Wednesday 1 December 2021

मला वाचवा


 माझ्या डोक्यात बरेचदा विचार येतो कुठले दिवस असतील जे मी परत जगता यावे म्हणून देवाकडे मागेल?  'back to school ' एकमेव उत्तर.  क्या दिन थे यार ! खरंच शाळेतले दिवस हे फुलपाखरासारखे रंगीत बागडणारे दिवस होते. आणि त्यातल्या त्यात मी खूप अभ्यासू वगैरे च्या संख्येत यायची त्यामुळे आयुष्यातही  टॉप राहूच ही  खात्री होती. जेव्हा रिअल वर्ल्ड मध्ये एन्ट्री घेतली तेव्हा लक्षात आले इथे सगळेच काही वेगळे आहे. आतापर्यंत पुस्तकात जी थेअरी वाचली ती इथे लागू होत नाही .इथे फिट बसतील असे फंडे शाळेत शिकवलेच नाही. आणि हा विचार करण्यास भाग पाडले भारतातील गुरुकुल प्रणाली किती बेस्ट होती. जीवनात उदरनिर्वाह होण्याकरिता लागणारे शिक्षण व त्याबरोबरच एक समृद्ध आणि परिपूर्ण व्यक्ती घडवण्याचे मार्गदर्शन इन वन प्याकेज .ऑल अंडर  वन रूफ विथ नो चार्ज.   म्याकेले काका आले आणि सगळ्यात पहिले त्यांनी घाव घातला तो ह्याच प्रणालीवर . भारताचा सर्वांगीण विकास होण्याचे सर्व रस्ते गुरुकुल प्रणाली बंद झाल्यापासून आखूड झाले. अमुक अमुक गुरूकुल’ असा फलक लावून पुराण काळातील गुरूकुल पद्धती पुनरूज्जीवित करता येणार नाही 'द्रोणाचार्य व सांदिपनी यांच्या योग्यतेचे गुरू आज नाहीत आणि कृष्ण-अर्जुन-कर्ण-एकलव्य यांच्या योग्यतेचे विद्यार्थी पण नाहीत . पण काही गोष्टी खरंच पुन्हा आधुनिक पद्धतीने आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये अमलात आणता येतील.त्यातल्या काही गोष्टींचाच आवर्जून उल्लेख करते आहे.   


१]योग आणि ध्यान -काहीच दिवस झाले आपण योग आणि ध्यान ह्या गोष्टींच्या पुन्हा एकदा जवळ आलोय. ह्याचे कितीतरी फायदे आता लक्षात येत आहे अस सारखं वाटते हे सगळं शाळेत का शिकवल्या गेले नाही जेव्हा आम्ही डेव्हलपमेंट च्या उंबरठयावर होतो.  जगातल्या कॉम्पिटिशन  मध्ये भाग घेणे आणि जिंकणे हे सगळे शाळेने शिकवले पण हरलो तर स्वतःला सांभाळणे आणि पुन्हा उठण्याचे  बळ देणे हे योग आणि ध्यान शिकवून किती लवकर जमले असते.

गिरना और हारना ये बिलकुल  नॉर्मल है  ये पहेलेसे बताया जाता तो आज जिंदगी कूछ  और होती ज्यादा खूबसूरत महसूस होती     

२]उद्योग कौशल्य -मला कोणी लहानपणी जर सांगितले असते की  तुम्ही स्वतःचे उद्योग सुरु करू शकता ,आणि त्याला लागणारे प्राथमिक शिक्षण हे शाळेत मिळाले असते तर , मला जॉब कसा मिळेल हे न बघता दुसर्यांना जॉब कसा देता येईल ही मध्यम वर्गीय मानसिकता नक्कीच  बदलली असती . गुरुकुल मध्ये तेव्हाचे उद्योगासाठी  लागणारे कौशल्य हे लहानपणी शिकवले जायचे पण आता इंग्रजी सिस्टिम प्रमाणे नोकरी मिळवणे हे अल्टिमेट ध्येय आयुष्याचे झाले.आणि स्वतःचे विचार नसलेले लेबर म्हणून मार्केट मध्ये जागा मिळाली . कोणी  १० रुपये देऊन ह्याचे १०० रुपये कसे करता येईल कुठलेही शॉर्ट कट न वापरता  हे सांगितलेच नाही .भाजी विकणे हि ऍक्टिव्हिटी सुद्धा लहानपणी एन्जॉय करायला आवडली असती .    

