Tuesday 31 October 2017

परत एकदा अ आ इ पासून शिकावयास वाटतंय .

माझा मुलगा सक्षम सध्या वय वर्षे ३.५. तो ३ वर्षाचा झाला तेव्हा इतर आईप्रमाणे माझ्याही डोक्यात विचार सुरु झाले त्याच्यासाठी शाळा कुठली निवडायची? मित्र मंडळीत शोभेल आणि जास्तीत जास्त स्टडी ओरिएंटेड हाय स्टेटस स्कूल,वेल सेटल ,फ्रेंडली इन्व्हॉर्नमेंट ,भरपूर ऍक्टिव्हिटी जिथे हे सगळं उपलब्ध असेल अशी शाळा निवडण्यामागे माझा कल  होता . म्हणून सगळ्या शाळांना भेट देऊन झाली . पण मन त्या कोवळ्या जीवाला शाळेत पाठवायला राजी होत नव्हतं .  रोजच्या वेळेत शाळेत जाऊन दिवसांचे रकाने भरणे ,इतिहास ,भूगोल,गणित मार्क पाडण्यासाठी वाचणे . मातृभाषेत न बोलता इंग्लिश मधेच संभाषण करणे हे सगळं मला करायला भाग पडणार होत.कारण मुलाला ग्लोबल बनवायचं असेल तर हे सगळं त्याच्याकडून हळुवारपणे ,त्याच्या कलाने आणि नाही ऐकलं तर दमदाटी करून करूनच घ्यावं लागणार होत . पण हे करून माझा मुलगा खरंच ग्लोबल होईल का ?ग्लोबल ह्याची व्याख्या एका जापनीज माणसाने सुंदर     शब्दात मांडली आहे  आपली संस्कृती, आपली भाषा, आपली मुळ  नीट समजावून घेतल्यावर जगातील इतर संस्कृतींना सहिष्णू दृष्टीने समजावून घेणे म्हणजे ग्लोबल ...... त्यासाठी संवादाची भाषा म्हणून इंग्रजीची गरज पडेलही  पण अनुकरणाचा नाही तर समजावून घेण्यासाठी .जर तुम्हाला  स्वतःच्या मातृभाषेतील साहित्यच जर नीट वाचता येत नसेल  तर तुम्ही इतर संस्कृतींना कसे समजावून घेणार?आणि खऱ्या अर्थाने ग्लोबल  कसे होणार ? पण या न थांबणाऱ्या स्पर्धेमध्ये माझा मुलगा मागे पडायला नको , ह्या सगळ्या पिएर प्रेशर मधून मी जात होते. एका हाय स्टॅंडर्ड शाळेमध्ये शिक्षक -पालक सभा ला हजेरी लावली ,शिक्षकांच्या छोट्या मुलांकडून केल्या जाणाऱ्या आभाळाएवढ्या अपेक्षा ऐकून मन खिन्न झालं. हे जर माझ्या मुलाला जमल नाही तर हे शिक्षक  त्याच्या कडून करवून घेणार याची शाश्वती ते पालक लोकांना देत होते. पण ह्या सगळ्यामध्ये त्याच बालपण कोमेजून जाईल ,कुठलीही गोष्ट ठरवून दिल्या गेलेल्या साच्यातच झाली पाहिजे ह्याच दडपण मनावर असेल.  आणि सक्षमचा  निरपराध चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरंगू लागला . तो ह्या सगळ्यापासून अनभीज्ञ होता . तिथून निघाल्यावर या शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या शाळेला दुसरी वाट आहे का याचा शोध सुरु झाला . माझ्या नवऱ्याच्या डोक्यात हा विचार त्याच्या जन्मापासूनच सुरु होता .पण हे सगळं आपल्याला झेपेल का याचा अंदाज येत नव्हता .  शाळेला न दाखल करता त्याला शिकवण्याचा  आणि हो खऱ्या अर्थाने ग्लोबल करण्याचा काही पर्यायी रस्ता आहे का??फक्त पैसे आणि उच्च जीवनशैली मिळेल  हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण देणं हे कितपत योग्य आहे हा विचार करून "सक्षमला शाळेत न पाठवणं "हा आम्ही दोघांनी  एक मतांनी घेतलेला निर्णय आहे. तिथूनच  आमचा होमस्कूल कडे वळण्याचा  प्रवास सुरु झाला. 
