Sunday 29 July 2018

सरकारी कार्यालयातील चष्म्याची चौकडी ---आणि माझा अनुभव


नवऱ्याच्या परदेशी वाऱ्या सुरु झाल्या ,तेव्हापासून आपल्यालाही लवकरच ही सुवर्ण संधी मिळेल या अपेक्षेने माझ्याही पासपोर्ट ऑफिसच्या वाऱ्या सुरु झाल्या . आणि सरकारी कामाचा अजून एक नवीन अनुभव पदरात पाडून घेतला. माझं काम आणि सरकारी दफ्तर हे समीकरण मुळातच माझ्या कुंडलीत धोकादायक सांगितलं असावं. कारण ज्या सरकारी ऑफिस मध्ये माझं काम असतं तिथे समोरचा माणूस मला हेलपाटे घालायला मजबूर करण्यासाठी नियुक्त झाला असावा असाच अनुभव बरेचदा येतो. किंवा ही सगळीच सरकारी नोकर मला साच्यात ओतलेल्या चकलीच्या पिठाप्रमाणे वाटतात .पीठ कितीही वरून कितीही समर्पक वाटत असले तरीही वळण काटेरीच असतं ,समोरच्या व्यक्तीने एखादा जरी प्रश्न चौकटीच्या बाहेर जाऊन विचारला तर कार्यालयातील माणसाच्या चष्म्याच्या चौकडीतुन डोळे मोठे झालेच म्हणून समजावं. आणि ते विस्फारलेले डोळे बघून पुढचे पडलेले अगणित प्रश्न गिळून टाकले जातात . आणि मग पुढे काय करायचं हे न समजल्याने सुरु होतो एक वेगळाच खेळ. 

असाच एक अनुभव :स्थळ -पासपोर्ट ऑफिस :मुंढवा 

ह्या वेळी सगळ्या तयारी निशी जायचं आणि काम फत्ते करायचं म्हणून गुगल वरूनच पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून गेले होते. ऑन लाइन फॉर्म भरून लागणाऱ्या कागदपत्रांची उजळणी ३ वेळा करून निघाले. नवऱ्याची मदत न घेता काम करायचा विडा उचला होता त्यामुळे जबाबदारी जास्त होती. गाडी विमानाच्या गतीने हाकायला सुरवात केली जणू परदेश वारीलाच निघाले होते .मॅप धुंडाळत ऑफिसला पोहचले. आतमध्ये सोडायला sms ची पडताळणी करण्यात आली . वेळेच्या आधीच पोहचल्याने वाट बघायला लागणार होती. बेंच वर बसून तिथे आलेल्या लोकांचे चेहरे वाचण्याचे माझे आवडते काम सुरु झाले. बरीच जण जणू आताच फॉरेन ला निघालोय ह्या आवेशात होते. त्यामध्ये काठी घेऊन आलेले आजी आजोबा सुद्धा नातवाच्या घरी जाऊन तोंडात दात नसले तरी पिझ्झा कशाशी खातात हे बघण्याला उत्सुक होते . नेलपेण्टचा कलर तर निघाला नाही ना हे दहादा तपासून पाहणारी कॉलेज सुंदरी दूरदेशी वाट बघत बसलेला एखादा बॉयफ्रेंडला भेटण्यास उत्सुक होती. कोणी एक काकू सुनेच्या बाळंतपणाच्या तारखेपर्यंत पोहचण्याचा गडबडीमध्ये दिसत होत्या. काही शाळकरी मुले सामना खेळण्याच्या आधीच सामना जिंकल्याच्या आनंदात होते. मी मात्र निश्चिन्त होते आज आपण गड जिंकणारच म्हणून लढाईला तयार होते. 


प्रचंड गर्दीतून वाट काढत ,बराच वेळ रांगेत उभे राहून रिसेप्शन ला माझा नंबर लागला . सगळ्या कागदपत्रांची पडताळणी झाली. आणि व्हायचं तेच झालं ,address प्रूफ साठी गॅस बुक ची पावती चालत नव्हती त्यांना गॅस कनेक्शन चे पुस्तक हवे होते. ऑफिस जवळून घराचे अंतर १६ की . मी होते ,वेळ होता २० मि आज जर आणले नाही तर पुढची अपॉइंटमेंट घ्यावी लागणार होती. माझ्यापुढे एकच पर्याय होता नवऱ्याला फोन करून पुस्तक मागवणे. आणि जड अंतःकरणांनी फोन लावला आणि पुस्तक मागवले. आणि परत नवऱ्याच्या मदतीशिवाय सरकारी काम करू शकते हे च्यालेंज घेणार नाही म्हणून कबुली दिली. आणि अशाप्रकारे एक टप्पा पूर्ण झाला. प्रक्रियेनुसार आतमध्ये सोडण्यात आले. जुना पासपोर्ट कॉलेज मधूनच काढला होता त्यामुळे एवढे हेलपाटे घ्यावे लागतात हे माहित नव्हतं .आता पासपोर्ट फक्त रिन्यू करून घ्यायचा होता. 


