Monday, 4 June 2018

डिजिटल इंडिया चल पड़ा है ......आज भारत को सवारने


कल सुबह जल्दी उठकर गैलरी में आकर ठंडी हवा खाने का मन हुआ, बहुत व्यस्तता के कारण ये मौका बहुत ही कम मिलता है|  अंगड़ाइयां लेते ही निचे देखा तो सफ़ेद रंग का टी-शर्ट पहने हुए लड़के लड़कियों की टीम रास्ता साफ़ कर रही है| देखकर आश्चर्य लगा ....और मन में एक कमीसी भी लगी की यहाँ अंगड़ाईयाँ न लेकर मुझे भी निचे होना चाहिए था|  सैटरडे की छुट्टी को नींद में न गवाँते हुए ये लोग आज एक बहुत महत्वपूर्ण काम करने आये थे| बात बहुत अच्छी है की भारत बदल रहा है| आज की युवा पीढ़ी को अहसास हो रहा है की शुरुवात हमें हमसे ही, अपने घर से ही करनी है| 

देखो आसमां में खिलकर सूरज निकल रहा है,
युवाओ के हाथो से ये भारत संवर रहा है,
मेरा देश, मेरा देश, मेरा देश.... 
मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है !
मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है !

तीन साल पहले, प्रधान मंत्री नरेन्द्र मोदीजी ने एक मिशन का शुभारंभ किया था|  और आज की युवा पीढ़ी इसमें उतर आयी है ये बहुत गौरव की बात है| हमारे  पहले की पीढ़ी कहती है की आज कल के युवा लोग, न संस्कार जानते है नाहीं आत्मीयता, इनको तो बस डिजिटल साधनो से प्यार है|  ये पूरी तरह सच नहीं है, डिजिटल होने के साथ साथ एक जागरूकता भी इस पीढ़ीमें दिखाई देती है| 

ये लिखने का प्रयोजन यही है की, सिटी बैंक की तरफ से खराड़ी स्वछता अभियान का उपक्रम IT के युवाओ दवरा करवाया गया|   सबको सिटी बैंक की तरफ से सफ़ेद टी शर्ट दी गयी और ये युवक युवतियां निकल पड़े इंडिया को स्व्च्छ बनाने, अपने सेल्फी फोटो और व्हाटस एप के स्टेटस को अपडेट करते हुए, सफाई जारी थी|  लगातार ३ घंटे ये सब लोग जोश के साथ काम कर रहे थे|  जो उंगलिया कंप्यूटर पर तेजीसे चलती है वही उंगलिया आज क्यारी बैग्स की गन्दगी उठा रही थी|  और सही अर्थो में डिजिटल इंडिया आज रस्ते पर उतरकर ग्रांट रोड पर फैली हुई अनवांटेड फाइल्स रीसायकल बिन में डाल रहे थे| बस धीरे धीरे ये डिजिटल इंडिया अगर ठान ले तो भारत को फिरसे सुनहरा बना सकता है|

   जानते हैं कि सफाई एक दिन का काम नहीं है. सफाई जब तक आदत का हिस्सा नहीं बन जाती तब तक गंदगी वापस लौटती रहेगी. स्वच्छता अभियान यदि एक बार सफल भी हो गया, तो भी देश में स्वच्छता टिकी नहीं रह पाएगी जब तक  सफाई हमारे निजी और सार्वजनिक जीवन का अभिन्न अंग नहीं बन जाती.हम अपने आप से कमसे कम ये तो उम्मीद रखे की खुद सफाई न कर पाते तो न सही पर कमसे कम जो करते है उनकी मदत   तो करे ,ये भी नहीं कर सकते तो कम से कम  उनको प्रोत्साहित करे और ये भी नहीं हो सकते तो कृपया अपने घर की गन्दगी बहार रस्ते पर न डाले

Friday, 18 May 2018

माझी भटकंती .... निसर्गरम्य कोंकण


नुकतीच कोंकण मधील मालवणला जाण्याची संधी मिळाली . सकाळी ६ वाजता पुण्यावरून निघालो .कोल्हापूर पर्यंत उन्ह आपला मीपणा सोडायला तयार नव्हतं .आपली कोकणात जाण्याची वेळ चुकली बहुदा हे रुखरुख मनाला जाणवत होती. थोडे अंतर कापल्यानंतर एक वेगळच वळण रस्त्याने घेतलं .आणि निसर्गरम्य दृश्य दिसायला सुरवात झाली. शहरात न अनुभवता येणाऱ्या बऱ्याच गोष्टी मन वेधून घेऊ लागल्या . वळणावळणाचे रस्ते ... कौलारू घरे ,समोर आणि मागे दोन्ही बाजूनी अंगण ,अंगणामध्ये आंबा ,फणस,काजू सुपारी ह्यांच्या बागा ,समुद्र किनारे हे निर्सगरम्य दृश्य बघायला डोळे आणि मन दोनीही उघडे ठेऊन बघायला लागतं . निसर्गाची मुक्तहस्ताने केलेली उधळण इथेच बघायला मिळते. नारळाच्या झाडांमधून दिसलेले निळं आभाळ म्हणजे  जणु  निळ्या कोऱ्या कागदावर  हिरव्या रंगानी रेखाटलेली ठिपक्यांची रांगोळीच . छोटे छोटे टुमदार कौलारू घरे सगळीकडे विखूरलेलेआहे. मासेमारी,पर्यटन हाच येथील लोकांचा प्रमुख  व्यवसाय.  सगळं दृश्य डोळ्यात साठवत वळणदार रस्त्यावरून लाल माती उडवत आमची गाडी गंगनबावडा घाट ,कणकवली ला वळसा घेत मालवणला पोहचली .  

