Friday, 17 January 2020

आणि एक नवीन अनुभव गाठीस पडला ....


सक्षमचे (वय वर्षे ५.९)होमस्कूलिंग करतांना एक एक नवीन अनुभव गाठीस पडत होता हे नक्कीच . पण समोर वेगवेगळे प्रश्न उभे ठाकत होते. आम्ही घरीच वेगवेगळ्या गोष्टी पडताळून बघतो आणि खरचं रोज  काहीतरी नवीन सापडतं शिकायला.त्याला शिकण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हापासून सक्षमची विचार करण्याची त्रिज्या  बरीच रुंदावलेली आहे. कालचच एक उदाहरण ,आम्ही बाबांच्या USA वरून आलेल्या मित्रांसोबत  "तानाजी"  चित्रपट बघायला गेलो होतो. २ आठवड्यापूर्वी आम्ही कोंढाण्याची (सिंहगडाची )इत्यंभूत माहिती काढून त्याचा फडशा पाडला  होता . सिंहगडचे मॉडेल बनवून तानाजी मालुसरे कसे लढले असतील ,उदयभान राजा ला मारून शिवाजी महाराजांचे उदगार "गड  आला पण सिंह गेला "हे आम्ही आमच्या थिएटर मध्ये action करून करून रंगवले  होते .चित्रपट बघून आल्यानंतर त्याने त्याची केलेली समीक्षा अतिशय कौतुकास्पद होती. USA वाल्या काकांना आपल्या शब्दात कळवली देखील. "तानाजी हे  उदयभान राजाला आधी भेटलेच नव्हते ",शिवाजी राजे गडावर जातच नाही  ते त्यांच्या दरबारात हे उदगार काढतात  ","उदयभान राजाला शेलार मामानी मारले होते ना ?"  मग चित्रपटात चुकीचे का दाखवले? हे त्याने शिकलेल्या इतिहासात बसत नव्हते . चित्रपटामध्ये ट्विस्ट टाकायला त्यांनी असा दाखवलंय हे समजावणं आम्हाला थोडं अवघड गेलं. पण एक correction तो करायला विसरला नाही त्यांचे नाव तानाजी नसून तान्हाजी आहे. एक गोष्ट वाखाण्याजोगी ती म्हणजे तो इतिहासातील  कुठल्याच व्यक्तीचे  नाव एकेरी न घेता आदरपूर्वक उच्चरतो . त्याच्या मनात इतिहासाबद्दल आदर आणि त्याचबरोबर आवड निर्माण झालीय . हीच काय ती माझी कमाई . आता माझं शिकवण्याचं  काम खूप सोपं झालं  आहे . तोच स्वतः उत्सुक असतो इतिहासातील नवीन व्यक्ती बद्दल  जाणून घेण्यासाठी . मी फक्त कसं  शिकायचं एवढंच शिकवलं काय काय शिकायचं हे त्याच तो शोधतो आहे . अजून काय हवं नाही का???हा आमचा पालक म्हणून  नवीन गिरवेलेला धडा . 


काही नवीन गोष्टींची ओळख करून देण्यासाठी  मी कमी पडते आहे असं मला जाणवतं तेव्हा आम्ही बाहेर कुठे तरी learning center शोधत असतो.असाच एक   आमच्यासाठी अवघड, कठीण अनुभव. स्कूल ऑफ लाईफ एक alternative स्कूल ज्या  मध्ये सक्षम हल्ली performing arts शिकायला दिवसातील २ तास  जातोय. स्कूल आणि शिक्षक ,शिकवण्याची पद्धत एकदम  उत्तम ह्यामध्ये कुठलाही वाद नाही. पण तो जायला तयार होत नव्हता ,सोडायला गेल्यानंतर खूप रडून रडून लाल होत असे. इथे त्याचे ओळखीचे मित्र कोणीही नव्हते . नवीन स्कूल ह्या वातावरणाशी जुळवून घेणे त्याला जमत नव्हते. आमच्यासाठी देखील हा पहिलाच अनुभव होता . त्याला रडवलेलं सोडून माझा पाय तिथून निघत नव्हता  पण हे करणं त्याच्यासाठी योग्यच आहे हे ठाऊक होत.त्याचे रडणे थांबावे म्हणून मी मैत्रीणीना विचारायाला सुरवात गेली,google करून वेगवेगळे उत्तरे शोधायला सुरवात केली. त्याला रोज अमिश दाखवून पाठवायला लागले. त्याचे रडणे कमी होत नव्हते . रोज प्रॉमिस करून आज तू रडू नकोस अशी विनवणी करू लागले . शेवटी अर्चना मॅम founder ऑफ स्कूल ऑफ लाईफ ,होमस्कूल mother ,आमच्यासाठी inspiring असे व्यक्तिमत्व  त्यांच्याशी बोलायचं ठरवले . माझा पहिला व्हाट्स अँप मॅसेज "mam need some tips to stop saksham from crying  ". ह्यावर त्यांचे सुंदर उत्तर "why you want to stop him from crying ,he is just  expressing his emotions for  unknown environment ,unknown people" . हे हृदयाला भिडणारे उत्तर मला खरंच रिलॅक्स करणार होतं . त्याच्या भावनांचा आदर करायला हवा  हो ... रडणे  हि सुद्धा त्याची एक भावना असू शकते हे नव्याने कळले. आता मात्र माझे  अमिश दाखवणे बंद झाले आहे. आता रडून घे थोडं हरकत नाही ... पण स्वतःला adjust करायचा प्रयत्न कर हे मी त्याला समजावते . सकारात्मक फरक पडतोय सक्षम मध्ये पण त्याला ह्या गोष्टींमध्ये रुळायला मुरायला वेळ लागेल हे नक्कीच . हे सुद्धा माझ्यासाठी एक लर्निंगच आहे . 
(special Thanks to all Staff from school of Life ).    

