लग्नाची रेशीमगाठ अशी हि कोण बांधे न कळे
जिनेंद्र अश्विनी चालू करिती नवं जीवनाचे सोहळे
संगई परिवार जोडिती नाते डोणगावकरांशी शी वेगळे
२५ नोव्हेम्बर, शनिवार १ वाजताचा मुहूर्त हा जुळे
अमृत मंगल कार्यालय सुभाष रोड ,बीड मधले गाठले
शैला , गिरीश सव आरती स्वागतास आपुल्या उभे हे ठाकले
स्वरूची भोज लग्नानंतर घेऊन आपण आम्हास आनंदावे
हेच आग्रहाचे आमंत्रण संगई परिवाराचे समजावे
फक्त आपले आशीर्वाद नवं दाम्पत्यासाठी घेऊन यावे
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.
Wednesday, 17 June 2020
Tuesday, 2 June 2020
सुई दोरा आणि आमची शिक्षणाची गुंफण ....
सध्या lockdown मध्ये मुलांना शाळेत पाठवायचा धोका पालकांना जाणवतोय ,त्यामुळे आता शाळेची पूर्ण फी भरून शाळा online (डिजिटल)चालू होते आहे ,पण परत पालकांना संभ्रम आहे की मुले एवढा वेळ लॅपटॉप किंवा मोबाइल समोर कसे टिकतील ??? मग सुरु होतोय प्रवास ह्याला काहीतरी दुसरा पर्याय आहे का हे शोधण्याचा ???मलाही बरेच दिवसात ह्या विषयावर बरेच फोन आले . आम्हाला एक वर्ष शाळेत पाठवायचं नाही त्याचे किंवा तिचे होमस्कूलिंग करायचे आहे ....त्यासाठीच हा ब्लॉग लिहावासा वाटतोय.
एक वर्ष शाळेतून काढून मुलांना घरी ठेवणे म्हणजे होमस्कूलिंग नव्हे ,आपला होमस्कूलिंग कडे बघण्याचा हा दृष्टिकोन मुळातच चुकीचा आहे.होमस्कूलिंग म्हणजे स्वअध्ययन ,स्वतः ,स्वतः साठी निवडलेला मार्ग. होमस्कूलिंग हे काही एक किंवा दोन वर्ष करायची समायोजन (adjustment )नाही .... हा एक आयुष्यात मुलांना वेगळ्या वाटेने घडवण्याचा जीवनभराचा संपूर्ण पूर्ण प्रवास आहे. ह्यामध्ये फक्त शाळेत न जाणारा एकटा मुलगा किंवा मुलगी समाविष्ट असते असं नाही ,त्याच्या भवती घरातील प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बदलतं असते.पण हा प्रवास घरी सगळे एकमताने आनंदाने अनुभवू शकतात. त्यासाठी थोडी मनाची तयारी करावी लागते . आपण आपल्या मुलाला जन्म दिला आहे त्याची पालनपोषण करण्याची जबाबदारी हि आपलीच आहे ती शाळेवर किंवा अजून कोणावर ढकलून आपण त्यामधून सुटू शकत नाही. पण म्हणजे याचा अर्थ त्याला मांडीवर घेऊन बसून सतत शिकवणे असा नाही किंबहुना तो त्याचा स्वतःच शिकतो त्याला आवडणाऱ्या गोष्टींपर्यंत तो पोहचतो तिथे पोहचण्याचे मार्ग तो स्वतः शोधून काढतो पालक म्हणून आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या सोबत असणे एवढाच आहे.
शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तेवढीच सहज जेवढे सहज जन्माला आलेला बाळ बोलायला शिकतो. मुलगा जसजसा मोठा होऊ लागतो तश्या आपल्याला त्याच्या साठी काय वाटतं हे आपण कायम त्याला सांगायला जातो ,तू असं केलं म्हणजेच तुझं चांगलं होऊ शकतं हे आपण त्याच्या कोऱ्या पाटीवर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला सुद्धा स्वतःची विचार करण्याची एक शैली असू शकते किंवा तो अनुभवातून शिकू शकतो हे आपण मान्य करू शकत नाही. असाच एक आमचा अनुभव सुई दोरा आणि आमची शिक्षणाची गुंफण ....
विषय अगदी साधाच आज आम्ही (सक्षम माझा ६ वर्षाचा मुलगा आणि मी )दोघांनी मिळून पिशवी शिवली .सगळ्यात आधी लागणारे साहित्य जमवले :-रुमाल ,सुई ,दोरा आणि सोबत खूप सगळे कुतुहूल. आज करण्यासाठी काही विशेष नव्हतं आणि असं काही विशेष नसलं कि आम्हाला अफलातून कल्पना सुचतात . आज सक्षम स्वतः एक रुमाल आणि सुई दोरा घेऊन आला आई आपण ह्याची पिशवी शिवू शकतो का ? डोळ्यात खूप सगळे कुतुहूल आणि शिकण्याची जिद्द दिसत होती ,छे !!! काहीपण काय त्यापेक्षा दुसरं काहीतरी कर ... पिशवी शिवून काय तुला शिंपी व्हायचंय कि काय?