N -३० ह्या नंबर च कुपन घेऊन प्रवेश केला. मोठे मोठे स्क्रीन लावलेले दिसत होते.त्यावर आपला कुपन नंबर आणि काउंटर नंबर डिस्प्ले होणार होते. डोळ्यात तेल घालून ,डोळ्याची पापणी सुद्धा न लावता मी नंबर शोधत होते. न जाणो पुन्हा काउंटर ला पोहचायला उशीर झाला तर परत पुढची चक्कर !!!!!!!!!!शेवटी काउंटर ला पोहचले.A -काउंटर च्या पलीकडे बसलेल्या माणसाला चष्मा नव्हता त्यामुळे परत चौकड हलायचा प्रश्न नव्हता. त्याच्यासाठी हा खेळ रोजचाच असावा. हळुवार आवाजात "मॅडम पर्स ,गॉगल ,फाईल ,मोबाइल सगळं बाजूला ठेवा आणि स्माईल करा आपण तुमचा फोटो घेणार आहोत "एवढ्या आपुलकीने बोललेले शब्द तेही सरकारी कार्यालयात माझ्यासाठी नवीनच होते. खरंच नकली का असेना पण मोठं हसू आणून फोटो काढण्याचा सोहळा पार पडला . हुश्श !!आता दुसऱ्या जाळ्यातून सुखरूप बाहेर पडले होते. काउंटर बी पडताळणी विभाग परत कागदपत्रांची पडताळणी झाली. सामान्य माणसांच्या हातून होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं तर इथे असलेली सिस्टिम खरंच कौतुक करण्यासारखी आहे.बसायला ऐसपैस जागा ,गर्दी लवकर कमी व्हावी म्हणून स्क्रीन आणि सगळं कॉम्पुटर द्वारा हाताळण्याची सुव्यवस्था .ह्यासाठी tcs ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे . आता माझी रवानगी झाली ते काउंटर सी कडे सरकारी झोन. आता मात्र पलीकडे बसलेली बाई एकदा कागदपत्रांकडे आणि एकदा माझ्याकडे बघायला लागली आणि माझ्या मनात धोक्याची पाल चुकचुकली आणि परत चष्मयची चौकडी हलली चष्मा नाकावर सरकून बाई बोलू लागली "मॅडम आधार कार्ड मध्ये pooja आहे आणि जुन्या पासपोर्ट वर puja आहे ,स्पेल्लिंग मध्ये चूक आहे , " अरे बापरे पहिल्यांदा मराठी भाषेतील उकार चे महत्व कळले . "गॅस बुक वर pooja च आहे " - इति मी .बाई अक्षरश : ओरडली हे काही आयडेंटिटी प्रूफ नाही. नेक्स्ट अपॉइंटमेंट घ्या म्हणून सांगून बाई सुटल्या.चष्मयची चौकडी परत हलू नये म्हणून त्यासाठी काय करायचं हा प्रश गिळून टाकला. आणि घरी येऊन गुगल ला हाताशी धरलं .पेपर मध्ये जाहिरात देऊन नावात बदल अस छापून आणावं लागेल हे कळलं. आणि आयुष्यात पहिल्यांदा पासपोर्ट ऑफिस च्या कृपेने वर्तमानपत्रात नाव छापून आणले आणले 


ठरलेल्या दिवशी पासपोर्ट ऑफिसला जाऊन पोहचले. आता नाही परदेशात जायला मिळालं तरी चालेल पण इथे परत येणार नाही म्हणून मी मनाशी ठरवलेले होते. आणि २ परीक्षा पास करून ३ री परीक्षा उत्तीर्ण होईल कि नाही ह्या द्विधा मनस्थितीत होते. परत सी काउंटर ला बोलावण्यात आले ,नावात बदल केला हे ठीक आहे मॅडम आधार कार्ड सोडून अजून एक आयडेंटिटी प्रूफ दाखवा . परदेशात जाण्यसाठी एवढी पडतळणी एअरपोर्ट वर सुद्धा करत नसतील. किंवा इथून तावून सुलाखून निघाल्यावर ती पडताळणी काहीच वाटत नसावी. हे पहिल्यांदा परत पाठवलं तेव्हाच का सांगितलं नाही ?????नकोय मला पासपोर्ट असं तोंडावर फेकून उठून यावं कि काय ,अस वाटत होत पण File नीट बघा एकतरी प्रूफ ठेवलं असेल हे सांगून मला थोडा श्वास घ्यायला वेळ दिला ह्या बद्दल मी काकांचे धन्यवाद मानले. आणि File च्या एका कोपऱ्यात कॉलेज चे जुने आयडेंटिटी कार्ड दिसले फोटो वरून माझेच असावे , परत A काउंटर ला जाऊन स्कॅन करून घेतले . आता मात्र तिथला शिपाई पण ओळखायला लागला होता ,मॅडम परत आल्या का म्हणून गालातल्या गालात हसत होता. एक केस रोज असते हे आणि तेही विशेषकरून बायांचीच अस म्हटल्यावर, नवरा मला येऊ दे सोबत म्हणून का सांगत होता. हे आता कळलं. आणि सरते शेवटी काकांनी एक शब्दही न काढता कागदपत्र तपासून ओके चा शिक्का मारला . आणि शिक्याच्या आवाजाबरोबरच माझा जीव भांड्यात पडल्याचेही आवाज झाला. 

आणि परदेशात पोहचल्याच्या खुशीत मी ऑफिसमधून बाहेर पडले. आता मात्र मी सातव्या आसमंतात होते.

"अजून पासपोर्ट हातात आला नाही तोवर आनंद साजरा करू नको "इति नवरा . 



पासपोर्टच्या प्रतीक्षेत .....

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...