Sunday 10 February 2019

कुठेतरी हरवत चाललेला संवाद

काल  पर्वाची गोष्ट आहे ,निवांत वेळ मिळाला की मुलांना एकत्र करणे आणि गप्पा मारणे हा माझा आवडीचा विषय . खूप निरागस उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळतात . त्यांच्या चौकटीतले प्रश्न विचारले तर त्यांना जमतील तसे त्यांच्या त्रिज्या जिथपर्यंत रुंदावू शकतात तेवढे वेगवेगळे आणि सुंदर पैलू असलेले उत्तरे मिळतात. पण सध्या आजूबाजूची परिस्थिती बघितली  तर  हे कुठेतरी खुंटलंय  याची जाणीव होते . बागेमध्ये सगळा  मुलांचा गोतावळा खेळायला येतो तेव्हा काहीतरी खायला आणावं म्हणून  आई वर्गातल्या बहुतेक बायका इझी टू  कॅरी असं पॅक फूड  आणतात . गप्पा टप्पा च्या खेळामध्ये मी मुलांना विचारलेला सोपा प्रश्न "तुम्हाला माहितेय का लेझ च्या चिप्स कुठून येतात ???"मला ह्या प्रश्नावर खूप विविध प्रकारची उत्तरे येतील किंबहुना चिप्स  शेतातून येऊ शकतात का ??   , इथपर्यंत तरी मुले विचार करतील  अशी किमान अपेक्षा होती . परंतु उत्तरे ज्याप्रमाणे आली ते मला स्वतःला  स्तब्ध करण्यासाठी  कारणीभूत ठरली . लेझ च्या चिप्स ह्या आपल्या सोसायटी समोर असलेल्या दुकानातून येतात . अच्छा मस्त !!!आता मला सांगा त्या दुकानात कुठून येतात ??तर सगळे ओरडली   amzon वरून .वा वा छान च उत्तर आहे !! आणि amazon  ला कुठून   येतात तर लॅपटॉप मधून !! अक्षरशः  कीव करावीशी वाटते मला आजच्या बाल पिढी ची . एवढीच  विचार करण्याची त्रिज्या.  मला आठवतंय लहान असतांना आई हात धरून भाजी मंडई मध्ये घेऊन जायची  भाजी आणणे हा तर फक्त बहाणा होता ,बाहेर  हुंदडायला  मिळेल म्हणून मी ही संधी सोडत नसे.मंडई मध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त मज्जा यायची ते भाजीवाला आणि आईचा हिंदीत चाललेला संवाद ऐकून . समस्त दूधवाले किंवा भाजीवाले हे भैया लोक असतात अशी माझ्या आईची समजूत आहे . त्यामुळे त्यांच्याशी हिंदीतच बोलायला पाहिजे असा तिचा गोड   गैरसमज  आहे. भाजी ऐसी शिळी क्यू लग रहि है ??इति माझी आई,"शिळी थोडी ना है बाई ,कूच भी म्हणता तुम्ही "इति भाजीवाली मावशी असा अस्खलित हिंदी मराठी संवाद ऐकायला खूप गंमत यायची ,ओळखीचं कोणी भेटलं कि गप्पा व्हायच्या ,सुख दुःखाची देवाण घेवाण व्हायची . कमीत कमी संवादाचा आस्वाद तरी होता . आता मात्र हा संवादच अपवाद ठरला आहे ह्याच वाईट वाटतं . ऑनलाईन शॉपिंग ने माणसाचं खूप काम हलकं केलय ,बोटाच्या एक क्लिक सरशी पाहिजे ते पाहिजे तिथून तुमच्या दारात पोहचत आहे कमालच नाही का!! अहो पण त्यामध्ये जिवंतपणा नाही ना . कुठे हरवलाय  तो सवांद ??