ह्याप्रमाणे झिडकारून न देता मी पण त्याच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये शामिल झाली,जणू ह्याआधी मी कधीही पिशवी शिवली नव्हती ....आणि खरंच जाणवलं आपण ती कशी वापरायची हेच शिकलो होतो पण शिवतांना असंख्य अडचणी येऊ शकतात हे नवीन होतंच . रुमालाची नीट घातलेली घडी ,कैचीने कापून दिलेला चौकोनी आकार, हे सगळं त्याचे त्यानीच ठरवलं मी फक्त तिथे हजर होती. त्याचा अंदाज घेऊन तो पुढे जात होता आता सुईमध्ये दोरा घालण्याचा खेळ सुरु झाला एक डोळा बारीक करून मोठा करून त्याच्या हॅन्ड स्किल्स तो पडताळून पाहत होता ,मी पण त्याचीच कॉपी करत होते,पण तो सुई आणि दोरा एकमेकांमध्ये जाईना,बराच वेळ सुरु असलेला डाव अर्ध्यवार सोडून जायला त्याचे मन तयार होईना ,मग सुरु झाली शोधाशोध .... घरात असलेली कुठली पुंजी वापरून हे काम पूर्ण करता येईल ,बरीच अवजारे आणली त्यामध्ये चाकू,टाचणी,सेप्टी पिन आणि बरेच काही ..... तो थकला पण हताश मात्र झाला नाही ,असंख्य गोष्टी पडताळून पाहण्यात गर्क होता हे करतांना फक्त आई आहे आजूबाजूला हा विश्वास त्याला होता .... मी शिकवावे अशी त्याची अपेक्षा नव्हती त्याला जरुरी होते ते माझे तिथे असलेलं अस्तित्व,आणि मुलाच्या भावनिक आणि शारीरिक विकासासाठी पालकांचा हा रोल खूप मोलाचा आहे. माझ्यासाठी दोरा सुईमध्ये पोहचला किंवा नाही हे महत्वाचं अजिबात नाही पण तो ज्या प्रक्रिया वापरून ध्येय पर्यंत चालत गेला ते खूप कौतुकास्पद आहे आणि माझ्या दृष्टीने हेच स्वअध्ययन ...... सुई टोचली ,शिवण वाकडी गेली पिशवीचे भोक मोठं झालं एवढं कि त्यातून सामान बाहेर येईल पण सुंदर होता तो क्षण ... "एक दिवस पूर्ण फुकट घालवला ? " ...... नाही खरंच नाही
मनसोक्त आज तयार झालेल्या पिशवीत आम्ही आयुष्याकडे पाहण्याच्या विविध कला शिकलो ,प्रश्नांचे उत्तरे काढायला शिकलो ..आणि एकमेकांसोबत असण्याचा सुंदर प्रवासाचे साक्षीदार होतो ... आणि तीच पिशवी घेऊन निघालोय पुढचा प्रवास करायला
Tuesday, 21 April 2020
माझ्या मनातली ती रिकामी बरणी
आज सकाळी उठून रोजच्यासारखीच गॅल्लरी मध्ये मॅट घेऊन गेली आज पण प्राणायाम करूनच दिवसाला सुरवात करायची असा निश्चय केला होता . Lockdown चे दिवस आता कुठे अंगवळणी पडायला सुरवात झाली होती . रोजचा दिवस कंटाळवाणा न वाटता काहीतरी नवीन शिकण्याची संधीच घेऊन येत होता. प्राणायाम करतांनाच एक सुंदर झुळूक सुंगध घेऊन येत होती . परत परत तोच सुंगंध नाकाजवळ दरवळत होता. डोळे बंद करून मन एकाग्र करून आठवण्याचा खूप प्रयत्न केला आणि हो हा सुगंध खूप ओळखीचा होता .....खूप जवळचा होता अरेच्चा !!!हा तर आंब्याच्या मंजिऱ्या चा दरवळणारा सुगंध होता . समोर रो हाऊस मध्ये बरीच आंब्याची झाडे आहेत,त्याला कैऱ्या आलेल्या दिसल्या होत्या पण हा सुंगंध खूप जवळून येत होता. आणि आठवलं ३ दिवसांपूर्वी मैत्रिणी कडून रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी मागवून घेतली होती आणि quarantine च्या सूचनांप्रमाणे त्याला हात ही न लावता ती पेटी सुद्धा काही दिवस quarantine मध्ये एका बाजूला ठेऊन दिली होती.आंबे अजून कच्चे च आहेत असे समजून आम्ही त्याला उघडून पहिले नव्हते . आज जणू हा सकाळी सकाळी दरवळणारा सुगंध त्या रसाळ पिकलेल्या आंब्यांची आठवणच घेऊन आला होता .
