Monday 19 November 2018

सध्या गर्दीतून जातांनाही एकटं वाटतंय ....

सध्या गर्दीतून जातांनाही एकटं वाटतंय ह्याच  कारण गेले कित्तेक दिवस शोधून काढण्याचा प्रयत्न करतेय . अजून पूर्णपणे सापडलं नाही तरीही आपणच आपल्यासाठी निर्माण केलेलं "आभासी विश्व " काही अंशी पटलेलं उत्तर आहे. जस पक्ष्यांना उडण्यासाठी आभाळ असतं  तसच आपल्याला ,आपली दोरी आपल्याच हातात ठेऊन सगळ्या विश्वात डोकावून येण्यासाठी आभासी जग निर्माण झालाय. माउस च्या एका क्लिक वरून तुम्ही इंटरनेट च्या माध्यमातून कुठेही जाऊन येऊ शकता . आणि फिरून येत असतांना आपण वास्तव आणि कल्पना ह्याची सीमारेखा हरवून बसतो . लहानपणी आजी चेटकीण ,परी ,राक्षस ह्यांच्या गोष्टी रंगवून सांगायची आणि तिच्या रंगवण्यात आपण आपल्या कल्पनेप्रमाणे ते मानस पटलावर रंगवायचो ,प्रत्येकाची कल्पनाशक्ती वेगळी होती गोष्ट संपल्यावर त्यातून बाहेर पडल्यावर वास्तव काय ह्याची जाणीव व्हायची . आता मात्र आपणच जादूगार झालोय हवे तसे चित्र काढून आपल्याला पाहिजे तसे रंग भरून एक आभासी  चित्र निर्माण करता येत आणि फेसबुक व्हाट्स अँप च्या माध्यमातून ते जगाला दाखवता येत . ह्या जादूचा उपयोग करून असंख्य मित्र सुद्धा जोडता येतात आणि मग सुरु होतो एक वेगळाच खेळ ,वेगवेगळे चित्र रंगवून खोटं विश्व निर्माण करण्याची आणि मी किती सुखी आहे हे दाखवण्याची चढाओढ !!!ह्यामध्ये आभास आणि वास्तव ह्याची गल्लत होते. नेमकं मला हेच हवं होत की माझ्या आवडी वेगळ्या होत्या,खर काय? आणि खोट काय ? ह्याचा गोंधळ सुरु होतो. 


           संध्याकाळी थकून आल्यावर दिलखुलास गप्पा माराव्या अस वाटलं ,आजूबाजूला कोणी नसले  तरी आभासी  माध्यमांचा वापर करून त्या मारल्या हि जातात .एकटेपणा काहीवेळासाठी कमीही होत  असेल कदाचित    पण त्यामध्ये भावनिक जवळीक कुठेही दिसत नाही . समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हाव  भाव टिपण्याचे सुख मिळत नाही. दिलखुलास हा शब्द  त्या गप्पांसाठी फोल ठरतो. कॉलेजमधे शिकवतांना शिकवण्याबरोबरच विदयार्थ्यांच्या चेहऱ्याचा पाट्या वाचणं माझा आवडता छंद  होता.एक इंजिनीरिंगचा  विद्यार्थी जो मला नेहमीच सगळ्यांमध्ये वेगळा वाटायचा ,दिसायला साधारण होता ,अभ्यासात जेमतेम पण मला वेगळं काय जाणवलं असेल तर त्याला आभासी विश्वात रमण्यापेक्षा समोर दिसणाऱ्या जिवंत व्यक्तींसोबत रमायला जास्त आवडायचं . त्याचे बाकी मित्र कॅंटीनमध्ये मोबाइल किंवा लॅपटॉप शी खेळत असतांना हा मात्र कँटीन मध्ये काम करणाऱ्या राजू सोबत गप्पा मारायचा . चक्क वडा पावमध्ये चटणी घालून प्लेट नेऊन द्यायचा . मी त्याला अस करतांना बरेचदा बघितलंय. लॅब असिस्टंट किंवा चपराशी लोकांच्या मुलांच्या  नावासकट शाळा, त्यांचे छंद ह्याची  खडानखडा माहिती ह्या पठ्याला  होती.तो नुसता गप्पाच मारायचा अस नाही संकटकाळी त्यांच्या मदतीला सुद्धा धावून जाताना मी नोटीस केलय.ऑफिसमधले कर्मचारी ,गेटवरचा सकाळचा आणि रात्रीचा सेक्युरिटी गार्ड देखील  त्याला नावाने आवाज द्यायचे. एक वेगळी जवळीक त्यांची मला जाणवली . बाकी मित्र त्याला वेड्यात काढतांना देखील मी ऐकलंय काय तर म्हणे हा संध्याकाळी आजी आजोबांच्या पार्कमध्ये जाऊन बसतो आणि गप्पा करतो. एकमेकांना मेसेजेस पाठवण्यात ,फेसबुक च्या पोस्ट वर कंमेंट्स लिहण्यात ,सेल्फी काढण्यात जेव्हा बाकी लोक मला मश्गुल दिसतात त्या सगळ्यांमध्ये जिवंत लोकांच्या भावनांची कदर करणारा हा नक्कीच वेगळा भासतो . फायनल सबमिशन घेताना तो वेळेवर हजर राहू शकला नाही ,तेव्हा तो आजारी आहे हे मला सेक्युरिटी वाले काका, कॅन्टीनचा राजू आणि एक आजोबा येऊन सांगून गेले ह्यावरून मला त्यानी नुसते जपलेले च नाही तर निभावलेले नातेसंबंध काय होते ह्याचा धडा समजला. 

व्हाट्स अप किंवा फेसबुक ह्यांच्या आहारी जाऊन आपण खर् च  काय गमावून बसलोय हे कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. आज आभासी जग हे केवळ व्यक्त होण्याचं माध्यम  आजच्या पिढीसाठी झालय म्हणून हि पिढी निकोप वाढू शकेल का ह्यावर प्रश्न  चिन्ह निर्माण झालय.आवकशकतेपेक्षा जास्त वापर केल्याने ह्याचे दुष्परिणाम लवकरच घातक ठरतील. 

पास आऊट होऊन तो एका चांगल्या स्वाफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला लागला . कॉलेजमध्ये मार्कलिस्ट घ्यायला आला असताना माझी त्याच्याशी गाठ पडली ,"अजूनही वडा पाव मध्ये चटणी  भरतोस का ??  "माझा गमतीने विचारलेला प्रश्न.पण त्यानी दिलेलं उत्तरा वर मला विचार करायला भाग पडलं 
"वडा पाव मध्ये चटणी भरणं त्यासारखी मज्जा कंपनीमध्ये नाही मॅडम त्या निमित्ताने   एकावेळी अनेक लोकांशी संवाद साधता यायचा ,लॅपटॉप वरच्या आभासी जगातून पलीकडले जे विश्व दिसते  त्यामध्ये माणुसकीचे रंग भरता   येत नाही   "       

No comments:

Post a Comment

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...