३]क्रिएटिव्ह learning- नवनीत guide वापरून पेपर मध्ये मार्क्स मिळतात आणि सगळीकडून पाठीवर थाप मिळते हे डोक्यात पक्के बसले होते . म्हणून स्वतःचे डोके लावण्याचे कष्ट घेतले नाही. परंतु नोकरीला लागल्यावर नवनीत गाईड मदतीला नव्हती रोज काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया पाहिजे ह्याची ची डिमांड होत होती . पण आपण स्वतः वेगळे विचार मांडू शकतो आणि ते लोकांना आवडू शकतात हा छोटासा फंडा समजला तेव्हा उशीर झाला होता. आपण कुठलीही टेकनॉलॉजी शिकलो तरी ती काही दिवसांनी जुनी होणार , मग आपण वेगळी  थॉट प्रोसेस जर मुलांना शिकवली तर ...  जे गुरुकुल मध्ये तंतोतंत व्हायचे.  

४]नैतिक विवेक आणि नैतिक प्रशिक्षणाची निर्मिती- cheating करून पुढे जाणारे लोक आजूबाजूला दिसले आणि त्याचे आयुष्यात  काहीही वाईट होत नाही हे कुठेतरी मनाला चटका लावून जायचे . बऱ्याच प्रसंगी राग यायचा ,भावनिक ताबा सुटायचा ह्याबद्दल कोणीच काही शिकवले नाही. physical फिटनेस कडे शाळेत  थोडे फार धडे पी टी च्या पिरियड  मिळाले पण माईंड , इमोशन्स ह्याबद्दल कोणीच शिकवले नाही. आयुष्यातल्या डिप्रेशन वरचे solution कोणी का सांगितले नाही ह्याची खूप खंत वाटते. 

स्वतःची image आणि रेप्युटेशन ह्यावर  जागरूक राहायचे धडे मिळाले  पण सेवा ह्याचे धडे फक्त नैतिक  शिक्षण ह्या  पुस्तकात वाचायला होते. त्याचा प्रॅक्टिकल अनुभव  कधी घेतला नाही त्यामुळे जीवनात सेवा भाव उतरवणे हे प्रचंड कठीण झाले जे गुरुकुल मध्ये सहज  व्हायचे . स्वतःची ,समाजाची आणि देशाची नैतिकता टिकवायला मदत होत होती. 

५]आर्थिक साक्षरता -अक्ख इंजिनीरिंग पूर्ण झाले तरी साधे बँकेचे व्यवहार मला कोणी शिकवले नाही ह्याची खंत होती. पैसा  हातात आला तेव्हा saving आणि खर्च ह्याची बॅलन्स शीट मला maintain ठेवता आली नाही.भारताची आर्थिक व्यवस्था काय आहे ती कुठल्या फ्युएल वर चालते ह्याची विशेष माहिती नव्हती आणि हे माहिती असणे किती आवश्यक होते हे बाहेरच्या जगात आल्यावर कळले . कॉमर्स फील्ड सोडली तर बऱ्याच लोकांना आजही उगाच ह्याचा बाऊ वाटतो  पण हे आधीच  शिकवले गेले असते तर चक्रवाढ व्याज चे फक्त गणित म्हणून सोडवण्याचा दृष्टिकोन बदलला असता . 


