Tuesday 16 February 2021

जुनेच पण पुन्हा नव्याने भेटलेले माझे गाव

 lock down चा कहर आता बराच ओसरला होता आणि कंपनी च्या मालकाच्या कृपेने घरून काम करा ह्या संधीची  अंमलबजावणी आम्हाला चांगलीच मानवली. माहेरपण अनुभवता अनुभवता  बालपण गेलेल्या गावाला इतके दिवस राहण्याची आयतीच संधी मिळाली. दोन दिवसाची भेट घेऊन निघण्यात मन तृप्त होत नव्हतं . ह्यावेळचा  मुक्काम जरा जास्तच लांबला आणि पुन्हा आठवणीत जमा झालेलं गाव अनुभवावं म्हणून सगळीकडे दौरा सुरु झाला.

मनात परत ते जुनं  गाव भेटावं ,जुने लोक भेटावे ,जुने मित्र भेटावे किमान रस्त्यांनी तरी ओळखीचा परिचय दाखवावा  अशीच अपेक्षा धरून ,माझ्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन फेरफटका सुरु झाला. माझ्या काही लहानपणीच्या आठवणी ऐकायला आणि ती जागा बघायला तोही उत्सुक होता. मी अनुभवलेलं गाव शांत ,सरळ आणि निश्चिन्त होतं .  नैसार्गिगता ही  निसर्गात समरस तर होतीच पण इथे वावरणाऱ्या मानवी स्वभावात देखील होती   पण आता जरा सगळंच कस हायब्रीड वाटलं . मुद्दाम सकाळी उठून लवकरच बाहेर पडले ,परिचित  काकड आरतीचा आवाज आणि देवाचे नाव ऐकायला येतील म्हणून बराच वेळ वाट पाहिली . ८   वाजेपर्यंत मंदिरात लोकांची ये जा सुद्धा दिसत नव्हती .अध्यात्मिक वातावरणात भक्तीचे  कारंजे उडवणारी धार   एकंदरच  मंदावलेली दिसली .   गाभाऱ्यातील देव आणि छताला  टांगलेली स्तब्ध घंटा एकमेकांना सोबत करीत होते.  तो पहाटेचा आवाज हवेत कुठेतरी विरून गेला  आहे ह्याची जाणीव झाली. 

सकाळी ओळखीच्या कुठल्याही घरात डोकावले तरी येणाऱ्यांचे स्वागत मोकळ्या मनाने केले जायचे त्या आत्मीयतेची गोडी परत अनुभवता येईल म्हणून थेट दारावरची बेल वाजवली . दार उघडून स्वागत करणारे  चेहरे सगळे ओळखीचेच होते .  चहा ही  सामान्य गोष्ट किती नात्यांना जुळवून ठेऊ  शकते ह्याची प्रचिती तेव्हा येत होती .फक्त चहा आणि गप्पा साठी साठी डोकावलेली   मी जेवणाची तृप्त ढेकर देऊनच बाहेर पडायची. पण आता माझ्या लहानपणीचे मुदपाक खाण्यात  काम करतांना दिसणारी आकृती पदावरून निवृत्त झालेली दिसली .आपली सत्ता नसतांना फुकटचा आग्रह नको म्हणून गप्प  गप्प होती. चहा  हा शिष्टाचार म्हणून   झालाच पण रिकामा झालेला कप ठेवतांना ,आठवणींची  गप्पांची बशी कदाचित  चीर जाऊन  फुटली की  काय असा भास झाला. 

गावातील वेशीतून निघणारा वळणदार रस्ता संपला की  सार्वजनिक वाचनालयची एक इमारत उभी आहे . विविध पुस्तकांची  रेलचेल असणारे हे माझे आवडते ठिकाण. ह्या पुस्तकांनीच तर आयुष्यात समृद्ध होण्यासाठी अनमोल ठेव मला दिली . लहानपणीचा तो खजाना परत सापडतो का म्हणून तिथे रेंगाळले . नेहमी सायकलवरून येणारी मी आज फक्त गाडी घेऊन  आले होते ,वाचनालय गाठायला येण्याचे  साधन बदललेले असले तरी पुस्तकांचे वेड अजूनही तसेच होते. वाचनालय वाचक नाहीत म्हणून बंद पडले होते . पुस्तकांचे पाने  जीर्ण झालेत की लोकांची नजर मोबाईलच्या पानावर स्तिरावली हे गणित न उलगडण्यासारखे होते .आधुनिकीकरण चे वारे गावाला सुद्धा झोंबत असतील ह्याची जाणीव झाली . 

 ह्यावेळी शाळेत सुद्धा जाण्याचा योग्य आला  तिथल्या रंग गेलेल्या बाकडयांवर बसून आम्ही भविष्याची स्वप्ने रंगवली होती आज तेच बाकडे  एक आधुनिक रूपात मांडले होते.  सगळा शाळेचा ओळखीचा परिसर आज मात्र अनोळखी वाटत होता. तिथल्या मुलांकरिता एक ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मला बोलावण्यात आले ,मी सुद्धा परत आपले लहानपण अनुभवता येईल म्हणून आनंदाने तयार झाले.पण आज मुलांच्या गर्दीत खाली न बसता मला  dias वर उभे राहायचे होते. पण मी मात्र अजूनही स्वतःला त्या छोट्या गर्दीतच   शोधत होते. ते निरागस लहानपण परत मिळेल म्हणून वाट बघत होते. सरांचा धाक,मधली सुट्टीची घंटा ,फळ्याचा स्पर्श ,प्रार्थनेचा तो एकसुर,समोर उभे राहून केली गेलेली शिक्षा परत हविहवीशीच वाटत होती. पण ते सुंदर बालपण हातातून केव्हाच निसटले ,हे माझ्या चिमुकल्याचा हात धरून शाळेत फिरतांना लक्षात आले. तो मात्र आईची शाळा ,आईचा वर्ग ,आईचे सर हे सगळे आपल्या डोळ्यात साठवून घेत होता .

चार वेशीच्या कुशीत सामावलेले माझे गाव  ,गावाच्या बाहेर असलेले  एकमेव तलाव ,छोटे छोटे रस्ते आणि रस्त्यांच्या वळणावर असलेली घरे,काही बंगले शासकीय इमारती ,शाळा  ह्यांची जुगलबंदी ही नेहमी मला गावाच्या प्रेमात पाडते .गावातील रस्ते मात्र आपुलकीचा परिचय देत होते . आपण इथलेच आहोत ही  ओळखीची साद  तिथून हिंडतांना पदोपदी येत होती. डांबरीकरण झाले असले तरी  रस्त्यांनी आपली मूळ संगत मोडली नव्हती. 

सगळेच  कसे बदलून गेले ,माझ्या पूर्वीच्या अपेक्षांचे गाठोडे  सोबत घेऊन  गावाला भेटणे हेच माझे चुकले नव्हते का ?एक नवीन दृष्टिकोन ठेऊन गावाला भेटणेच योग्य होते. शहरी वातावरणात आधुनिकता च्या नावाखाली हरवलेली आत्मीयता शोधायला मी बाहेर पडले होते  पण कोरड्या ,शुष्क भावनांना वाढीस  लावणारे हे जाळे सगळीकडेच पसरत आहे ,माझे गाव ह्यातून कसे सुटणार ?   जुने गाव एक नवीन रूपाने भेटले हा आनंद काही थोडा नव्हे . तो सक्षम सोबत अजून नव्याने अनुभवता आले  हे समाधान जास्त होते. 




  

जुनेच पण पुन्हा नव्याने भेटलेले माझे गाव  



भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...