Monday, 1 July 2019

शाळेचा पहिला दिवस

काकांची गडबड पुन्हा चालू झाली .खुर्चीवर बसून मान  सुद्धा न हलवता दुकानातल्या मुलांना सूचना देणे चालू होते. दुकानातल्या गिऱ्हाईकांची गर्दी वाढतच होती . आज तर जेवायला सुद्धा जायला वेळ मिळाला नसावा,काकांचे बोलणे चालू असतानाचं माझी हजेरी दुकानात लागली. माझ्या छोट्याश्या  गावातील एक पुस्तकांचं दुकान ,माझ्या काही आठवणी , हवं तर बालपणच म्हणा ना ह्या दुकानाशी जोडल्या गेलेलं आहे. आज शाळेचा पहिला दिवस होता म्हणून दुकानात लहान मुलांचा आणि पालकांचा किलबिलाट चालू होता . मुलांच्या चेहऱ्यावर नवीन पुस्तक,नवीन वही, नवीन दप्तर खरेदी करण्याचा आनंद ओसंडून वाहत होता . शाळा सुरु झाली कि काकांचे हे नेहमीचेच होते .कुठली पुस्तके कुठे ठेवली आहे हे त्यांच्या अचूक लक्षात राहत होते. कोणी दुकानात गेलं कि पांढऱ्या शुभ्र बंडी  आणि पैजामा घातलेले काका मोठ्या आवाजात विचारत "ए पोरा कितव्या वर्गाला गेला रे ???"काकांचा आवाज ऐकून तो गोंधळून विचार करत असे ,थोडा वेळ निघून गेल्यावर त्याला आठवून सांगणे भाग पडे "काका सातवीत गेलोय यंदा " . मान  सुद्धा न हलवता ३ ऱ्या नंबर  मधून पुस्तकांचा ७ विचा संच बाहेर काढ रे . दुकानातली काम करणारी मुले ह्या काकांच्या रोजच्या बोलण्याला सरावली होती.   परत २७ वर्ष पूर्वी ची  काकांची छबी मी आज पुन्हा अनुभवली,तोच आवाज ,तीच बंडी-पैजामा  ,तेच दुकान ,तोच मुलांचा किलबिलाट .आज त्या शाळेच्या मुलांच्या गर्दीत मी मला शोधत होते.

शाळेचा पहिला दिवस आणि हमखास बरसणारा तो पाऊस . शाळा जुनीच असली तरी  वर्ग मात्र नवीन असायचा ,पहिल्या दिवशी बाकड्यावर जागा पकडायला सगळ्यांची धडपड  असायची पहिला बेंच म्हणजे वर्गातील सगळ्यात हुशार मुलांचा ,त्यांना डुलकी सुद्धा द्यायला परवानगी नसायची . शेवटचा बेंच हा सगळ्यात उडाणटप्पू पोरांचा ,म्हणून मधला कुठला तरी बाक पकडावा सोबत जुनीच मैत्रीण यावी यासाठी ३ दिवस आधी नियोजन व्हायचे . पहिला तास हेडमास्तर सरांचा असायचा ,नेहमी त्यांच्या तासाला पाऊस का येतो हे गणित कधीच सुटले नाही ,आधीच अस्पष्ट असलेले शब्द पावसाच्या आवाजात लुप्त व्हायचे. आणि त्यापैकी कानावर फक्त पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा आवाज जोर करून जायचा. पहिल्या दिवशी पुस्तकांची यादी देऊन डब्बा खाऊन शाळा लवकर सुटायची ,कारण सगळ्यांनाच वेध लागायचे ते नवीन -नवीन खरेदी करण्याचे . मी सुद्धा सायकलला   पायडल मारून घरून पैसे घेऊन पुस्तक आणायला बाहेर पडत असे . तेव्हा पावसाची चिंता नव्हती आणि आईच्या रागावण्याची सुद्धा नाही . 

आज भूतकाळात शिरून परत एकदा काकांना ७ वि चा पुस्तकांचा संच मागावा असे वाटत होते .आणि परत एकदा तो नवीन पुस्तकांचा सुंगंध  नाकात घ्यावा आणि तो कोरा करकरीत स्पर्श नेहमीसाठी जपून ठेवावा.पण पुन्हा एकदा विजेसोबत काकांच्या आवाजाचा गडगडाट झाला ,"वह्या पाहिजे का रे ????" आणि मी भूतकाळात डोकावून लगेच बाहेर आली ,"हो काका " सौम्य आवाजात मुलाने उत्तर दिले. "छोट्या ५ नंबर  मधून ६ वह्या काढ रे " ,
"पण काका मला ७ वह्या पाहिजे  "गांगरून मुलाने सांगितले . 

"७वि कशाला पाहिजे रे तुला ६ च विषय आहे ना ??"     

"एक वही रफ करावी म्हणतो सगळ्या विषयासाठी "

काकांची पुन्हा एकदा गर्जना " मेल्या ...तुझ्या बापाकडे जास्त पैसे झालेय का रे ??रफ वही म्हणून दुसरी वही घेऊन जा "

आणि मुलाला सांगून काका एक जुनी पानांची वही त्याच्याकडे सोपवत असत . आणि काका घेतील तो  अंतिम निर्णय समजून आपल्या पदरात पडून घ्यावं लागत असे. 

 काकांचा तोंडातून असाच  स्तोत्र दिवसभर  चालू राही. शेवटी "कंपास आहे का रे मागच्या वर्षीचा ??"

"फक्त पेन्सिल आणि रबर शिल्लक आहे काका "

मग काका  पेन्सिल आणि रबर वगळून बाकी सगळे सामान स्वतःच्या हातानी कंपासात लावून द्यायचे . आणि कोणी पेन्सिल मागितली तर "आधी जुनी संपव मग नवीन फुकट देतो तुला"हे वाक्य ठरलेलं असायचं . 

जून संपल्याशिवाय काकांनी आम्हाला कधीही नवीन घेऊ दिल नाही म्हणून की काय अजूनही "नवीन पेन्सिल च अप्रूप टिकून आहे "

सक्षम साठी कवितांचे २ पुस्तक घेऊन आणि भूतकाळातील शाळेच्या आणि सोबत काकांच्या  आठवणी सोबत घेऊन मी बाहेर पडले.   



शाळेचा तो पहिला दिवस खास ....... 
नवीन वहीचा कोरा कोरा वास ....... 
अजूनही तसाच जपून ठेवला आहे मनाच्या कप्प्यात ..... 