एकंदरीत मला वाचवा हे शीर्षक घेऊन  , भारतीय शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धतीचा समावेश आधुनिक पद्धतीने करता येईल का? यासाठी मी हा विषय मांडला. हे प्रत्यक्षात उतरवणे  खूप  अवघड  आहे हे माहित असूनही लेखणीची ताकद खूप आहे ह्यावर विश्वास आहे. म्हणूनच  हा प्रपंच .  

Thursday 30 September 2021

आयुष्याच्या कॅनवास वर एक वेगळं चित्र सक्षम ने आज रंगवले होते.

  काळ्या कुट्ट अंधारातून ,दगडांमधून पायवाट शोधत  प्रवास सुरु होता . सोबत दूरवरून येणारा  पाण्याचा आवाज आणि रातकिड्यांची किरकिर ह्यापलीकडे सगळा परिसर  शांत होता .  रात्रीचे १० वाजले होते  ,रस्ता परिचित नव्हता ,डोंगरावरून खाली उतरून ,नदीच्या काठावर मुक्कामाला टेन्ट हाऊस मध्ये जायचे होते. आमचा १५ जणांचा ग्रुप होता. वाटाड्या सोबत असला तरीही रस्ता आपला आपल्याला चाचपडत पार करायचा होता. अंतर सुद्धा काही थोडे नव्हते आम्ही नेहमीचे night ट्रेकर नसल्यामुळे ३ किलो मीटर चे अंतर जास्तच वाटत होते. सक्षम   [माझा ७ वर्षाचा मुलगा ] कसा रिऍक्ट करेल ह्याची धाकधूक होती. हा त्याचा पहिला अनुभव होता ,माझाही तसा पहिलाच अनुभव  होता . मी मनातून घाबरले होते पण ते दाखवायचे नाही असे ठरवले . बहुदा सक्षम रडेलच आणि मी खाली येणार नाही असा हट्ट करून बसेल असा अंदाज मी बांधला . म्हणून त्याच्यासोबत  वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या आणि कसातरी वेळ काढायचा म्हणून विषय बदल करायला सुरवात केली. समोर वाटाड्या आणि आम्ही ४ जण त्याच्या मागून मागून जात होतो . काही फांद्या हाताला टोचून जायच्या ,दगडाची ठेच लागत होती,समोर एकदम  मोठा खड्डा येत होता त्याला पार करून पुढे जाणे चालू होते. माझ्या ,मनात धाकधूक कायम होती ,म्हणून  मी सक्षम सोबत त्याच्या पुण्यातील मित्रांबद्दल बोलत होते. पण त्याचे लक्ष वाटाड्या च्या बोलण्याकडे होते ,त्याने माझा हात पकडला असला तरीही तो कान  देऊन वाटाड्या काय सांगतोय हे ऐकत होता. शेवटी मला गप्प बसायला त्याने भाग पाडले .  इथे साप ,विंचू कसे राहतात आणि जंगलातील प्राणी कसे रात्री येतात ह्याच्या गप्पा तो मारत होता आता माझी भीती अजूनच बळावली . आणि तेवढ्यातच  पाय निसटून सक्षम घसरला ,थोडे हातापायाला खरचटले ,आता आपले काही खरे नाही बहुदा मला माघारी जावं लागेल ,नसती उठाठेव केली आपण असे अनेक विचार मनात फेर घालू लागले. वाटाड्या ने सक्षम ला आता कडेवर घेतले होते आणि तो पुढचा रस्ता  तुडवत होता . मोठ्याने भोकाड पसरलेला सक्षम  जरा शांत झाला होता.त्याने स्वतःहूनच मला खाली उतरव म्हणून त्याला सांगितले असावे पण आता तो माघारी येऊन  मला बिलगेल किंवा माझा हात पकडेल अशी माझी अपेक्षा होती. पण त्याने माझ्याकडे न येत वाटाड्या सोबत चालणे पसंद केले आणि साप बद्दल अजून सांगा म्हणून त्याला तो विनवू लागला. मनात विचार आला ,घाबरले मी होते म्हणून तो ही  घाबरलाच असेल अशी समजूत करून घेतली आणि त्या प्रमाणे क्रिया करायला सुरवात केली होती पण त्या प्रसंगाकडे  त्याचा बघण्याचा स्वतःचा दृष्टिकोन असू शकतो हे मी विसरले. लगेच comfort झोन मध्ये त्याला ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. असाच अनुभव पुढेही मला आला. 