एरवी बाकी कुठल्याही ऋतूत न मिळणार हा फळांचा राजा त्याचे अस्तित्व तसेच टिकवून आहे.केवढी ही त्या आंब्याला मिळालेली लोकप्रियता खरंच त्या राजाची बातच निराळी.प्लम , ऑलिव्ह,पीच हि त्याच्याच जातीची फळ पण छे !!त्यांना हि उपमा कुठे ?त्याचा दरारा वेगळा !त्याचा रुबाब वेगळा !त्याचा ढंग वेगळा!त्याची ऐट काही औरच एकंदर आमचा लाडका आंबा खरचं सर्वांमध्ये वेगळा . आंब्याचे पाने सुद्धा एक मंगल कार्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते . आंब्याच्या डहाळ्या दाराला लावून चैत्र महिण्याची सुरवात होते ते गुढीपाढव्याला . पातळ असलेली साल काढून केशरी लालसर रसाळ मधुर,सुगंधित बाहेर आलेला रस बघून मन कसं बघूनच तृप्त होऊन जातं . पुण्यामधली सुजाताची मँगो मस्तानी,खत्री बंधूचे मँगो आईसक्रीम ,दुर्वांकूरचा रस ,चितळे चे आम्रखंड ह्यांना लोकप्रिय करणारा हा आंबाच !!आज मी पण सकाळी सकाळी ह्या आंब्याच्या प्रेमात पडले . आतापर्यंत फक्त आंबा हा बाजारातून आणणे आणि खाणे एवढंच ठाऊक होतं पण lockdown मध्ये चक्क घरीच माच टाकून आंबे पिकवण्याची हि पहिलीच वेळ . २ bhk मध्ये एका कोपऱ्यात हा माच आणि दरवळणारा सुगंध अनुभवण्याची माझी पहिलीच वेळ.एक सुंदर मोहर घरात आलाय आणि त्या चैत्राच्या सुगंधात मन न्हाहून निघतय.
आता बघा ना ,कच्ची छोटुशी हिरवीगार कैरी झाडाला लटकलेली बघून तो तोडण्याचा मोह अजिबात आवरत नाही . तसंच उन्हाळ्यात भेळ बरोबर मीठ लावलेली कैरी म्हणजे अप्रतिम combination. मला आजीची उन्हाळ्यात आवर्जून आठवण येते ती यासाठी कैरी बाजारात आली कि तिची लगबग चालू व्हायची ते वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी. उगाच नाही "लोणचं घाल त्याचं " हि म्हण रुजली. कैरीची चटणी ,कैरीचा तक्कु ,कैरीचे पन्ह एवढंच काय कैरीच्या आतमधली कोय वाळवून त्याची सुपारी ती करायची .केवढा तो उरक आणि केवढी ती हौस !!आज मी हेच सगळं करायला जाते पण तेवढा उसंत मिळत नाही आणि त्याला ती मज्जा पण येत नाही असं का झालं असेल?पदार्थ तेच पण आजीसारखी चव मुळीच नाही . आजी आज या जगात नाही पण तिच्या सुरकुतलेल्या हातांनी बनवलेली लोणच्याची आठवण मनात ताजी आहे .माझी रिकामी बरणी त्या लोणच्याची वाट पाहतेय आणि मन आजीची .....
Saturday, 21 March 2020
मनापर्यंत घेऊन जाणारी शांतता...आज गवसली
आजची सकाळ खरंच काहीतरी वेगळी होती. लवकर उठायचं नाही आज कुठे धावायचं नव्हतं पण तरीही सकाळी जाग आली अगदी पहाटे पहाटे सूर्य उगवतांना सुद्धा आज काहीतरी वेगळा आभास होत होता. हा आभास पुढे येणाऱ्या आंधी चा होता की एक सुंदर जाणीवपूर्वक उगवलेली होती ह्याचा अंदाज येत नव्हता. मन थोडंसं खट्टू होत हा virus भारतात आला नसता तर आज आम्ही मुक्तागिरी ,अंजनगाव ला जाणार होतो . माझ्या भाच्याचा आज पहिला वाढदिवस साजरा करणार होतो. दोन दिवसांनी माझाही वाढदिवस येणार होता ,डोक्यात असंख्य प्लांनिंग तयार होते. पण ..... हे काय पहिल्यांदा हे सगळं रद्द करण्याचे कारणे काहीतरी वेगळीच होती.उठून गॅल्लरी मध्ये खुर्चीत जाऊन बसले बाहेर एकटक पाहत होते. गेल्या दोन -तीन दिवसांपासून काहीतरी वेगळंच घडतंय वातावरण भीतीने,आकुलतेने भरून गेलेलं आहे. का घडत असेल हे सगळं ????