पावसाच्या सरींचा  तो आवाज
आणि हेडमास्तरांचा पहिला तास 
करकरीत स्पर्श  नवीन पुस्तकांचा 
गणिताच्या वहीवर अर्धवट शेरा बाईंचा 

स्टाफ रूम जवळच ते पारिजातकाचं झाड 
ओल्या झालेल्या मातीचा सुगंध आसमंतात 
पावसाने  चिंब भिजलेली लाल भिंत शाळेची 
खिडकीतून नजर सारखीच बाहेर जायची 

 काळ्या फळ्यावर ते  पांढरे खडू उमटलेले  
रेनकोट दप्तरात ठेऊन मुद्दाम क्षण भिजलेले 
सगळ्यांनी सोबत म्हटलेल्या कविता मराठीच्या 
पिटी च्या तासाला खेळलेला खेळ लंगडीचा 

त्या घंटेचा आवाज अजूनही कानात तसाच आहे 
मैत्रिणींसोबत घातलेला गोंधळ अजूनही लक्षात आहे 
वर्गात सगळ्यांसमोर सांडलेला माझा डब्बा 
आठवून ओशाळून टाकतो आजही मला 

पुन्हा एकदा लहान व्हायचंय 
ते निरागस बालपण परत अनुभवायचं 
मला परत एकदा शाळेत जायचंय 


Sunday, 10 February 2019

कुठेतरी हरवत चाललेला संवाद

काल  पर्वाची गोष्ट आहे ,निवांत वेळ मिळाला की मुलांना एकत्र करणे आणि गप्पा मारणे हा माझा आवडीचा विषय . खूप निरागस उत्तर त्यांच्याकडून ऐकायला मिळतात . त्यांच्या चौकटीतले प्रश्न विचारले तर त्यांना जमतील तसे त्यांच्या त्रिज्या जिथपर्यंत रुंदावू शकतात तेवढे वेगवेगळे आणि सुंदर पैलू असलेले उत्तरे मिळतात. पण सध्या आजूबाजूची परिस्थिती बघितली  तर  हे कुठेतरी खुंटलंय  याची जाणीव होते . बागेमध्ये सगळा  मुलांचा गोतावळा खेळायला येतो तेव्हा काहीतरी खायला आणावं म्हणून  आई वर्गातल्या बहुतेक बायका इझी टू  कॅरी असं पॅक फूड  आणतात . गप्पा टप्पा च्या खेळामध्ये मी मुलांना विचारलेला सोपा प्रश्न "तुम्हाला माहितेय का लेझ च्या चिप्स कुठून येतात ???"मला ह्या प्रश्नावर खूप विविध प्रकारची उत्तरे येतील किंबहुना चिप्स  शेतातून येऊ शकतात का ??   , इथपर्यंत तरी मुले विचार करतील  अशी किमान अपेक्षा होती . परंतु उत्तरे ज्याप्रमाणे आली ते मला स्वतःला  स्तब्ध करण्यासाठी  कारणीभूत ठरली . लेझ च्या चिप्स ह्या आपल्या सोसायटी समोर असलेल्या दुकानातून येतात . अच्छा मस्त !!!आता मला सांगा त्या दुकानात कुठून येतात ??तर सगळे ओरडली   amzon वरून .वा वा छान च उत्तर आहे !! आणि amazon  ला कुठून   येतात तर लॅपटॉप मधून !! अक्षरशः  कीव करावीशी वाटते मला आजच्या बाल पिढी ची . एवढीच  विचार करण्याची त्रिज्या.  मला आठवतंय लहान असतांना आई हात धरून भाजी मंडई मध्ये घेऊन जायची  भाजी आणणे हा तर फक्त बहाणा होता ,बाहेर  हुंदडायला  मिळेल म्हणून मी ही संधी सोडत नसे.मंडई मध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त मज्जा यायची ते भाजीवाला आणि आईचा हिंदीत चाललेला संवाद ऐकून . समस्त दूधवाले किंवा भाजीवाले हे भैया लोक असतात अशी माझ्या आईची समजूत आहे . त्यामुळे त्यांच्याशी हिंदीतच बोलायला पाहिजे असा तिचा गोड   गैरसमज  आहे. भाजी ऐसी शिळी क्यू लग रहि है ??इति माझी आई,"शिळी थोडी ना है बाई ,कूच भी म्हणता तुम्ही "इति भाजीवाली मावशी असा अस्खलित हिंदी मराठी संवाद ऐकायला खूप गंमत यायची ,ओळखीचं कोणी भेटलं कि गप्पा व्हायच्या ,सुख दुःखाची देवाण घेवाण व्हायची . कमीत कमी संवादाचा आस्वाद तरी होता . आता मात्र हा संवादच अपवाद ठरला आहे ह्याच वाईट वाटतं . ऑनलाईन शॉपिंग ने माणसाचं खूप काम हलकं केलय ,बोटाच्या एक क्लिक सरशी पाहिजे ते पाहिजे तिथून तुमच्या दारात पोहचत आहे कमालच नाही का!! अहो पण त्यामध्ये जिवंतपणा नाही ना . कुठे हरवलाय  तो सवांद ??


मुलांची किंवा पालकांची ह्यामध्ये चूक आहे अस अजिबात नाही . पण इझी गो लाईफ झाल्यामुळे भावनांना जागा राहिली नाही. आई बाबांशी गप्पा मारण्यापेक्षा आजच्या  मुलांना एकांत आणि लॅपटॉप किंवा मोबाईल जास्त प्रिय आहे.थोडंस थांबून आपणच आपल्या मुलांबद्दल विचार करायला हवा . आपल्या पाल्याला त्याची किंवा तिची स्पेस मिळायलाच हवी पण कमीतकमी नात्यांमधील संवादच संपेल असं होऊ नये  .कुठल्याही  स्पर्धेत मिळालेल्या  बक्षीसाचा  आनंद त्याला फेसबुक वर शेयर करण्याआधी आई वडिलांसोबत साजरा करायाला जमलं तरच नात्यामध्ये जिवंतपणा राहू शकतो .


