Friday 28 June 2024

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

  भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ... 

AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता )


हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ?संध्याकाळी जेवायला  काय बनवायचं हे जर सुचत नसेल तर पटकन जाऊन चॅट जिपीटी ला विचारायचं . गमंत नाही!! मी खरंच करून बघितलं आणि त्याने रेसिपी सकट अख्खा  धडा समोर लिहला आणि शेवटी एक वाक्य लिहलं  "आपला स्वयंपाक रुचकर होऊ दे " . आता फक्त "तू येणार का जेवायला  ?" एवढंच मी चॅट जिपीटी ला विचारायचं शिल्लक होत . 



काल शाहिद कपूर चा सिनेमा पहिला सिफरा कृत्रिम रित्या बनवलेली रोबोट तिच्या प्रेमात शाहिद पडतो . सिफरा समोरच्याचे फेशिअल एक्स्प्रेशन बघून ठरवते त्याला काय होत असेल आणि फीड केलेल्या codes वरून काय action घ्यायची  हे स्वतः ठरवते . "रोबोट च्या प्रेमात पडणे आणि भावनांना एकतर्फी वाट करून देणे " हे लवकरच येणाऱ्या पिढी मध्ये बघायला मिळेल ह्यात काही खोटे नाही. आता प्रेम पण विकत घेण्याची सोय झाली . 



मला माझ्या कन्टेन्ट साठी काही इमेज बनवायच्या होत्या ,मी पेन आणि पेन्सिल घेऊन अख्खी रात्र जागून ४ ते ५ वेळा खोडून एक आराखडा तयार केला. काम मनासारखे झाले म्हणून खुश होऊन पहाटे झोपले. आता तो आराखडा डिझायनर कडे देऊन सुंदर ,बोलके चित्र कधी येते ह्याची वाट पाहू लागले , इतकी किचकिच कशाला ?AI ला सांगितलं तर तो देईल कि चित्र २ सेकंदात काढून . आणि खरंच चित्र आले देखील अगदी हुबेहूब . 

पण कोरडेच होते ते . भावनाशून्य !! कारण त्या मागच्या भावना AI वाचू शकले नाही . 


माझी आई ची एक पिढी आहे ,जी अजूनही मराठी भाजीवाल्या शी अस्खलित हिंदी मध्ये बोलते (दूधवाले भैया आणि भाजीवाले ह्यांच्याशी हिंदी बोलावं लागते असा तिचा गोड समज आहे) आणि पर्स मधून कॅश किंवा चिल्लर काढून ती त्याला किमान दोन वेळा  मोजून देते . आत्ता अलीकडेच खूप प्रयत्नांनी  ती गूगल पे हाताळायला शिकली .  लाईट बिल , मोबाइल चे बिल इतके विश्वासाने भरते आणि मला नवीन तंत्रज्ञान जमले ह्यावर खुश होतांना मी तिला पाहिलंय. नवीन अँप आता ती स्वतः download करून हाताळून बघते. पण पैसे देतांना जी शब्दांची देवाण घेवाण व्हायची ,नवीन लोक जोडली जायची ,भावना पोहचायच्या ते समाधान वेगळं होत . ह्या अँप मधून लोक भेटत नाही ग, काम झटपट होत बस  . असं ती सारखं म्हणते . आता ह्या नवीन अंगावर येणाऱ्या टेकनॉलॉजि शी जुळवून घेणं तिला परत किती अवघड जाईल ह्याची कल्पना देखील  करवत नाही. 


माझी पिढी केवळ आपली सोय बघते .आम्हाला फक्त कोड किंवा कमांड कश्या द्यायच्या हे चांगलं ठाऊक आहे. हातात गॅजेट्स घेऊन आपली एकाकी जागा शोधायची आणि ह्या virtual दुनियेमध्ये रमायचं . तू हे असं का केलंस ?नियम का तोडले ? ह्या प्रश्नांची सरबत्ती करायला ह्या virtual दुनियेत कोणी नाही.आपली प्रायव्हसी आपल्याला मिळणार आणि जगात कुठे हि हिंडून येण्याची मुभा सुद्धा . शिवाय पर्सनल आयुष्यात डोकावायला इथे कोणाला वेळ नाही . लगाम नसलेले स्वातंत्र्य !! तेच हवे ना आम्हाला . 


हे असेच चालू राहणार  ह्याच्याशी जुळवून घेणे च म्हणजे स्वतःला ह्या विश्वात टिकवून धरणे . भावनांना सांभाळा ,मनाला आवरा हे  outdated होऊन  कोडींग रिफ्रेश करा ,कमांड change करा म्हणजे जमले . जो ह्या AI शी जुळवून घेईल तो राज्य करेल . नवा गडी नवा डाव . 


तुमचे काय ?भावनांना घेऊन बसणार कि ह्या बदलणाऱ्या जगात स्वतःला बदलणार ?

Wednesday 1 December 2021

मला वाचवा


 माझ्या डोक्यात बरेचदा विचार येतो कुठले दिवस असतील जे मी परत जगता यावे म्हणून देवाकडे मागेल?  'back to school ' एकमेव उत्तर.  क्या दिन थे यार ! खरंच शाळेतले दिवस हे फुलपाखरासारखे रंगीत बागडणारे दिवस होते. आणि त्यातल्या त्यात मी खूप अभ्यासू वगैरे च्या संख्येत यायची त्यामुळे आयुष्यातही  टॉप राहूच ही  खात्री होती. जेव्हा रिअल वर्ल्ड मध्ये एन्ट्री घेतली तेव्हा लक्षात आले इथे सगळेच काही वेगळे आहे. आतापर्यंत पुस्तकात जी थेअरी वाचली ती इथे लागू होत नाही .इथे फिट बसतील असे फंडे शाळेत शिकवलेच नाही. आणि हा विचार करण्यास भाग पाडले भारतातील गुरुकुल प्रणाली किती बेस्ट होती. जीवनात उदरनिर्वाह होण्याकरिता लागणारे शिक्षण व त्याबरोबरच एक समृद्ध आणि परिपूर्ण व्यक्ती घडवण्याचे मार्गदर्शन इन वन प्याकेज .ऑल अंडर  वन रूफ विथ नो चार्ज.   म्याकेले काका आले आणि सगळ्यात पहिले त्यांनी घाव घातला तो ह्याच प्रणालीवर . भारताचा सर्वांगीण विकास होण्याचे सर्व रस्ते गुरुकुल प्रणाली बंद झाल्यापासून आखूड झाले. अमुक अमुक गुरूकुल’ असा फलक लावून पुराण काळातील गुरूकुल पद्धती पुनरूज्जीवित करता येणार नाही 'द्रोणाचार्य व सांदिपनी यांच्या योग्यतेचे गुरू आज नाहीत आणि कृष्ण-अर्जुन-कर्ण-एकलव्य यांच्या योग्यतेचे विद्यार्थी पण नाहीत . पण काही गोष्टी खरंच पुन्हा आधुनिक पद्धतीने आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये अमलात आणता येतील.त्यातल्या काही गोष्टींचाच आवर्जून उल्लेख करते आहे.   


१]योग आणि ध्यान -काहीच दिवस झाले आपण योग आणि ध्यान ह्या गोष्टींच्या पुन्हा एकदा जवळ आलोय. ह्याचे कितीतरी फायदे आता लक्षात येत आहे अस सारखं वाटते हे सगळं शाळेत का शिकवल्या गेले नाही जेव्हा आम्ही डेव्हलपमेंट च्या उंबरठयावर होतो.  जगातल्या कॉम्पिटिशन  मध्ये भाग घेणे आणि जिंकणे हे सगळे शाळेने शिकवले पण हरलो तर स्वतःला सांभाळणे आणि पुन्हा उठण्याचे  बळ देणे हे योग आणि ध्यान शिकवून किती लवकर जमले असते.