आज मन कुठेतरी अंतर्मनात डोकावलं डोळे घट्ट मिटून घेतले ,एक मोठा श्वास घेतला आणि खरंच जाणवलं अरे आज सगळीकडे शांतता जाणवतेय .अगदी आतमध्ये सुद्धा . समोरच्या रो -हाऊस मध्ये बरीच उंच उंच हिरवीगार झाडे आहेत ,पक्ष्यांची घरटे देखील आहेत. आज पहिल्यांदा इतक्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला आला होता. मैना ,पोपट ,कावळा ,कोकिळा आज अगदी स्पष्ट आवाज कानी पडत होता. हा आवाज रोज असतो कि आजच आला ???कदाचित रोजच होता पण गाड्यांच्या आवाजाखाली विरून जात होता. बोगनवेलची रंगीत फुले झाडावर दस्तक देत होती . आज रस्त्यावर पडलेली आणि वाळलेली झाडांची पाने देखील नावीन्य पूर्ण दिसत होती . रोज गॅल्लरीत येऊन सुद्धा लक्ष कधी तिकडे गेलेच नाही .रोज कोणीतरी धावतंय ,गाड्या ऑफिस साठी पळताय ,मुले स्कूल साठी धावतंय फक्त धावणे आणि पळणे इतकेच मन वेधून घेत होते आणि ह्या घाईमध्ये नकळत मी सुद्धा पळतच तर होते.पण आज ही शांतता हविहवीशी वाटत होती. मला माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी हीच शांतता हवी होती . अरे....... !!!! आपण खूप दिवसांपासून काहीतरी शोधत होतो ,काहीतरी हरवलं अस वाटतं होत हेच तर आहे ना ते !!!मनापर्यंत घेऊन जाणारी शांतता !!!
कोरोना virus हे फक्त प्रकृतीचे मानवजातीला एक ओरडून सांगणे तर नसेल ना??अरे थांबा !!!किती ओरबाडून घेणार आहे माझ्याकडून ???तुमच्यापेक्षाही कोणी श्रेष्ठ शक्ती या विश्वात आहे. या आधी प्रकृतीने ओरडून ओरडून सांगितले तरीही तिचा आवाज तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखा केला ..आज तिने गंभीर रूप धारण केलं हे तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी . आता तरी जागे व्हा !!!कुणालातरी घाबरा !!
खरं तर एकदा हात जोडून प्रकृतीला धन्यवाद द्यायला पाहिजे कि वेळेतच आमचे डोळे उघडले हे बरे झाले. आणि तन ,मन एकत्रित करून आज प्रकृतीची क्षमा मागायला हवी. आम्ही यापुढे कधीही बेजबाबदार रीतीने प्रकृती सोबत वागणार नाही .
Friday, 17 January 2020
आणि एक नवीन अनुभव गाठीस पडला ....
सक्षमचे (वय वर्षे ५.९)होमस्कूलिंग करतांना एक एक नवीन अनुभव गाठीस पडत होता हे नक्कीच . पण समोर वेगवेगळे प्रश्न उभे ठाकत होते. आम्ही घरीच वेगवेगळ्या गोष्टी पडताळून बघतो आणि खरचं रोज काहीतरी नवीन सापडतं शिकायला.त्याला शिकण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हापासून सक्षमची विचार करण्याची त्रिज्या बरीच रुंदावलेली आहे. कालचच एक उदाहरण ,आम्ही बाबांच्या USA वरून आलेल्या मित्रांसोबत "तानाजी" चित्रपट बघायला गेलो होतो. २ आठवड्यापूर्वी आम्ही कोंढाण्याची (सिंहगडाची )इत्यंभूत माहिती काढून त्याचा फडशा पाडला होता . सिंहगडचे मॉडेल बनवून तानाजी मालुसरे कसे लढले असतील ,उदयभान राजा ला मारून शिवाजी महाराजांचे उदगार "गड आला पण सिंह गेला "हे आम्ही आमच्या थिएटर मध्ये action करून करून रंगवले होते .चित्रपट बघून आल्यानंतर त्याने त्याची केलेली समीक्षा अतिशय कौतुकास्पद होती. USA वाल्या काकांना आपल्या शब्दात कळवली देखील. "तानाजी हे उदयभान राजाला आधी भेटलेच नव्हते ",शिवाजी राजे गडावर जातच नाही ते त्यांच्या दरबारात हे उदगार काढतात ","उदयभान राजाला शेलार मामानी मारले होते ना ?" मग चित्रपटात चुकीचे का दाखवले? हे त्याने शिकलेल्या इतिहासात बसत नव्हते . चित्रपटामध्ये ट्विस्ट टाकायला त्यांनी असा दाखवलंय हे समजावणं आम्हाला थोडं अवघड गेलं. पण एक correction तो करायला विसरला नाही त्यांचे नाव तानाजी नसून तान्हाजी आहे. एक गोष्ट वाखाण्याजोगी ती म्हणजे तो इतिहासातील कुठल्याच व्यक्तीचे नाव एकेरी न घेता आदरपूर्वक उच्चरतो . त्याच्या मनात इतिहासाबद्दल आदर आणि त्याचबरोबर आवड निर्माण झालीय . हीच काय ती माझी कमाई . आता माझं शिकवण्याचं काम खूप सोपं झालं आहे . तोच स्वतः उत्सुक असतो इतिहासातील नवीन व्यक्ती बद्दल जाणून घेण्यासाठी . मी फक्त कसं शिकायचं एवढंच शिकवलं काय काय शिकायचं हे त्याच तो शोधतो आहे . अजून काय हवं नाही का???हा आमचा पालक म्हणून नवीन गिरवेलेला धडा .