एका १५ वर्षाच्या मुलाला सहज विचारले "तुला मित्र किती रे ?"फेसबुक वर  २०० आणि व्हाट्स अँप वर मित्रांची गिनतीच नाही .तू इतक्या सगळ्या मित्रांना कधी भेटतोस? छे !! मी प्रत्यक्ष खूप जणांना भेटलोच नाहीय अजून. ज्याच्या सोबत मनमोकळं हसता येत ,गळ्यात हात टाकून भटकंती करता येते असा हक्काचा एक तरी मित्र आहे का तुला ?? हो आमचा ४ जणांचा छान  ग्रुप आहे . पण आम्ही व्हाट्स अप वरच जास्त बोलतो ,dp बदलून आपलं लुक आज कसे आहे ते कळवतो ,स्टेटस ठेऊन जगातल्या  प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे हे दर्शवतो  ,अंथरुणातून उठण्याच्या आधीच सगळ्यांना हायफाय ठोकतो ,आणि आमच्या सगळ्या भावना smily वापरून समोरच्यापर्यंत पोहचवतो. हे व्हर्चुअल दिसत असलं ना तरी हेच माझं विश्व आहे आणि हल्ली मी यातच बिझी आहे. अगदी खरंय !!! सगळीकडे हेच दिसतंय ,इथे माणसांची एवढी गर्दी असूनही शांतता आहे . कारण तेच संवाद मुका झालाय .एखादा विनोद सांगितल्यावर कट्ट्यावर जेव्हा मित्रांच्या समुहामधून खळखळण्याचा जो आवाज येतो ,हातावर टाळी देत आनंद साजरा होतो. दुःख ,हास्य ,वेदना,क्रोध ,संताप,प्रेम,आपुलकी ,मिठी ह्या भावनांची सर व्हाट्स अप वरच्या smilies  ला येईल का हो ???एका दूरच्या नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. नवरदेवासोबत त्याचे ५० कॉलेज गोइंग मित्र होते ,सगळे नाचून एन्जॉय करत होते .एवढे मित्र कसे काय ??हल्ली ५ मित्रही दिसत नाही . तेव्हा कळले कि हे सगळे मित्र म्हणजे नवरदेवाची "ओटा गॅंग" होती ,शाळा सुटल्यावर समोरच असलेल्या ओट्यावर सगळे एकत्र बसायचे आणि तासनतास तिथे घालवायचे ,शाळेमधल्या सरांची केलेली नक्कल असेल,एखाद्या मित्राची टर  उडवणे असेल , क्रिकेटच्या गप्पा असतील, एखाद्याच्या बहिणीच्या लग्नात केलेली कामे  असतील , परीक्षा संबंधी चर्चा असेल अनेक गोष्टी या ओट्याने वाटून घेत ल्या असतील .पण आज हा  ओटा ओस पडलाय ,जो तो हातात मोबाइल घेऊन इथे बसतो,आणि स्वतःच्या दुनियेत मश्गुल असतो . बाजूला हाकेच्या अंतरावर असलेल्या मित्राशी बोलायला वेळ नाही आणि सात समुद्र पलीकडे असेल्या शी व्हाट्स अप वरून चाट होतात . काही दिवसात पैसे देऊन भावना share करायला कोणीतरी विकत घेण्याची  वेळ येऊ नये.

कुठेतरी हरवलेला संवाद ,मला वाटत असलेली खंत आज शब्दांच्या माध्यमातून मोकळी झाली


.  

Wednesday, 30 January 2019

जेवढ्या निराळ्या आकृती तेवढ्या वेगळ्या प्रकृती

राजकारणातील लोकांचा किंवा गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे   कधी संबंध आला नाही आणि तो यावा अशी माझी इच्छाही  नाही. राजकारण ह्याचा अर्थ माझ्यासाठी फक्त अर्थासाठी राजे लोकांनी शोधून काढलेलं कारण हाच आहे. मला ते  समजवून घ्याव अस कधीही वाटलं नाही. मतदानाचा हक्क सुद्धा मी फक्त त्याच दिवशी मनावर दगड ठेवल्याप्रमाणे  राबवून येते . साडी ला फॉल कुठला लावायचा किंवा उद्या पाहुणे येणार असतील तर भाजी कुठली करायची , ??हे माझ्यासाठी राजकारण समजवून घेण्या  पेक्षा महत्वाचे प्रश्न आहेत. मला सुज्ञ नागरिक नाही म्हटलं तरी चालेल त्यासाठी अजिबात हरकत नाही . आलिया भट  जसे उत्तर देते तसेच राजकारण ह्या विषयावरची माझ्याकडून उत्तरे येऊ शकतात आणि मला प्रांजळपणे कबूल करायला कुठलीही खंत नाही   !!!!

हा विषय लिहण्याच कारण असं की ,अलीकडेच एका गुन्हेगारी म्हणजेच राजकारण क्षेत्रातील एक व्यक्तीशी माझी झालेली भेट.ही भेट मी स्वतः घडवून आणलेली नाही ,तो एक योगायोगच . सासरी गेल्यानंतर ४ दिवसाच्या प्रवासात सगळ्या  गोष्टी साच्यातुन निघाल्याप्रमाणेच घडतात .खूप नाही पण ७  वर्षाचा सारखा तोच  अनुभव असल्यामुळे मी हे इतके ठामपणे सांगू शकते .  पोहचल्या पासून कोण कोण  व्यक्ती भेटायला येणार त्यांच्यासोबत बोलण्याचे विषय कोणते ,कोण व्यक्ती कधी येऊ शकतो ???हेच काय रिकामे होणारे चहाचे कप ह्याची संख्या सुद्धा बदलत नसावी कदाचित!!! 