नुकतीच संध्याकाळ होत होती . प्रवासाचा शिण  आलेला होता . बाजारपेठ मधून वाट काढत गाडी "वासंती निवास "ला पोहचली . स्वागताला शैलजा ताई उभीच होती. आम्ही हॉटेलचे बुकिंग केले  नसून होम स्टे ला पसंती दिलेली होती. आणि खरंच पाहुण्यांचं स्वागत करतात तसच स्वागत  आमचं वासंती निवास आणि चिवला बीच वर समुद्राच्या लाटांनी केलं . निळेशार पाणी ,दुधासारख्या उसळणाऱ्या लाटा क्षितिजा पर्यंत पसरणारा मावळत्या सूर्याचा प्रकाश सगळं प्रवासाचा शीण निघून गेला . आणि आम्ही सर्वात अगोदर धाव घेतली ती समुद्राकडे ..... माझा मुलगा सक्षम वय वर्षे ४  त्याच्या आयुष्यात प्रथमच इतका विशाल समुद्र पाहत होता . त्याच ते निरागस ,लोभस रूप आणि त्याला मनमुराद दाद देणारा अथांग सागर ...हे दृश्य अवर्णनिय होत . स्विमिन्ग पूल मध्ये पहिल तेवढंच पाणी पण त्याहीपलीकडे जाऊन इतका अथांग ,विशाल ,दूरवर पसरलेला समुद्र पाहून तो हरखून गेला. मनसोक्त आनंद घेतल्यावर आम्ही घराकडे परतलो. आणि वासंती निवास आणि तेथील लोक खरोखरच सागरासारखीच विशाल हृदयाची आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी मोजक्याच पण नीटनेटक्या केलेल्या सोयी आम्हा पुणेकर लोकांना लाजवून सोडतात . वासंती निवास पासून चिवला बीच हाकेच्या अंतरावर आहे. खिडकीचे तावदाने उघडली तर समोर फक्त समुद्र आणि फक्त समुद्र दिसतो.   दिवस मावळला आणि रात्रीचा समुद्र परत वेगळाच भासू लागला. रात्रीचे जेवण आटपून आम्ही परत किनाऱ्यावर वाळूत जाऊन बसलो. रात्रीचे समुद्राचे रूप हे केवळ त्याचे स्वतःचे असते ,कारण सूर्याची चमक त्याला रात्री येत नाही. संध्याकाळी चकाकणारे समुद्राचे तेच पाणी रात्री शांत ,निश्चल ,सावरकरांच्या ओळी  सार्थक करत होता 
                                                              सुंदर नभ हे , नभ हे अतलची हा 

                                                      सुनील सागर , सुंदर सागर , सागर अतलची हा 


.                                                                 

आणि मला माझा मीपणा विसरायला भाग पाडत होता . आकर्षणासाठी लावलेला वर्ख फार काळ टिकत नाही. रात्रीचा मूळ रूपात आलेला समुद्र आणि त्याच्यामुळे उठून दिसणारं चांदणं हे गणित मला जास्त भावलं . शांत वातावरण ,थंडगार वारा , फक्त लाटांचा आवाज , काळोखाची शाल पांघरून आलेली निशा , आणि पांढर शुभ्र चांदणं हे वसुंधरेचे रूप पाहून मी परत एकदा प्रेमात पडले. आणि निद्रेच्या स्वाधीन झाले . 
पश्चिम किनारा असल्यामुळे सकाळचा सूर्योदय बघायला मिळाला नाही . सकाळचे आन्हिक आटपून आम्ही भटकंतीला निघालो . दीपक भाऊ आम्हाला घेण्यासाठी आलेच होते. स्कुबा डायविंग हा एक अफलातून अनुभव घेण्यासाठी आम्ही सज्ज होतो. सिंधुदुर्ग पाहून,शिवाजीमहाराजांना नतमस्तक होऊन आम्ही निघालो . बुलंद असा तो गड समुद्राच्या लाटांना अंगावर झेलत तटस्थ उभा आहे . जिथे समुद्राचे पाणी शांत होते तिथे समुद्रात असलेल विहंगम विश्व आपल्याला जवळून अनुभवता येत. एक छान साखळी या लोकांची आहे . दीपक भाऊ आम्हाला बोटीवाल्या माणसाकडे सोपवून निघून गेले.  स्कुबा डायविंग करवून घेणारी टीम वेगळीच होती ,आणि पाण्यामध्ये हात पकडून समुद्राचा तळ दाखवणारी वेगळीच लोक होती. हा सगळा प्रकार आपल्याला असुरक्षित वाटत असला तरी या लोकांच्या अंगवळणी पडला आहे . खर सांगायचं झालं तर माझं मन मला हा अफलातून प्रकार करण्याची परवानगी देत नव्हतं . इथली सगळी लोक हे जबाबदारीने आणि सुरक्षित कररवूं घेतात ह्याची शाश्वती होती तरीही . माझ्या सोबत असणाऱ्या मावशीच्या  १५ वर्षाच्या मुलींनी सुद्धा हे दिव्य न घाबरता पार पाडलं आणि एक वेगळाच अनुभव आपल्या आयुष्यात नोंदवला . पण माझ्या बाबतीत असा घडलं नाही मी पाण्यात दोन वेळा उतरून परत आले. आणि एका सुंदर अनुभवाला मुकले. हे कायमच मनात राहिलं .(पुढच्या संधीच्या प्रतीक्षेत) . तिथून आम्ही देवबाग ला गेलो .अहाहा ..काय ती निसर्गाची किमया ..... भरभरून दिलय निसर्गानी कोकणला ...... हातच न राखता !!!!  

वॉटर स्पोर्ट्स ची असलेली उत्तम सोय, अरबी समुद्र आणि करली नदीचा संगम , मगरीच्या आकाराची सुनामी पासून बनलेली टेकडी त्याच्यावर असलेली उंचच उंच नारळाची आणि विविध प्रकारची झाडे . मस्तच !!!!! नदीचे संथ पाणी आणि समुद्राच्या खळखळून येणाऱ्या लाटा हा संगम इथे बघायला मिळतो. समुद्राच्या पाण्याचा रंग एके ठिकाणी बदललेला दिसतो ,तेवढ्याच भागात लालसर लाटा दिसतात ,असे विचारले असता ,शिवाजी काका म्हणजे ए बी पी माझा चे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बातमीदार आमच्यासोबत बोटवर होते आणि तेच सगळी माहिती देत होते.  ते म्हणाले इथे थोडासा भाग जमिनीचा आहे जो सहा महिने  पाण्यात सहा महिने वर  असतो. होडीला इथून जाताना जोरात हिसका बसतो तो याच कारणाने . काय हे अजबच !!


असे एकेक सुंदर नवल अनुभवता आले. सक्षमची पोहण्याची हौस इथे पूर्ण झाली . कारण संगम असल्यामुळे पाणी शांत आणि खोल नव्हते. 
बनाना राईड मध्ये बसवून समुद्र फिरून आणतात आणि मधेच जिथे पाण्याची खोली जास्त नाही तिथे पलटी मारतात ,अंगामध्ये सेफ्टी जाकीट असल्यामुळे आपण लगेच बाहेर येतो पण अनुभव थरारक असतो . त्याच्यानंतर मी मजा घेतली ते पॅरासिलिंगची ,एका अनुभवाला मुकली असली तरी हा पण माझ्या आयुष्यातला रोमांचित अनुभव म्हणावा लागेल. बोटीने समुद्राच्या मधोमध्ये आपल्याला नेतात ,सेफ्टी जाकीट सोबतच पायात नायलॉनची दोरी अडकवतात आणि एका वेळी दोघांना पॅराशूटला जुंपतात ,आणि पॅराशूट आकाशात  सोडतात ऐकूनच भीती वाटली ना????ओहोहो काय  दृश्य होत अविस्मरणीय खाली निळंशार पाणी वरती पांढर शुभ्र आकाश आणि मध्ये आपण .... कुठे बघावं आणि काय काय बघावं. शब्द हि कमी पडे ,न वर्णिले जाती हे अनुभवांचे कवडसे !!!!

