Monday 1 July 2019

शाळेचा पहिला दिवस

काकांची गडबड पुन्हा चालू झाली .खुर्चीवर बसून मान  सुद्धा न हलवता दुकानातल्या मुलांना सूचना देणे चालू होते. दुकानातल्या गिऱ्हाईकांची गर्दी वाढतच होती . आज तर जेवायला सुद्धा जायला वेळ मिळाला नसावा,काकांचे बोलणे चालू असतानाचं माझी हजेरी दुकानात लागली. माझ्या छोट्याश्या  गावातील एक पुस्तकांचं दुकान ,माझ्या काही आठवणी , हवं तर बालपणच म्हणा ना ह्या दुकानाशी जोडल्या गेलेलं आहे. आज शाळेचा पहिला दिवस होता म्हणून दुकानात लहान मुलांचा आणि पालकांचा किलबिलाट चालू होता . मुलांच्या चेहऱ्यावर नवीन पुस्तक,नवीन वही, नवीन दप्तर खरेदी करण्याचा आनंद ओसंडून वाहत होता . शाळा सुरु झाली कि काकांचे हे नेहमीचेच होते .कुठली पुस्तके कुठे ठेवली आहे हे त्यांच्या अचूक लक्षात राहत होते. कोणी दुकानात गेलं कि पांढऱ्या शुभ्र बंडी  आणि पैजामा घातलेले काका मोठ्या आवाजात विचारत "ए पोरा कितव्या वर्गाला गेला रे ???"काकांचा आवाज ऐकून तो गोंधळून विचार करत असे ,थोडा वेळ निघून गेल्यावर त्याला आठवून सांगणे भाग पडे "काका सातवीत गेलोय यंदा " . मान  सुद्धा न हलवता ३ ऱ्या नंबर  मधून पुस्तकांचा ७ विचा संच बाहेर काढ रे . दुकानातली काम करणारी मुले ह्या काकांच्या रोजच्या बोलण्याला सरावली होती.   परत २७ वर्ष पूर्वी ची  काकांची छबी मी आज पुन्हा अनुभवली,तोच आवाज ,तीच बंडी-पैजामा  ,तेच दुकान ,तोच मुलांचा किलबिलाट .आज त्या शाळेच्या मुलांच्या गर्दीत मी मला शोधत होते.

शाळेचा पहिला दिवस आणि हमखास बरसणारा तो पाऊस . शाळा जुनीच असली तरी  वर्ग मात्र नवीन असायचा ,पहिल्या दिवशी बाकड्यावर जागा पकडायला सगळ्यांची धडपड  असायची पहिला बेंच म्हणजे वर्गातील सगळ्यात हुशार मुलांचा ,त्यांना डुलकी सुद्धा द्यायला परवानगी नसायची . शेवटचा बेंच हा सगळ्यात उडाणटप्पू पोरांचा ,म्हणून मधला कुठला तरी बाक पकडावा सोबत जुनीच मैत्रीण यावी यासाठी ३ दिवस आधी नियोजन व्हायचे . पहिला तास हेडमास्तर सरांचा असायचा ,नेहमी त्यांच्या तासाला पाऊस का येतो हे गणित कधीच सुटले नाही ,आधीच अस्पष्ट असलेले शब्द पावसाच्या आवाजात लुप्त व्हायचे. आणि त्यापैकी कानावर फक्त पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा आवाज जोर करून जायचा. पहिल्या दिवशी पुस्तकांची यादी देऊन डब्बा खाऊन शाळा लवकर सुटायची ,कारण सगळ्यांनाच वेध लागायचे ते नवीन -नवीन खरेदी करण्याचे . मी सुद्धा सायकलला   पायडल मारून घरून पैसे घेऊन पुस्तक आणायला बाहेर पडत असे . तेव्हा पावसाची चिंता नव्हती आणि आईच्या रागावण्याची सुद्धा नाही . 