ह्यावर्षी एका नवीन व्यक्तीची भर पडली आणि सोबत ८-१० चहाचे कप रिकामे होण्याचीही . कारण घरी येणारी व्यक्ती एकटी नव्हती सोबत ४ अंगरक्षक असायचेच . डोक्यावर  केशरी टीळा ,  हातात रुद्राक्षाची माळ ,गळ्यात सोन्याचे दागिने,कडक इस्त्री केलेला  झब्बा आणि पांढरी चुडीदार ,वाढलेले केस ,राजकारणी अदब . घरात एन्ट्री पण ""नमस्का ssssss र वहिनी "ओळखलं का??? मी कधी आधी पाहिलंय अस वाटत नव्हतं माझी मोठी जाऊ, तिची पण प्रतिक्रिया काहीशी अशीच. सासूबाईंनी ओळख करून दिली अगं  हा संजू  ... आपल्या दुकानात नव्हता का कामाला ???आतामात्र ५ -५० लोक कामाला ठेवलेत ह्यानी. आमच्या चेहऱयावर प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य "तो छोटासा संजू  ...  ज्याला दुकानात रोज उशिरा यायचा त्यासाठी बाबांनी सायकल घेऊन दिली होती ?????" खरं म्हणजे एकंदर व्यक्ती बघून संजू  असा एकेरी आवाज देतांना सुद्धा आमची गाळण  उडाली. पण तोच सरसावला आणि म्हणाला वहिनी अख्या गावात बाकी कोणाची हिंमत नाही आपल्याला संजू म्हणायची सरळ जीभ तोडून हातात देणारा माणूस आहे आपण पण बाबांनी खूप केलय आपल्यासाठी म्हणून अजूनही घरी येतो . आज आपल्या दारात ४- ५ गाड्या उभ्या आहेत सकाळी विचार करावा लागतो कुठली गाडी न्यायची तरिही  पण अजूनही बाबांनी दिलेली सायकल भी तशीच हाय.मुंबईला   जेव्हा मोर्चा निघाला होता तेव्हा मी १७ दिवस उपोषण केलं आणि  मुख्यमंत्री स्वतः येऊन भेटून  गेले  ,माझ्या लग्नाला सगळे राजकारणातील मंडळी उपस्थित होती ह्याच वर्णन संजूनी  खूप  रंगवून रंगवून  सांगितलं. ह्या जिल्ह्यातील एकही अस जेल नाही जिथे मी जाऊन आलो नाही ,सगळे पोलीस आपले मित्र आहेत . अरेस्ट वॉरंट निघालं कि मला आधी पोलीस स्टेशन मधून फोन येतो आणि मी आलोच म्हणून पोलिसांना कळवतो आणि लगेच  दुसऱ्या दिवशी बेल वर सुटतो .

नेमकं तू काय करतो???असं विचारल्यावर इतकं सहजपणे संजू सांगतो एकदा पोलीस गाडीत बसला असताना पेट्रोल टाकून गाडी पेटवली आणि २ दिवस जाऊन आलो जेल  ची हवा खाऊन आलो ,कोणाची जागा ताब्यात घ्यायची असेल ,कोणाचे भांडण सोडवायचे असेल तर पैसे घेऊन हेच काम करतो. पण आजपर्यंत रेकॉर्ड आहे आपला चोरी ,खून या भानगडीत आपण पडलो नाही . जो व्यक्ती बरोबर आहे असं वाटत त्याच्या बाजूने आपण उभे राहतो . खूप दोन नंबर कमवले पण आता नकोय बस झालं . आता आपल्याला इलेकशन ला उभा राहायचंय . बायकोला माहिती आहे का?? असं विचारल्यावर चक्क संजू लाजला ,म्हणतो "चला वाहिनी आता घरी आणि सांगा संजू कुठेतरी भांडणात अडकलाय ,घाबरण्यापेक्षा किंवा रडत बसण्यापेक्षा ती स्वतः तलवार घेऊन येते हातात " धन्य आहे संजू आणि तुझी सहचारिणी एवढेच मी बोलू शकले. 

दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर जाऊन आलो ,पुन्हा संजू आणि चार अंगरक्षक घरात बसलेले दिसले हे बघा वाहिनी ,म्हणून संजू ने  हात पुढे केला ब्रेसलेट सारखं हातात काहीतरी दिसलं सापाच्या आकाराच काहीतरी होतं ,जवळ जाऊन बघितलं तर मी जवळ जवळ किंचाळलेच आणि पलंगावर चढून बसले ,कारण ते ब्रेसलेट नसून खरोखरचं साप होता .संजू एक सर्पमित्र आहे . सक्षम ला एक  साप पकडण्याचा नवीन अनुभव संजूनी दिला .त्यामुळे सापाची भीती सक्षमच्या मनातून निघून गेली आणि साप माझा मित्र आहे असं तो सांगायला लागला . असा एक नवीन रोमांचक प्राण्याशी (संजूशी ) माझी ओळख झाली   

त्याच्या मित्राला (सापाला )खिशात टाकून आपल्या घोड्यावर स्वार होऊन संजू निघून गेला  आणि माझी लेखणी एक नवीन अनुभव शब्दात लिहायला सरसावली


Thursday, 13 December 2018

एक अनुभव असाही .....

आयुष्यात सतत वेगळं आणि नवीन करण्याची धडपड मला शांत बसू देत नाही . इंटर सोसायटी च्या वूमेन्स क्रिकेट सामना होणार हे घोषित झाल्यापासून आमच्याही सोसायटी मध्ये क्रिकेटचे वारे वाहू लागले. सरावासाठी फक्त १५ दिवस मिळणार आणि आमच्यासोबत चक दे इंडियामधला  शारुखखान सारखा कोणी कोच नाही त्यामुळे पुढे जावं कि नाही ह्या संभ्रमात आमचे ३ दिवस निघून गेले . पण बऱ्याच विचाराअंती आपलयाला  काही भारताचे प्रतिनिधित्व करायचे नाही आणि हरलोच तरी सोसायटी चे नाव अजून चार चौघात माहितीच होईल जास्त काही नाही हे ठरवून आम्ही युद्धाच्या मैदानात उतरायचे ठरवले   !!!  व्हाट्स अप ग्रुप वर मेसेज फ्लोट व्हायला सुरवात झाली तशी बरीच मैत्रिणींची नावाची नोंदणी झाली पण त्यापैकी एकाही कारभारणीला क्रिकेट कशासोबत फोडणीला टाकतात हे माहिती नव्हतं . तरीही उत्साह भरपूर होता  ४ सेल्फी तर नक्कीच ऍड होतील ह्या विचाराने काही लोकांनी मोर्चा पुढे वळवला . ४-५ दिवस   फक्त व्हाट्स अप मधले ईमोजी वापरून सामना चालू होता कारण विषय गंभीर होता "प्रॅक्टिस टाइम ". मॉर्निंग टाइम यावर वेगवेगळे उत्तर जमा झाली "बच्चे स्कूल जाते है टिफिन बनाना पडेगा ,इट्स टू अर्ली यार ,सकाळीच क्रिकेट नि  थकून गेल्यावर दिवसभराची कामे कोण करणार ??  " त्यामुळे दुपारची वेळ ठरवण्यात आली ,यामध्ये सुद्धा  महिलामंडळ आणि एकमत हा चक्क विरोधाभास आहे ह्याच्याशी मात्र मी एकमत आहे .    " इतने धूप मी स्किन का ग्लो कम हो जायेगा ,I cant play in office time इत्यादी  "आणि संध्याकाळी कोणाला जमेल विचारल्यास "माझी कार्टी शाळेतून येतात तेच बॅट  बॉल घेऊन पळतील,अंधार लवकर पडतो बॉल दिसणार कसा ??? "एकंदर प्रॅक्टिस टाइम हा विषय चांगलाच गाजला . त्यातल्या त्यात सुवर्णमध्य काढून सकाळी १० वाजता ची वेळ ठरली ,आणि अर्धा ग्रुप रिकामा झाला .