गिरना और हारना ये बिलकुल  नॉर्मल है  ये पहेलेसे बताया जाता तो आज जिंदगी कूछ  और होती ज्यादा खूबसूरत महसूस होती     

२]उद्योग कौशल्य -मला कोणी लहानपणी जर सांगितले असते की  तुम्ही स्वतःचे उद्योग सुरु करू शकता ,आणि त्याला लागणारे प्राथमिक शिक्षण हे शाळेत मिळाले असते तर , मला जॉब कसा मिळेल हे न बघता दुसर्यांना जॉब कसा देता येईल ही मध्यम वर्गीय मानसिकता नक्कीच  बदलली असती . गुरुकुल मध्ये तेव्हाचे उद्योगासाठी  लागणारे कौशल्य हे लहानपणी शिकवले जायचे पण आता इंग्रजी सिस्टिम प्रमाणे नोकरी मिळवणे हे अल्टिमेट ध्येय आयुष्याचे झाले.आणि स्वतःचे विचार नसलेले लेबर म्हणून मार्केट मध्ये जागा मिळाली . कोणी  १० रुपये देऊन ह्याचे १०० रुपये कसे करता येईल कुठलेही शॉर्ट कट न वापरता  हे सांगितलेच नाही .भाजी विकणे हि ऍक्टिव्हिटी सुद्धा लहानपणी एन्जॉय करायला आवडली असती .    

३]क्रिएटिव्ह learning- नवनीत guide वापरून पेपर मध्ये मार्क्स मिळतात आणि सगळीकडून पाठीवर थाप मिळते हे डोक्यात पक्के बसले होते . म्हणून स्वतःचे डोके लावण्याचे कष्ट घेतले नाही. परंतु नोकरीला लागल्यावर नवनीत गाईड मदतीला नव्हती रोज काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया पाहिजे ह्याची ची डिमांड होत होती . पण आपण स्वतः वेगळे विचार मांडू शकतो आणि ते लोकांना आवडू शकतात हा छोटासा फंडा समजला तेव्हा उशीर झाला होता. आपण कुठलीही टेकनॉलॉजी शिकलो तरी ती काही दिवसांनी जुनी होणार , मग आपण वेगळी  थॉट प्रोसेस जर मुलांना शिकवली तर ...  जे गुरुकुल मध्ये तंतोतंत व्हायचे.  

४]नैतिक विवेक आणि नैतिक प्रशिक्षणाची निर्मिती- cheating करून पुढे जाणारे लोक आजूबाजूला दिसले आणि त्याचे आयुष्यात  काहीही वाईट होत नाही हे कुठेतरी मनाला चटका लावून जायचे . बऱ्याच प्रसंगी राग यायचा ,भावनिक ताबा सुटायचा ह्याबद्दल कोणीच काही शिकवले नाही. physical फिटनेस कडे शाळेत  थोडे फार धडे पी टी च्या पिरियड  मिळाले पण माईंड , इमोशन्स ह्याबद्दल कोणीच शिकवले नाही. आयुष्यातल्या डिप्रेशन वरचे solution कोणी का सांगितले नाही ह्याची खूप खंत वाटते. 

स्वतःची image आणि रेप्युटेशन ह्यावर  जागरूक राहायचे धडे मिळाले  पण सेवा ह्याचे धडे फक्त नैतिक  शिक्षण ह्या  पुस्तकात वाचायला होते. त्याचा प्रॅक्टिकल अनुभव  कधी घेतला नाही त्यामुळे जीवनात सेवा भाव उतरवणे हे प्रचंड कठीण झाले जे गुरुकुल मध्ये सहज  व्हायचे . स्वतःची ,समाजाची आणि देशाची नैतिकता टिकवायला मदत होत होती. 

५]आर्थिक साक्षरता -अक्ख इंजिनीरिंग पूर्ण झाले तरी साधे बँकेचे व्यवहार मला कोणी शिकवले नाही ह्याची खंत होती. पैसा  हातात आला तेव्हा saving आणि खर्च ह्याची बॅलन्स शीट मला maintain ठेवता आली नाही.भारताची आर्थिक व्यवस्था काय आहे ती कुठल्या फ्युएल वर चालते ह्याची विशेष माहिती नव्हती आणि हे माहिती असणे किती आवश्यक होते हे बाहेरच्या जगात आल्यावर कळले . कॉमर्स फील्ड सोडली तर बऱ्याच लोकांना आजही उगाच ह्याचा बाऊ वाटतो  पण हे आधीच  शिकवले गेले असते तर चक्रवाढ व्याज चे फक्त गणित म्हणून सोडवण्याचा दृष्टिकोन बदलला असता . 


एकंदरीत मला वाचवा हे शीर्षक घेऊन  , भारतीय शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धतीचा समावेश आधुनिक पद्धतीने करता येईल का? यासाठी मी हा विषय मांडला. हे प्रत्यक्षात उतरवणे  खूप  अवघड  आहे हे माहित असूनही लेखणीची ताकद खूप आहे ह्यावर विश्वास आहे. म्हणूनच  हा प्रपंच .  

Thursday 30 September 2021

आयुष्याच्या कॅनवास वर एक वेगळं चित्र सक्षम ने आज रंगवले होते.

  काळ्या कुट्ट अंधारातून ,दगडांमधून पायवाट शोधत  प्रवास सुरु होता . सोबत दूरवरून येणारा  पाण्याचा आवाज आणि रातकिड्यांची किरकिर ह्यापलीकडे सगळा परिसर  शांत होता .  रात्रीचे १० वाजले होते  ,रस्ता परिचित नव्हता ,डोंगरावरून खाली उतरून ,नदीच्या काठावर मुक्कामाला टेन्ट हाऊस मध्ये जायचे होते. आमचा १५ जणांचा ग्रुप होता. वाटाड्या सोबत असला तरीही रस्ता आपला आपल्याला चाचपडत पार करायचा होता. अंतर सुद्धा काही थोडे नव्हते आम्ही नेहमीचे night ट्रेकर नसल्यामुळे ३ किलो मीटर चे अंतर जास्तच वाटत होते. सक्षम   [माझा ७ वर्षाचा मुलगा ] कसा रिऍक्ट करेल ह्याची धाकधूक होती. हा त्याचा पहिला अनुभव होता ,माझाही तसा पहिलाच अनुभव  होता . मी मनातून घाबरले होते पण ते दाखवायचे नाही असे ठरवले . बहुदा सक्षम रडेलच आणि मी खाली येणार नाही असा हट्ट करून बसेल असा अंदाज मी बांधला . म्हणून त्याच्यासोबत  वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या आणि कसातरी वेळ काढायचा म्हणून विषय बदल करायला सुरवात केली. समोर वाटाड्या आणि आम्ही ४ जण त्याच्या मागून मागून जात होतो . काही फांद्या हाताला टोचून जायच्या ,दगडाची ठेच लागत होती,समोर एकदम  मोठा खड्डा येत होता त्याला पार करून पुढे जाणे चालू होते. माझ्या ,मनात धाकधूक कायम होती ,म्हणून  मी सक्षम सोबत त्याच्या पुण्यातील मित्रांबद्दल बोलत होते. पण त्याचे लक्ष वाटाड्या च्या बोलण्याकडे होते ,त्याने माझा हात पकडला असला तरीही तो कान  देऊन वाटाड्या काय सांगतोय हे ऐकत होता. शेवटी मला गप्प बसायला त्याने भाग पाडले .  इथे साप ,विंचू कसे राहतात आणि जंगलातील प्राणी कसे रात्री येतात ह्याच्या गप्पा तो मारत होता आता माझी भीती अजूनच बळावली . आणि तेवढ्यातच  पाय निसटून सक्षम घसरला ,थोडे हातापायाला खरचटले ,आता आपले काही खरे नाही बहुदा मला माघारी जावं लागेल ,नसती उठाठेव केली आपण असे अनेक विचार मनात फेर घालू लागले. वाटाड्या ने सक्षम ला आता कडेवर घेतले होते आणि तो पुढचा रस्ता  तुडवत होता . मोठ्याने भोकाड पसरलेला सक्षम  जरा शांत झाला होता.त्याने स्वतःहूनच मला खाली उतरव म्हणून त्याला सांगितले असावे पण आता तो माघारी येऊन  मला बिलगेल किंवा माझा हात पकडेल अशी माझी अपेक्षा होती. पण त्याने माझ्याकडे न येत वाटाड्या सोबत चालणे पसंद केले आणि साप बद्दल अजून सांगा म्हणून त्याला तो विनवू लागला. मनात विचार आला ,घाबरले मी होते म्हणून तो ही  घाबरलाच असेल अशी समजूत करून घेतली आणि त्या प्रमाणे क्रिया करायला सुरवात केली होती पण त्या प्रसंगाकडे  त्याचा बघण्याचा स्वतःचा दृष्टिकोन असू शकतो हे मी विसरले. लगेच comfort झोन मध्ये त्याला ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. असाच अनुभव पुढेही मला आला. 