काही नवीन गोष्टींची ओळख करून देण्यासाठी मी कमी पडते आहे असं मला जाणवतं तेव्हा आम्ही बाहेर कुठे तरी learning center शोधत असतो.असाच एक आमच्यासाठी अवघड, कठीण अनुभव. स्कूल ऑफ लाईफ एक alternative स्कूल ज्या मध्ये सक्षम हल्ली performing arts शिकायला दिवसातील २ तास जातोय. स्कूल आणि शिक्षक ,शिकवण्याची पद्धत एकदम उत्तम ह्यामध्ये कुठलाही वाद नाही. पण तो जायला तयार होत नव्हता ,सोडायला गेल्यानंतर खूप रडून रडून लाल होत असे. इथे त्याचे ओळखीचे मित्र कोणीही नव्हते . नवीन स्कूल ह्या वातावरणाशी जुळवून घेणे त्याला जमत नव्हते. आमच्यासाठी देखील हा पहिलाच अनुभव होता . त्याला रडवलेलं सोडून माझा पाय तिथून निघत नव्हता पण हे करणं त्याच्यासाठी योग्यच आहे हे ठाऊक होत.त्याचे रडणे थांबावे म्हणून मी मैत्रीणीना विचारायाला सुरवात गेली,google करून वेगवेगळे उत्तरे शोधायला सुरवात केली. त्याला रोज अमिश दाखवून पाठवायला लागले. त्याचे रडणे कमी होत नव्हते . रोज प्रॉमिस करून आज तू रडू नकोस अशी विनवणी करू लागले . शेवटी अर्चना मॅम founder ऑफ स्कूल ऑफ लाईफ ,होमस्कूल mother ,आमच्यासाठी inspiring असे व्यक्तिमत्व त्यांच्याशी बोलायचं ठरवले . माझा पहिला व्हाट्स अँप मॅसेज "mam need some tips to stop saksham from crying ". ह्यावर त्यांचे सुंदर उत्तर "why you want to stop him from crying ,he is just expressing his emotions for unknown environment ,unknown people" . हे हृदयाला भिडणारे उत्तर मला खरंच रिलॅक्स करणार होतं . त्याच्या भावनांचा आदर करायला हवा हो ... रडणे हि सुद्धा त्याची एक भावना असू शकते हे नव्याने कळले. आता मात्र माझे अमिश दाखवणे बंद झाले आहे. आता रडून घे थोडं हरकत नाही ... पण स्वतःला adjust करायचा प्रयत्न कर हे मी त्याला समजावते . सकारात्मक फरक पडतोय सक्षम मध्ये पण त्याला ह्या गोष्टींमध्ये रुळायला मुरायला वेळ लागेल हे नक्कीच . हे सुद्धा माझ्यासाठी एक लर्निंगच आहे .
(special Thanks to all Staff from school of Life ).
Monday, 1 July 2019
शाळेचा पहिला दिवस
काकांची गडबड पुन्हा चालू झाली .खुर्चीवर बसून मान सुद्धा न हलवता दुकानातल्या मुलांना सूचना देणे चालू होते. दुकानातल्या गिऱ्हाईकांची गर्दी वाढतच होती . आज तर जेवायला सुद्धा जायला वेळ मिळाला नसावा,काकांचे बोलणे चालू असतानाचं माझी हजेरी दुकानात लागली. माझ्या छोट्याश्या गावातील एक पुस्तकांचं दुकान ,माझ्या काही आठवणी , हवं तर बालपणच म्हणा ना ह्या दुकानाशी जोडल्या गेलेलं आहे. आज शाळेचा पहिला दिवस होता म्हणून दुकानात लहान मुलांचा आणि पालकांचा किलबिलाट चालू होता . मुलांच्या चेहऱ्यावर नवीन पुस्तक,नवीन वही, नवीन दप्तर खरेदी करण्याचा आनंद ओसंडून वाहत होता . शाळा सुरु झाली कि काकांचे हे नेहमीचेच होते .कुठली पुस्तके कुठे ठेवली आहे हे त्यांच्या अचूक लक्षात राहत होते. कोणी दुकानात गेलं कि पांढऱ्या शुभ्र बंडी आणि पैजामा घातलेले काका मोठ्या आवाजात विचारत "ए पोरा कितव्या वर्गाला गेला रे ???"काकांचा आवाज ऐकून तो गोंधळून विचार करत असे ,थोडा वेळ निघून गेल्यावर त्याला आठवून सांगणे भाग पडे "काका सातवीत गेलोय यंदा " . मान सुद्धा न हलवता ३ ऱ्या नंबर मधून पुस्तकांचा ७ विचा संच बाहेर काढ रे . दुकानातली काम करणारी मुले ह्या काकांच्या रोजच्या बोलण्याला सरावली होती. परत २७ वर्ष पूर्वी ची काकांची छबी मी आज पुन्हा अनुभवली,तोच आवाज ,तीच बंडी-पैजामा ,तेच दुकान ,तोच मुलांचा किलबिलाट .आज त्या शाळेच्या मुलांच्या गर्दीत मी मला शोधत होते.