आज भूतकाळात शिरून परत एकदा काकांना ७ वि चा पुस्तकांचा संच मागावा असे वाटत होते .आणि परत एकदा तो नवीन पुस्तकांचा सुंगंध  नाकात घ्यावा आणि तो कोरा करकरीत स्पर्श नेहमीसाठी जपून ठेवावा.पण पुन्हा एकदा विजेसोबत काकांच्या आवाजाचा गडगडाट झाला ,"वह्या पाहिजे का रे ????" आणि मी भूतकाळात डोकावून लगेच बाहेर आली ,"हो काका " सौम्य आवाजात मुलाने उत्तर दिले. "छोट्या ५ नंबर  मधून ६ वह्या काढ रे " ,
"पण काका मला ७ वह्या पाहिजे  "गांगरून मुलाने सांगितले . 

"७वि कशाला पाहिजे रे तुला ६ च विषय आहे ना ??"     

"एक वही रफ करावी म्हणतो सगळ्या विषयासाठी "

काकांची पुन्हा एकदा गर्जना " मेल्या ...तुझ्या बापाकडे जास्त पैसे झालेय का रे ??रफ वही म्हणून दुसरी वही घेऊन जा "

आणि मुलाला सांगून काका एक जुनी पानांची वही त्याच्याकडे सोपवत असत . आणि काका घेतील तो  अंतिम निर्णय समजून आपल्या पदरात पडून घ्यावं लागत असे. 

 काकांचा तोंडातून असाच  स्तोत्र दिवसभर  चालू राही. शेवटी "कंपास आहे का रे मागच्या वर्षीचा ??"

"फक्त पेन्सिल आणि रबर शिल्लक आहे काका "

मग काका  पेन्सिल आणि रबर वगळून बाकी सगळे सामान स्वतःच्या हातानी कंपासात लावून द्यायचे . आणि कोणी पेन्सिल मागितली तर "आधी जुनी संपव मग नवीन फुकट देतो तुला"हे वाक्य ठरलेलं असायचं . 

जून संपल्याशिवाय काकांनी आम्हाला कधीही नवीन घेऊ दिल नाही म्हणून की काय अजूनही "नवीन पेन्सिल च अप्रूप टिकून आहे "

सक्षम साठी कवितांचे २ पुस्तक घेऊन आणि भूतकाळातील शाळेच्या आणि सोबत काकांच्या  आठवणी सोबत घेऊन मी बाहेर पडले.   



शाळेचा तो पहिला दिवस खास ....... 
नवीन वहीचा कोरा कोरा वास ....... 
अजूनही तसाच जपून ठेवला आहे मनाच्या कप्प्यात ..... 

पावसाच्या सरींचा  तो आवाज
आणि हेडमास्तरांचा पहिला तास 
करकरीत स्पर्श  नवीन पुस्तकांचा 
गणिताच्या वहीवर अर्धवट शेरा बाईंचा 

स्टाफ रूम जवळच ते पारिजातकाचं झाड 
ओल्या झालेल्या मातीचा सुगंध आसमंतात 
पावसाने  चिंब भिजलेली लाल भिंत शाळेची 
खिडकीतून नजर सारखीच बाहेर जायची 

 काळ्या फळ्यावर ते  पांढरे खडू उमटलेले  
रेनकोट दप्तरात ठेऊन मुद्दाम क्षण भिजलेले 
सगळ्यांनी सोबत म्हटलेल्या कविता मराठीच्या 
पिटी च्या तासाला खेळलेला खेळ लंगडीचा 

त्या घंटेचा आवाज अजूनही कानात तसाच आहे 
मैत्रिणींसोबत घातलेला गोंधळ अजूनही लक्षात आहे 
वर्गात सगळ्यांसमोर सांडलेला माझा डब्बा 
आठवून ओशाळून टाकतो आजही मला 

पुन्हा एकदा लहान व्हायचंय 
ते निरागस बालपण परत अनुभवायचं 
मला परत एकदा शाळेत जायचंय 