दिवसभराचा प्रवासाचा थकवा जाणवत होता ,शेतात काम करायची ऍक्टिव्हिटी झाली होती त्यामुळे अंग दुखत होते.३ किलो मीटर चालल्यामुळे पायात गोळे आले होते  कधी जाऊन झोपतो असे झाले होते. नदीच्या जवळ पोहचताच थंडावा जाणवला ,पाण्याचा आवाज अजून स्पष्ट ऐकायला येऊ लागला. समोर पाणी आहे हे आवाजावरून कळत होते पण सगळाच अंधार दिसत होता. शेवटी लाल ,काळे ओळीने मांडलेले टेन्ट दिसू लागले आजूबाजूला लावलेले दिवे मंद होते त्यामुळे अंधार आणि  शांतता आपले रोख दाखवत होते. शहरातील झगमगाट ,गाड्याचे आवाज ह्याची सवय असलेले माझे  कान आणि मन हे स्वीकारायला लवकर तयार नव्हते. हे सगळे वातावरण बघून वाईट विचार मनात शिरकाव करत होते. adventure पेक्षा भीती जास्त वाटत होती. पण कुठलेही पूर्वानुग्रह न बांधता सक्षम ह्या सगळ्या गोष्टींकडे कसा बघतो हे आपण बघूया असे ठरवले. सगळे आपापल्या टेन्ट मध्ये स्थिरावले , निजानीज ची तयारी झाली .'झोप बाळा 'मी विनवू लागले. पण वाटाड्या आणि दोघे तिघे मिळून कुठेतरी जायचे नियोजन करत होते हे त्याने  अचूक वेधले. . तेवढ्यात कोणीतरी सांगत आले  'आम्ही  नदीत जाणार आहे ,तुम्ही येणार का? '. अरे बापरे हे काय नवीन आता ,रात्रीचे ११;३० वाजता ? नको नको . सक्षम उठून बसला ,आई चल ना ,प्लीज ... मला हे अनपेक्षित होते. मी फक्त आणि फक्त त्याच्या साठी तयार झाले. आतून माझी घाबरगुंडी वळली होतीच. मला सोडून बाकी सगळ्यांचा  adventure हा सवयीचा भाग असावा . एक टोपली प्रमाणे दिसणारी होडी नदीत उतरवण्यात आली ,दोन वल्हे बाहेर काढले. एका होडीत ५ व्यक्ती प्रमाणे २ टोपल्या पाण्यात ओढल्या आम्ही १० जण निघालो  . मी सक्षम ,वाटाड्या आणि अजून एक जण होडीत बसलो . माझी मैत्रीण आणि तिचा मुलगा दुसऱ्या होडीत बसले. वल्हे चालवून टोपली नदीत पुढे पुढे सरकू लागली. 


अमावसेची रात्र ,मध्यरात्रीचे १२ वाजून गेले आहेत,आजूबाजूला अंधार ,घनदाट  जंगल,  अथांग दूरवर पसरलेले नदीचे पाणीच पाणी  आणि त्याचा मधोमध छोटोशी टोपली .   तोंडात बोटे टाकायची वेळ माझ्यावर आली  होती. सक्षम शांत होता ,पण घाबरलेला दिसत नव्हता .निरीक्षण करत होता. पाणी हालत होते,वल्हे पाण्याला मागे टाकत होते ,टोपली पुढे पुढे जात होती . नदीच्या मध्यभागी जाऊन टोपली थांबली ,मी अक्षरशः डोळे मिटून घेतले होते माझी घाबरगुंडी उडाली आहे हे सगळ्यांना कळून चुकले.  होडीत सोबत असणारा मित्र योगा  ट्रेनर होता,तो म्हणाला घाबरणे दूर करण्यासाठी एक मेडिटेशन घेऊया . मी जवळपास किंचाळले 'कुठे?'.... 'इथेच  '..माझा योग ट्रेनर मित्र. 'इथे पाण्याच्या मध्यभागी ,अंधारात ?'... इति मी . 'हो ,वेगळा अनुभव असेल '

...माझा मित्र . असं म्हणून तो सुरूच झाला ,डोळे हलके बंद करा, आणि विचार करा आपण आपले सगळे जग मागे ठेऊन आलोय, सगळे आधीचे अनुभव, चिंता ,सगळ्या  भावना आणि हो भीती सुद्धा . ..... तो २० मिनिटे बोलत होता . जो अनुभव होता तो मला शब्दात मांडता येण्यासारखा नाही. भीती वाटायला काय कारणीभूत होते ?आधीचे काही ठोकताळे च ना ? जे माझ्याकडे होते आणि सक्षम कडे नव्हते . म्हणून तो कुतूहलाने हा अनुभव घेत असावा आणि मी मात्र भीतीने त्या वेगळ्या अनुभवाला  जवळ करू शकत नव्हते.  हे मात्र नक्की तो अनुभव घेतांना सक्षम माझा गुरु  झाला आणि मला बरेच काही शिकवून गेला. 


सकाळी डोळे उघडल्यानंतर रात्रीची तीच शांतता ,तीच नदी ,तेच डोंगर ,तेच जंगल खूप सुंदर एक चित्र रंगवल्याप्रमाणे भासत होते. माझ्या आयुष्याच्या कॅनवास वर सुद्धा एक वेगळं चित्र सक्षम ने आज रंगवले होते.   

  

 



नोट -बोलकी चित्रे शब्दांसोबत जोडत आहे,हा अनुभव जिथे घेतला त्याची लिंक जोडली आहे. संधी मिळाल्यास नक्की एकदा भेट द्या. ''साकार ,इको village ..... ''

video clip of our first adventure trip



पुन्हा कधी संधी मिळेल ह्याच्या प्रतीक्षेत. 

Thursday 3 June 2021

ते वडाचे झाड ....


वडाचे झाड आणि त्याच्या लांबच लांब पारंब्या हे मला नेहमीच एक गूढ प्रतीक वाटत आलंय . लहानपणी शाळेत जातांना रस्त्यामध्ये एक खूप जुने वडाचे झाड दिसायचे. त्याच्या खाली एक मंदिर होते नक्की कोणाचे होते हे आठवत नाही ,कारण वडाच्या झाडाचे भुताशी काहीतरी नातं आहे हे मनात कोणीतरी बिंबवले होते. त्यामुळे शाळा सुटल्यावर त्या झाडाखाली जास्त वेळ थांबायचे नाही हे पक्के ठाऊक होते. त्या वडाच्या झाडाखाली एक प्रेस वाल्या माणसाचे दुकान होते ,टपरी  वजा छोटेखानी दुकान ते कायम कपड्यांनी भरलेले असायचे ,तो माणूस आणि त्याची बायको प्रेस मध्ये कोळसा भरतांना मला जाता येतांना दिसायची . दिवसभर हा माणूस बायकोला सोबत घेऊन खूप काम करायचा हे मला पक्के ठाऊक होते. एकदा रात्री सुमारे ८ वाजायच्या आसपास मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला ,शाळेच्या रस्त्यावरूनच पुढे तिचे घर होते . रस्ता रोजचाच असल्याने परिचित होता . पार्टी संपली सगळेजण आपापल्या घरी जायला निघाली मी सुद्धा सायकल वरून निघाले गिफ्ट्स,हसणे ,मज्जा ह्या पार्टीच्या विश्वातून मी अजून बाहेर आले नव्हते तेवढयात ते झाड आणि तो रस्ता रात्रीच्या वेळी अजूनच भयानक जाणवत होता. तो प्रेस वाला रोज दिसणारा माणूस दारू पिऊन धिंगाणा घालत होता बायकोला जोरजोऱ्यात शिव्या देऊन मारत होता  . हे चित्र रात्री रोजच असते असे कोणाकडून तरी मला कळले.  दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना मी काहीश्या भीतीनेच  डोकावले तेव्हाचे चित्र वेगळे होते   , जुने भरभक्क्म झाड ,लोंबत्या वाकड्या तिकड्या पारंब्या ,तो प्रेस वाला ,त्याची शांत बायको आणि तोच काळा कोळसा .आता मात्र रात्रीच्या धिंगाण्याचा नामोनिशाण त्याच्या वागण्यात दिसत नव्हता .हे चित्र मी जवळपास १० वर्षे पाहत आली  आहे.  