शाळेचा पहिला दिवस आणि हमखास बरसणारा तो पाऊस . शाळा जुनीच असली तरी वर्ग मात्र नवीन असायचा ,पहिल्या दिवशी बाकड्यावर जागा पकडायला सगळ्यांची धडपड असायची पहिला बेंच म्हणजे वर्गातील सगळ्यात हुशार मुलांचा ,त्यांना डुलकी सुद्धा द्यायला परवानगी नसायची . शेवटचा बेंच हा सगळ्यात उडाणटप्पू पोरांचा ,म्हणून मधला कुठला तरी बाक पकडावा सोबत जुनीच मैत्रीण यावी यासाठी ३ दिवस आधी नियोजन व्हायचे . पहिला तास हेडमास्तर सरांचा असायचा ,नेहमी त्यांच्या तासाला पाऊस का येतो हे गणित कधीच सुटले नाही ,आधीच अस्पष्ट असलेले शब्द पावसाच्या आवाजात लुप्त व्हायचे. आणि त्यापैकी कानावर फक्त पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा आवाज जोर करून जायचा. पहिल्या दिवशी पुस्तकांची यादी देऊन डब्बा खाऊन शाळा लवकर सुटायची ,कारण सगळ्यांनाच वेध लागायचे ते नवीन -नवीन खरेदी करण्याचे . मी सुद्धा सायकलला पायडल मारून घरून पैसे घेऊन पुस्तक आणायला बाहेर पडत असे . तेव्हा पावसाची चिंता नव्हती आणि आईच्या रागावण्याची सुद्धा नाही .
आज भूतकाळात शिरून परत एकदा काकांना ७ वि चा पुस्तकांचा संच मागावा असे वाटत होते .आणि परत एकदा तो नवीन पुस्तकांचा सुंगंध नाकात घ्यावा आणि तो कोरा करकरीत स्पर्श नेहमीसाठी जपून ठेवावा.पण पुन्हा एकदा विजेसोबत काकांच्या आवाजाचा गडगडाट झाला ,"वह्या पाहिजे का रे ????" आणि मी भूतकाळात डोकावून लगेच बाहेर आली ,"हो काका " सौम्य आवाजात मुलाने उत्तर दिले. "छोट्या ५ नंबर मधून ६ वह्या काढ रे " ,
"पण काका मला ७ वह्या पाहिजे "गांगरून मुलाने सांगितले .
"७वि कशाला पाहिजे रे तुला ६ च विषय आहे ना ??"
"एक वही रफ करावी म्हणतो सगळ्या विषयासाठी "
काकांची पुन्हा एकदा गर्जना " मेल्या ...तुझ्या बापाकडे जास्त पैसे झालेय का रे ??रफ वही म्हणून दुसरी वही घेऊन जा "
आणि मुलाला सांगून काका एक जुनी पानांची वही त्याच्याकडे सोपवत असत . आणि काका घेतील तो अंतिम निर्णय समजून आपल्या पदरात पडून घ्यावं लागत असे.
काकांचा तोंडातून असाच स्तोत्र दिवसभर चालू राही. शेवटी "कंपास आहे का रे मागच्या वर्षीचा ??"
"फक्त पेन्सिल आणि रबर शिल्लक आहे काका "
मग काका पेन्सिल आणि रबर वगळून बाकी सगळे सामान स्वतःच्या हातानी कंपासात लावून द्यायचे . आणि कोणी पेन्सिल मागितली तर "आधी जुनी संपव मग नवीन फुकट देतो तुला"हे वाक्य ठरलेलं असायचं .
जून संपल्याशिवाय काकांनी आम्हाला कधीही नवीन घेऊ दिल नाही म्हणून की काय अजूनही "नवीन पेन्सिल च अप्रूप टिकून आहे "
सक्षम साठी कवितांचे २ पुस्तक घेऊन आणि भूतकाळातील शाळेच्या आणि सोबत काकांच्या आठवणी सोबत घेऊन मी बाहेर पडले.
शाळेचा तो पहिला दिवस खास .......
नवीन वहीचा कोरा कोरा वास .......
अजूनही तसाच जपून ठेवला आहे मनाच्या कप्प्यात .....