Sunday 10 February 2019

कुठेतरी हरवत चाललेला संवाद

काल  पर्वाची गोष्ट आहे ,निवांत वेळ मिळाला की मुलांना एकत्र करणे आणि गप्पा मारणे हा माझा आवडीचा विषय . खूप निरागस उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळतात . त्यांच्या चौकटीतले प्रश्न विचारले तर त्यांना जमतील तसे त्यांच्या त्रिज्या जिथपर्यंत रुंदावू शकतात तेवढे वेगवेगळे आणि सुंदर पैलू असलेले उत्तरे मिळतात. पण सध्या आजूबाजूची परिस्थिती बघितली  तर  हे कुठेतरी खुंटलंय  याची जाणीव होते . बागेमध्ये सगळा  मुलांचा गोतावळा खेळायला येतो तेव्हा काहीतरी खायला आणावं म्हणून  आई वर्गातल्या बहुतेक बायका इझी टू  कॅरी असं पॅक फूड  आणतात . गप्पा टप्पा च्या खेळामध्ये मी मुलांना विचारलेला सोपा प्रश्न "तुम्हाला माहितेय का लेझ च्या चिप्स कुठून येतात ???"मला ह्या प्रश्नावर खूप विविध प्रकारची उत्तरे येतील किंबहुना चिप्स  शेतातून येऊ शकतात का ??   , इथपर्यंत तरी मुले विचार करतील  अशी किमान अपेक्षा होती . परंतु उत्तरे ज्याप्रमाणे आली ते मला स्वतःला  स्तब्ध करण्यासाठी  कारणीभूत ठरली . लेझ च्या चिप्स ह्या आपल्या सोसायटी समोर असलेल्या दुकानातून येतात . अच्छा मस्त !!!आता मला सांगा त्या दुकानात कुठून येतात ??तर सगळे ओरडली   amzon वरून .वा वा छान च उत्तर आहे !! आणि amazon  ला कुठून   येतात तर लॅपटॉप मधून !! अक्षरशः  कीव करावीशी वाटते मला आजच्या बाल पिढी ची . एवढीच  विचार करण्याची त्रिज्या.  मला आठवतंय लहान असतांना आई हात धरून भाजी मंडई मध्ये घेऊन जायची  भाजी आणणे हा तर फक्त बहाणा होता ,बाहेर  हुंदडायला  मिळेल म्हणून मी ही संधी सोडत नसे.मंडई मध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त मज्जा यायची ते भाजीवाला आणि आईचा हिंदीत चाललेला संवाद ऐकून . समस्त दूधवाले किंवा भाजीवाले हे भैया लोक असतात अशी माझ्या आईची समजूत आहे . त्यामुळे त्यांच्याशी हिंदीतच बोलायला पाहिजे असा तिचा गोड   गैरसमज  आहे. भाजी ऐसी शिळी क्यू लग रहि है ??इति माझी आई,"शिळी थोडी ना है बाई ,कूच भी म्हणता तुम्ही "इति भाजीवाली मावशी असा अस्खलित हिंदी मराठी संवाद ऐकायला खूप गंमत यायची ,ओळखीचं कोणी भेटलं कि गप्पा व्हायच्या ,सुख दुःखाची देवाण घेवाण व्हायची . कमीत कमी संवादाचा आस्वाद तरी होता . आता मात्र हा संवादच अपवाद ठरला आहे ह्याच वाईट वाटतं . ऑनलाईन शॉपिंग ने माणसाचं खूप काम हलकं केलय ,बोटाच्या एक क्लिक सरशी पाहिजे ते पाहिजे तिथून तुमच्या दारात पोहचत आहे कमालच नाही का!! अहो पण त्यामध्ये जिवंतपणा नाही ना . कुठे हरवलाय  तो सवांद ??