कॉलेज मध्ये गेल्यानंतर ,अमरावती चे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय  आणि तेथील जुन्या दगडाच्या इमारती हे  आधीच एक गूढ वाटायचे  आणि परत सोबतीला असलेले एकच वडाचे झाड त्याच्या मध्ये अजून भर टाकायचे . दिवसाकाठी ह्या झाडाच्या आजूबाजूला सगळ्या कॉलेज मधील तरुण ,तरुणींचा घोळका असायचा .  गाडी लावायला एकमेव पार्किंग इथेच होती. आम्ही सुद्धा कधी कधी गप्पा इथेच उभे राहून मारत असू. पण नजर चुकूनही झाडावर गेली तरी एक भीतीची लहेर चमकून जायची. एकदा स्नेह संमेलनाचा दिवस होता रात्री कॉलेज मधून निघायला बरीच रात्र झाली . गाडी झाडाखाली लावली असल्याने तिथे जाणे भागच होते. वडाचे झाड  रात्रीच भयानक भासते ह्याची खात्री परत एकदा झाली. माझी गाडी खूप प्रयत्न करूनही सुरु होत नव्हती . अजून थोडा  वेळ तिथे घालवावा असे मुळीच वाटत नव्हते . गाडी तिथेच सोडून ऑटो च्या मदतीने घरी पोहचले पण संपूर्ण रस्त्यावर वडाची च झाड महानगर पालिकेने लावली कि काय असा भास होत होता . 

पुणे युनिव्हर्सिटी मध्ये आल्यानंतर पी एच डी साठी पी जी section ला सारख्या घिरट्या घालाव्या लागायच्या . इथे  देखील हेच रहस्यमय ,गूढ वातावरण मला बघायला मिळाले. अलिबाबाची गुफा असल्याप्रमाणे थंडगार असे ते एकमेव डिपार्टमेंट वडाच्या झाडाखालीच उभे होते.  पावसाळ्यात त्याचे रहस्य अजून गूढ होत जाते. ढग दाटून आले आणि विज जर गेली तर दिवसाढवळ्या अंधार पडायचा.   येथील स्टाफ देखील  सिरीयल मधील डिटेक्टिव्ह  प्रमाणे वाटतात . टेबल पलीकडून माणूस नसून फक्त चष्मा बोलतोय अशी जाणीव होते.  इथले गूढ वातावरणाचे श्रेय मी त्या एकांत टिकवून ठेवणाऱ्या वडाच्या 
झाडालाच देऊ इच्छिते . 


 माझे शिक्षण आणि गूढ वडाचे झाड ह्याची सोबत मला शेवट पर्यंत झाली  आणि हा शिक्षणाचा प्रवास आता जरी थांबला असला तरी वडाचे झाड आणि त्याच्या भीतीचे  गूढ अजूनही कायम आहे 


Tuesday 16 February 2021

जुनेच पण पुन्हा नव्याने भेटलेले माझे गाव

 lock down चा कहर आता बराच ओसरला होता आणि कंपनी च्या मालकाच्या कृपेने घरून काम करा ह्या संधीची  अंमलबजावणी आम्हाला चांगलीच मानवली. माहेरपण अनुभवता अनुभवता  बालपण गेलेल्या गावाला इतके दिवस राहण्याची आयतीच संधी मिळाली. दोन दिवसाची भेट घेऊन निघण्यात मन तृप्त होत नव्हतं . ह्यावेळचा  मुक्काम जरा जास्तच लांबला आणि पुन्हा आठवणीत जमा झालेलं गाव अनुभवावं म्हणून सगळीकडे दौरा सुरु झाला.

मनात परत ते जुनं  गाव भेटावं ,जुने लोक भेटावे ,जुने मित्र भेटावे किमान रस्त्यांनी तरी ओळखीचा परिचय दाखवावा  अशीच अपेक्षा धरून ,माझ्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन फेरफटका सुरु झाला. माझ्या काही लहानपणीच्या आठवणी ऐकायला आणि ती जागा बघायला तोही उत्सुक होता. मी अनुभवलेलं गाव शांत ,सरळ आणि निश्चिन्त होतं .  नैसार्गिगता ही  निसर्गात समरस तर होतीच पण इथे वावरणाऱ्या मानवी स्वभावात देखील होती   पण आता जरा सगळंच कस हायब्रीड वाटलं . मुद्दाम सकाळी उठून लवकरच बाहेर पडले ,परिचित  काकड आरतीचा आवाज आणि देवाचे नाव ऐकायला येतील म्हणून बराच वेळ वाट पाहिली . ८   वाजेपर्यंत मंदिरात लोकांची ये जा सुद्धा दिसत नव्हती .अध्यात्मिक वातावरणात भक्तीचे  कारंजे उडवणारी धार   एकंदरच  मंदावलेली दिसली .   गाभाऱ्यातील देव आणि छताला  टांगलेली स्तब्ध घंटा एकमेकांना सोबत करीत होते.  तो पहाटेचा आवाज हवेत कुठेतरी विरून गेला  आहे ह्याची जाणीव झाली. 

सकाळी ओळखीच्या कुठल्याही घरात डोकावले तरी येणाऱ्यांचे स्वागत मोकळ्या मनाने केले जायचे त्या आत्मीयतेची गोडी परत अनुभवता येईल म्हणून थेट दारावरची बेल वाजवली . दार उघडून स्वागत करणारे  चेहरे सगळे ओळखीचेच होते .  चहा ही  सामान्य गोष्ट किती नात्यांना जुळवून ठेऊ  शकते ह्याची प्रचिती तेव्हा येत होती .फक्त चहा आणि गप्पा साठी साठी डोकावलेली   मी जेवणाची तृप्त ढेकर देऊनच बाहेर पडायची. पण आता माझ्या लहानपणीचे मुदपाक खाण्यात  काम करतांना दिसणारी आकृती पदावरून निवृत्त झालेली दिसली .आपली सत्ता नसतांना फुकटचा आग्रह नको म्हणून गप्प  गप्प होती. चहा  हा शिष्टाचार म्हणून   झालाच पण रिकामा झालेला कप ठेवतांना ,आठवणींची  गप्पांची बशी कदाचित  चीर जाऊन  फुटली की  काय असा भास झाला. 

गावातील वेशीतून निघणारा वळणदार रस्ता संपला की  सार्वजनिक वाचनालयची एक इमारत उभी आहे . विविध पुस्तकांची  रेलचेल असणारे हे माझे आवडते ठिकाण. ह्या पुस्तकांनीच तर आयुष्यात समृद्ध होण्यासाठी अनमोल ठेव मला दिली . लहानपणीचा तो खजाना परत सापडतो का म्हणून तिथे रेंगाळले . नेहमी सायकलवरून येणारी मी आज फक्त गाडी घेऊन  आले होते ,वाचनालय गाठायला येण्याचे  साधन बदललेले असले तरी पुस्तकांचे वेड अजूनही तसेच होते. वाचनालय वाचक नाहीत म्हणून बंद पडले होते . पुस्तकांचे पाने  जीर्ण झालेत की लोकांची नजर मोबाईलच्या पानावर स्तिरावली हे गणित न उलगडण्यासारखे होते .आधुनिकीकरण चे वारे गावाला सुद्धा झोंबत असतील ह्याची जाणीव झाली . 