अशाप्रकारे आमचा दिवस संपला आणि सोबत एक वेगळाच अनुभव पदराशी घेऊन परतीचा प्रवास सुरु झाला. 

काय ती लाल लाल माती कोकणाची 
कशी मोजावी उंची माडाच्या झाडाची
कौलारू घरे आणि घनदाट वनराई
देवाने इथे कशाचीही कमी केली नाही

प्रत्येक वेळी वेगळा भासणरा समुद्र हा
कधी शांत ,कधी अवखळ ,तर कधी खवळलेला
निसर्गानी सुंदर निळा आणि शुभ्र रंगवलेला
पण पर्यटकांनी स्वार्थसाठी गढूळ केलेला

नीटनेटकी आणि साधीसुधी टुमदार  घरे
जे निसर्गानी दिले ते सहज स्वीकारणारी
 प्रामाणिक आणि निसर्गाशी एकरूप झालेली
आदरतिथ्य जपणारी भाबडी माणसे

क्षितिजापर्यंत  विस्तारलेलं मोकळं  आभाळ
दूरवर पसरलेलं अथांग निळंशार पाणी
आणि त्यावर दिमाखात डोलणारी नाव
फळांचा राजा हापूस खाऊन जातो भाव

करवंद ,जांभूळ ,काजू हा इथला मेवा
निसर्गाचा साज इथे येऊनच बघावा
डोळ्यात साठवाया किती हा ठेवा
परतुनी मागे बघता आठवणी राहाव्या 
Add caption


Friday, 6 April 2018

बऱ्याच दिवसांनी सहजच !!

सक्षम ला घडवतांना मला काय वेगळा अनुभव येतोय हे आज मी शब्द रूपाने उतरवण्याचा प्रयत्न करते आहे . जगापेक्षा वेगळी वाट निवडलीय खरी ,चालायला आम्ही सज्ज पण आहोत पण हि वाट नेमकी कुठे पोहचवेल याचा अंदाज बांधता येत नाही. पण छान  वाटतोय हा प्रवास ... तुम्ही कधी केलय असं ? ध्येय किती दूर आहे ,कुठे थांबायचं हे माहित नसताना चालत राहणे.करून पहा मज्जा येईल आयुष्यात. आमच्याबाबतीत हेच होतंय . आजूबाजूचा आई हा वर्ग मुलांना सकाळी उठवणे  , दप्तर तयार करणे,डब्बा भरणे,स्कूल बस पर्यंत जाऊन टाटा करून येणे , दुपारी बस ची वाट बघणे , होम वर्क करून घेणे किंवा स्वतःच करणे.......  डब्बा संपवला नाही म्हणून ओरडाओरडी ,वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवणे ... हुश्श !! ह्यामध्ये धावतांना दिसतात  .पण माझ्याबतीत हे काहीच घडत नाहीय . कारण स्कूल ह्या विषयापासून मी आणि सक्षम खूप दूर आहोत. आमचा दिवस तो उठेल तेव्हा चालू होतो . सकाळी लवकरच उठाव असा माझा आग्रह नाही. पण तो त्याची झोप पूर्ण करून वेळेतच उठतो. सकाळची थंड हवा अंगावर घेऊन मोकळ्या मैदानात चक्कर मारून प्रसन्न सूर्योदय बघत बघत आमच्या  अखंड उत्साहपूर्ण दिवसाची सुरवात होते. निसर्गाच्या शाळेपुढे मला बाकडे टाकलेली चार भिंतीची बंद शाळा ठेंगणी वाटते. आणि विशेष म्हणजे आम्ही एका शाळेसमोरूनच हिंडत फिरत जात असतो. माझ्या घराच्या बालकनीतून थोडं दूर बघितलं कि शाळेचं तेच तेच चित्र रोज दिसत. ठराविक वेळेला वातानुकूलित ,उत्तम दर्जा असलेल्या बसेस गेटसमोर येऊन थांबतात , सगळी मुले रांगेत उतरून आपापल्या वर्गामध्ये प्रवेश करतात,आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ६ तास घड्याळीच्या ठोक्याप्रमाणे यंत्रवत चालू असतात , त्या शाळेमध्ये प्रत्येक स्पोर्ट्स साठी क्लब हाऊस  आहे. एकदम  उत्तम !!!यामध्ये वादच नाही आणि का असू नये पालकांकडून घेतल्या गेलेल्या फीसमधून एवढं समृद्ध ठेवणं आवश्यक आहे.पण प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन ,स्विमिन्ग पूल मध्ये नुकताच हात पाय मारायला शिकलेला तो छोटा मुलगा ,अजून आनंद घ्यावा असं वाटलं तरीही घड्याळात ठोका वाजतो ,कारण त्याला संगीतावर ठेका धरायला जायचं असत. ह्याच शाळेमध्ये संध्याकाळी शाळेव्यतिरिक्त इतर मुलांसाठी स्विमिन्ग पूल ओपन असतो , सक्षम आणि माझी हझरी तेव्हा तिथे लागते. आणि  हा माझा  स्वतःचा अनुभव आहे स्वच्छंद सोडल्यानंतर त्याची प्रगती लवकर होते आहे. अक्षरांच्या ओळख बाबतीतही बोलायचं झालं तर  ,जी मुले वयाच्या ५ वर्षी वाचायला शिकतात माझा मुलगा कदाचित उशिरा शिकेल  ह्याच दुःख अजिबात नाही पण तो स्वतः धडपड करत शिकेल ,अनुभवातून त्याच तो शिकेल ,ह्यापेक्षा माझ्यासाठी दुसरं काही नाही .मी फक्त त्याच्यासाठी एक माध्यम आहे.  १२ वय वर्षी वाचायला शिकलेला एक मुलगा वयाच्या १४ वय वर्षी एका मासिकाचा  संपादक म्हणून काम करू शकतो,असेहि  कुठेतरी वाचनात आलय.नैसर्गिकपणे शिक्षण हे केव्हाही उत्तम .  माझी कुठल्याही शाळेवर टीका नाही ,आपल्या मुलाला शाळेत टाकावं किंवा टाकू नये  असा माझा कोणाला आग्रहही  नाही. हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे . सगळेच जण प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतात असही नाही. फक्त एका मुलाला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलेल्या आईच्या चष्म्यातून स्कूल ते होमस्कूल  आणि या गोष्टीकडे कसं  बघावं हाच दृष्टिकोन ठेऊन मी लिहत आहे. 
मी स्वतः कॉलेजमध्ये जेव्हा ठराविक तासाला ठराविक शिकवायचं असा ठोकताळा स्वतःशी बांधून जाते तेव्हाच lecture आणि स्वछंद ,ठरवून न घेतलेलं lecture ह्यामध्ये खूप अंतर मला जाणवते. चौकट  आखून घेतली कि काही गोष्टींना सीमा राहते  . अभिव्यक्ती  स्वतंत्र हाच मुळात शिक्षणाचा पाया  आहे. आपण काय शिकतोय ह्यापेक्षा कस शिकतोय हे खूप महत्वाचं आहे. शिकण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम वर  अवलंबून राहण्याची गरज नाही. आपल्याला क्षितिज च शिकण्यासाठी अंत असू शकतो . कुठलीही स्पर्धा परीक्षा पास होणं किंवा एखादी  डिग्री मिळवणं हे समाधानी आयुष्य जगण्यासाठी कारण असू शकत नाही. शिक्षणातली उच्च पदवी मिळवण्याकरिता मी सध्या संशोधन करतेय ,पण   मला प्रासंगिक उद्भवलेल्या प्रश्नावर तोडगा काढता येईल का ???हा मला बरेचदा पडलेला प्रश आणि त्यावर न सुचलेलं उत्तर !!!! बालपण म्हणजे एक निरागस जगणं आहे. ध्येय गाठण्यासाठी त्याला स्पर्धेच्या शृंखलेत न अडकवता तिथपर्यंत जात असलेली वाट ,प्रवास अनुभवता यावा . हि प्रामाणिक इच्छा . किती सुंदर असेल तो प्रवास जेव्हा  मुक्कामच असेल तुमचा खरा प्रवास !!!


