Friday 9 October 2020

जगणं आणि शिकणं हे वेगळं कसं ?

 जगणं आणि शिकणं हे वेगळं कसं ?


माझा मुलगा सक्षम आता त्याचे वय वर्षे ६.५ त्याचा जन्म  होण्याच्या आधीपासून त्याला  वाढवण्याच्या अनेक आखीव रेखीव चौकटी आम्ही आखल्या होत्या . आपण त्याला ते सगळं द्यायचा प्रयत्न करायचा जे आपल्याला भेटू शकले नाही  त्यामध्ये  शिक्षण ह्याचे बांधलेले ठोकताळे अधिक होते .  तो ३ वर्षाचा झाला तेव्हापासून आम्ही त्याच्यासाठी बेस्ट काय काय करता येईल ह्याची यादी लिहायला घेतली. अनेक दिवस बेस्ट शोधण्यासाठी  प्रयत्न देखील केले .  उच्च सुविधा आणि ख्यातनाम असलेली शाळा शोधण्यासाठी आम्ही अनेक उंबरठे पालथे देखील घातले . पण बेस्ट शिक्षण द्यायचं म्हणजे काय काय द्यायचं ह्याची यादी जुळून येत नव्हती . मग आजूबाजूच्या  अनुभवी पालकांकडून बेस्ट म्हणजे काय ते आपल्या मुलांना काय देतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,त्याने पाहिजे तसे समाधान झाले नाही .  पॅरेंटिंग चे कार्यशाळा ला हजेरी लावली पण तरीही मनाला पटेल अशी  बेस्ट ची यादी तयार होत नव्हती . 

 सक्षमला वाढवतांना आयुष्यात कुठेही कुठल्याही गोष्टीसाठी  कमी पडू द्यायचं  नाही हा  आमचा निष्कर्ष किंवा निर्धार होता. मग आपणच ह्या प्रश्नाचे उत्तर शोधूया आणि त्यानुसार यादी बनवूया असे ठरवले. आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या पालकांचे निरीक्षण करण्यास सुरुवात  केली . समाजातील सगळ्या स्थरातील पालक बघितले त्यांच्या सुद्धा मुलांना बेस्ट देण्याच्या व्याख्या समजून घेतल्या .  middle class लोकांची धडपड पहिली ,higher क्लास लोकांचा मुलांना दिलेला टॅबलेट पासून एअर कंडिशनर गाड्या ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली.  अगदी कामवाली बाई सुद्धा तिच्या मुलाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करते हे आढळून आले . तिचे बेस्ट म्हणजे मुलांना पोटभर जेवायला देणे .त्यासाठी ती खूप धडपड करते असे दिसले.हे मुलांना बेस्ट देणं समाजातील वेगवेगळ्या स्थरातील लोंकांप्रमाणे  बदललं . पण हे पालकांच्या दृष्टिकोनातून बेस्ट होत ज्याला हे बेस्ट द्यायचं होत, त्याच्या अपेक्षा मात्र शून्य होत्या . हे सगळे बघत असतांना जाणवले   हा पॅरेंटिंगचा रस्ता सक्षमला  मोठं कसं  करावं ह्या विषयापेक्षा आपलयाला  आई बाबा म्हणून मोठं कसं होता येईल ह्याचा   जास्त आहे. तो त्याचा मोठा होतो आहे अनुभवानी समृद्ध होतो आहे त्याचा तोच शिकतोय .

 आपण आपल्या  स्टेटस ला शोभेल अशी शाळा शोधत होतो पण खरं म्हणजे त्याच्यासाठी शाळा हे एक बंधन आहे  त्याच्या निरागस खेळण्यावर आक्रमण आहे . शाळा ह्या पद्धतीला विरोध नसून त्याचे झालेले बाजारीकरण हा प्रगतीला धोका आहे ह्याची खात्री पटली.शाळेतील साधा स्पोर्ट डे पण एका चकचकित  कागदाचे वेष्टन देऊन पालकांसमोर जाहिरात करून मांडला जातो. त्याचा गाभ्यात न पोहचता आपण त्या रंगीत  कागदावर भाळतो. हा स्पोर्ट डे मुलांना मजबूत बनवण्यासाठी नसून एक स्पर्धात्मक जीवन जगण्याची नांदी आहे.म्हणूनच आम्ही ते झगमगाट असलेलं किंवा तसं दाखवलं जाणारं शाळा ह्या प्रकरणावर पूर्ण विराम दिला आणि  आम्ही आमची स्वतःची होमस्कूलिंग ची आड वाट निवडली.  


 ज्या शिक्षणाच्या आणि जगण्याच्या साच्यातून आपण गेलो आहे तो बदलणं आमच्यासाठी एक आव्हान होत .  शिकण्यासाठी शाळा हेच एक माध्यम आहे, फक्त पुस्तकं वाचून आणि परीक्षा देऊन च शिक्षणाची पूर्तता होते ह्या चौकटी तुन आम्हाला बाहेर यायला स्वतःला unlearn करायला बराच कालावधी लागला आणि अजूनही पूर्णपणे जमले असे नाही . जगणे आणि शिकणे हे वेगळे नाहीच मुळी. शिकणे आणि जगणे हि एक सोबत सोबत चालणारी क्रिया आहे ह्याचा सुंदर अनुभव गाठीस पडतोय. जसं नैसर्गिक पणे  बोलायला, खायला, खेळायला चालायला शिकता येत  तितकंच सहज लिहायला आणि वाचायला ही शिकता येत. 



कुठलंही लक्ष्य साधायचं नसल्यामुळे शिक्षणाचा प्रवास अनुभवता येतोय आणि हा प्रवासच त्याची मिळवलेली पुंजी बनेल  हे नक्की. अनुभवानी समृद्ध होणारी वाट सक्षमला स्वतःचा पोर्टफोलिओ बनवायला मदत करेल ह्याचा विश्वास वाटायला लागला आहे. आता सगळे बेस्ट  देण्याचे सामर्थ्य असून देखील अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी पण कष्ट कसे घ्यावे लागतात ह्याची पायाभरणी आम्ही करतो आहे आणि मला सांगताना आनंद होतो  हेच आमचे बेस्ट आहे.

1 comment:

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...