त्याच दरम्यान होमस्कूल ,अनस्कूल ,अल्टर्नेट स्कूल असे तीन पर्याय आमच्या समोर होते. होमस्कूल म्हणजे NIOS किंवा IGCSE  सारख्या बोर्डचा पाठ्यक्रम घरून पूर्ण करणे आणि परीक्षा देणे. तसेच अनस्कूल म्हणजे कुठलाही पाठ्यक्रम न  शिकवता नैसर्गिक पद्धतीने मुलाने शिकणे आणि आपण त्यात फक्त एक माध्यम बनणे आणि पर्यायी शिक्षण पध्दती म्हणजे ज्या शाळेमध्ये ठराविक अभ्यासक्रम न शिकवता, मुलांच्या कलेने आणि काही विशिष्ठ पद्धतीने (जसं की waldorf method) शिकवल्या जातात. आम्ही सध्या तरी सक्षम साठी होमस्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. दरम्यान उर्मिला स्यामसन, ३ मुलांची होमस्कूलर (किंवा unschooler म्हणा हवं तर ) आई ह्यांच्याशी भेट झाली ( माझ्या नवऱ्याने घडवून आणली ). आणि पुण्यात तुमच्यासारखे विचार करणारे २५० पालक आहेत जे आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत (आणि काही असेही आहेत जे अगोदर पाठवत होते आणि आता ते शाळेतून काढून घेत आहेत) हे सांगितल्यावर ऐकून खूप बरं वाटलं. त्या ग्रुप मध्ये आम्हीही सहभागी झालो. आम्ही महिन्यातून एक किंवा दोन वेळा भेटतो. एकमेकांसोबत विचारांची देवाण घेवाण होते. आता लोकांना वेगळा वाटणारा आमचा निर्णय हा आमच्यासाठी मात्र सहज होता. "काहीतरीच काय" ह्या लोकांच्या प्रश्नाला उत्तर देणं ही सोडून दिल. आम्ही सगळे मिळून शिकतो, कारण आम्हाला एकमेकांचा सहवास आवडतो, जगातील सुंदर वाटणाऱ्या गोष्टी पडताळून बघायला आवडतात इतकेच उत्तर मी देते. असच सक्षमला घेऊन एका "होम स्कूल co -opp" ला गेले होते. साधारण ३ ते १० या वयोगटाची मुले आणि त्यांचे पालक तिथे जमले होते. एका कॉफी जार कॅफे मध्ये आम्ही भेटलो. कॅफे चालवणारी लिसा ही सुद्धा एक होम स्कूलर मुलांची आई आहे. त्यामुळे तीची जागा आम्ही महिन्यातून एकदा भेटण्यासाठी वापरतो. जे शिक्षण शाळेत मिळूच शकत नाही अस exposure मुलांना मिळतं. कुणाचा धाक नाही, वेळेचं बंधन नाही, अभ्यासाचे ओझे नाही, कुणासोबत स्पर्धा नाही आणि मार्कांचा आकडा नाही. स्वछंद सोडल्या नंतर मुलांमध्ये किती प्रतिभा आहे हे लक्षात येत. एका टेबलवर भरपूर कलर्स अक्षरशः सांडलेले होते सगळ्यांना एक एक कोरा कागद देण्यात आला. पाहिजे ते साहित्य उचला आणि आपली कला दाखवण्यास त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला. अप्रतिम चित्र मुलांनी आपापल्या क्षमतेनुसार रेखाटली. "असच" करायला पाहिजे हे सांगणार त्यांना कोणी नव्हतं. साच्यातली चित्र त्यांनी काढली नाही. त्यामुळे एकही चित्रात गवत खाणारी गाय किंवा दोरी खेळणारी मुलगी दिसली नाही. दिसले ते थ्रीडी अँगल ने मुलांनी कल्पना केलेले चित्र. त्याची तुलना होऊच शकत नाही. हाताची बोटे वापरून सुंदर निसर्ग चित्र रेखाटल्या गेले. यावरून एकच लक्षात आले मुलांना जर मदत करायची असेल तर एवढंच करा कि "त्यांना कुठलीच मदत करू नका ". हे घोड्याचं चित्र आहे हे त्यांच्या मानस पटलावर बिंबित करण्यापेक्षा, जेव्हा खरंच घोडा त्यांच्या डोळ्यसमोर येईल तेव्हा त्याला आलेली अनुभूती ही  कायम त्याच्या स्मरणात राहील. हे ज्ञान कायमस्वरूपी असत एक उदाहरण द्यायचं झालं तर या ग्रुप मध्ये माझ्यासारखीच एक आई मला भेटली, ती एक उत्तम चित्रकार आहे सुंदर पैंटिंग्स तिने बनवलेले आहे, तिचा मुलगा वय वर्ष १०-१२ असेल, त्याने तिच्या पैंटिंग्सला भारतातच नाही तर विदेशात सुद्धा एक उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, गूगल हे माध्यम वापरून  जे एका एम बी ए मार्केटिंग वाल्याला सुद्धा जमल नसत. 