Monday, 19 February 2018

चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे

अनुभवी प्रधानमंत्री  आधीच घरी असतांना नवीन येणाऱ्या गृहमंत्र्यांचे स्वागत आनंद आणि दुःख अशा  सरमिसळ भावनांनीच होत असतं . "सुनबाई आलीय आता तुम्ही मोकळ्या व्हा "मैत्रिणींनी दिलेला टोला ,हसून टोलवावा कि झेलावा हेच कळत नाही . मोकळे व्हा पण नेमके कोणत्या कोणत्या प्रकरणातून ?हे मात्र  ठरत नाही . मुलगा शिकून मोठा झाला चांगल्या उच्च पदावर नोकरी सुद्धा आहे. भरभक्कम कमावतो ,आणि आईच्या शब्दाबाहेर नाही हं ,बापरे केवढं ते सुख सासूबाई या समस्त वर्गाला  .आयुष्याची शर्यंत जिंकलेच समजावं ह्या घडीला. मग काय तोऱ्यात शोध सुरु होतो तो सुनबाईंचा ,प्रत्येक सार्वजनिक प्रसंगाला हळदी कुंकापासून ते दूरच्या नात्यातल्या लग्नापर्यंत हजेरी लावणे सुरु होते.आधीच जाड काच असलेल्या चष्म्यातून योग्य ती मुलगी टिपण्याचा कार्यक्रम कोपऱ्यात बसून चालू असतो, आणि न जाणे लग्नात अशा किती समस्त भावी सासूबाई बसल्यात हे ओळखूनच सगळ्या मुली वावरत असतात. कमाल आहे नाही!!सुंदर नटून थटून ,चेहऱयावर जमेल तेवढं स्मित ठेऊन ह्या भावी सुना बागडत असतात . त्या जाड काचातुन  नजर बरोबर कोणावर तरी खिळून जाते ... ... आणि मग काय विचारपूस चालू. तिच्या घरी जाऊन  केवळ लोकांनाच नाही तर घरातील वस्तू बारकाव्याने बघितलेल्या असतात  आणि कुठल्या गोष्टी रीतील सोडून आहे आणि कुठल्या धरून हे अचूक  टिपलेलं असतं  . आपल्या साच्यात बसणारी निघाली तर सोन्याहून पिवळं नाहीतर शोध अभि जारी है !!!!

   बऱ्याच मुलींना नाकारून एक पसंत केली जाते .  सोनारयाच्या दुकानात जाऊन संपूर्ण दागिने बघून सुद्धा मनासारखं नाहीच मिळालं असा म्हणून एकाचा स्वीकार होतो अगदी त्याचप्रमाणे,पुढची अवघड असणारी पण समर्थपणे पेलणारी क्रिया म्हणजे आपल्या शब्दाबाहेर नसणाऱ्या मुलाला शब्दात अडकवणे. तिच्याबद्दल ऐकलेलं ,न ऐकलेलं उत्तमच सगळ्यांना ऐकवणे.आणि आपली आई आपल्यासाठी योग्यच करत आहे असा म्हणून मुलाने दिलेला होकार  म्हणजे संस्काराची पावतीच !!!!अशाप्रकारे घरातील प्रधानमंत्री खरंच  प्रधान बनून सगळं पार पडतात. आणि सासूच्या भूमिकेत शिरतात . मनात मात्र धाकधूक कायम असते ,एक अनोळखी चेहरा ,अनोळखी घराणं  आपल्या काळजाच्या तुकड्याशी कायमच  जोडणं . आणि आपल्या भविष्याची मदार काहीप्रमाणात त्या मुलीच्या खांद्यावर टाकणं ."आजकालच्या या नवीन मुलींचं आपल्या सारख्या सासवांसोबत जमणं  सोपं नसत. त्यांचं शिक्षण,त्यांचं स्वतंत्र ,त्यांची कमाई मोठी मोठी होत चालीय ना " महिला मंडळाच्या एका सूनग्रसित सासूचा टोला आठवतो. आणि आपल्या वाट्याला आलेला वाण हा उत्तमच असेल आणि नसला तरी जे बाकी जगाच होत तेच आपल्यासोबतही होईल अशी  अशी शंका वजा  समजूत काढून पुढला प्रवास ठरतो. हे झालं सासूबाईंच्या मर्जीप्रमाणे ठरलेल्या  लग्नाबद्दल . पण जे लग्न नवरा मुलाच्या पसंतीप्रमाणे ठरतं त्यातही सासूबाई ह्या नटाची कहाणी वेगळी नसते. 

आधीची गोष्ट वेगळी होती लग्नामुळे एक मुलगी अख्या कुटुंबाशी जोडल्या जायची .कितीही आवडो किंवा न आवडो जन्मभर ते ओझं वाहायची पण आता मात्र लग्न दोन व्यक्तीच होत आणि निम्या लोकांना तेही धड सांभाळणं अवघड जात . मुलाने पसंत केलेली मुलगी पदरी पाडून घेणं तिचा स्वीकार करणं हे पण एका दिव्यातून जाण्यासारखंच आहे. आपल्या सुनेला काय निक्षून सांगायचं ,काय बजावायाच ,काय मनावर ठसवायचं  याची यादी सासूबाई मनात घोळवत असतात. मुली सासरी जातात तेव्हा तिची आई अस्वस्थ होतेच पण सून येणार म्हणून मुलाची आई देखील अस्वस्थच असते. शेवटी काय "चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे " . 


सध्या माझी भूमिका सुनेची आहे. सुनेबद्दल नंतर कधीतरी !!!

