Monday 1 July 2019

शाळेचा पहिला दिवस

काकांची गडबड पुन्हा चालू झाली .खुर्चीवर बसून मान  सुद्धा न हलवता दुकानातल्या मुलांना सूचना देणे चालू होते. दुकानातल्या गिऱ्हाईकांची गर्दी वाढतच होती . आज तर जेवायला सुद्धा जायला वेळ मिळाला नसावा,काकांचे बोलणे चालू असतानाचं माझी हजेरी दुकानात लागली. माझ्या छोट्याश्या  गावातील एक पुस्तकांचं दुकान ,माझ्या काही आठवणी , हवं तर बालपणच म्हणा ना ह्या दुकानाशी जोडल्या गेलेलं आहे. आज शाळेचा पहिला दिवस होता म्हणून दुकानात लहान मुलांचा आणि पालकांचा किलबिलाट चालू होता . मुलांच्या चेहऱ्यावर नवीन पुस्तक,नवीन वही, नवीन दप्तर खरेदी करण्याचा आनंद ओसंडून वाहत होता . शाळा सुरु झाली कि काकांचे हे नेहमीचेच होते .कुठली पुस्तके कुठे ठेवली आहे हे त्यांच्या अचूक लक्षात राहत होते. कोणी दुकानात गेलं कि पांढऱ्या शुभ्र बंडी  आणि पैजामा घातलेले काका मोठ्या आवाजात विचारत "ए पोरा कितव्या वर्गाला गेला रे ???"काकांचा आवाज ऐकून तो गोंधळून विचार करत असे ,थोडा वेळ निघून गेल्यावर त्याला आठवून सांगणे भाग पडे "काका सातवीत गेलोय यंदा " . मान  सुद्धा न हलवता ३ ऱ्या नंबर  मधून पुस्तकांचा ७ विचा संच बाहेर काढ रे . दुकानातली काम करणारी मुले ह्या काकांच्या रोजच्या बोलण्याला सरावली होती.   परत २७ वर्ष पूर्वी ची  काकांची छबी मी आज पुन्हा अनुभवली,तोच आवाज ,तीच बंडी-पैजामा  ,तेच दुकान ,तोच मुलांचा किलबिलाट .आज त्या शाळेच्या मुलांच्या गर्दीत मी मला शोधत होते.

शाळेचा पहिला दिवस आणि हमखास बरसणारा तो पाऊस . शाळा जुनीच असली तरी  वर्ग मात्र नवीन असायचा ,पहिल्या दिवशी बाकड्यावर जागा पकडायला सगळ्यांची धडपड  असायची पहिला बेंच म्हणजे वर्गातील सगळ्यात हुशार मुलांचा ,त्यांना डुलकी सुद्धा द्यायला परवानगी नसायची . शेवटचा बेंच हा सगळ्यात उडाणटप्पू पोरांचा ,म्हणून मधला कुठला तरी बाक पकडावा सोबत जुनीच मैत्रीण यावी यासाठी ३ दिवस आधी नियोजन व्हायचे . पहिला तास हेडमास्तर सरांचा असायचा ,नेहमी त्यांच्या तासाला पाऊस का येतो हे गणित कधीच सुटले नाही ,आधीच अस्पष्ट असलेले शब्द पावसाच्या आवाजात लुप्त व्हायचे. आणि त्यापैकी कानावर फक्त पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा आवाज जोर करून जायचा. पहिल्या दिवशी पुस्तकांची यादी देऊन डब्बा खाऊन शाळा लवकर सुटायची ,कारण सगळ्यांनाच वेध लागायचे ते नवीन -नवीन खरेदी करण्याचे . मी सुद्धा सायकलला   पायडल मारून घरून पैसे घेऊन पुस्तक आणायला बाहेर पडत असे . तेव्हा पावसाची चिंता नव्हती आणि आईच्या रागावण्याची सुद्धा नाही . 