दिवसभराचा प्रवासाचा थकवा जाणवत होता ,शेतात काम करायची ऍक्टिव्हिटी झाली होती त्यामुळे अंग दुखत होते.३ किलो मीटर चालल्यामुळे पायात गोळे आले होते  कधी जाऊन झोपतो असे झाले होते. नदीच्या जवळ पोहचताच थंडावा जाणवला ,पाण्याचा आवाज अजून स्पष्ट ऐकायला येऊ लागला. समोर पाणी आहे हे आवाजावरून कळत होते पण सगळाच अंधार दिसत होता. शेवटी लाल ,काळे ओळीने मांडलेले टेन्ट दिसू लागले आजूबाजूला लावलेले दिवे मंद होते त्यामुळे अंधार आणि  शांतता आपले रोख दाखवत होते. शहरातील झगमगाट ,गाड्याचे आवाज ह्याची सवय असलेले माझे  कान आणि मन हे स्वीकारायला लवकर तयार नव्हते. हे सगळे वातावरण बघून वाईट विचार मनात शिरकाव करत होते. adventure पेक्षा भीती जास्त वाटत होती. पण कुठलेही पूर्वानुग्रह न बांधता सक्षम ह्या सगळ्या गोष्टींकडे कसा बघतो हे आपण बघूया असे ठरवले. सगळे आपापल्या टेन्ट मध्ये स्थिरावले , निजानीज ची तयारी झाली .'झोप बाळा 'मी विनवू लागले. पण वाटाड्या आणि दोघे तिघे मिळून कुठेतरी जायचे नियोजन करत होते हे त्याने  अचूक वेधले. . तेवढ्यात कोणीतरी सांगत आले  'आम्ही  नदीत जाणार आहे ,तुम्ही येणार का? '. अरे बापरे हे काय नवीन आता ,रात्रीचे ११;३० वाजता ? नको नको . सक्षम उठून बसला ,आई चल ना ,प्लीज ... मला हे अनपेक्षित होते. मी फक्त आणि फक्त त्याच्या साठी तयार झाले. आतून माझी घाबरगुंडी वळली होतीच. मला सोडून बाकी सगळ्यांचा  adventure हा सवयीचा भाग असावा . एक टोपली प्रमाणे दिसणारी होडी नदीत उतरवण्यात आली ,दोन वल्हे बाहेर काढले. एका होडीत ५ व्यक्ती प्रमाणे २ टोपल्या पाण्यात ओढल्या आम्ही १० जण निघालो  . मी सक्षम ,वाटाड्या आणि अजून एक जण होडीत बसलो . माझी मैत्रीण आणि तिचा मुलगा दुसऱ्या होडीत बसले. वल्हे चालवून टोपली नदीत पुढे पुढे सरकू लागली. 


