येत. एक छान साखळी या लोकांची आहे . दीपक भाऊ आम्हाला बोटीवाल्या माणसाकडे सोपवून निघून गेले.  स्कुबा डायविंग करवून घेणारी टीम वेगळीच होती ,आणि पाण्यामध्ये हात पकडून समुद्राचा तळ दाखवणारी वेगळीच लोक होती. हा सगळा प्रकार आपल्याला असुरक्षित वाटत असला तरी या लोकांच्या अंगवळणी पडला आहे . खर सांगायचं झालं तर माझं मन मला हा अफलातून प्रकार करण्याची परवानगी देत नव्हतं . इथली सगळी लोक हे जबाबदारीने आणि सुरक्षित कररवूं घेतात ह्याची शाश्वती होती तरीही . माझ्या सोबत असणाऱ्या मावशीच्या  १५ वर्षाच्या मुलींनी सुद्धा हे दिव्य न घाबरता पार पाडलं आणि एक वेगळाच अनुभव आपल्या आयुष्यात नोंदवला . पण माझ्या बाबतीत असा घडलं नाही मी पाण्यात दोन वेळा उतरून परत आले. आणि एका सुंदर अनुभवाला मुकले. हे कायमच मनात राहिलं .(पुढच्या संधीच्या प्रतीक्षेत) . तिथून आम्ही देवबाग ला गेलो .अहाहा ..काय ती निसर्गाची किमया ..... भरभरून दिलय निसर्गानी कोकणला ...... हातच न राखता !!!!  

वॉटर स्पोर्ट्स ची असलेली उत्तम सोय, अरबी समुद्र आणि करली नदीचा संगम , मगरीच्या आकाराची सुनामी पासून बनलेली टेकडी त्याच्यावर असलेली उंचच उंच नारळाची आणि विविध प्रकारची झाडे . मस्तच !!!!! नदीचे संथ पाणी आणि समुद्राच्या खळखळून येणाऱ्या लाटा हा संगम इथे बघायला मिळतो. समुद्राच्या पाण्याचा रंग एके ठिकाणी बदललेला दिसतो ,तेवढ्याच भागात लालसर लाटा दिसतात ,असे विचारले असता ,शिवाजी काका म्हणजे ए बी पी माझा चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बातमीदार आमच्यासोबत बोटवर होते आणि तेच सगळी माहिती देत होते.  ते म्हणाले इथे थोडासा भाग जमिनीचा आहे जो सहा महिने  पाण्यात सहा महिने वर  असतो. होडीला इथून जाताना जोरात हिसका बसतो तो याच कारणाने . काय हे अजबच !!


असे एकेक सुंदर नवल अनुभवता आले. सक्षमची पोहण्याची हौस इथे पूर्ण झाली . कारण संगम असल्यामुळे पाणी शांत आणि खोल नव्हते. 
बनाना राईड मध्ये बसवून समुद्र फिरून आणतात आणि मधेच जिथे पाण्याची खोली जास्त नाही तिथे पलटी मारतात ,अंगामध्ये सेफ्टी जाकीट असल्यामुळे आपण लगेच बाहेर येतो पण अनुभव थरारक असतो . त्याच्यानंतर मी मजा घेतली ते पॅरासिलिंगची ,एका अनुभवाला मुकली असली तरी हा पण माझ्या आयुष्यातला रोमांचित अनुभव म्हणावा लागेल. बोटीने समुद्राच्या मधोमध्ये आपल्याला नेतात ,सेफ्टी जाकीट सोबतच पायात नायलॉनची दोरी अडकवतात आणि एका वेळी दोघांना पॅराशूटला जुंपतात ,आणि पॅराशूट आकाशात  सोडतात ऐकूनच भीती वाटली ना????ओहोहो काय  दृश्य होत अविस्मरणीय खाली निळंशार पाणी वरती पांढर शुभ्र आकाश आणि मध्ये आपण .... कुठे बघावं आणि काय काय बघावं. शब्द हि कमी पडे ,न वर्णिले जाती हे अनुभवांचे कवडसे !!!!

अशाप्रकारे आमचा दिवस संपला आणि सोबत एक वेगळाच अनुभव पदराशी घेऊन परतीचा प्रवास सुरु झाला. 

काय ती लाल लाल माती कोकणाची 
कशी मोजावी उंची माडाच्या झाडाची
कौलारू घरे आणि घनदाट वनराई
देवाने इथे कशाचीही कमी केली नाही

प्रत्येक वेळी वेगळा भासणरा समुद्र हा
कधी शांत ,कधी अवखळ ,तर कधी खवळलेला
निसर्गानी सुंदर निळा आणि शुभ्र रंगवलेला
पण पर्यटकांनी स्वार्थसाठी गढूळ केलेला

नीटनेटकी आणि साधीसुधी टुमदार  घरे
जे निसर्गानी दिले ते सहज स्वीकारणारी
 प्रामाणिक आणि निसर्गाशी एकरूप झालेली
आदरतिथ्य जपणारी भाबडी माणसे

क्षितिजापर्यंत  विस्तारलेलं मोकळं  आभाळ
दूरवर पसरलेलं अथांग निळंशार पाणी
आणि त्यावर दिमाखात डोलणारी नाव
फळांचा राजा हापूस खाऊन जातो भाव

करवंद ,जांभूळ ,काजू हा इथला मेवा
निसर्गाचा साज इथे येऊनच बघावा
डोळ्यात साठवाया किती हा ठेवा
परतुनी मागे बघता आठवणी राहाव्या 
Add caption


भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...