Thursday 4 October 2018

चार दिवसांचे गृहिणीत्व .....

written by :Vaibhav Paratwar


तसे तर भारतातल्या जवळपास सगळ्याच धर्मांच्या मान्यतेनुसार स्त्री ने महिन्यातली ४-५ दिवस बाजूला बसून विश्रांती घ्यायची असते. जरी या गोष्टीचे कारण किंवा उद्देश्य पवित्रता असा मानला गेला असला तरी त्यामागे वैज्ञानिक कारणे नक्कीच आहेत. असो, हा विषय याकरिता कि आम्ही पण ठरवलं कि आता महिन्यातले ४ दिवस बायको ला पूर्ण विश्रांती आणि स्वयंपाकघरातून सुट्टी द्यावी.  
आम्ही नुकतेच पर्युषण पर्व साजरा करून पुण्यात पोचलो आणि दुपारी बायको बाजूला बसली. त्या दिवशीचा स्वयंपाक तर झाला होता. पण आता ठरवत होतो कि पुढचे २-३ दिवस काय करायचं? या वेळी नेमकी आई सुद्धा गावाला गेलेली होती आणि मी या आधी पूर्ण स्वयंपाक कधी केला नव्हता. भाजी बारीक करणे, फोडणी घालणे किंवा फार तर फार खिचडी लावणे एवढं केलं होतं. आणि हो भांडी घासण्यात तर आपला हातखंडाच होता त्यामुळे त्याबद्दल काही काळजी करण्यासारखा नव्हता.
आम्ही नवरा बायको तर नुसती खिचडी खाऊन पण राहिलो असतो. पण प्रश्न होता सक्षम चा, आमचे साडेचार वर्षाचे वारसदार! त्याला पोळी/पराठा या शिवाय जमत नाही. मग ठरलं तर. या वेळेस पूर्ण स्वयंपाक मी करायचा. आता प्रश्न होता सकाळी स्वयंपाक करून ऑफिस सुद्धा गाठायचं. तरी माझं भाग्य म्हणावं लागेल कि पुण्यासारख्या शहरात ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे. तरी हे आव्हान स्वीकाराचं ठरवलं.
पहिल्या दिवशीचा अलार्म पहाटे साडेपाच चा लावलेला पण नेहमी प्रमाणे अलार्म बंद करून पडून राहिलो तो उठलो एकदम साडेसहा ला. उठून स्नानादि प्रातःविधी उरकून स्वयंपाक घरात शिरलो. पहिले पाणी गाळून घेतले आणि मग ठरवलं अगोदर आपण जे जमतं ते उरकून घ्यावं. पहिले अंदाजे तांदूळ, डाळ काढली नि कुकर लावला, थोडा अतिविश्वास दाखवला स्वतःवर, कारण बऱ्याच दिवसांनी वरण भात लावणार होतो. तरी नशिबाने साथ दिली आणि वरणभात बऱ्यापैकी जमला. 

भाजी हा एक प्रकार मला जमण्यासारखा होता, तेव्हा सोपी म्हणून दोडक्याची भाजी केली. आणि मात्र आता होता मोठा प्रश्न तो म्हणजे पोळ्यांचा. कणिक मळण्या पासून शिकायचं होतं. त्यासाठी मला मदत हवी होती, कुणीतरी सांगण्याची. बायकोला उठवणं भाग पडलं. किती पीठ घ्यायचं, पाणी कसं टाकायचं, किती टाकायचं,  तेल केव्हा आणि किती लावायचं असं सगळं तिने व्यवस्थित सांगितलं. तरी थोडं पाणी जास्तच झालं. तेव्हा थोडी अजून कणिक घेऊन तेल लावलं आणि एकदाचा आमचा कणकेचा गोळा तयार झाला. 

माझी हि अवस्था पाहून बायको ने फलक्यांपेक्षा पराठे करण्याचे सुचवले आणि मलाही ते पटलं. तिला तिथेच supervision साठी उभं केलं आणि मी पराठे लाटायला सुरुवात केली. आकार तर कधी महाराष्ट्राचा तर कधी श्रीलंकेचा येत होता पण नाईलाज होता. काळजी फक्त एवढी घ्यायची होती कि कडांना कच्च राहू नये. पराठे कशे भाजायचे, किती तेल लावायचं, कधी पालटायचे अस सगळं बायको सांगत गेली. एक दोन पराठे वगळता बाकीचे खाण्यालायक झाले होते असा शेरा खुद्द राणी सरकार कडून मिळाला! केलेल्या श्रमाचं फळ मिळालं असं वाटलं. पण खरी परीक्षा तर होती ती सक्षम ने जेवण करण्याची आणि त्याला आवडण्याची. त्यातही मी कसाबसा पास झालो :). 

त्यादिवशी डोक्यात विचार आला, ज्या गृहिणी नौकरी किंवा व्यवसाय करून आपल्या घरच्यांसाठी सगळा स्वयंपाक करत असतील त्यांची सकाळी सकाळी किती धावपळ आणि श्रम होत असतील? आणि आपल्या पूर्वजांनी जी हि ४ दिवस स्त्री ने बाजूला बसण्याची आणि संपूर्ण विश्रंती घेण्याची जी प्रथा आहे ती पण किती योग्य आहे ते कळलं.  पुरुषांना सुद्धा ४ दिवस आपली पाककला जिवंत ठेवायला आणि नवीन काही शिकायला मिळतं. तेव्हा सर्व पुरुषांनी महिन्यातून ४ दिवस तरी गृहिणीत्व स्वीकारावं आणि त्यातला आनंद घ्यावा!

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...