आज भूतकाळात शिरून परत एकदा काकांना ७ वि चा पुस्तकांचा संच मागावा असे वाटत होते .आणि परत एकदा तो नवीन पुस्तकांचा सुंगंध  नाकात घ्यावा आणि तो कोरा करकरीत स्पर्श नेहमीसाठी जपून ठेवावा.पण पुन्हा एकदा विजेसोबत काकांच्या आवाजाचा गडगडाट झाला ,"वह्या पाहिजे का रे ????" आणि मी भूतकाळात डोकावून लगेच बाहेर आली ,"हो काका " सौम्य आवाजात मुलाने उत्तर दिले. "छोट्या ५ नंबर  मधून ६ वह्या काढ रे " ,
"पण काका मला ७ वह्या पाहिजे  "गांगरून मुलाने सांगितले . 

"७वि कशाला पाहिजे रे तुला ६ च विषय आहे ना ??"     

"एक वही रफ करावी म्हणतो सगळ्या विषयासाठी "

काकांची पुन्हा एकदा गर्जना " मेल्या ...तुझ्या बापाकडे जास्त पैसे झालेय का रे ??रफ वही म्हणून दुसरी वही घेऊन जा "

आणि मुलाला सांगून काका एक जुनी पानांची वही त्याच्याकडे सोपवत असत . आणि काका घेतील तो  अंतिम निर्णय समजून आपल्या पदरात पडून घ्यावं लागत असे. 

 काकांचा तोंडातून असाच  स्तोत्र दिवसभर  चालू राही. शेवटी "कंपास आहे का रे मागच्या वर्षीचा ??"

"फक्त पेन्सिल आणि रबर शिल्लक आहे काका "

मग काका  पेन्सिल आणि रबर वगळून बाकी सगळे सामान स्वतःच्या हातानी कंपासात लावून द्यायचे . आणि कोणी पेन्सिल मागितली तर "आधी जुनी संपव मग नवीन फुकट देतो तुला"हे वाक्य ठरलेलं असायचं . 

जून संपल्याशिवाय काकांनी आम्हाला कधीही नवीन घेऊ दिल नाही म्हणून की काय अजूनही "नवीन पेन्सिल च अप्रूप टिकून आहे "

सक्षम साठी कवितांचे २ पुस्तक घेऊन आणि भूतकाळातील शाळेच्या आणि सोबत काकांच्या  आठवणी सोबत घेऊन मी बाहेर पडले.   



शाळेचा तो पहिला दिवस खास ....... 
नवीन वहीचा कोरा कोरा वास ....... 
अजूनही तसाच जपून ठेवला आहे मनाच्या कप्प्यात ..... 

पावसाच्या सरींचा  तो आवाज
आणि हेडमास्तरांचा पहिला तास 
करकरीत स्पर्श  नवीन पुस्तकांचा 
गणिताच्या वहीवर अर्धवट शेरा बाईंचा 

स्टाफ रूम जवळच ते पारिजातकाचं झाड 
ओल्या झालेल्या मातीचा सुगंध आसमंतात 
पावसाने  चिंब भिजलेली लाल भिंत शाळेची 
खिडकीतून नजर सारखीच बाहेर जायची 

 काळ्या फळ्यावर ते  पांढरे खडू उमटलेले  
रेनकोट दप्तरात ठेऊन मुद्दाम क्षण भिजलेले 
सगळ्यांनी सोबत म्हटलेल्या कविता मराठीच्या 
पिटी च्या तासाला खेळलेला खेळ लंगडीचा 

त्या घंटेचा आवाज अजूनही कानात तसाच आहे 
मैत्रिणींसोबत घातलेला गोंधळ अजूनही लक्षात आहे 
वर्गात सगळ्यांसमोर सांडलेला माझा डब्बा 
आठवून ओशाळून टाकतो आजही मला 

पुन्हा एकदा लहान व्हायचंय 
ते निरागस बालपण परत अनुभवायचं 
मला परत एकदा शाळेत जायचंय 


भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...