अमावसेची रात्र ,मध्यरात्रीचे १२ वाजून गेले आहेत,आजूबाजूला अंधार ,घनदाट  जंगल,  अथांग दूरवर पसरलेले नदीचे पाणीच पाणी  आणि त्याचा मधोमध छोटोशी टोपली .   तोंडात बोटे टाकायची वेळ माझ्यावर आली  होती. सक्षम शांत होता ,पण घाबरलेला दिसत नव्हता .निरीक्षण करत होता. पाणी हालत होते,वल्हे पाण्याला मागे टाकत होते ,टोपली पुढे पुढे जात होती . नदीच्या मध्यभागी जाऊन टोपली थांबली ,मी अक्षरशः डोळे मिटून घेतले होते माझी घाबरगुंडी उडाली आहे हे सगळ्यांना कळून चुकले.  होडीत सोबत असणारा मित्र योगा  ट्रेनर होता,तो म्हणाला घाबरणे दूर करण्यासाठी एक मेडिटेशन घेऊया . मी जवळपास किंचाळले 'कुठे?'.... 'इथेच  '..माझा योग ट्रेनर मित्र. 'इथे पाण्याच्या मध्यभागी ,अंधारात ?'... इति मी . 'हो ,वेगळा अनुभव असेल '

...माझा मित्र . असं म्हणून तो सुरूच झाला ,डोळे हलके बंद करा, आणि विचार करा आपण आपले सगळे जग मागे ठेऊन आलोय, सगळे आधीचे अनुभव, चिंता ,सगळ्या  भावना आणि हो भीती सुद्धा . ..... तो २० मिनिटे बोलत होता . जो अनुभव होता तो मला शब्दात मांडता येण्यासारखा नाही. भीती वाटायला काय कारणीभूत होते ?आधीचे काही ठोकताळे च ना ? जे माझ्याकडे होते आणि सक्षम कडे नव्हते . म्हणून तो कुतूहलाने हा अनुभव घेत असावा आणि मी मात्र भीतीने त्या वेगळ्या अनुभवाला  जवळ करू शकत नव्हते.  हे मात्र नक्की तो अनुभव घेतांना सक्षम माझा गुरु  झाला आणि मला बरेच काही शिकवून गेला. 


सकाळी डोळे उघडल्यानंतर रात्रीची तीच शांतता ,तीच नदी ,तेच डोंगर ,तेच जंगल खूप सुंदर एक चित्र रंगवल्याप्रमाणे भासत होते. माझ्या आयुष्याच्या कॅनवास वर सुद्धा एक वेगळं चित्र सक्षम ने आज रंगवले होते.   

  

 



नोट -बोलकी चित्रे शब्दांसोबत जोडत आहे,हा अनुभव जिथे घेतला त्याची लिंक जोडली आहे. संधी मिळाल्यास नक्की एकदा भेट द्या. ''साकार ,इको village ..... ''

video clip of our first adventure trip



पुन्हा कधी संधी मिळेल ह्याच्या प्रतीक्षेत. 

Thursday 3 June 2021

ते वडाचे झाड ....


वडाचे झाड आणि त्याच्या लांबच लांब पारंब्या हे मला नेहमीच एक गूढ प्रतीक वाटत आलंय . लहानपणी शाळेत जातांना रस्त्यामध्ये एक खूप जुने वडाचे झाड दिसायचे. त्याच्या खाली एक मंदिर होते नक्की कोणाचे होते हे आठवत नाही ,कारण वडाच्या झाडाचे भुताशी काहीतरी नातं आहे हे मनात कोणीतरी बिंबवले होते. त्यामुळे शाळा सुटल्यावर त्या झाडाखाली जास्त वेळ थांबायचे नाही हे पक्के ठाऊक होते. त्या वडाच्या झाडाखाली एक प्रेस वाल्या माणसाचे दुकान होते ,टपरी  वजा छोटेखानी दुकान ते कायम कपड्यांनी भरलेले असायचे ,तो माणूस आणि त्याची बायको प्रेस मध्ये कोळसा भरतांना मला जाता येतांना दिसायची . दिवसभर हा माणूस बायकोला सोबत घेऊन खूप काम करायचा हे मला पक्के ठाऊक होते. एकदा रात्री सुमारे ८ वाजायच्या आसपास मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला ,शाळेच्या रस्त्यावरूनच पुढे तिचे घर होते . रस्ता रोजचाच असल्याने परिचित होता . पार्टी संपली सगळेजण आपापल्या घरी जायला निघाली मी सुद्धा सायकल वरून निघाले गिफ्ट्स,हसणे ,मज्जा ह्या पार्टीच्या विश्वातून मी अजून बाहेर आले नव्हते तेवढयात ते झाड आणि तो रस्ता रात्रीच्या वेळी अजूनच भयानक जाणवत होता. तो प्रेस वाला रोज दिसणारा माणूस दारू पिऊन धिंगाणा घालत होता बायकोला जोरजोऱ्यात शिव्या देऊन मारत होता  . हे चित्र रात्री रोजच असते असे कोणाकडून तरी मला कळले.  दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना मी काहीश्या भीतीनेच  डोकावले तेव्हाचे चित्र वेगळे होते   , जुने भरभक्क्म झाड ,लोंबत्या वाकड्या तिकड्या पारंब्या ,तो प्रेस वाला ,त्याची शांत बायको आणि तोच काळा कोळसा .आता मात्र रात्रीच्या धिंगाण्याचा नामोनिशाण त्याच्या वागण्यात दिसत नव्हता .हे चित्र मी जवळपास १० वर्षे पाहत आली  आहे.  