मुलांची किंवा पालकांची ह्यामध्ये चूक आहे अस अजिबात नाही . पण इझी गो लाईफ झाल्यामुळे भावनांना जागा राहिली नाही. आई बाबांशी गप्पा मारण्यापेक्षा आजच्या  मुलांना एकांत आणि लॅपटॉप किंवा मोबाईल जास्त प्रिय आहे.थोडंस थांबून आपणच आपल्या मुलांबद्दल विचार करायला हवा . आपल्या पाल्याला त्याची किंवा तिची स्पेस मिळायलाच हवी पण कमीतकमी नात्यांमधील संवादच संपेल असं होऊ नये  .कुठल्याही  स्पर्धेत मिळालेल्या  बक्षीसाचा  आनंद त्याला फेसबुक वर शेयर करण्याआधी आई वडिलांसोबत साजरा करायाला जमलं तरच नात्यामध्ये जिवंतपणा राहू शकतो .


एका १५ वर्षाच्या मुलाला सहज विचारले "तुला मित्र किती रे ?"फेसबुक वर  २०० आणि व्हाट्स अँप वर मित्रांची गिनतीच नाही .तू इतक्या सगळ्या मित्रांना कधी भेटतोस? छे !! मी प्रत्यक्ष खूप जणांना भेटलोच नाहीय अजून. ज्याच्या सोबत मनमोकळं हसता येत ,गळ्यात हात टाकून भटकंती करता येते असा हक्काचा एक तरी मित्र आहे का तुला ?? हो आमचा ४ जणांचा छान  ग्रुप आहे . पण आम्ही व्हाट्स अप वरच जास्त बोलतो ,dp बदलून आपलं लुक आज कसे आहे ते कळवतो ,स्टेटस ठेऊन जगातल्या  प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे हे दर्शवतो  ,अंथरुणातून उठण्याच्या आधीच सगळ्यांना हायफाय ठोकतो ,आणि आमच्या सगळ्या भावना smily वापरून समोरच्यापर्यंत पोहचवतो. हे व्हर्चुअल दिसत असलं ना तरी हेच माझं विश्व आहे आणि हल्ली मी यातच बिझी आहे. अगदी खरंय !!! सगळीकडे हेच दिसतंय ,इथे माणसांची एवढी गर्दी असूनही शांतता आहे . कारण तेच संवाद मुका झालाय .एखादा विनोद सांगितल्यावर कट्ट्यावर जेव्हा मित्रांच्या समुहामधून खळखळण्याचा जो आवाज येतो ,हातावर टाळी देत आनंद साजरा होतो. दुःख ,हास्य ,वेदना,क्रोध ,संताप,प्रेम,आपुलकी ,मिठी ह्या भावनांची सर व्हाट्स अप वरच्या smilies  ला येईल का हो ???एका दूरच्या नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. नवरदेवासोबत त्याचे ५० कॉलेज गोइंग मित्र होते ,सगळे नाचून एन्जॉय करत होते .एवढे मित्र कसे काय ??हल्ली ५ मित्रही दिसत नाही . तेव्हा कळले कि हे सगळे मित्र म्हणजे नवरदेवाची "ओटा गॅंग" होती ,शाळा सुटल्यावर समोरच असलेल्या ओट्यावर सगळे एकत्र बसायचे आणि तासनतास तिथे घालवायचे ,शाळेमधल्या सरांची केलेली नक्कल असेल,एखाद्या मित्राची टर  उडवणे असेल , क्रिकेटच्या गप्पा असतील, एखाद्याच्या बहिणीच्या लग्नात केलेली कामे  असतील , परीक्षा संबंधी चर्चा असेल अनेक गोष्टी या ओट्याने वाटून घेत ल्या असतील .पण आज हा  ओटा ओस पडलाय ,जो तो हातात मोबाइल घेऊन इथे बसतो,आणि स्वतःच्या दुनियेत मश्गुल असतो . बाजूला हाकेच्या अंतरावर असलेल्या मित्राशी बोलायला वेळ नाही आणि सात समुद्र पलीकडे असेल्या शी व्हाट्स अप वरून चाट होतात . काही दिवसात पैसे देऊन भावना share करायला कोणीतरी विकत घेण्याची  वेळ येऊ नये.

कुठेतरी हरवलेला संवाद ,मला वाटत असलेली खंत आज शब्दांच्या माध्यमातून मोकळी झाली


.  

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...