पावसाच्या सरींचा तो आवाज
आणि हेडमास्तरांचा पहिला तास
करकरीत स्पर्श नवीन पुस्तकांचा
गणिताच्या वहीवर अर्धवट शेरा बाईंचा
स्टाफ रूम जवळच ते पारिजातकाचं झाड
ओल्या झालेल्या मातीचा सुगंध आसमंतात
पावसाने चिंब भिजलेली लाल भिंत शाळेची
खिडकीतून नजर सारखीच बाहेर जायची
काळ्या फळ्यावर ते पांढरे खडू उमटलेले
रेनकोट दप्तरात ठेऊन मुद्दाम क्षण भिजलेले
सगळ्यांनी सोबत म्हटलेल्या कविता मराठीच्या
पिटी च्या तासाला खेळलेला खेळ लंगडीचा
त्या घंटेचा आवाज अजूनही कानात तसाच आहे
मैत्रिणींसोबत घातलेला गोंधळ अजूनही लक्षात आहे
वर्गात सगळ्यांसमोर सांडलेला माझा डब्बा
आठवून ओशाळून टाकतो आजही मला
पुन्हा एकदा लहान व्हायचंय
ते निरागस बालपण परत अनुभवायचं
मला परत एकदा शाळेत जायचंय
Sunday, 10 February 2019
कुठेतरी हरवत चाललेला संवाद
काल पर्वाची गोष्ट आहे ,निवांत वेळ मिळाला की मुलांना एकत्र करणे आणि गप्पा मारणे हा माझा आवडीचा विषय . खूप निरागस उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळतात . त्यांच्या चौकटीतले प्रश्न विचारले तर त्यांना जमतील तसे त्यांच्या त्रिज्या जिथपर्यंत रुंदावू शकतात तेवढे वेगवेगळे आणि सुंदर पैलू असलेले उत्तरे मिळतात. पण सध्या आजूबाजूची परिस्थिती बघितली तर हे कुठेतरी खुंटलंय याची जाणीव होते . बागेमध्ये सगळा मुलांचा गोतावळा खेळायला येतो तेव्हा काहीतरी खायला आणावं म्हणून आई वर्गातल्या बहुतेक बायका इझी टू कॅरी असं पॅक फूड आणतात . गप्पा टप्पा च्या खेळामध्ये मी मुलांना विचारलेला सोपा प्रश्न "तुम्हाला माहितेय का लेझ च्या चिप्स कुठून येतात ???"मला ह्या प्रश्नावर खूप विविध प्रकारची उत्तरे येतील किंबहुना चिप्स शेतातून येऊ शकतात का ?? , इथपर्यंत तरी मुले विचार करतील अशी किमान अपेक्षा होती . परंतु उत्तरे ज्याप्रमाणे आली ते मला स्वतःला स्तब्ध करण्यासाठी कारणीभूत ठरली . लेझ च्या चिप्स ह्या आपल्या सोसायटी समोर असलेल्या दुकानातून येतात . अच्छा मस्त !!!आता मला सांगा त्या दुकानात कुठून येतात ??तर सगळे ओरडली amzon वरून .वा वा छान च उत्तर आहे !! आणि amazon ला कुठून येतात तर लॅपटॉप मधून !! अक्षरशः कीव करावीशी वाटते मला आजच्या बाल पिढी ची . एवढीच विचार करण्याची त्रिज्या. मला आठवतंय लहान असतांना आई हात धरून भाजी मंडई मध्ये घेऊन जायची भाजी आणणे हा तर फक्त बहाणा होता ,बाहेर हुंदडायला मिळेल म्हणून मी ही संधी सोडत नसे.मंडई मध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त मज्जा यायची ते भाजीवाला आणि आईचा हिंदीत चाललेला संवाद ऐकून . समस्त दूधवाले किंवा भाजीवाले हे भैया लोक असतात अशी माझ्या आईची समजूत आहे . त्यामुळे त्यांच्याशी हिंदीतच बोलायला पाहिजे असा तिचा गोड गैरसमज आहे. भाजी ऐसी शिळी क्यू लग रहि है ??इति माझी आई,"शिळी थोडी ना है बाई ,कूच भी म्हणता तुम्ही "इति भाजीवाली मावशी असा अस्खलित हिंदी मराठी संवाद ऐकायला खूप गंमत यायची ,ओळखीचं कोणी भेटलं कि गप्पा व्हायच्या ,सुख दुःखाची देवाण घेवाण व्हायची . कमीत कमी संवादाचा आस्वाद तरी होता . आता मात्र हा संवादच अपवाद ठरला आहे ह्याच वाईट वाटतं . ऑनलाईन शॉपिंग ने माणसाचं खूप काम हलकं केलय ,बोटाच्या एक क्लिक सरशी पाहिजे ते पाहिजे तिथून तुमच्या दारात पोहचत आहे कमालच नाही का!! अहो पण त्यामध्ये जिवंतपणा नाही ना . कुठे हरवलाय तो सवांद ??
