Thursday 30 September 2021

आयुष्याच्या कॅनवास वर एक वेगळं चित्र सक्षम ने आज रंगवले होते.

  काळ्या कुट्ट अंधारातून ,दगडांमधून पायवाट शोधत  प्रवास सुरु होता . सोबत दूरवरून येणारा  पाण्याचा आवाज आणि रातकिड्यांची किरकिर ह्यापलीकडे सगळा परिसर  शांत होता .  रात्रीचे १० वाजले होते  ,रस्ता परिचित नव्हता ,डोंगरावरून खाली उतरून ,नदीच्या काठावर मुक्कामाला टेन्ट हाऊस मध्ये जायचे होते. आमचा १५ जणांचा ग्रुप होता. वाटाड्या सोबत असला तरीही रस्ता आपला आपल्याला चाचपडत पार करायचा होता. अंतर सुद्धा काही थोडे नव्हते आम्ही नेहमीचे night ट्रेकर नसल्यामुळे ३ किलो मीटर चे अंतर जास्तच वाटत होते. सक्षम   [माझा ७ वर्षाचा मुलगा ] कसा रिऍक्ट करेल ह्याची धाकधूक होती. हा त्याचा पहिला अनुभव होता ,माझाही तसा पहिलाच अनुभव  होता . मी मनातून घाबरले होते पण ते दाखवायचे नाही असे ठरवले . बहुदा सक्षम रडेलच आणि मी खाली येणार नाही असा हट्ट करून बसेल असा अंदाज मी बांधला . म्हणून त्याच्यासोबत  वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या आणि कसातरी वेळ काढायचा म्हणून विषय बदल करायला सुरवात केली. समोर वाटाड्या आणि आम्ही ४ जण त्याच्या मागून मागून जात होतो . काही फांद्या हाताला टोचून जायच्या ,दगडाची ठेच लागत होती,समोर एकदम  मोठा खड्डा येत होता त्याला पार करून पुढे जाणे चालू होते. माझ्या ,मनात धाकधूक कायम होती ,म्हणून  मी सक्षम सोबत त्याच्या पुण्यातील मित्रांबद्दल बोलत होते. पण त्याचे लक्ष वाटाड्या च्या बोलण्याकडे होते ,त्याने माझा हात पकडला असला तरीही तो कान  देऊन वाटाड्या काय सांगतोय हे ऐकत होता. शेवटी मला गप्प बसायला त्याने भाग पाडले .  इथे साप ,विंचू कसे राहतात आणि जंगलातील प्राणी कसे रात्री येतात ह्याच्या गप्पा तो मारत होता आता माझी भीती अजूनच बळावली . आणि तेवढ्यातच  पाय निसटून सक्षम घसरला ,थोडे हातापायाला खरचटले ,आता आपले काही खरे नाही बहुदा मला माघारी जावं लागेल ,नसती उठाठेव केली आपण असे अनेक विचार मनात फेर घालू लागले. वाटाड्या ने सक्षम ला आता कडेवर घेतले होते आणि तो पुढचा रस्ता  तुडवत होता . मोठ्याने भोकाड पसरलेला सक्षम  जरा शांत झाला होता.त्याने स्वतःहूनच मला खाली उतरव म्हणून त्याला सांगितले असावे पण आता तो माघारी येऊन  मला बिलगेल किंवा माझा हात पकडेल अशी माझी अपेक्षा होती. पण त्याने माझ्याकडे न येत वाटाड्या सोबत चालणे पसंद केले आणि साप बद्दल अजून सांगा म्हणून त्याला तो विनवू लागला. मनात विचार आला ,घाबरले मी होते म्हणून तो ही  घाबरलाच असेल अशी समजूत करून घेतली आणि त्या प्रमाणे क्रिया करायला सुरवात केली होती पण त्या प्रसंगाकडे  त्याचा बघण्याचा स्वतःचा दृष्टिकोन असू शकतो हे मी विसरले. लगेच comfort झोन मध्ये त्याला ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. असाच अनुभव पुढेही मला आला. 