 ह्यावेळी शाळेत सुद्धा जाण्याचा योग्य आला  तिथल्या रंग गेलेल्या बाकडयांवर बसून आम्ही भविष्याची स्वप्ने रंगवली होती आज तेच बाकडे  एक आधुनिक रूपात मांडले होते.  सगळा शाळेचा ओळखीचा परिसर आज मात्र अनोळखी वाटत होता. तिथल्या मुलांकरिता एक ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मला बोलावण्यात आले ,मी सुद्धा परत आपले लहानपण अनुभवता येईल म्हणून आनंदाने तयार झाले.पण आज मुलांच्या गर्दीत खाली न बसता मला  dias वर उभे राहायचे होते. पण मी मात्र अजूनही स्वतःला त्या छोट्या गर्दीतच   शोधत होते. ते निरागस लहानपण परत मिळेल म्हणून वाट बघत होते. सरांचा धाक,मधली सुट्टीची घंटा ,फळ्याचा स्पर्श ,प्रार्थनेचा तो एकसुर,समोर उभे राहून केली गेलेली शिक्षा परत हविहवीशीच वाटत होती. पण ते सुंदर बालपण हातातून केव्हाच निसटले ,हे माझ्या चिमुकल्याचा हात धरून शाळेत फिरतांना लक्षात आले. तो मात्र आईची शाळा ,आईचा वर्ग ,आईचे सर हे सगळे आपल्या डोळ्यात साठवून घेत होता .

चार वेशीच्या कुशीत सामावलेले माझे गाव  ,गावाच्या बाहेर असलेले  एकमेव तलाव ,छोटे छोटे रस्ते आणि रस्त्यांच्या वळणावर असलेली घरे,काही बंगले शासकीय इमारती ,शाळा  ह्यांची जुगलबंदी ही नेहमी मला गावाच्या प्रेमात पाडते .गावातील रस्ते मात्र आपुलकीचा परिचय देत होते . आपण इथलेच आहोत ही  ओळखीची साद  तिथून हिंडतांना पदोपदी येत होती. डांबरीकरण झाले असले तरी  रस्त्यांनी आपली मूळ संगत मोडली नव्हती. 

सगळेच  कसे बदलून गेले ,माझ्या पूर्वीच्या अपेक्षांचे गाठोडे  सोबत घेऊन  गावाला भेटणे हेच माझे चुकले नव्हते का ?एक नवीन दृष्टिकोन ठेऊन गावाला भेटणेच योग्य होते. शहरी वातावरणात आधुनिकता च्या नावाखाली हरवलेली आत्मीयता शोधायला मी बाहेर पडले होते  पण कोरड्या ,शुष्क भावनांना वाढीस  लावणारे हे जाळे सगळीकडेच पसरत आहे ,माझे गाव ह्यातून कसे सुटणार ?   जुने गाव एक नवीन रूपाने भेटले हा आनंद काही थोडा नव्हे . तो सक्षम सोबत अजून नव्याने अनुभवता आले  हे समाधान जास्त होते. 




  

जुनेच पण पुन्हा नव्याने भेटलेले माझे गाव  



Tuesday 13 October 2020

मुलाखत : स्वतःचे विश्व शून्यातून स्थापन करणाऱ्या व्यक्तिमत्वाची.( शिरीष शांतीकुमार खंडारे,औरंगाबाद )

मुलाखत : स्वतःचे विश्व शून्यातून स्थापन करणाऱ्या व्यक्तिमत्वाची.(  श्री शिरीष शांतीकुमार खंडारे,औरंगाबाद )


आयुष्यात एक प्राथमिक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःला काय आवडतं हे जाणून त्यामध्येच वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही. . त्यांनी केलेले मार्गदर्शन हे समाजातील युवक पिढी साठी खूप महत्वाचे आहे. एक सुदृढ पिढी व्यवसायात उतरावी आणि स्वतः बरोबर समाजाची प्रगती व्हावी ह्यासाठी त्यांनी मोलाचे सल्ले दिले आहेत . अतिशय सुंदर आणि सोप्या शैलीत आपले म्हणणे मांडण्याची श्री शिरीष भाऊंची पद्धत वाखाणण्यासारखी आहे . ज्याप्रमाणे नदी समुद्राला जाऊन मिळते आणि आपला रस्ता स्वतः निर्माण करते   त्याचप्रमाणे यशस्वी उद्योजक श्री शिरीष शांतीकुमार खंडारे ,औरंगाबाद ह्यांनी आपला व्यवसायचा रस्ता स्वतः निर्माण करून  त्याचबरोबर "हाय टेक" चा ठसा सर्वत्र उमटवला. नदीच्या प्रवासावर हिंदी कवी श्री प्रमोद तिवारी ह्यांनी  लिहलेल्या ओळी त्यांच्यासाठी सार्थ ठरतात  



प्रचलित गतियों से बचना

अपना पथ खुद ही रचना

अपनी रचना में तुमको छलकेंगी गंगा जमुना

अपना पथ अपना होगा,अपना रथ अपना होगा

अपनीही होगी फिर रफ़्तार

अपनी कश्ती........  अपनी पतवार, नदिया

धीरे धीरे बहना नदिया घाट घाट से कहना


१) आपल्या व्यवसायाची कल्पना आपल्याला कशी सुचली ?

- स्वतःचा व्यवसाय करायचा हे इंजिनीरिंग करतांना डोक्यात होते परंतु नक्की काय करायचे हे माहिती नव्हते .औरंगाबाद शहर सोडायचे नाही हे माझे निश्चित होते.  आजोळी मामांचा व्यवसाय मी लहानपणा पासून बघत होतो. पालकांकडून व्यवसाय चालू करण्यासाठी पूर्ण पाठिंबा होता. परंतु नक्की काय करता येईल ह्याची दिशा ठरत नव्हती. दीड वर्ष  मी औरंगाबादला बजाज ऑटो मध्ये नोकरी केली, तिथे कर्मचारी वर्गाचा संप सुरु होता त्यामुळे सामान उचलण्यापासून ते कस्टमर ला पोहचवण्यापर्यंतचे काम मला करावे लागत होते. पण इतका सगळा अनुभव गाठीशी पडला हे मला चांगलेच फावले. नोकरी करत असताना मला खूप चांगली संधी चालून आली. मला अशी पोस्ट मिळणार होती ज्यासाठी लोकांना १०-१० वर्षे वाट पहावी लागली असती, पण ते नाकारून मला स्वतःच व्यवसायच करायचा आहे असे मी ठाम ठरवले होते. एम बी ए करतांना एका मित्रासोबत नवीन व्यवसाय करण्याच्या कल्पना जुळून आल्या आणि "हाय टेक" च्या प्रवासाला सुरवात झाली .


२) उद्योजक होण्यासाठी आपली मुख्य प्रेरणा शक्ती कोणती होती?

माझ्याकडे आईचे सगळेच भाऊ व्यवसायात होते त्यामुळे मी लहानपानपासून ते बघतच होतो तसेच बाबांची शिस्त प्रियता आणि काटकसर हे माझ्या व्यवसायाच्या सुरवातीला खूप मोलाचे ठरले. बाबा मला त्यांच्यासमोर बसवून व्यवसायात गुंतवलेला पैसा काढायचा नाही किंवा होणार खर्च हा कर्ज काढून फेडायचा नाही असे एक ना अनेक अनमोल धडे देत होते.. मी माझा व्यवसाय चालू केला तेव्हा ते रोज संध्याकाळी मला दिवसभराचा आढावा विचारत असे .सगळे व्यवहार पारदर्शक ठेवण्याबाबतीत त्यांचा कटाक्ष असायचा. चैनीच्या गोष्टी वर पैसा खर्च करणे हे त्यांना पटत नसे. मला दिलेल्या पॉकेट मनी मधूनच माझी कपडे ,सिनेमा , सहली ह्या गरजा पूर्ण करायच्या वरखर्च बाबांकडून मिळत नसे त्यामुळे एक काटकसर करण्याची सवय मनाला लागली .  उधार घेतलेले पैसे हे बचत मधून  फेडता यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त उधारी करायची नाही हि शिस्त खूप उपयोगी पडली. व्यवसायात गेलेली गुंतवणूक आम्ही अजूनही वैयत्तिक कामासाठी वापरत नाही खूपच निकडीचे प्रसंग उद्भवला तरच ती वापरण्यात येते त्याची परतफेड हि कालांतराने केली जाते. हि बाबांनी शिकवलेली शिस्त व्यवसायात खूप उपयोगी पडली. माझे बाबा  माझे प्रेरणा स्रोत होते


3) आपण आपल्या कंपनीचे नाव  "हाय टेक"कश्यावरुन ठेवले? 