मुलांची किंवा पालकांची ह्यामध्ये चूक आहे अस अजिबात नाही . पण इझी गो लाईफ झाल्यामुळे भावनांना जागा राहिली नाही. आई बाबांशी गप्पा मारण्यापेक्षा आजच्या मुलांना एकांत आणि लॅपटॉप किंवा मोबाईल जास्त प्रिय आहे.थोडंस थांबून आपणच आपल्या मुलांबद्दल विचार करायला हवा . आपल्या पाल्याला त्याची किंवा तिची स्पेस मिळायलाच हवी पण कमीतकमी नात्यांमधील संवादच संपेल असं होऊ नये .कुठल्याही स्पर्धेत मिळालेल्या बक्षीसाचा आनंद त्याला फेसबुक वर शेयर करण्याआधी आई वडिलांसोबत साजरा करायाला जमलं तरच नात्यामध्ये जिवंतपणा राहू शकतो .
एका १५ वर्षाच्या मुलाला सहज विचारले "तुला मित्र किती रे ?"फेसबुक वर २०० आणि व्हाट्स अँप वर मित्रांची गिनतीच नाही .तू इतक्या सगळ्या मित्रांना कधी भेटतोस? छे !! मी प्रत्यक्ष खूप जणांना भेटलोच नाहीय अजून. ज्याच्या सोबत मनमोकळं हसता येत ,गळ्यात हात टाकून भटकंती करता येते असा हक्काचा एक तरी मित्र आहे का तुला ?? हो आमचा ४ जणांचा छान ग्रुप आहे . पण आम्ही व्हाट्स अप वरच जास्त बोलतो ,dp बदलून आपलं लुक आज कसे आहे ते कळवतो ,स्टेटस ठेऊन जगातल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे हे दर्शवतो ,अंथरुणातून उठण्याच्या आधीच सगळ्यांना हायफाय ठोकतो ,आणि आमच्या सगळ्या भावना smily वापरून समोरच्यापर्यंत पोहचवतो. हे व्हर्चुअल दिसत असलं ना तरी हेच माझं विश्व आहे आणि हल्ली मी यातच बिझी आहे. अगदी खरंय !!! सगळीकडे हेच दिसतंय ,इथे माणसांची एवढी गर्दी असूनही शांतता आहे . कारण तेच संवाद मुका झालाय .एखादा विनोद सांगितल्यावर कट्ट्यावर जेव्हा मित्रांच्या समुहामधून खळखळण्याचा जो आवाज येतो ,हातावर टाळी देत आनंद साजरा होतो. दुःख ,हास्य ,वेदना,क्रोध ,संताप,प्रेम,आपुलकी ,मिठी ह्या भावनांची सर व्हाट्स अप वरच्या smilies ला येईल का हो ???एका दूरच्या नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. नवरदेवासोबत त्याचे ५० कॉलेज गोइंग मित्र होते ,सगळे नाचून एन्जॉय करत होते .एवढे मित्र कसे काय ??हल्ली ५ मित्रही दिसत नाही . तेव्हा कळले कि हे सगळे मित्र म्हणजे नवरदेवाची "ओटा गॅंग" होती ,शाळा सुटल्यावर समोरच असलेल्या ओट्यावर सगळे एकत्र बसायचे आणि तासनतास तिथे घालवायचे ,शाळेमधल्या सरांची केलेली नक्कल असेल,एखाद्या मित्राची टर उडवणे असेल , क्रिकेटच्या गप्पा असतील, एखाद्याच्या बहिणीच्या लग्नात केलेली कामे असतील , परीक्षा संबंधी चर्चा असेल अनेक गोष्टी या ओट्याने वाटून घेत ल्या असतील .पण आज हा ओटा ओस पडलाय ,जो तो हातात मोबाइल घेऊन इथे बसतो,आणि स्वतःच्या दुनियेत मश्गुल असतो . बाजूला हाकेच्या अंतरावर असलेल्या मित्राशी बोलायला वेळ नाही आणि सात समुद्र पलीकडे असेल्या शी व्हाट्स अप वरून चाट होतात . काही दिवसात पैसे देऊन भावना share करायला कोणीतरी विकत घेण्याची वेळ येऊ नये.
कुठेतरी हरवलेला संवाद ,मला वाटत असलेली खंत आज शब्दांच्या माध्यमातून मोकळी झाली
Subscribe to:
Posts (Atom)
भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...
भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ... AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...
-
आज सकाळी उठून रोजच्यासारखीच गॅल्लरी मध्ये मॅट घेऊन गेली आज पण प्राणायाम करूनच दिवसाला सुरवात करायची असा निश्चय केला होता . Lockdown चे दिव...
-
नवऱ्याच्या परदेशी वाऱ्या सुरु झाल्या ,तेव्हापासून आपल्यालाही लवकरच ही सुवर्ण संधी मिळेल या अपेक्षेने माझ्याही पासपोर्ट ऑफिसच्या वाऱ्या स...
-
आजची सकाळ खरंच काहीतरी वेगळी होती. लवकर उठायचं नाही आज कुठे धावायचं नव्हतं पण तरीही सकाळी जाग आली अगदी पहाटे पहाटे सूर्य उगवतांना सुद्धा आ...