दिवसभराचा प्रवासाचा थकवा जाणवत होता ,शेतात काम करायची ऍक्टिव्हिटी झाली होती त्यामुळे अंग दुखत होते.३ किलो मीटर चालल्यामुळे पायात गोळे आले होते  कधी जाऊन झोपतो असे झाले होते. नदीच्या जवळ पोहचताच थंडावा जाणवला ,पाण्याचा आवाज अजून स्पष्ट ऐकायला येऊ लागला. समोर पाणी आहे हे आवाजावरून कळत होते पण सगळाच अंधार दिसत होता. शेवटी लाल ,काळे ओळीने मांडलेले टेन्ट दिसू लागले आजूबाजूला लावलेले दिवे मंद होते त्यामुळे अंधार आणि  शांतता आपले रोख दाखवत होते. शहरातील झगमगाट ,गाड्याचे आवाज ह्याची सवय असलेले माझे  कान आणि मन हे स्वीकारायला लवकर तयार नव्हते. हे सगळे वातावरण बघून वाईट विचार मनात शिरकाव करत होते. adventure पेक्षा भीती जास्त वाटत होती. पण कुठलेही पूर्वानुग्रह न बांधता सक्षम ह्या सगळ्या गोष्टींकडे कसा बघतो हे आपण बघूया असे ठरवले. सगळे आपापल्या टेन्ट मध्ये स्थिरावले , निजानीज ची तयारी झाली .'झोप बाळा 'मी विनवू लागले. पण वाटाड्या आणि दोघे तिघे मिळून कुठेतरी जायचे नियोजन करत होते हे त्याने  अचूक वेधले. . तेवढ्यात कोणीतरी सांगत आले  'आम्ही  नदीत जाणार आहे ,तुम्ही येणार का? '. अरे बापरे हे काय नवीन आता ,रात्रीचे ११;३० वाजता ? नको नको . सक्षम उठून बसला ,आई चल ना ,प्लीज ... मला हे अनपेक्षित होते. मी फक्त आणि फक्त त्याच्या साठी तयार झाले. आतून माझी घाबरगुंडी वळली होतीच. मला सोडून बाकी सगळ्यांचा  adventure हा सवयीचा भाग असावा . एक टोपली प्रमाणे दिसणारी होडी नदीत उतरवण्यात आली ,दोन वल्हे बाहेर काढले. एका होडीत ५ व्यक्ती प्रमाणे २ टोपल्या पाण्यात ओढल्या आम्ही १० जण निघालो  . मी सक्षम ,वाटाड्या आणि अजून एक जण होडीत बसलो . माझी मैत्रीण आणि तिचा मुलगा दुसऱ्या होडीत बसले. वल्हे चालवून टोपली नदीत पुढे पुढे सरकू लागली. 


अमावसेची रात्र ,मध्यरात्रीचे १२ वाजून गेले आहेत,आजूबाजूला अंधार ,घनदाट  जंगल,  अथांग दूरवर पसरलेले नदीचे पाणीच पाणी  आणि त्याचा मधोमध छोटोशी टोपली .   तोंडात बोटे टाकायची वेळ माझ्यावर आली  होती. सक्षम शांत होता ,पण घाबरलेला दिसत नव्हता .निरीक्षण करत होता. पाणी हालत होते,वल्हे पाण्याला मागे टाकत होते ,टोपली पुढे पुढे जात होती . नदीच्या मध्यभागी जाऊन टोपली थांबली ,मी अक्षरशः डोळे मिटून घेतले होते माझी घाबरगुंडी उडाली आहे हे सगळ्यांना कळून चुकले.  होडीत सोबत असणारा मित्र योगा  ट्रेनर होता,तो म्हणाला घाबरणे दूर करण्यासाठी एक मेडिटेशन घेऊया . मी जवळपास किंचाळले 'कुठे?'.... 'इथेच  '..माझा योग ट्रेनर मित्र. 'इथे पाण्याच्या मध्यभागी ,अंधारात ?'... इति मी . 'हो ,वेगळा अनुभव असेल '

...माझा मित्र . असं म्हणून तो सुरूच झाला ,डोळे हलके बंद करा, आणि विचार करा आपण आपले सगळे जग मागे ठेऊन आलोय, सगळे आधीचे अनुभव, चिंता ,सगळ्या  भावना आणि हो भीती सुद्धा . ..... तो २० मिनिटे बोलत होता . जो अनुभव होता तो मला शब्दात मांडता येण्यासारखा नाही. भीती वाटायला काय कारणीभूत होते ?आधीचे काही ठोकताळे च ना ? जे माझ्याकडे होते आणि सक्षम कडे नव्हते . म्हणून तो कुतूहलाने हा अनुभव घेत असावा आणि मी मात्र भीतीने त्या वेगळ्या अनुभवाला  जवळ करू शकत नव्हते.  हे मात्र नक्की तो अनुभव घेतांना सक्षम माझा गुरु  झाला आणि मला बरेच काही शिकवून गेला. 


सकाळी डोळे उघडल्यानंतर रात्रीची तीच शांतता ,तीच नदी ,तेच डोंगर ,तेच जंगल खूप सुंदर एक चित्र रंगवल्याप्रमाणे भासत होते. माझ्या आयुष्याच्या कॅनवास वर सुद्धा एक वेगळं चित्र सक्षम ने आज रंगवले होते.   

  

 



नोट -बोलकी चित्रे शब्दांसोबत जोडत आहे,हा अनुभव जिथे घेतला त्याची लिंक जोडली आहे. संधी मिळाल्यास नक्की एकदा भेट द्या. ''साकार ,इको village ..... ''

video clip of our first adventure trip



पुन्हा कधी संधी मिळेल ह्याच्या प्रतीक्षेत. 

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...