मुलांची किंवा पालकांची ह्यामध्ये चूक आहे अस अजिबात नाही . पण इझी गो लाईफ झाल्यामुळे भावनांना जागा राहिली नाही. आई बाबांशी गप्पा मारण्यापेक्षा आजच्या  मुलांना एकांत आणि लॅपटॉप किंवा मोबाईल जास्त प्रिय आहे.थोडंस थांबून आपणच आपल्या मुलांबद्दल विचार करायला हवा . आपल्या पाल्याला त्याची किंवा तिची स्पेस मिळायलाच हवी पण कमीतकमी नात्यांमधील संवादच संपेल असं होऊ नये  .कुठल्याही  स्पर्धेत मिळालेल्या  बक्षीसाचा  आनंद त्याला फेसबुक वर शेयर करण्याआधी आई वडिलांसोबत साजरा करायाला जमलं तरच नात्यामध्ये जिवंतपणा राहू शकतो .


एका १५ वर्षाच्या मुलाला सहज विचारले "तुला मित्र किती रे ?"फेसबुक वर  २०० आणि व्हाट्स अँप वर मित्रांची गिनतीच नाही .तू इतक्या सगळ्या मित्रांना कधी भेटतोस? छे !! मी प्रत्यक्ष खूप जणांना भेटलोच नाहीय अजून. ज्याच्या सोबत मनमोकळं हसता येत ,गळ्यात हात टाकून भटकंती करता येते असा हक्काचा एक तरी मित्र आहे का तुला ?? हो आमचा ४ जणांचा छान  ग्रुप आहे . पण आम्ही व्हाट्स अप वरच जास्त बोलतो ,dp बदलून आपलं लुक आज कसे आहे ते कळवतो ,स्टेटस ठेऊन जगातल्या  प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे हे दर्शवतो  ,अंथरुणातून उठण्याच्या आधीच सगळ्यांना हायफाय ठोकतो ,आणि आमच्या सगळ्या भावना smily वापरून समोरच्यापर्यंत पोहचवतो. हे व्हर्चुअल दिसत असलं ना तरी हेच माझं विश्व आहे आणि हल्ली मी यातच बिझी आहे. अगदी खरंय !!! सगळीकडे हेच दिसतंय ,इथे माणसांची एवढी गर्दी असूनही शांतता आहे . कारण तेच संवाद मुका झालाय .एखादा विनोद सांगितल्यावर कट्ट्यावर जेव्हा मित्रांच्या समुहामधून खळखळण्याचा जो आवाज येतो ,हातावर टाळी देत आनंद साजरा होतो. दुःख ,हास्य ,वेदना,क्रोध ,संताप,प्रेम,आपुलकी ,मिठी ह्या भावनांची सर व्हाट्स अप वरच्या smilies  ला येईल का हो ???एका दूरच्या नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. नवरदेवासोबत त्याचे ५० कॉलेज गोइंग मित्र होते ,सगळे नाचून एन्जॉय करत होते .एवढे मित्र कसे काय ??हल्ली ५ मित्रही दिसत नाही . तेव्हा कळले कि हे सगळे मित्र म्हणजे नवरदेवाची "ओटा गॅंग" होती ,शाळा सुटल्यावर समोरच असलेल्या ओट्यावर सगळे एकत्र बसायचे आणि तासनतास तिथे घालवायचे ,शाळेमधल्या सरांची केलेली नक्कल असेल,एखाद्या मित्राची टर  उडवणे असेल , क्रिकेटच्या गप्पा असतील, एखाद्याच्या बहिणीच्या लग्नात केलेली कामे  असतील , परीक्षा संबंधी चर्चा असेल अनेक गोष्टी या ओट्याने वाटून घेत ल्या असतील .पण आज हा  ओटा ओस पडलाय ,जो तो हातात मोबाइल घेऊन इथे बसतो,आणि स्वतःच्या दुनियेत मश्गुल असतो . बाजूला हाकेच्या अंतरावर असलेल्या मित्राशी बोलायला वेळ नाही आणि सात समुद्र पलीकडे असेल्या शी व्हाट्स अप वरून चाट होतात . काही दिवसात पैसे देऊन भावना share करायला कोणीतरी विकत घेण्याची  वेळ येऊ नये.