असच खेळण्याच्या बाबतीत सुद्धा आढळत . आधी मी १० दिवसातून एकदा खेळण्याच्या दुकानाला भेट द्यायचे आणि विशेष वेगळे वाटणारे खेळणे हे मी सक्षम साठी निवडायचे . उच्च किमतीचे ,ब्रॅण्डेड खेळणे निवडण्यामागे माझा कल होता . पण काही दिवसात तो त्या खेळण्यांना कंटाळून जातो .  हळूहळू लक्षात आले आपण त्याला हातात खेळणे देऊन त्याच्या creativity वर बंधन घालतोय .  म्हणून एक नवीन प्रयोग सुरु केला घरात जे खोके ,प्लास्टिकचे बॉक्सेस ,चमचे , टाकाऊ सामान आहे आम्ही त्यातून वेगवेगळे निर्मिती करू लागलो . आणि कुणाचा विश्वास बसणार नाही अशा युक्त्या मला त्याच्याकडून ऐकायला मिळतात . रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम हा कसा डायव्हर्ट होतो हे त्याने मला प्रयोग करून दाखवले . तेव्हापासून शॉपिंग मॉल मध्ये जाऊन माझे ब्रँडेड खेळणे आणणे बंद झाले. मुलांची निसर्गाशी फार लवकर मैत्री होते . पण आजकालच्या शहरी वातावरणात आपण मुलांना कृत्रिम जगाशी ओळख करून घेण्यास भाग पाडतो .माझ्या मुलाला  सामाजिक जाणीव असली पाहिजे हि पालकांची अपेक्षा फोल ठरते .झाड ,नदी,डोंगर , जंगल ,प्राणी ह्यांच्याशी मुलांची लवकर मैत्री होते . कारण त्यांना ते आपल्यापेक्षा वेगळे वाटतात . नैसार्गिग घडणाऱ्या गोष्टींकडे मुलांचं आकर्षण असत. आपण मात्र ready made knowledge मुलांना देतो .



म्हणून मला एक नवीन पैलू जाणवतोय . स्वतः एक प्राध्यापक असून ,असं वाटत पुस्तकी ज्ञान तर मी खूप मिळवलं ,पण सक्षमसोबत परत एकदा अ आ इ पासून शिकावयास वाटतंय .   

जर अस झालं तर मजेत जगता येईल 
जेव्हा घर म्हणजेच  माझी शाळा होईल  

आजी, आजोबा, आई आणि बाबा हेच माझे गुरु 
ह्या चौघांसोबत शिक्षण होईल माझं सुरु 

मार दिला तरी आवडेल, मला तुमचा  धाक 
शाळेतल्या छडीपेक्षा चालेल तुमचा राग  

पुस्तक आणि दप्तराचे ओझे नको पाठीवर 
गिरवूया सुरेख अक्षरे अनुभवांच्या पाटीवर 

मला आवडेल तो विषय दोघे मिळून शिकू 
मदतीला वाटल्यास गुगलला घेऊ 

चौकटीच्या बाहेर जरा जाऊन तर पाहू 
निसर्गाच्या विद्यापीठात शिकून सगळं घेऊ 

स्पर्धा मात्र माझी स्वतः सोबतच असेल 
माझा अभ्यास घड्याळीच्या ठोकावर नसेल 

मित्रांची संगत पण मी निराळीच ठेवेल 
वॉचमन काकां, बाजूचे आजोबा यांना पण मित्र बनवेल  

इतिहासातल्या शिवाजीला सिंहगडावर जाऊन भेटू 
भूगोल शिकण्यासाठी आपण देशाटन करू 

चित्र रेखाटेल मी माझ्या कल्पनेतून 
हवं तस साकारेल माझ्या कुंचल्यातून 

आयुष्याच्या पोस्टर मध्ये  सुंदर रंग आपणच भरुया 
संगीताचा ठेका   पावसाच्या थेंबासोबत धरूया 

स्वयंपाकघरात निराळे प्रयोग आपण करूया 
यूट्यूब वरून  नवीन रेसिपी करायला शिकूया 

अस झालं तर सगळंच कसं छान  होऊन जाईल 
स्वछंद पाखरासारखं उडून बघता येईल 
शाळेची गंमत मला जाणून घेता येईल

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...