Tuesday, 2 January 2018

माझी शाळा

सगळ्यांच्या शाळेशी काही खास आठवणी जडलेल्या असतात . मोठे झाल्यावर  लहानपणीच्या गमतीजमती सांगताना आपणही नकळत हरखून जातो .आणि मग आठवते आपण शिकलो ती शाळा. गावी गेल्यावर मधेच शाळेसमोरून जाताना अनेकदा वाटत आतमध्ये जाऊन बघावं, पण संकोच वाटतो आता तिथं आपल्या ओळखीचं कोणीच नसणार . आणि "नुसतं बघायला आले " अस सांगायला विचित्र वाटेल ! म्हणून बरेचदा हिम्मत होत नाही . पण या वेळी मुक्काम बरेच दिवस होता. सक्षम ला माझी शाळा दाखवेल म्हणून आश्वासन दिल होत . त्याप्रमाणे त्याला घेऊन गेले देखील . कारंजा  म्हणायला छोटस गाव पण राहणारी लोक मात्र अगदी रसिक ,मनाने दिलदार ,मनमिळाऊ ,अशी आहेत . माझ्यावेळी चांगल्या समजणाऱ्या शाळाही जेमतेम तिनच  . दोन शब्दांमध्ये सांगायचं झालं तर शाळेचं नाव जे . सी कारंजाच्या व्यक्तीला विचारलं तर लगेच कळेल . पण शाळेचं पूर्ण नाव होत जिणवरसा  चवरे हायस्कूल . त्या शाळेत शिकणारी माझी तिसरी पिढी . प्रत्येक पिढीने बघितलेले शाळेचे रंगरूप हे वेगवेगळे होते. आतामात्र शाळेचा पूर्ण कायापालट झाला आहे. 
नेहमी शाळेत आल्यावर सायकल लावून जायचे नेमकी त्याच जागी गाडी लावून आतमध्ये शिरले. प्रार्थनेला उशीर व्हायचा  तेव्हा रस्त्यामध्ये उभी राहून बोलणी खावी लागायची आजही कोणीतरी ओरडेल हीच धाकधूक मनात होती. किती खोलवर प्रभाव असतो काही गोष्टींचा मनावर ,आणि डोळ्यसमोर एक एक आठवणी दाटू लागल्या . दारामधून आत शिरताच नजर वेधून घ्यायचा तो काळा फळा ,त्यावर काही खास गुणांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव झळकायचे .  शाळेत असताना खूप हेवा वाटायचा ह्या गोष्टींचा . इंगळे सर आम्हाला चित्रकला शिकवायचे त्यांच्या सुंदर मोतीसारख्या असणाऱ्या अक्षरांमध्ये त्या विद्यार्थ्यांचे नाव झळकायचे . पुढे ते विद्यार्थी  त्या क्षेत्रात यश मिळवतील किंवा न मिळवतील पण सरांनी लिहलेलं नेत्रदीपक कामगिरी हा शब्द त्याच्यासाठी मित्रमंडळींमध्ये भाव मिळवून द्यायचा. प्रत्येक सरांची शिकवण्याची आपापली लकब होती . दरवर्षी तेच शिकवावं लागायचं पण सगळे जण खूप आत्मीयतेने शिकवायचे . तेव्हा शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं नव्हतं . त्यांची विद्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ दिसायची. आणि म्हणून आजही संस्कृतचा देव शब्द चालवायला सांगितला  तरी  उच्चार पूर्ण आठवत नसले तरी ती विशिष्ट लय डोक्यामध्ये पचलेली  आहे .  पी टी  चा तास आम्हाला खूप आवडायचा कारण राऊत  सर पोटात दुखत आहे म्हटलं कि बसायला जा म्हणायचे मग थोड्या वेळानी खेळायला परवानगी मिळाली कि  पोटातले दुखणे पळून जायचे . भूगोलाच्या तासाला वडतकर सर समोर बोलावून नकाशावर राज्य शोधायला सांगायचे ,त्याचा परिणाम अजूनही प्रत्येक राज्याची राजधानी लक्षात आहे. खूप छान  होते ते शाळेचे दिवस , शिकण्यामध्ये एक वेगळा आनंद होता. आतासारखी रॅट रेस  नव्हती. शाळेत जायला मजा यायची . 
आतामात्र शाळा बदलून गेली आहे ,नवीन दिमाखात उभी असलेली तीन मजली इमारत शाळेची प्रगती पथावर असलेली वाटचाल दाखवून   देते पण त्या जुन्या इमारतीची सय नवीन इमारतीला  नाही .  स्टाफ रूम जवळ एक प्राजक्ताच झाड दिमाखात उभं होत त्याचा सुगंध पूर्ण शाळेत दरवळला  होता. पण आता त्याची जागा कुंड्यानी घेतलीय . ती आपलीशी वाटणारी शाळा कुंड्यांप्रमाणे खुंटल्यासारखी जाणवली. नवीन झालेली संगणक लॅबोरेटरी , पुस्तकांनी भरलेले वाचनालय बघून अभिमान वाटला . नवीन पिढीप्रमाणे शाळेने देखील आपल्यामध्ये बदल घडवून आणला तर !ती तर काळाची गरज आहे. बाहेर निघतांना  सक्षमला 
जे दाखवायला आणले होते ते तिथे नव्हतेच . कारण मी मोठी झाली तशी माझी शाळा देखील मोठी झाली होती. मला माझी शाळा परत दिसेल हि अपेक्षा नक्कीच फोल ठरली. 