कॉलेज मध्ये गेल्यानंतर ,अमरावती चे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय  आणि तेथील जुन्या दगडाच्या इमारती हे  आधीच एक गूढ वाटायचे  आणि परत सोबतीला असलेले एकच वडाचे झाड त्याच्या मध्ये अजून भर टाकायचे . दिवसाकाठी ह्या झाडाच्या आजूबाजूला सगळ्या कॉलेज मधील तरुण ,तरुणींचा घोळका असायचा .  गाडी लावायला एकमेव पार्किंग इथेच होती. आम्ही सुद्धा कधी कधी गप्पा इथेच उभे राहून मारत असू. पण नजर चुकूनही झाडावर गेली तरी एक भीतीची लहेर चमकून जायची. एकदा स्नेह संमेलनाचा दिवस होता रात्री कॉलेज मधून निघायला बरीच रात्र झाली . गाडी झाडाखाली लावली असल्याने तिथे जाणे भागच होते. वडाचे झाड  रात्रीच भयानक भासते ह्याची खात्री परत एकदा झाली. माझी गाडी खूप प्रयत्न करूनही सुरु होत नव्हती . अजून थोडा  वेळ तिथे घालवावा असे मुळीच वाटत नव्हते . गाडी तिथेच सोडून ऑटो च्या मदतीने घरी पोहचले पण संपूर्ण रस्त्यावर वडाची च झाड महानगर पालिकेने लावली कि काय असा भास होत होता . 

पुणे युनिव्हर्सिटी मध्ये आल्यानंतर पी एच डी साठी पी जी section ला सारख्या घिरट्या घालाव्या लागायच्या . इथे  देखील हेच रहस्यमय ,गूढ वातावरण मला बघायला मिळाले. अलिबाबाची गुफा असल्याप्रमाणे थंडगार असे ते एकमेव डिपार्टमेंट वडाच्या झाडाखालीच उभे होते.  पावसाळ्यात त्याचे रहस्य अजून गूढ होत जाते. ढग दाटून आले आणि विज जर गेली तर दिवसाढवळ्या अंधार पडायचा.   येथील स्टाफ देखील  सिरीयल मधील डिटेक्टिव्ह  प्रमाणे वाटतात . टेबल पलीकडून माणूस नसून फक्त चष्मा बोलतोय अशी जाणीव होते.  इथले गूढ वातावरणाचे श्रेय मी त्या एकांत टिकवून ठेवणाऱ्या वडाच्या 
झाडालाच देऊ इच्छिते . 