कंपनीचे नाव ठेवण्यामागे एकच उद्देश होता आपण जे मार्केट मध्ये उत्पादन देतोय ते ह्या नावावरून ओळखले जावे. ह्या नावातून लोकांना परिचय व्हावा. आम्ही आमचे उत्पादन हे दारोदारी जाऊन न विकता कस्टमर च्या प्रश्नाला गुणवत्ता पूर्वक उपाय सुचवणे हेच आमचे ध्येय आहे त्यामुळे हाय -टेक ह्या छताच्या खाली आमच्या अनेक कंपन्या चालतात.माझ्याकडे भांडवल खूप नसल्यामुळे मी उत्पादन करू शकत नव्हतो म्हणून मी ट्रेडिंग पासून सुरवात केली .माझ्या कौशल्याचा पूर्णतः उपयोग व्हावा असे मला काहीतरी सुरु करायचे होते. सगळ्यात पहिली कंपनी हाय टेक एंटरप्राइज म्हणून निर्माण झाली. कस्टमरला आलेल्या कुठल्याही समस्येचे निराकरण करणे आणि नवीन येणारे तंत्रज्ञान वापरून त्याला सोडवणे ह्यालाच कन्सेप्ट सेल्लिंग असे म्हणतात हे आम्ही मुख्यकरून करतो . ह्यासाठी बाजारात येणारे नवीन नवीन तंत्रज्ञान आम्ही अमलात आणतो आणि  कालांतराने कालबाह्य झालेले तंत्रज्ञान आम्ही काढून टाकतो.  हाय टेक कंपनी  सोलुशन देणे तथा कन्सेप्ट सेल्लिंग ह्या नावाने मार्केट मध्ये नावाजलेली गेली . माझ्या कंपनीचे स्वरूप समजणे हे थोडे अवघड आहे . कारण आम्ही प्रॉडक्ट विकत नाही . 


४) आपल्या कंपनीसाठी आपण निधी कसा वाढवला?

मी नोकरी करत असताना माझी मासिक आय १२५० रुपये होती. ते पैसे मी जमा करत होतो. लग्न होईपर्यंत बाबांकडून मला मासिक पॉकेटमनी १०० रुपये मिळत होता तेच पैसे मग मी महिन्यातून एक दोन सिनेमा किंवा कधी कधी डोसा खाण्यात घालवीत असे तसेच वर्षभरात काही ड्रेस मी ह्याच पॉकेट मनी मधून विकत घेत  होतो . २४,००० रुपये, हि व्यवसायात केलेली माझी पहिली गुंतवणूक माझ्या जमा खर्चातून आली होती.आजही आम्ही कंपनीचे पैसे वेतन म्हणून  उचलतो . कालांतराने ही वेतनराशी वाढत गेली एवढेच पण व्यवसायामध्ये गुंतवलेला आणि झालेला नफा आम्ही त्यातच गुंतवतो . आजच्या तारखेला माझ्या कंपनीचा टर्न ओव्हर १५० करोड एवढा आहे. हा इथपर्यंत पोहचण्यासाठी मला बरेच वर्ष कठोर परिश्रम घ्यावे लागले. 


५) आपल्या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारची संस्कृती अस्तित्वात आहे आणि आपण ती कशी स्थापित केली?

आमच्याकडे मुक्त आणि पारदर्शक कार्य पद्धती आहे. अगदी लोवर स्टाफ सुद्धा माझ्यापर्यंत विनाप्रयास पोहचू शकतो. जिथे जिथे समस्या आली  तिथे तिथे मी स्वतः जाऊन ते प्रश्न सोडवतो किंवा स्टाफ ला प्रोत्साहन देतो. एका परिवार मधील सदस्य म्हणून आम्ही सगळे वावरतो. बरेचदा स्टाफ च्या खाजगी समारंभाला मी स्वतः सहपरिवार हजेरी लावतो परंतु आता कामाच्या व्यापात हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. एकंदर निरोगी असे वातावरण आपल्या कंपनी मध्ये आहे.आमच्या काही सहली जातात तसेच कर्मचारीसाठी लागणारे इन्शुरन्स आम्ही देतो. कंपनीच्या turn ओव्हर हा सुद्धा सगळ्या कर्मचारी ला माहिती असतो कोणापासून काहीही लपवून ठेवलं जात नाही . 


६) उद्योजक असण्याने आपल्या कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम झाला आहे?आपल्या दिवसाचे नियोजन काय असते ?

एक उद्योजक म्हणून मलाही परिवारासाठी पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही ह्यासाठी मी माझी धर्मपत्नी सौ. नीता खंडारे हिला श्रेय देऊ इच्छितो. मी जर ठरवलं असतं की मला १० ते ५ ची नोकरी करून आनंदी आयुष्य जगायचं आहे तर माझ्यामधील कर्तृत्व मी कधीच बाहेर काढू शकलो नसतो. मी कधीही पैसा हे लक्ष ठेऊन काम केलं नाही . मला कामावर प्रेम होत आणि मी ते करत गेलो पैसा हा त्याबरोबर  मिळत गेला. त्यामुळे हे सगळं उभं करतांना थोड्याफार प्रमाणात माझ्या परिवाराला कष्ट सहन करावे लागले हे मी नाकारू शकत नाही.कॉलेज मधील दिवसांपासून मी लवकर उठतो . सकाळचा १ घंट्याचा वेळ हा माझा वेळ असतो ज्यामध्ये मी फिटनेस संबंधी क्रिया करतो. सकाळचा वेळ मुलांसोबत आणि परिवारासोबत घालवतो जेवण करून १०:३० पर्यंत ऑफिस ला पोहचतो . जवळपास १० ते १२ तास काम मी अजूनही करतो . गेली २0 वर्ष रविवार हा माझ्यासाठी,परिवारासाठी  मी राखून ठेवलेला दिवस आहे . ह्यादिवशी ऑफिस संबंधी कुठलहि काम मी करत नाही.

माझ्या यशामध्ये माझी पत्नी नीता खंडारे हिचा मोलाचा वाटा  आहे . सौ नीता ह्यांनी  बी कॉम ची पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले आहे. लग्नानंतर २ वर्षांनी एम कॉम ला ऍडमिशन घेऊन मराठवाडा विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवले आहे. मुले मोठी झाल्यानंतर एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीचा अनुभव घेऊन त्या आता स्वतःच्या दोन शाळा औरंगाबाद इथे चालवतात . पूर्ण दिवस वेळ देऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी शाळा प्री स्कूल पर्यंतच मर्यदित ठेवली आहे. तसेच माझी मुलगी शौरी हिने बी टेक एम बी ए ची पदवीधर शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे आणि एक कर्मचारी म्हणूनच ती आता मला कंपनीच्या कामात मार्केटिंग च्या क्षेत्रात काम करते आहे . माझा मुलगा सोम हा नुकताच १० ची परीक्षा ९४. २ टक्के घेऊन उत्तीर्ण झाला आहे. पैंटिंग हा छंद सांभाळत तो पुढचे शिक्षण पूर्ण करत आहे  



७)आपल्या कंपनीच्या इतर कुठे कुठे शाखा आहेत?त्या आपण कशा व्यस्थापित करता?

सुरवातीपासून माझे असे धोरण होते की सगळे स्वतः करण्यापेक्षा काम वाटली गेली पाहिजे आणि त्या कामांचे हक्क आणि जबाबदारी त्या व्यक्ती कडे पूर्णतः असली पाहिजे त्यामुळे खूप लोक जोडली गेली .त्यामुळेच मी माझ्या कंपनीचा विस्तार करू शकलो . सगळीकडे मीच धावायचं असे जर झाले असते तर कंपनीचा सर्वांगीण विकास हा मला शक्य झाला नसता . औरंगाबाद सोडून पुणे ,नाशिक,बंगलोर तसेच उत्तरांचल मधील रौद्रपूर इथे आमची कंपनी ची शाखा आहेत . मी स्वतः तिथे महिन्यातून एकदा किंवा काही ठराविक काळानंतर भेट देतो तिथले सगळे व्यस्थापन तिथली स्थानिक टीम पार पडते . तिथला सगळा  आढावा माझ्यापर्यंत पोहचतो . आणि मी औरंगाबाद च्या ऑफिस मधून सगळे व्यवस्थापन करतो. 


८) आपली सर्वात मोठी भीती काय आहे आणि आपण भीतीचे व्यवस्थापन कसे करता?