Thursday, 2 November 2017

माझी आजी ......... एक ठसठशीत व्यक्तिमत्व


आमची आजी म्हणजे शांताबाई ओंकारदास चवरे . माझ्या आईची आई . माझं बालपण आजीच्याच संगतीत गेलं म्हणून तीच व्यक्तिमत्व फार जवळून बघायला मिळालं. आजी म्हणजे  वडाच्या खोडासारखी मजबूत बुंधा असलेली आहे .तिच्या सावलीत आम्ही सगळे भावंडं मोठी झालो. तिची मुले मुली म्हणजे वडाच्या झाडाला असलेल्या पारंब्याप्रमाणे  आहे . ५मुली २ मुले एवढा मोठा पसारा या वडाच्या झाडाचा आहे .आजीने आयुष्यात बरच काही पहिल. नातवंडाची मुलं बघायला मिळालेली माझी आजी वयाच्या ८७ वर्षी देखील ठणठणीत आहे. एक प्रकारचा प्रचंड शहाणेपणा आणि समजूतदारपणा तिच्याकडे होता. खूप भयंकर अनुभव तिच्या समोर आले पण आजीने कधीच मान टाकली नाही . हे तीच जगण्यावरच प्रेम होत की  जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे लक्षात आल नाही पण आजोबा असूनही त्यांची पाहिजे तशी साथ आजीला संसाराचा गाडा ओढताना मिळाली नाही. सगळा गाडा तिने एकटीनेच ओढला,आपण जर काही केलं नाही तर मुले रस्त्यावर येतील हे जाणून तिने जगायचं थांबवलं नाही किंवा कोणी मदतीला येईल याची वाट पहिली नाही. पदर खोचून कमी वयात कर्तबगार झाली. आजच्या काळातलं वातावरण जर आजीला मिळालं असत तर ती कुठल्या कुठे गेली असती. पण तिची ही मेहनत मात्र मुलांना उभी करण्यात दिसली. 
आजीचं मुळच माहेर  अचलपूर अमरावती जिल्ह्यातील , भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हाचा  तिचा जन्म ,घरातील परिस्थितीमुळे आजीला कारंजा येथील कंकूबाई आश्रमात शिकायला ठेवले. आजीचं शिक्षण १० वि पर्यंत झालं . लगेच आजीला जिल्हा परिषदच्या शाळेत नोकरी मिळाली होती . तीच व्यक्तीमत्व देखील शिक्षिका म्हणून शोभून दिसत होत . आजी  दिसायला विलक्षण तेजस्वी होती तिच्या चेहऱ्यवरच तेज आजही अंगावर आलेल्या सुरकुत्या मधून  झळकत. आजोबानी आजीला पाहताच क्षणी पसंत केलं होत हे आजोबांकडूनच ऐकलेलं आठवत . एका ठराविक लयीमध्ये आजोबा आजीला "मास्तरीण बाई SSSSS " म्हणून हाक मारायचे. आजी कायम नऊवारीत दिसायची आता मात्र अघळ पघळ गाऊन घालते पण कोणी बाहेरचे लोकं  आले कि तिची पदर सावरण्यासाठी घालमेल होते.
अंघोळ करून झाली की  तीच वेणी फणी करून लांबसडक केसांचा रिबन लावून अंबाडा पाडणं  ,आणि कपाळावर ठसठशीत कुंकू अजूनही स्मरणात आहे. आता मात्र कुंकूंची जागा टिकलीने घेतली तेवढाच काय फरक बाकी अजूनही सगळं जसच्या तस. तिची एक संदूक होती लोखंडाची त्याला कायम कुलूप  असायचं,त्याची चाबी तिच्या गळ्यात एका काळ्या दोराला अडकवलेली असायची ,आम्हा भावंडाना कायम उत्सुकता असायची कि यामध्ये काय बर असेल?एकदा पेटी उघडायचा मला मौका मिळाला तिच्या हिशेबाच्या वह्या,पेन्सिल,रब्बर,गळ्यातील पोत ,एका वहीमध्ये पैसे अस बरच काय काय कामाचं आणि बिनकामाच सगळंच असायचं . हि सवय तिला आश्रमात असल्यापासून  होती . आजोबा पंडित होते ते कायम फिरस्तीवर असायचे . त्यामुळे सगळंच आजीला करावं लागायचं.तिची खूप ओढाताण व्हायची . ज़िल्हा परिषद ची नोकरी असल्यामुळे तिच्या सारख्या बदल्या व्हायच्या ,नवीन ठिकाणी घडी बसायला वेळ लागत होता . पण तिने सगळंच धीराने केलं . समाजात मिसळणं , लग्नाला जाणे,आला गेला पै पाहून बघणे यामध्ये तिला खूप उल्हास नव्हता . परिस्थिती पण तशी नव्हती. सगळ्यात  पहिली गरज तिला मुलांचे पालनपोषण करणे ही होती .  नोकरीमध्ये पण आजी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली , तिचा शाळेमध्ये,विद्यार्थ्यांमध्ये आणि घरीही धाक होता. आम्ही नातवंड सुद्धा आजीच्या एका आवाजात गपगार व्हायचो . आजोबा सुद्धा आजीचा आवाज वाढला कि शांत बसलेले मी पाहिलंय . नशीब ,प्राक्तन,देव हे शब्द मी कधी आजीच्या तोंडून ऐकले नाही. फार देव देव करणं तिला आवडायचं नाही ,तिचा विश्वास आपल्या पुरुषार्थावर आहे.चांगले वागणे म्हणजेच देवाची पूजा आहे असा ती म्हणायची , दणकून कष्ट करावे ,ह्यावर तिचा विश्वास आहे. तिच्या नातवंडांना परीक्षेत कितीही मार्क पडू देत ती आवर्जून पेढे आणायला लावायची . आजीची पेंशन काढायला मी रिक्षात तिला घेऊन जात असे . तिकडून येताना मला नेहमी खाऊ मिळायचा ,आता आजीचं वय झालाय ,तिची स्मरणशक्ती खूप कमी झालीय पण मधेच तिला जुन्या गोष्टी आठवतात . माझी मोठी मावशी म्हणजे तिची मोठी मुलगी आणि जावई दोघेही आता या जगात नाही ,पण शरयू कडे जायचं असे ती  बरेचदा म्हणते. आम्ही सगळे नातवंड जमलो कि तिला आनंद होतो ,आम्ही तिथेच राहावं असा तिला कायम वाटत ,माझं लग्न झालाय हे सुद्धा ती बरेचदा  विसरते. एक मजेशीर प्रसंग मला आठवतो, आईच्या दूरच्या नात्यातला एक व्यक्ती एकदा घरी आला होता,त्याचे चारित्र्य  तरुण असताना चांगले नव्हते (आजीच्या भाषेत लंपट ) पण साधारण त्याचे वय ४२ वगैरे असेल तेव्हा तो घरी भेटायला आला होता . पण आजीच्या डोक्यात अजूनही जुन्या आठवणी असतील त्याच्याबद्दलच्या , आईला आजीने त्याला बाहेर काढ म्हणून सांगितले,पण एक्दम कोणाला जा म्हणून कस  सांगणार म्हणून आई विचार करत होती , आई बाहेर काढत नाहीय म्हणून आजी तिची काठी टेकवत बाहेर आली ,आणि त्या बिचाऱ्या व्यक्तीला घालून पडून बोलून हाकलून लावलं . आता तो तसा नसेलही पण आजीच्या   जुन्या आठवणीतुन तो विसरल्या गेला नव्हता . आम्हाला मात्र तोंड लपवायला जागा नव्हती. आजीचा एक भाऊ न चुकता भाऊबीजेला ओवाळायला  येतो,तेव्हा आजीच्या सगळ्या आठवणी दाटून आलेल्या मी पाहिलंय . ,तिच्या या आग्रही स्वभावानं माझे मामा ,आई,मावशी सगळ्या उच्च  पदावर नोकरी करू शकत आहे,तेव्हा जर आजीने मूलं  आणि मुलींना  बाहेर पडू दिल नसत तर आज त्यांनी इतकी प्रगती केली नसती. समाजात अंधश्रद्धा असताना  देखील आजीचे विचार बुरसटलेले नव्हते. तिने यासाठी बऱ्याच लोकांचा वाईटपणा ओढवून घेतलाय. .कसलं आणि कुठून आलेलं शहाणपण तिच्याकडे होत ठाऊक नाही पण कोणी आजीचं ऐकलं नाही असा कधी झालं नाही . 
आजोबा गेल्यानंतर देखील तिने स्वतःला सावरलं. आज तीच शरीर कृश झालाय,असंख्य सुरकुत्यांनी व्यापलाय ,पण स्वतःच स्वावलंबीपण मात्र अजूनही तसाच आहे. तिच्या भिंगाच्या चष्म्यातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला अजूनही मोहवून टाकतो . म्हणून आजीवर लिहण्याचा माझा हा प्रयास!!!  
  




