Thursday 3 June 2021

ते वडाचे झाड ....


वडाचे झाड आणि त्याच्या लांबच लांब पारंब्या हे मला नेहमीच एक गूढ प्रतीक वाटत आलंय . लहानपणी शाळेत जातांना रस्त्यामध्ये एक खूप जुने वडाचे झाड दिसायचे. त्याच्या खाली एक मंदिर होते नक्की कोणाचे होते हे आठवत नाही ,कारण वडाच्या झाडाचे भुताशी काहीतरी नातं आहे हे मनात कोणीतरी बिंबवले होते. त्यामुळे शाळा सुटल्यावर त्या झाडाखाली जास्त वेळ थांबायचे नाही हे पक्के ठाऊक होते. त्या वडाच्या झाडाखाली एक प्रेस वाल्या माणसाचे दुकान होते ,टपरी  वजा छोटेखानी दुकान ते कायम कपड्यांनी भरलेले असायचे ,तो माणूस आणि त्याची बायको प्रेस मध्ये कोळसा भरतांना मला जाता येतांना दिसायची . दिवसभर हा माणूस बायकोला सोबत घेऊन खूप काम करायचा हे मला पक्के ठाऊक होते. एकदा रात्री सुमारे ८ वाजायच्या आसपास मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला ,शाळेच्या रस्त्यावरूनच पुढे तिचे घर होते . रस्ता रोजचाच असल्याने परिचित होता . पार्टी संपली सगळेजण आपापल्या घरी जायला निघाली मी सुद्धा सायकल वरून निघाले गिफ्ट्स,हसणे ,मज्जा ह्या पार्टीच्या विश्वातून मी अजून बाहेर आले नव्हते तेवढयात ते झाड आणि तो रस्ता रात्रीच्या वेळी अजूनच भयानक जाणवत होता. तो प्रेस वाला रोज दिसणारा माणूस दारू पिऊन धिंगाणा घालत होता बायकोला जोरजोऱ्यात शिव्या देऊन मारत होता  . हे चित्र रात्री रोजच असते असे कोणाकडून तरी मला कळले.  दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना मी काहीश्या भीतीनेच  डोकावले तेव्हाचे चित्र वेगळे होते   , जुने भरभक्क्म झाड ,लोंबत्या वाकड्या तिकड्या पारंब्या ,तो प्रेस वाला ,त्याची शांत बायको आणि तोच काळा कोळसा .आता मात्र रात्रीच्या धिंगाण्याचा नामोनिशाण त्याच्या वागण्यात दिसत नव्हता .हे चित्र मी जवळपास १० वर्षे पाहत आली  आहे.  

कॉलेज मध्ये गेल्यानंतर ,अमरावती चे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय  आणि तेथील जुन्या दगडाच्या इमारती हे  आधीच एक गूढ वाटायचे  आणि परत सोबतीला असलेले एकच वडाचे झाड त्याच्या मध्ये अजून भर टाकायचे . दिवसाकाठी ह्या झाडाच्या आजूबाजूला सगळ्या कॉलेज मधील तरुण ,तरुणींचा घोळका असायचा .  गाडी लावायला एकमेव पार्किंग इथेच होती. आम्ही सुद्धा कधी कधी गप्पा इथेच उभे राहून मारत असू. पण नजर चुकूनही झाडावर गेली तरी एक भीतीची लहेर चमकून जायची. एकदा स्नेह संमेलनाचा दिवस होता रात्री कॉलेज मधून निघायला बरीच रात्र झाली . गाडी झाडाखाली लावली असल्याने तिथे जाणे भागच होते. वडाचे झाड  रात्रीच भयानक भासते ह्याची खात्री परत एकदा झाली. माझी गाडी खूप प्रयत्न करूनही सुरु होत नव्हती . अजून थोडा  वेळ तिथे घालवावा असे मुळीच वाटत नव्हते . गाडी तिथेच सोडून ऑटो च्या मदतीने घरी पोहचले पण संपूर्ण रस्त्यावर वडाची च झाड महानगर पालिकेने लावली कि काय असा भास होत होता . 

पुणे युनिव्हर्सिटी मध्ये आल्यानंतर पी एच डी साठी पी जी section ला सारख्या घिरट्या घालाव्या लागायच्या . इथे  देखील हेच रहस्यमय ,गूढ वातावरण मला बघायला मिळाले. अलिबाबाची गुफा असल्याप्रमाणे थंडगार असे ते एकमेव डिपार्टमेंट वडाच्या झाडाखालीच उभे होते.  पावसाळ्यात त्याचे रहस्य अजून गूढ होत जाते. ढग दाटून आले आणि विज जर गेली तर दिवसाढवळ्या अंधार पडायचा.   येथील स्टाफ देखील  सिरीयल मधील डिटेक्टिव्ह  प्रमाणे वाटतात . टेबल पलीकडून माणूस नसून फक्त चष्मा बोलतोय अशी जाणीव होते.  इथले गूढ वातावरणाचे श्रेय मी त्या एकांत टिकवून ठेवणाऱ्या वडाच्या 
झाडालाच देऊ इच्छिते . 


 माझे शिक्षण आणि गूढ वडाचे झाड ह्याची सोबत मला शेवट पर्यंत झाली  आणि हा शिक्षणाचा प्रवास आता जरी थांबला असला तरी वडाचे झाड आणि त्याच्या भीतीचे  गूढ अजूनही कायम आहे 


भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...