कुठेतरी हरवलेला संवाद ,मला वाटत असलेली खंत आज शब्दांच्या माध्यमातून मोकळी झाली


.  

Wednesday 30 January 2019

जेवढ्या निराळ्या आकृती तेवढ्या वेगळ्या प्रकृती

राजकारणातील लोकांचा किंवा गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे   कधी संबंध आला नाही आणि तो यावा अशी माझी इच्छाही  नाही. राजकारण ह्याचा अर्थ माझ्यासाठी फक्त अर्थासाठी राजे लोकांनी शोधून काढलेलं कारण हाच आहे. मला ते  समजवून घ्याव अस कधीही वाटलं नाही. मतदानाचा हक्क सुद्धा मी फक्त त्याच दिवशी मनावर दगड ठेवल्याप्रमाणे  राबवून येते . साडी ला फॉल कुठला लावायचा किंवा उद्या पाहुणे येणार असतील तर भाजी कुठली करायची , ??हे माझ्यासाठी राजकारण समजवून घेण्या  पेक्षा महत्वाचे प्रश्न आहेत. मला सुज्ञ नागरिक नाही म्हटलं तरी चालेल त्यासाठी अजिबात हरकत नाही . आलिया भट  जसे उत्तर देते तसेच राजकारण ह्या विषयावरची माझ्याकडून उत्तरे येऊ शकतात आणि मला प्रांजळपणे कबूल करायला कुठलीही खंत नाही   !!!!

हा विषय लिहण्याच कारण असं की ,अलीकडेच एका गुन्हेगारी म्हणजेच राजकारण क्षेत्रातील एक व्यक्तीशी माझी झालेली भेट.ही भेट मी स्वतः घडवून आणलेली नाही ,तो एक योगायोगच . सासरी गेल्यानंतर ४ दिवसाच्या प्रवासात सगळ्या  गोष्टी साच्यातुन निघाल्याप्रमाणेच घडतात .खूप नाही पण ७  वर्षाचा सारखा तोच  अनुभव असल्यामुळे मी हे इतके ठामपणे सांगू शकते .  पोहचल्या पासून कोण कोण  व्यक्ती भेटायला येणार त्यांच्यासोबत बोलण्याचे विषय कोणते ,कोण व्यक्ती कधी येऊ शकतो ???हेच काय रिकामे होणारे चहाचे कप ह्याची संख्या सुद्धा बदलत नसावी कदाचित!!! 