Tuesday, 31 October 2017

परत एकदा अ आ इ पासून शिकावयास वाटतंय .

माझा मुलगा सक्षम सध्या वय वर्षे ३.५. तो ३ वर्षाचा झाला तेव्हा इतर आईप्रमाणे माझ्याही डोक्यात विचार सुरु झाले त्याच्यासाठी शाळा कुठली निवडायची? मित्र मंडळीत शोभेल आणि जास्तीत जास्त स्टडी ओरिएंटेड हाय स्टेटस स्कूल,वेल सेटल ,फ्रेंडली इन्व्हॉर्नमेंट ,भरपूर ऍक्टिव्हिटी जिथे हे सगळं उपलब्ध असेल अशी शाळा निवडण्यामागे माझा कल  होता . म्हणून सगळ्या शाळांना भेट देऊन झाली . पण मन त्या कोवळ्या जीवाला शाळेत पाठवायला राजी होत नव्हतं .  रोजच्या वेळेत शाळेत जाऊन दिवसांचे रकाने भरणे ,इतिहास ,भूगोल,गणित मार्क पाडण्यासाठी वाचणे . मातृभाषेत न बोलता इंग्लिश मधेच संभाषण करणे हे सगळं मला करायला भाग पडणार होत.कारण मुलाला ग्लोबल बनवायचं असेल तर हे सगळं त्याच्याकडून हळुवारपणे ,त्याच्या कलाने आणि नाही ऐकलं तर दमदाटी करून करूनच घ्यावं लागणार होत . पण हे करून माझा मुलगा खरंच ग्लोबल होईल का ?ग्लोबल ह्याची व्याख्या एका जापनीज माणसाने सुंदर     शब्दात मांडली आहे  आपली संस्कृती, आपली भाषा, आपली मुळ  नीट समजावून घेतल्यावर जगातील इतर संस्कृतींना सहिष्णू दृष्टीने समजावून घेणे म्हणजे ग्लोबल ...... त्यासाठी संवादाची भाषा म्हणून इंग्रजीची गरज पडेलही  पण अनुकरणाचा नाही तर समजावून घेण्यासाठी .जर तुम्हाला  स्वतःच्या मातृभाषेतील साहित्यच जर नीट वाचता येत नसेल  तर तुम्ही इतर संस्कृतींना कसे समजावून घेणार?आणि खऱ्या अर्थाने ग्लोबल  कसे होणार ? पण या न थांबणाऱ्या स्पर्धेमध्ये माझा मुलगा मागे पडायला नको , ह्या सगळ्या पिएर प्रेशर मधून मी जात होते. एका हाय स्टॅंडर्ड शाळेमध्ये शिक्षक -पालक सभा ला हजेरी लावली ,शिक्षकांच्या छोट्या मुलांकडून केल्या जाणाऱ्या आभाळाएवढ्या अपेक्षा ऐकून मन खिन्न झालं. हे जर माझ्या मुलाला जमल नाही तर हे शिक्षक  त्याच्या कडून करवून घेणार याची शाश्वती ते पालक लोकांना देत होते. पण ह्या सगळ्यामध्ये त्याच बालपण कोमेजून जाईल ,कुठलीही गोष्ट ठरवून दिल्या गेलेल्या साच्यातच झाली पाहिजे ह्याच दडपण मनावर असेल.  आणि सक्षमचा  निरपराध चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरंगू लागला . तो ह्या सगळ्यापासून अनभीज्ञ होता . तिथून निघाल्यावर या शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या शाळेला दुसरी वाट आहे का याचा शोध सुरु झाला . माझ्या नवऱ्याच्या डोक्यात हा विचार त्याच्या जन्मापासूनच सुरु होता .पण हे सगळं आपल्याला झेपेल का याचा अंदाज येत नव्हता .  शाळेला न दाखल करता त्याला शिकवण्याचा  आणि हो खऱ्या अर्थाने ग्लोबल करण्याचा काही पर्यायी रस्ता आहे का??फक्त पैसे आणि उच्च जीवनशैली मिळेल  हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण देणं हे कितपत योग्य आहे हा विचार करून "सक्षमला शाळेत न पाठवणं "हा आम्ही दोघांनी  एक मतांनी घेतलेला निर्णय आहे. तिथूनच  आमचा होमस्कूल कडे वळण्याचा  प्रवास सुरु झाला. 
त्याच दरम्यान होमस्कूल ,अनस्कूल ,अल्टर्नेट स्कूल असे तीन पर्याय आमच्या समोर होते. होमस्कूल म्हणजे NIOS किंवा IGCSE  सारख्या बोर्डचा पाठ्यक्रम घरून पूर्ण करणे आणि परीक्षा देणे. तसेच अनस्कूल म्हणजे कुठलाही पाठ्यक्रम न  शिकवता नैसर्गिक पद्धतीने मुलाने शिकणे आणि आपण त्यात फक्त एक माध्यम बनणे आणि पर्यायी शिक्षण पध्दती म्हणजे ज्या शाळेमध्ये ठराविक अभ्यासक्रम न शिकवता, मुलांच्या कलेने आणि काही विशिष्ठ पद्धतीने (जसं की waldorf method) शिकवल्या जातात. आम्ही सध्या तरी सक्षम साठी होमस्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. दरम्यान उर्मिला स्यामसन, ३ मुलांची होमस्कूलर (किंवा unschooler म्हणा हवं तर ) आई ह्यांच्याशी भेट झाली ( माझ्या नवऱ्याने घडवून आणली ). आणि पुण्यात तुमच्यासारखे विचार करणारे २५० पालक आहेत जे आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत (आणि काही असेही आहेत जे अगोदर पाठवत होते आणि आता ते शाळेतून काढून घेत आहेत) हे सांगितल्यावर ऐकून खूप बरं वाटलं. त्या ग्रुप मध्ये आम्हीही सहभागी झालो. आम्ही महिन्यातून एक किंवा दोन वेळा भेटतो. एकमेकांसोबत विचारांची देवाण घेवाण होते. आता लोकांना वेगळा वाटणारा आमचा निर्णय हा आमच्यासाठी मात्र सहज होता. "काहीतरीच काय" ह्या लोकांच्या प्रश्नाला उत्तर देणं ही सोडून दिल. आम्ही सगळे मिळून शिकतो, कारण आम्हाला एकमेकांचा सहवास आवडतो, जगातील सुंदर वाटणाऱ्या गोष्टी पडताळून बघायला आवडतात इतकेच उत्तर मी देते. असच सक्षमला घेऊन एका "होम स्कूल co -opp" ला गेले होते. साधारण ३ ते १० या वयोगटाची मुले आणि त्यांचे पालक तिथे जमले होते. एका कॉफी जार कॅफे मध्ये आम्ही भेटलो. कॅफे चालवणारी लिसा ही सुद्धा एक होम स्कूलर मुलांची आई आहे. त्यामुळे तीची जागा आम्ही महिन्यातून एकदा भेटण्यासाठी वापरतो. जे शिक्षण शाळेत मिळूच शकत नाही अस exposure मुलांना मिळतं. कुणाचा धाक नाही, वेळेचं बंधन नाही, अभ्यासाचे ओझे नाही, कुणासोबत स्पर्धा नाही आणि मार्कांचा आकडा नाही. स्वछंद सोडल्या नंतर मुलांमध्ये किती प्रतिभा आहे हे लक्षात येत. एका टेबलवर भरपूर कलर्स अक्षरशः सांडलेले होते सगळ्यांना एक एक कोरा कागद देण्यात आला. पाहिजे ते साहित्य उचला आणि आपली कला दाखवण्यास त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला. अप्रतिम चित्र मुलांनी आपापल्या क्षमतेनुसार रेखाटली. "असच" करायला पाहिजे हे सांगणार त्यांना कोणी नव्हतं. साच्यातली चित्र त्यांनी काढली नाही. त्यामुळे एकही चित्रात गवत खाणारी गाय किंवा दोरी खेळणारी मुलगी दिसली नाही. दिसले ते थ्रीडी अँगल ने मुलांनी कल्पना केलेले चित्र. त्याची तुलना होऊच शकत नाही. हाताची बोटे वापरून सुंदर निसर्ग चित्र रेखाटल्या गेले. यावरून एकच लक्षात आले मुलांना जर मदत करायची असेल तर एवढंच करा कि "त्यांना कुठलीच मदत करू नका ". हे घोड्याचं चित्र आहे हे त्यांच्या मानस पटलावर बिंबित करण्यापेक्षा, जेव्हा खरंच घोडा त्यांच्या डोळ्यसमोर येईल तेव्हा त्याला आलेली अनुभूती ही  कायम त्याच्या स्मरणात राहील. हे ज्ञान कायमस्वरूपी असत एक उदाहरण द्यायचं झालं तर या ग्रुप मध्ये माझ्यासारखीच एक आई मला भेटली, ती एक उत्तम चित्रकार आहे सुंदर पैंटिंग्स तिने बनवलेले आहे, तिचा मुलगा वय वर्ष १०-१२ असेल, त्याने तिच्या पैंटिंग्सला भारतातच नाही तर विदेशात सुद्धा एक उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, गूगल हे माध्यम वापरून  जे एका एम बी ए मार्केटिंग वाल्याला सुद्धा जमल नसत. 


