Tuesday 2 January 2018

माझी शाळा

सगळ्यांच्या शाळेशी काही खास आठवणी जडलेल्या असतात . मोठे झाल्यावर  लहानपणीच्या गमतीजमती सांगताना आपणही नकळत हरखून जातो .आणि मग आठवते आपण शिकलो ती शाळा. गावी गेल्यावर मधेच शाळेसमोरून जाताना अनेकदा वाटत आतमध्ये जाऊन बघावं, पण संकोच वाटतो आता तिथं आपल्या ओळखीचं कोणीच नसणार . आणि "नुसतं बघायला आले " अस सांगायला विचित्र वाटेल ! म्हणून बरेचदा हिम्मत होत नाही . पण या वेळी मुक्काम बरेच दिवस होता. सक्षम ला माझी शाळा दाखवेल म्हणून आश्वासन दिल होत . त्याप्रमाणे त्याला घेऊन गेले देखील . कारंजा  म्हणायला छोटस गाव पण राहणारी लोक मात्र अगदी रसिक ,मनाने दिलदार ,मनमिळाऊ ,अशी आहेत . माझ्यावेळी चांगल्या समजणाऱ्या शाळाही जेमतेम तिनच  . दोन शब्दांमध्ये सांगायचं झालं तर शाळेचं नाव जे . सी कारंजाच्या व्यक्तीला विचारलं तर लगेच कळेल . पण शाळेचं पूर्ण नाव होत जिणवरसा  चवरे हायस्कूल . त्या शाळेत शिकणारी माझी तिसरी पिढी . प्रत्येक पिढीने बघितलेले शाळेचे रंगरूप हे वेगवेगळे होते. आतामात्र शाळेचा पूर्ण कायापालट झाला आहे. 
नेहमी शाळेत आल्यावर सायकल लावून जायचे नेमकी त्याच जागी गाडी लावून आतमध्ये शिरले. प्रार्थनेला उशीर व्हायचा  तेव्हा रस्त्यामध्ये उभी राहून बोलणी खावी लागायची आजही कोणीतरी ओरडेल हीच धाकधूक मनात होती. किती खोलवर प्रभाव असतो काही गोष्टींचा मनावर ,आणि डोळ्यसमोर एक एक आठवणी दाटू लागल्या . दारामधून आत शिरताच नजर वेधून घ्यायचा तो काळा फळा ,त्यावर काही खास गुणांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव झळकायचे .  शाळेत असताना खूप हेवा वाटायचा ह्या गोष्टींचा . इंगळे सर आम्हाला चित्रकला शिकवायचे त्यांच्या सुंदर मोतीसारख्या असणाऱ्या अक्षरांमध्ये त्या विद्यार्थ्यांचे नाव झळकायचे . पुढे ते विद्यार्थी  त्या क्षेत्रात यश मिळवतील किंवा न मिळवतील पण सरांनी लिहलेलं नेत्रदीपक कामगिरी हा शब्द त्याच्यासाठी मित्रमंडळींमध्ये भाव मिळवून द्यायचा. प्रत्येक सरांची शिकवण्याची आपापली लकब होती . दरवर्षी तेच शिकवावं लागायचं पण सगळे जण खूप आत्मीयतेने शिकवायचे . तेव्हा शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं नव्हतं . त्यांची विद्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ दिसायची. आणि म्हणून आजही संस्कृतचा देव शब्द चालवायला सांगितला  तरी  उच्चार पूर्ण आठवत नसले तरी ती विशिष्ट लय डोक्यामध्ये पचलेली  आहे .  पी टी  चा तास आम्हाला खूप आवडायचा कारण राऊत  सर पोटात दुखत आहे म्हटलं कि बसायला जा म्हणायचे मग थोड्या वेळानी खेळायला परवानगी मिळाली कि  पोटातले दुखणे पळून जायचे . भूगोलाच्या तासाला वडतकर सर समोर बोलावून नकाशावर राज्य शोधायला सांगायचे ,त्याचा परिणाम अजूनही प्रत्येक राज्याची राजधानी लक्षात आहे. खूप छान  होते ते शाळेचे दिवस , शिकण्यामध्ये एक वेगळा आनंद होता. आतासारखी रॅट रेस  नव्हती. शाळेत जायला मजा यायची . 
आतामात्र शाळा बदलून गेली आहे ,नवीन दिमाखात उभी असलेली तीन मजली इमारत शाळेची प्रगती पथावर असलेली वाटचाल दाखवून   देते पण त्या जुन्या इमारतीची सय नवीन इमारतीला  नाही .  स्टाफ रूम जवळ एक प्राजक्ताच झाड दिमाखात उभं होत त्याचा सुगंध पूर्ण शाळेत दरवळला  होता. पण आता त्याची जागा कुंड्यानी घेतलीय . ती आपलीशी वाटणारी शाळा कुंड्यांप्रमाणे खुंटल्यासारखी जाणवली. नवीन झालेली संगणक लॅबोरेटरी , पुस्तकांनी भरलेले वाचनालय बघून अभिमान वाटला . नवीन पिढीप्रमाणे शाळेने देखील आपल्यामध्ये बदल घडवून आणला तर !ती तर काळाची गरज आहे. बाहेर निघतांना  सक्षमला 
जे दाखवायला आणले होते ते तिथे नव्हतेच . कारण मी मोठी झाली तशी माझी शाळा देखील मोठी झाली होती. मला माझी शाळा परत दिसेल हि अपेक्षा नक्कीच फोल ठरली. 

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...