व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे माझ्याकडे वेळ खूप कमी असतो . त्या वेळामध्ये नात्यागोत्यातील काही समारंभला हजेरी लावणे, फॅमिली साठी वेळ देणे मित्रांना भेटणे, नातेवाईकांकडे जाणे हे सगळे बसवणे अवघड होते. त्यामुळे सगळ्यानांच न्याय देणे शक्य होत नाही. ह्या गोष्टीसाठी मला किंवा इतर माझ्या आप्त लोकांना त्रास सहन करावा लागतो.नातेवाईक, मित्र की व्यवसाय ह्यामधून एक निवडणे हे खूप कठीण असतं. जो निर्णय मला सर्व बाजूनी योग्य वाटतो तो मी घेतो, तसे अमलात आणतो. वेळेचं यवस्थापन करणे आणि सगळ्या गोष्टींना न्याय देणे ही माझ्यासाठी भीती ची एक गोष्ट ठरते .


९) आपले आदर्श काय आहेत?

आदर्श म्हणायचे झाले तर काटकसर आणि शिस्त ह्यामध्ये माझे बाबा माझे आदर्श आहेत त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. माझे सासरे ह्यांच्याकडून मी उत्साह टिकवायचा कसा हे शिकलो आणि बरीच पुस्तक त्यामध्ये रतन टाटा ह्यांचे आत्मचरित्र, महाभारत असा अनेक पुस्तकांचा उल्लेख करता येईल.माझ्या यशामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा पुस्तकांचा आहे. मी आजही माझ्या लायब्ररी मध्ये नवीन नवीन पुस्तके ठेवतो हा कोरोनाचा कालावधी माझ्यासाठी नवीन शिकण्याची ,नवीन पुस्तके वाचण्याची संधी घेऊन आला होता . सोशल मीडिया वर असणारे फायनान्स , राजकारण , व्यवस्थापन ह्या संबंधी चे बरेच व्हिडीओ मी बघितले त्यामधून शिकलो . शिव खेरा , टी .टी रंगराजन , अनिल लांबा ह्यांची पुस्तके मला सगळ्यात जास्त प्रोत्साहित करतात . स्वतःला उत्साहित ठेवण्यामध्ये मला पुस्तकांची खूप मदत होते . शिकण्यासाठी कधीही थांबायचं नाही  हा माझा मूलमंत्र आहे 


१०) यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही प्रकारची पद्धत किंवा सूत्र आहे जो आपण सर्वांना सांगू इच्छिता?

मी दिवसभर जे काम करतो ते एकच लक्ष ठरवून करतो काम झाल्यावर मनाला शांतता मिळायला पाहिजे आणि काम केल्याचा आनंदही .माझे मन नेहमीच  काहीतरी नवीन करण्यासाठी, नवीन शिकण्यासाठी धडपडत असते आणि त्यामुळे मला ह्या व्यवसायामध्ये स्थिर राहण्यासाठी बळ मिळत गेलं, आजही मी माझा उत्साह टिकवून आहे .मला काम करण्याचा दबाव हा कधी वाटला नाही मी माझे काम मनापासून जगतो . मी  शासकीय महाविद्यालय औरंगाबाद इथे रोबोकॉन नावाची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते तिथल्या मुलांना लागणारे सर्व साहित्य आणि मार्गदर्शन हे मी माझ्या कंपनी कडून दरवर्षी करतो . आणि पहिल्या तीन मध्ये ही टीम बक्षीस जिंकत आली आहे. समाजातील कुठल्याही मुलाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्यास मी कधीही मार्गदर्शन करायला तयार आहे. 


११) व्यवसायातील आपला सर्वात समाधानी क्षण कोणता आहे?

एक सगळ्यात मोठ्या कंपनी कडून मला कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता जी बाजारात एक नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाते तसेच ह्या जानेवारी मध्ये इकॉनॉमिक टाइम्स मधून भारतात असणाऱ्या १०८ ग्रोविंग (growing) कंपनी मध्ये नामांकन झाले होते तो आमच्या सगळ्यांसाठीच एक अद्भुत क्षण होता.हा अवॉर्ड मिळाला त्याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती एक दिवस अचानक एक मेल इनबॉक्स मध्ये आला ,आजकाल खोटे मेल बरेच येतात म्हणून दुर्लक्षच केलं पण सहज इकॉनॉमिक टाइम्स च्या वेबसाईट वर बघतिलयावरच खात्री पटली . स्टॅटीस्टिका नावाची एक जागतिक कंपनी आहे ती सगळ्या बिसनेस चा रेकॉर्ड गोळा करते ज्यामध्ये कस्टमर कडून घेतलेला फीडबॅक ला जास्त प्राधान्य दिले जाते आणि मग नामांकन ठरते . हि प्रक्रिया बरीच बारकाईने केली जाते हे आम्हाला नंतर कळले.  त्यांच्या पातळीवर उतरणे हि एक अवघड बाब होती पण आमची कंपनी नामांकित झाली हि खरंच एवढ्या वर्षाची मेहनत फळाला आली  असे वाटते. 


१२) यशस्वी उद्योजक बनू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन पदवीधरांना तुम्ही कोणता सल्ला द्याल?

कुठल्याही व्यवसायामध्ये सफल होण्यासाठी  मेहनत ,प्रामाणिकपणा आणि उत्साह ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत असे मला वाटते. जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही आणि कुठल्याही गोष्टीसाठी शॉर्टकट हा नसतोच . जर तुम्हाला असं आढळल कि एखादी गोष्ट मेहनत न करता मिळतेय किंवा फुकट मिळते आहे म्हणजे समजावं त्या गोष्टीत काहीतरी गडबड आहे. हार्ड वर्क आणि त्याचबरोबर स्मार्ट वर्क हा यशस्वी होण्याचा  मूलमंत्र असू शकतो .सगळ्यात महत्वाचा सल्ला मला द्यावा  वाटतो तो म्हणजे मेहनतीला दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही. कुठलीही गोष्ट तुमच्या आरोग्यापेक्षा मोठी असू शकत नाही ."जान है तो जहाँन है ". आरोग्याशी  तडजोड करून काहीही मिळवू शकत नाही. व्यायाम, योगा, प्राणायाम आणि योग्य आहार याकडे दुर्लक्ष करू नका.


१३) जगभ्रमंती ह्याबद्दल तुमचे काय मत आहे ?तुम्ही कुठे कुठे फिरून आला आहात ?

सहल आणि जगभ्रमण करणे हा  आमच्या  परिवाराचा आवडता छंदच आहे.  मी आई बाबांसोबत धार्मिक सहली ला बरेचदा जात होतो . कंपनीच्या निमित्ताने आता बरेच जग स्वतः पहिले आहे . कुठेही गेलो तरी आम्ही तिथे फिरण्यासाठी लोकल साधनांचा वापर करतो जेणेकरून तिथली संस्कृती जवळून बघता यावी. मागे चीन ला गेलो तेव्हा तिथल्या लोकांची कार्यक्षमता पाहून मी भारावून गेलो . जगात कुठेही गेलो तरी मला तिथले कामाचे क्षेत्र ,तिथली संस्कृती अभ्यास करायला आवडते आणि ती आपल्याला भारतात आणता येईल का ह्याची मी आवर्जून दखल घेतो . मी पूर्ण यूरोप फिरलो आहे ,चीन जपान ,कोरिया ,थायलंड ,मलेशिया असे अनेक देशात मी भ्रमण  केले आहे.माझा जगभ्रमंतीचा अनुभव उल्लेख करतांना मला चीन चा अनुभव नमूद करावासा वाटतो , तिथे शाकाहारी जेवण मिळवणे हे सगळ्यात अवघड काम होते मी रोज माझ्यासोबत आणलेला नास्ता हॉटेल मध्ये बनवून खात होतो ऑफिस मधील एक सहकारी मला रोज जेवणासाठी विचारात होता पण मी फक्त फळे आणि जूस घेतो हे त्याला लक्षात आले. त्यानी मला शाकाहारी जेवण मिळावं  म्हणून खूप प्रयत्न केले .आणि एक बुद्ध लोकांचा समूह होता जो वेगान होता तिथून माझ्यासाठी जेवण मागवून आणले. 


१४)कंपनी मध्ये इतके लोक काम करतात त्यापैकी कधी वाईट अनुभव आले का ?