असच खेळण्याच्या बाबतीत सुद्धा आढळत . आधी मी १० दिवसातून एकदा खेळण्याच्या दुकानाला भेट द्यायचे आणि विशेष वेगळे वाटणारे खेळणे हे मी सक्षम साठी निवडायचे . उच्च किमतीचे ,ब्रॅण्डेड खेळणे निवडण्यामागे माझा कल होता . पण काही दिवसात तो त्या खेळण्यांना कंटाळून जातो .  हळूहळू लक्षात आले आपण त्याला हातात खेळणे देऊन त्याच्या creativity वर बंधन घालतोय .  म्हणून एक नवीन प्रयोग सुरु केला घरात जे खोके ,प्लास्टिकचे बॉक्सेस ,चमचे , टाकाऊ सामान आहे आम्ही त्यातून वेगवेगळे निर्मिती करू लागलो . आणि कुणाचा विश्वास बसणार नाही अशा युक्त्या मला त्याच्याकडून ऐकायला मिळतात . रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम हा कसा डायव्हर्ट होतो हे त्याने मला प्रयोग करून दाखवले . तेव्हापासून शॉपिंग मॉल मध्ये जाऊन माझे ब्रँडेड खेळणे आणणे बंद झाले. मुलांची निसर्गाशी फार लवकर मैत्री होते . पण आजकालच्या शहरी वातावरणात आपण मुलांना कृत्रिम जगाशी ओळख करून घेण्यास भाग पाडतो .माझ्या मुलाला  सामाजिक जाणीव असली पाहिजे हि पालकांची अपेक्षा फोल ठरते .झाड ,नदी,डोंगर , जंगल ,प्राणी ह्यांच्याशी मुलांची लवकर मैत्री होते . कारण त्यांना ते आपल्यापेक्षा वेगळे वाटतात . नैसार्गिग घडणाऱ्या गोष्टींकडे मुलांचं आकर्षण असत. आपण मात्र ready made knowledge मुलांना देतो .



म्हणून मला एक नवीन पैलू जाणवतोय . स्वतः एक प्राध्यापक असून ,असं वाटत पुस्तकी ज्ञान तर मी खूप मिळवलं ,पण सक्षमसोबत परत एकदा अ आ इ पासून शिकावयास वाटतंय .   

जर अस झालं तर मजेत जगता येईल 
जेव्हा घर म्हणजेच  माझी शाळा होईल  

आजी, आजोबा, आई आणि बाबा हेच माझे गुरु 
ह्या चौघांसोबत शिक्षण होईल माझं सुरु 

मार दिला तरी आवडेल, मला तुमचा  धाक 
शाळेतल्या छडीपेक्षा चालेल तुमचा राग  

पुस्तक आणि दप्तराचे ओझे नको पाठीवर 
गिरवूया सुरेख अक्षरे अनुभवांच्या पाटीवर 

मला आवडेल तो विषय दोघे मिळून शिकू 
मदतीला वाटल्यास गुगलला घेऊ 

चौकटीच्या बाहेर जरा जाऊन तर पाहू 
निसर्गाच्या विद्यापीठात शिकून सगळं घेऊ 

स्पर्धा मात्र माझी स्वतः सोबतच असेल 
माझा अभ्यास घड्याळीच्या ठोकावर नसेल 

मित्रांची संगत पण मी निराळीच ठेवेल 
वॉचमन काकां, बाजूचे आजोबा यांना पण मित्र बनवेल  

इतिहासातल्या शिवाजीला सिंहगडावर जाऊन भेटू 
भूगोल शिकण्यासाठी आपण देशाटन करू 

चित्र रेखाटेल मी माझ्या कल्पनेतून 
हवं तस साकारेल माझ्या कुंचल्यातून 

आयुष्याच्या पोस्टर मध्ये  सुंदर रंग आपणच भरुया 
संगीताचा ठेका   पावसाच्या थेंबासोबत धरूया 

स्वयंपाकघरात निराळे प्रयोग आपण करूया 
यूट्यूब वरून  नवीन रेसिपी करायला शिकूया 

अस झालं तर सगळंच कसं छान  होऊन जाईल 
स्वछंद पाखरासारखं उडून बघता येईल 
शाळेची गंमत मला जाणून घेता येईल

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...