अशाप्रकारे सराव सुरु झाला पहिल्या दिवशी आपल्या घरी असलेले मुलांचे क्रिकेट टूल्स घेऊन यावे आणि  आधी सोसायटीच  पार्किंग वापरूया मग थोडे दिवसांनी मैदानात सराव करता येईल हे ठरलं . बॅट बॉल मारण्यापेक्षा जास्त वेळ बॉलच्या मागे पळण्यातच गेला .पहिल्या मजल्यावरचे  काका आमचा उत्साह बघून म्हणाले देखील "इंडियन वूमेन्स क्रिकेट टीम नि ११८ रन काढले ,तुम्ही १८ तरी काढून या ....मी माझ्या हातचा चहा पाजतो  ऑल डी बेस्ट !! ". कॅप्टन कोणाला करायचं  हा पुन्हा एक ज्वलंत विषय होता . तेव्हा स्वीटी चे नाव सगळ्यानीं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखून सुचवले चांगलं खेळता जरी येत नसलं तरी क्रिकेटचे नियम तिला इत्यंभूत माहिती होते.सोसायटी मध्ये खेळण्याचा फील येत नाही असे बघून  मोर्चा मैदानाकडे वळवला नंतर  सकाळ ची कामे लवकर लवकर उरकून १० वाजता न चुकता येणाऱ्या ८ जणींची टीम तयार झाली . "आज लवकर कसं आवरलं " इति कॅप्टन च्या सासु बाई "तुमची सून आता क्रिकेट टीम ची कॅप्टन आहे "इति कॅप्टन सुनबाई हा मजेदार खेळ मैदानावर पेक्षा घरी जास्तच रंगला  होता .   वूमेन्स सामना  साठी सगळे रूल्स अर्धे अर्धे ठेवण्यात आले होते जसे कि हाल्फ पिच , ७ ओव्हर ,७ जाणिंची टीम इत्यादी आणि बरोबरच होत ते. कारण ५ व्या  दिवशी खेळण्यात आत्मविश्वास आणि उत्साह आलाय अस समजून एकीने बॅट तोड परफॉर्मन्स दाखवला . त्यामुळे जेन्टस लोकांनी नुकतीच   क्रिकेट टूल्स ची खरेदी केली होती ती आमच्या चांगलीच पथ्यावर पडली.  खेळण्यांमध्ये थोडी सुधारणा करण्यासाठी  आपले आपले नवऱ्यांसोबत टी व्ही , शोकेस सांभाळून घरी प्रॅक्टिस करावी तसेच हा वीकएंड फॅमिली सोबत मैदानात क्रिकेट शिकवण्यात  घालवून साजरा करावा यावर शिकामोर्तब झालं . वीकएंड ला पतीदेव खरंच खेळण्यात खूप मज्जा येत आहे असे दाखवून संध्याकाळी जेवण मिळेल हा बेत मनामध्ये ठेऊन शिकवत होते . आणि शारुख खान नाही म्हणून काय झालं ??? आपले पतीदेव आज शारुख  खान  पेक्षा कमी नाही म्हणून सगळ्या गौरी आज आनंदी होत्या. हळू हळू फास्ट बॉलिंग ,विकेट कीपिंग ,आणि fielding मध्ये आम्ही प्राविण्य मिळवलेच . आता सामाना खेळण्याचा दिवस उजाडला ,अजून एक विषय समोर आला "टीम चे नाव काय ठेवायचे आणि सगळ्यात आवडता विषय कॉस्ट्यूम  सिलेक्शन ".... परत द्वंद्व सुरु . शॉपिंग करायची संधी  मिळाली . 

शनिवार तारिख  १५ डिसेंबर ,एकूण १४ सोसायटी च्या महिलांचा उत्साह पाहून डोळे दिपून गेले. आमचा पहिलाच सामना होता, गेरा नॉर्थ सोसायटी वेळ सकाळी ७:३०  पुढे काय झाले ?????



काही नाही जे व्हायचे तेच झाले .आम्ही हरलो पण सोबत एक अनुभव ,नवीन रोमांचकारी क्षण ,फील्ड वर लागणारी ताकद ,टीम वर्क ह्याची शोदोरी घेऊन बाहेर पडलो ते  गुणगुणतच ....

सोचा कहाँ था, ये जो, ये जो हो गया
माना कहाँ था, ये लो, ये लो हो गया
चुटकी कोई काटो, ना हैं, हम तो होश में
क़दमों को थामो, ये हैं उड़ते जोश में
बादल पे पाँव है, या छूटा गाँव है
अब तो भई चल पड़ी, अपनी ये नाव है
बादल पे पाँव है...