 माझे शिक्षण आणि गूढ वडाचे झाड ह्याची सोबत मला शेवट पर्यंत झाली  आणि हा शिक्षणाचा प्रवास आता जरी थांबला असला तरी वडाचे झाड आणि त्याच्या भीतीचे  गूढ अजूनही कायम आहे 


Tuesday 16 February 2021

जुनेच पण पुन्हा नव्याने भेटलेले माझे गाव

 lock down चा कहर आता बराच ओसरला होता आणि कंपनी च्या मालकाच्या कृपेने घरून काम करा ह्या संधीची  अंमलबजावणी आम्हाला चांगलीच मानवली. माहेरपण अनुभवता अनुभवता  बालपण गेलेल्या गावाला इतके दिवस राहण्याची आयतीच संधी मिळाली. दोन दिवसाची भेट घेऊन निघण्यात मन तृप्त होत नव्हतं . ह्यावेळचा  मुक्काम जरा जास्तच लांबला आणि पुन्हा आठवणीत जमा झालेलं गाव अनुभवावं म्हणून सगळीकडे दौरा सुरु झाला.

मनात परत ते जुनं  गाव भेटावं ,जुने लोक भेटावे ,जुने मित्र भेटावे किमान रस्त्यांनी तरी ओळखीचा परिचय दाखवावा  अशीच अपेक्षा धरून ,माझ्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन फेरफटका सुरु झाला. माझ्या काही लहानपणीच्या आठवणी ऐकायला आणि ती जागा बघायला तोही उत्सुक होता. मी अनुभवलेलं गाव शांत ,सरळ आणि निश्चिन्त होतं .  नैसार्गिगता ही  निसर्गात समरस तर होतीच पण इथे वावरणाऱ्या मानवी स्वभावात देखील होती   पण आता जरा सगळंच कस हायब्रीड वाटलं . मुद्दाम सकाळी उठून लवकरच बाहेर पडले ,परिचित  काकड आरतीचा आवाज आणि देवाचे नाव ऐकायला येतील म्हणून बराच वेळ वाट पाहिली . ८   वाजेपर्यंत मंदिरात लोकांची ये जा सुद्धा दिसत नव्हती .अध्यात्मिक वातावरणात भक्तीचे  कारंजे उडवणारी धार   एकंदरच  मंदावलेली दिसली .   गाभाऱ्यातील देव आणि छताला  टांगलेली स्तब्ध घंटा एकमेकांना सोबत करीत होते.  तो पहाटेचा आवाज हवेत कुठेतरी विरून गेला  आहे ह्याची जाणीव झाली. 

सकाळी ओळखीच्या कुठल्याही घरात डोकावले तरी येणाऱ्यांचे स्वागत मोकळ्या मनाने केले जायचे त्या आत्मीयतेची गोडी परत अनुभवता येईल म्हणून थेट दारावरची बेल वाजवली . दार उघडून स्वागत करणारे  चेहरे सगळे ओळखीचेच होते .  चहा ही  सामान्य गोष्ट किती नात्यांना जुळवून ठेऊ  शकते ह्याची प्रचिती तेव्हा येत होती .फक्त चहा आणि गप्पा साठी साठी डोकावलेली   मी जेवणाची तृप्त ढेकर देऊनच बाहेर पडायची. पण आता माझ्या लहानपणीचे मुदपाक खाण्यात  काम करतांना दिसणारी आकृती पदावरून निवृत्त झालेली दिसली .आपली सत्ता नसतांना फुकटचा आग्रह नको म्हणून गप्प  गप्प होती. चहा  हा शिष्टाचार म्हणून   झालाच पण रिकामा झालेला कप ठेवतांना ,आठवणींची  गप्पांची बशी कदाचित  चीर जाऊन  फुटली की  काय असा भास झाला. 