ह्यावर्षी एका नवीन व्यक्तीची भर पडली आणि सोबत ८-१० चहाचे कप रिकामे होण्याचीही . कारण घरी येणारी व्यक्ती एकटी नव्हती सोबत ४ अंगरक्षक असायचेच . डोक्यावर  केशरी टीळा ,  हातात रुद्राक्षाची माळ ,गळ्यात सोन्याचे दागिने,कडक इस्त्री केलेला  झब्बा आणि पांढरी चुडीदार ,वाढलेले केस ,राजकारणी अदब . घरात एन्ट्री पण ""नमस्का ssssss र वहिनी "ओळखलं का??? मी कधी आधी पाहिलंय अस वाटत नव्हतं माझी मोठी जाऊ, तिची पण प्रतिक्रिया काहीशी अशीच. सासूबाईंनी ओळख करून दिली अगं  हा संजू  ... आपल्या दुकानात नव्हता का कामाला ???आतामात्र ५ -५० लोक कामाला ठेवलेत ह्यानी. आमच्या चेहऱयावर प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य "तो छोटासा संजू  ...  ज्याला दुकानात रोज उशिरा यायचा त्यासाठी बाबांनी सायकल घेऊन दिली होती ?????" खरं म्हणजे एकंदर व्यक्ती बघून संजू  असा एकेरी आवाज देतांना सुद्धा आमची गाळण  उडाली. पण तोच सरसावला आणि म्हणाला वहिनी अख्या गावात बाकी कोणाची हिंमत नाही आपल्याला संजू म्हणायची सरळ जीभ तोडून हातात देणारा माणूस आहे आपण पण बाबांनी खूप केलय आपल्यासाठी म्हणून अजूनही घरी येतो . आज आपल्या दारात ४- ५ गाड्या उभ्या आहेत सकाळी विचार करावा लागतो कुठली गाडी न्यायची तरिही  पण अजूनही बाबांनी दिलेली सायकल भी तशीच हाय.मुंबईला   जेव्हा मोर्चा निघाला होता तेव्हा मी १७ दिवस उपोषण केलं आणि  मुख्यमंत्री स्वतः येऊन भेटून  गेले  ,माझ्या लग्नाला सगळे राजकारणातील मंडळी उपस्थित होती ह्याच वर्णन संजूनी  खूप  रंगवून रंगवून  सांगितलं. ह्या जिल्ह्यातील एकही अस जेल नाही जिथे मी जाऊन आलो नाही ,सगळे पोलीस आपले मित्र आहेत . अरेस्ट वॉरंट निघालं कि मला आधी पोलीस स्टेशन मधून फोन येतो आणि मी आलोच म्हणून पोलिसांना कळवतो आणि लगेच  दुसऱ्या दिवशी बेल वर सुटतो .

नेमकं तू काय करतो???असं विचारल्यावर इतकं सहजपणे संजू सांगतो एकदा पोलीस गाडीत बसला असताना पेट्रोल टाकून गाडी पेटवली आणि २ दिवस जाऊन आलो जेल  ची हवा खाऊन आलो ,कोणाची जागा ताब्यात घ्यायची असेल ,कोणाचे भांडण सोडवायचे असेल तर पैसे घेऊन हेच काम करतो. पण आजपर्यंत रेकॉर्ड आहे आपला चोरी ,खून या भानगडीत आपण पडलो नाही . जो व्यक्ती बरोबर आहे असं वाटत त्याच्या बाजूने आपण उभे राहतो . खूप दोन नंबर कमवले पण आता नकोय बस झालं . आता आपल्याला इलेकशन ला उभा राहायचंय . बायकोला माहिती आहे का?? असं विचारल्यावर चक्क संजू लाजला ,म्हणतो "चला वाहिनी आता घरी आणि सांगा संजू कुठेतरी भांडणात अडकलाय ,घाबरण्यापेक्षा किंवा रडत बसण्यापेक्षा ती स्वतः तलवार घेऊन येते हातात " धन्य आहे संजू आणि तुझी सहचारिणी एवढेच मी बोलू शकले. 

दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर जाऊन आलो ,पुन्हा संजू आणि चार अंगरक्षक घरात बसलेले दिसले हे बघा वाहिनी ,म्हणून संजू ने  हात पुढे केला ब्रेसलेट सारखं हातात काहीतरी दिसलं सापाच्या आकाराच काहीतरी होतं ,जवळ जाऊन बघितलं तर मी जवळ जवळ किंचाळलेच आणि पलंगावर चढून बसले ,कारण ते ब्रेसलेट नसून खरोखरचं साप होता .संजू एक सर्पमित्र आहे . सक्षम ला एक  साप पकडण्याचा नवीन अनुभव संजूनी दिला .त्यामुळे सापाची भीती सक्षमच्या मनातून निघून गेली आणि साप माझा मित्र आहे असं तो सांगायला लागला . असा एक नवीन रोमांचक प्राण्याशी (संजूशी ) माझी ओळख झाली   

त्याच्या मित्राला (सापाला )खिशात टाकून आपल्या घोड्यावर स्वार होऊन संजू निघून गेला  आणि माझी लेखणी एक नवीन अनुभव शब्दात लिहायला सरसावली


भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...