तसे खूप वाईट अनुभव कधी आले नाहीत ह्याला कारण म्हणजे मी दाखवलेला विश्वास . तरीही काही ओळखीची लोक मला  असे भेटले ज्यांनी माझ्या चांगलेपणाचा गैरफायदा घेतला . एक जरुरत असलेल्या युवक तरुणाला मी कंपनी मध्ये ठेऊन घेतले होते त्याचा कामाचा परफॉर्मन्स हा चांगला नव्हता तरीही आज ना उद्या सुधारेल म्हणून मी त्याला शिकवत गेलो पण काही दिवसांनी मला त्याचा   कंपनी सोडून जातोय असा एकई-मेल आला आणि काही दिवसात समजले कि तो आपल्या स्पर्धक असलेल्या कंपनी साठी नोकरी करतोय . ह्या घडणाऱ्या गोष्टींवरून विश्वास ठेवण्यात मी स्वतःला आणि येणाऱ्या कर्मचारीला पारखून घ्यायला शिकलो. 


१५) आपल्या समाजातील मुलांचा कल  हा स्वतःचा व्यवसाय न करता नोकरी कडे जास्त आहे ह्या संबंधी आपले काय मत आहे?

हो , हे खरं आहे . एक म्हणजे मेहनत करायला आजची पिढी तयार नसते आणि गावात राहिलो तर मुलगी मिळणार नाही भीती जास्त असते. मला मुलांपेक्षा त्यांच्या आई वडिलांना सल्ला द्यावासा वाटतो की जर तुमच्या मुलाची व्यवसाय करण्याची तयारी असेल तर त्याला प्रोत्साहन द्या जास्तीत जास्त काय होईल की थोडेफार पैस्यांचे नुकसान होईल पण त्याला एक प्रयत्न नक्की करू द्या त्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे ठरेल . त्याचबरोबर शहरात जाऊन कमी वेतन ची नोकरी करणाऱ्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा गावामध्ये स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या मुलाला मुलगी द्या. हि मानसिकता बदलणे आज समाजासाठी खूप आवश्यक आहे . 


-पूजा वैभव परतवार 

(खराडी, पुणे )

9766426536

Friday 9 October 2020

जगणं आणि शिकणं हे वेगळं कसं ?

 जगणं आणि शिकणं हे वेगळं कसं ?


माझा मुलगा सक्षम आता त्याचे वय वर्षे ६.५ त्याचा जन्म  होण्याच्या आधीपासून त्याला  वाढवण्याच्या अनेक आखीव रेखीव चौकटी आम्ही आखल्या होत्या . आपण त्याला ते सगळं द्यायचा प्रयत्न करायचा जे आपल्याला भेटू शकले नाही  त्यामध्ये  शिक्षण ह्याचे बांधलेले ठोकताळे अधिक होते .  तो ३ वर्षाचा झाला तेव्हापासून आम्ही त्याच्यासाठी बेस्ट काय काय करता येईल ह्याची यादी लिहायला घेतली. अनेक दिवस बेस्ट शोधण्यासाठी  प्रयत्न देखील केले .  उच्च सुविधा आणि ख्यातनाम असलेली शाळा शोधण्यासाठी आम्ही अनेक उंबरठे पालथे देखील घातले . पण बेस्ट शिक्षण द्यायचं म्हणजे काय काय द्यायचं ह्याची यादी जुळून येत नव्हती . मग आजूबाजूच्या  अनुभवी पालकांकडून बेस्ट म्हणजे काय ते आपल्या मुलांना काय देतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,त्याने पाहिजे तसे समाधान झाले नाही .  पॅरेंटिंग चे कार्यशाळा ला हजेरी लावली पण तरीही मनाला पटेल अशी  बेस्ट ची यादी तयार होत नव्हती . 

 सक्षमला वाढवतांना आयुष्यात कुठेही कुठल्याही गोष्टीसाठी  कमी पडू द्यायचं  नाही हा  आमचा निष्कर्ष किंवा निर्धार होता. मग आपणच ह्या प्रश्नाचे उत्तर शोधूया आणि त्यानुसार यादी बनवूया असे ठरवले. आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या पालकांचे निरीक्षण करण्यास सुरुवात  केली . समाजातील सगळ्या स्थरातील पालक बघितले त्यांच्या सुद्धा मुलांना बेस्ट देण्याच्या व्याख्या समजून घेतल्या .  middle class लोकांची धडपड पहिली ,higher क्लास लोकांचा मुलांना दिलेला टॅबलेट पासून एअर कंडिशनर गाड्या ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली.  अगदी कामवाली बाई सुद्धा तिच्या मुलाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करते हे आढळून आले . तिचे बेस्ट म्हणजे मुलांना पोटभर जेवायला देणे .त्यासाठी ती खूप धडपड करते असे दिसले.हे मुलांना बेस्ट देणं समाजातील वेगवेगळ्या स्थरातील लोंकांप्रमाणे  बदललं . पण हे पालकांच्या दृष्टिकोनातून बेस्ट होत ज्याला हे बेस्ट द्यायचं होत, त्याच्या अपेक्षा मात्र शून्य होत्या . हे सगळे बघत असतांना जाणवले   हा पॅरेंटिंगचा रस्ता सक्षमला  मोठं कसं  करावं ह्या विषयापेक्षा आपलयाला  आई बाबा म्हणून मोठं कसं होता येईल ह्याचा   जास्त आहे. तो त्याचा मोठा होतो आहे अनुभवानी समृद्ध होतो आहे त्याचा तोच शिकतोय .

 आपण आपल्या  स्टेटस ला शोभेल अशी शाळा शोधत होतो पण खरं म्हणजे त्याच्यासाठी शाळा हे एक बंधन आहे  त्याच्या निरागस खेळण्यावर आक्रमण आहे . शाळा ह्या पद्धतीला विरोध नसून त्याचे झालेले बाजारीकरण हा प्रगतीला धोका आहे ह्याची खात्री पटली.शाळेतील साधा स्पोर्ट डे पण एका चकचकित  कागदाचे वेष्टन देऊन पालकांसमोर जाहिरात करून मांडला जातो. त्याचा गाभ्यात न पोहचता आपण त्या रंगीत  कागदावर भाळतो. हा स्पोर्ट डे मुलांना मजबूत बनवण्यासाठी नसून एक स्पर्धात्मक जीवन जगण्याची नांदी आहे.म्हणूनच आम्ही ते झगमगाट असलेलं किंवा तसं दाखवलं जाणारं शाळा ह्या प्रकरणावर पूर्ण विराम दिला आणि  आम्ही आमची स्वतःची होमस्कूलिंग ची आड वाट निवडली.  


 ज्या शिक्षणाच्या आणि जगण्याच्या साच्यातून आपण गेलो आहे तो बदलणं आमच्यासाठी एक आव्हान होत .  शिकण्यासाठी शाळा हेच एक माध्यम आहे, फक्त पुस्तकं वाचून आणि परीक्षा देऊन च शिक्षणाची पूर्तता होते ह्या चौकटी तुन आम्हाला बाहेर यायला स्वतःला unlearn करायला बराच कालावधी लागला आणि अजूनही पूर्णपणे जमले असे नाही . जगणे आणि शिकणे हे वेगळे नाहीच मुळी. शिकणे आणि जगणे हि एक सोबत सोबत चालणारी क्रिया आहे ह्याचा सुंदर अनुभव गाठीस पडतोय. जसं नैसर्गिक पणे  बोलायला, खायला, खेळायला चालायला शिकता येत  तितकंच सहज लिहायला आणि वाचायला ही शिकता येत. 



कुठलंही लक्ष्य साधायचं नसल्यामुळे शिक्षणाचा प्रवास अनुभवता येतोय आणि हा प्रवासच त्याची मिळवलेली पुंजी बनेल  हे नक्की. अनुभवानी समृद्ध होणारी वाट सक्षमला स्वतःचा पोर्टफोलिओ बनवायला मदत करेल ह्याचा विश्वास वाटायला लागला आहे. आता सगळे बेस्ट  देण्याचे सामर्थ्य असून देखील अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी पण कष्ट कसे घ्यावे लागतात ह्याची पायाभरणी आम्ही करतो आहे आणि मला सांगताना आनंद होतो  हेच आमचे बेस्ट आहे.

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...