Tuesday, 11 December 2018

निसर्गाच्या शाळेत शिकताना


मी माझ्या मुलाला शाळेत पाठवत नाही मग तो शिकतोय कसा ???सगळ्यांमध्ये वेगळा दिसून येतोय खरा . हा प्रश्न माझ्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांना जास्त भेडसावतो. आम्ही काय शिकतो ?कधी  शिकतो?असे बरेच प्रश्न त्यांना पडलेले असतात. आणि हेच प्रश्न मला लिहायला प्रवृत्त करतात. मी माझाच अभ्यास बरेचदा करते. ज्या वाटेवरून जातोय ती वाट ओळखीची किंवा नेहमीची नाही . आम्हीच आपल्या पाऊलखुणा निर्माण करतोय आणि वाट शोधतोय.  तो त्याच्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करतोय . जेव्हा त्याला प्रश्न पडतात  तो त्याचे उत्तर स्वतःच शोधतो. एखाद्या  विषयात बरेचदा मला तो चुकीचं करतोय अस दिसतं . तेव्हा मला माझ्यावर संयम ठेवावा लागतो. त्याला "तू चुकला ,अस करू नकोस ,असं का केलास " ह्या प्रश्नांचा भडीमार पासून त्याला दूर ठेवणे आणि मागितल्यावरच   मदत करणे  नाहीतर शांत बसून राहणे  हा होमस्कूलिंगचा एक अलिखित नियम आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीपासून त्याला इजा पोहचणार नाही   तोपर्यंत मदत करायची नाही . तो चुकतो ,बरेचदा धडपडतो पण स्वतः उत्तर शोधून काढतो आणि ते बरोबर आहे कि नाही हे पडताळून सुद्धा पाहतो.

इतक्यात आम्ही वारली आर्ट शिकतोय . ते शिकताना वरचा चेहरा छोटा आणि खालची शरीर रचना मोठी एक पाय छोटा आणि एक मोठा असा प्रकार बरेच दिवसांपासून चालू होता . मला माहिती असूनही तो सुधारावा अस मला वाटलं नाही . थोड्या दिवसांनी त्याने वारली आर्ट स्वतः च्या फोटो शी पडताळून पहिले . आपलं कुठे तरी चुकतंय हे लक्षात आलं आणि त्यानेच त्याची  सुधारणा केली . आता ते  चुकीचं चित्र मला परत दिसलं नाही. नुकताच आम्ही सक्षम बाबतीत  शिकलेला एक नवीन धडा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न ह्या ब्लॉग मधून करतेय. 
बाबांना सुट्टी असेल तेव्हा आम्ही कुठे तरी भटकंती करायला निघतो . पुस्तकी विश्व ठाऊक असायलाच हवं पण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि अनुभव माणसाला जास्त शिकवून जातात .या आठवड्याचा विषय होता " सिटी अँड कंट्री साईड .....  ह्यामधील फरक "हाच विषय लक्षात घेऊन आम्ही निघालो . वडगाव निंबाळकर ऐतिहासिक वारसा लाभेलेल  गाव .शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई निंबाळकर हीच माहेर .मी बालपणापासून कधी शेतात राहिले नव्हते . माझ्या माहेरी आणि सासरी हक्काची शेती अशी कोणाकडेही नाही आहे . त्यामुळे शेतात राहण्याचं माझं स्वप्न देखील पूर्ण होणार होत. गावापासून दूर असलेली  हिरवीगार शेती आणि मधोमध्ये टुमदार बंगला लागूनच गाईचा गोठा अस एकंदर चित्रात रेखाटल्याप्रमाणे सुंदर कॅनव्हास अनुभवायला मिळणार होत त्यामुळे आम्ही सगळेच आनंदात होतो. एका वडाच्या पाराजवळ येऊन बस थांबली  अनोखळी पाहुणे गावात कोण आले ??म्हणून लोकांची नजर आमच्यावर खिळली शहराचा तिऱ्हाहीतपणा चा स्पर्श अजून गावाला झालेला नाही. त्यामुळे पत्ता शोधयालाही जास्त वेळ लागला नाही. आम्ही आलोय याची बातमी हवेच्या वेगाने काकूंपर्यन्त पोहचली देखील. स्वागताला सजला काकी आणि सुनील काका दोघेही तयार होते. काका जेवढे शांत आणि अंतर्मुखी तेवढ्याच काकू चुणचुणीत  आणि बोलक्या एकंदर अपिरिचित अस वाटलंच नाही. गप्पांचा ओघ आवरल्यानंतर आम्ही फेरफटका मारायला निघालो . सक्षम खूप उत्सुकतेने सगळे बघत होता आणि काका काय सांगत आहे हे ऐकत देखील होता. चिंचेच्या झाडांची असलेली बाग ,त्याच्या खाली ओडक्यांची रचलेली रांग ,विहिरीच्या वर सुगरणींनी बांधलेला खोपा ,दूरवर पसरलेला काळ्या मातीचा पोत ,उसांची एकसंध दिसणारी झाडे ,शेतातला पांढरे शुभ्र थेंब अंगावर उडवणारा झरा ,उंच नारळाच्या झाडांमधून दिसणारा मावळणारा सूर्य , आणि खडखडका मधून वाट काढत टायर खेळणारी मुले,रात्री  बाहेर बाजीवर बसून अंगणात सांडणारे चांदणे ,  असे अनेक शहरात न अनुभवता येणारे अनुभव आम्ही घेत होतो. जवळच ऊस तोडणारा तांडा आपल्या कबिला सोबत राहत होता . एकाच मंद अशा दिव्याच्या प्रकाशात ७ -८ परिवारातील स्त्रिया पोटाची खळगी भरण्यासाठी चूल धगधगवत होत्या. भुकेसाठी मुलांची चाललेली रडारड ,भाकरीसाठी आईची चाललेली लगबग ,थंडी पासून वाचण्यासाठी  काड्यांच्या झोपडीमध्ये घेतलेला आसरा ,रात्री थकून दमून झालेली निजानीज आणि पहाटे शिदोरी बांधून ,मुलांना घरीच सोडून  परत कामावर जाण्यासाठी निघालेली पुरुष आणि स्त्रिया ह्यांची जोडपी . तसेच  काकांच्या मदतीने  गाईचे दूध कसे काढायचे ,चारा  कसा द्यायचा,गाई म्हशींना अंघोळ कशी घालायची ह्याचा सुंदर अनुभव त्यानी स्वतः त्याच्या चिमुकल्या हातांनी घेतला . चित्रात बघणारे पाळीव प्राणी आज तो जवळून आपल्या निरागस पाटीवर कोरत होता.  ह्या सगळ्या गोष्टींची नोंद आमच्या देखील  मनाच्या वहीत कायमची झाली. ह्या आजूबाजूला  दिसणाऱ्या त्याच्या त्रिजेच्या बाहेरच्या सगळ्याच गोष्टींचा   परिचय सक्षम आपल्या मनाप्रमाणे स्वतःशी करून घेत होता. काही शंकांचं उत्तर प्रश्न विचारून करून घेत होता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शेतीची पेरणी,तोडणी ,पाणी सिंचन कसं होत हे समजावून सांगायचं अस ठरलं.काकांनाही त्याची कल्पना दिली .पहाटे उठून आम्ही सगळे शेतात निघालो . पण सक्षमच मन कुठे तरी दुसरीकडेच गुंतलेलं होत.कालपर्यंत इतका खुश दिसणारा ,हातात काडी घेऊन माती उकरून काढणारा ,झाडावर चढायला एका पायावर तयार होणारा ४. ६ वर्षाचं  कोकरू आज शेतात यायला नाही म्हणत होता. आम्हीही मूड नसेल म्हणून सोडून दिल आणि परत जबरदस्तीने ओढून नेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. आणि गप्पांमध्ये रंगून गेलो . थोड्या वेळानी आजूबाजूला तो दिसत नाही म्हणून हळूच दूरवर नजर टाकली ,तो एका १५ दिवसाच्या गाईच्या वासराशी खेळण्यात दंग होता.तो काय करतोय हे आम्ही दुरूनच बघत होतो. त्याने अंदाज घेऊन त्या वासराला आधी दुरूनच चारा  टाकला पण तो तोंड लावत नाही ,त्याने खा खा म्हणून प्रेमाने ,ओरडून सांगून बघितलं पण तो तयार होईना . हळू हळू जवळ जात त्याने एकट्यानेच त्याच्या पाठीवरून हात फिरवला . वासरानेही छान  प्रतिसाद दिला त्याची मनातील भीती नाहीशी झाली . मग काय त्याच्या सगळ्या  अंगावरून हळुवारपाने   कुरवाळणे चालू होत. तो हे सगळं एकाग्रपणे ,आजूबाजूचं भान विसरून आपल्यातच हरपून करत होता . त्याच्याशी गप्पा सुद्धा मारत होता. आम्ही त्याचा हिरमोड करायला मध्ये गेलो नाही. गाडीत परत निघताना आज आपण काय शिकलो हा प्रश विचारल्यावर त्याने फक्त माझं वासरू त्याचे नाव गट्टू आहे . त्याची आई मला पाहून कशी ओरडत होती मग मी काही त्रास देत नाही हे समजल्यावर ती कशी शांत झाली , तो चारा  का खात नाही ? तो डोळे उघडून कसा बघतो ह्याचे अगणित निरीक्षण त्यानी केलं होत. त्यामुळे सिटी अँड कंट्री साईड  ह्याचा अभ्यास करायला आम्ही निघालो ....पण त्याने त्याच स्वतःपुरत विश्व निर्माण केलं आणि तो शिकला . आता एका नवीन मित्राची गणना आमच्या यादीत झाली होती त्याच नाव होत "गट्टू "