गावातील वेशीतून निघणारा वळणदार रस्ता संपला की  सार्वजनिक वाचनालयची एक इमारत उभी आहे . विविध पुस्तकांची  रेलचेल असणारे हे माझे आवडते ठिकाण. ह्या पुस्तकांनीच तर आयुष्यात समृद्ध होण्यासाठी अनमोल ठेव मला दिली . लहानपणीचा तो खजाना परत सापडतो का म्हणून तिथे रेंगाळले . नेहमी सायकलवरून येणारी मी आज फक्त गाडी घेऊन  आले होते ,वाचनालय गाठायला येण्याचे  साधन बदललेले असले तरी पुस्तकांचे वेड अजूनही तसेच होते. वाचनालय वाचक नाहीत म्हणून बंद पडले होते . पुस्तकांचे पाने  जीर्ण झालेत की लोकांची नजर मोबाईलच्या पानावर स्तिरावली हे गणित न उलगडण्यासारखे होते .आधुनिकीकरण चे वारे गावाला सुद्धा झोंबत असतील ह्याची जाणीव झाली . 

 ह्यावेळी शाळेत सुद्धा जाण्याचा योग्य आला  तिथल्या रंग गेलेल्या बाकडयांवर बसून आम्ही भविष्याची स्वप्ने रंगवली होती आज तेच बाकडे  एक आधुनिक रूपात मांडले होते.  सगळा शाळेचा ओळखीचा परिसर आज मात्र अनोळखी वाटत होता. तिथल्या मुलांकरिता एक ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मला बोलावण्यात आले ,मी सुद्धा परत आपले लहानपण अनुभवता येईल म्हणून आनंदाने तयार झाले.पण आज मुलांच्या गर्दीत खाली न बसता मला  dias वर उभे राहायचे होते. पण मी मात्र अजूनही स्वतःला त्या छोट्या गर्दीतच   शोधत होते. ते निरागस लहानपण परत मिळेल म्हणून वाट बघत होते. सरांचा धाक,मधली सुट्टीची घंटा ,फळ्याचा स्पर्श ,प्रार्थनेचा तो एकसुर,समोर उभे राहून केली गेलेली शिक्षा परत हविहवीशीच वाटत होती. पण ते सुंदर बालपण हातातून केव्हाच निसटले ,हे माझ्या चिमुकल्याचा हात धरून शाळेत फिरतांना लक्षात आले. तो मात्र आईची शाळा ,आईचा वर्ग ,आईचे सर हे सगळे आपल्या डोळ्यात साठवून घेत होता .

चार वेशीच्या कुशीत सामावलेले माझे गाव  ,गावाच्या बाहेर असलेले  एकमेव तलाव ,छोटे छोटे रस्ते आणि रस्त्यांच्या वळणावर असलेली घरे,काही बंगले शासकीय इमारती ,शाळा  ह्यांची जुगलबंदी ही नेहमी मला गावाच्या प्रेमात पाडते .गावातील रस्ते मात्र आपुलकीचा परिचय देत होते . आपण इथलेच आहोत ही  ओळखीची साद  तिथून हिंडतांना पदोपदी येत होती. डांबरीकरण झाले असले तरी  रस्त्यांनी आपली मूळ संगत मोडली नव्हती. 

सगळेच  कसे बदलून गेले ,माझ्या पूर्वीच्या अपेक्षांचे गाठोडे  सोबत घेऊन  गावाला भेटणे हेच माझे चुकले नव्हते का ?एक नवीन दृष्टिकोन ठेऊन गावाला भेटणेच योग्य होते. शहरी वातावरणात आधुनिकता च्या नावाखाली हरवलेली आत्मीयता शोधायला मी बाहेर पडले होते  पण कोरड्या ,शुष्क भावनांना वाढीस  लावणारे हे जाळे सगळीकडेच पसरत आहे ,माझे गाव ह्यातून कसे सुटणार ?   जुने गाव एक नवीन रूपाने भेटले हा आनंद काही थोडा नव्हे . तो सक्षम सोबत अजून नव्याने अनुभवता आले  हे समाधान जास्त होते. 




  

जुनेच पण पुन्हा नव्याने भेटलेले माझे गाव  



भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...