सुंदर होती ती शाळा ना पाटी  ना पुस्तक होतं 
मातीची वही होती आणि लाकडाचा पेन होता
शिकायला अफाट  आसमंत कमी पडत होता 
गिरविलेल्या अक्षरांपेक्षा गाईचा ग श्रेष्ठ होता 

पुस्तकातल्या चित्राला अनुभवाची सीमा रेखाटलेली 
गंमतीतले क्ले पेक्षा  चिखलतली माती स्पर्शून गेली 
कागदावर काढलेला झाडाचा रंग आज फिका पडला 
आयुष्याचा धडा आज वेगळ्या  अर्थाने मनावर गिरवला 


Monday, 19 November 2018

सध्या गर्दीतून जातांनाही एकटं वाटतंय ....

सध्या गर्दीतून जातांनाही एकटं वाटतंय ह्याच  कारण गेले कित्तेक दिवस शोधून काढण्याचा प्रयत्न करतेय . अजून पूर्णपणे सापडलं नाही तरीही आपणच आपल्यासाठी निर्माण केलेलं "आभासी विश्व " काही अंशी पटलेलं उत्तर आहे. जस पक्ष्यांना उडण्यासाठी आभाळ असतं  तसच आपल्याला ,आपली दोरी आपल्याच हातात ठेऊन सगळ्या विश्वात डोकावून येण्यासाठी आभासी जग निर्माण झालाय. माउस च्या एका क्लिक वरून तुम्ही इंटरनेट च्या माध्यमातून कुठेही जाऊन येऊ शकता . आणि फिरून येत असतांना आपण वास्तव आणि कल्पना ह्याची सीमारेखा हरवून बसतो . लहानपणी आजी चेटकीण ,परी ,राक्षस ह्यांच्या गोष्टी रंगवून सांगायची आणि तिच्या रंगवण्यात आपण आपल्या कल्पनेप्रमाणे ते मानस पटलावर रंगवायचो ,प्रत्येकाची कल्पनाशक्ती वेगळी होती गोष्ट संपल्यावर त्यातून बाहेर पडल्यावर वास्तव काय ह्याची जाणीव व्हायची . आता मात्र आपणच जादूगार झालोय हवे तसे चित्र काढून आपल्याला पाहिजे तसे रंग भरून एक आभासी  चित्र निर्माण करता येत आणि फेसबुक व्हाट्स अँप च्या माध्यमातून ते जगाला दाखवता येत . ह्या जादूचा उपयोग करून असंख्य मित्र सुद्धा जोडता येतात आणि मग सुरु होतो एक वेगळाच खेळ ,वेगवेगळे चित्र रंगवून खोटं विश्व निर्माण करण्याची आणि मी किती सुखी आहे हे दाखवण्याची चढाओढ !!!ह्यामध्ये आभास आणि वास्तव ह्याची गल्लत होते. नेमकं मला हेच हवं होत की माझ्या आवडी वेगळ्या होत्या,खर काय? आणि खोट काय ? ह्याचा गोंधळ सुरु होतो. 


           संध्याकाळी थकून आल्यावर दिलखुलास गप्पा माराव्या अस वाटलं ,आजूबाजूला कोणी नसले  तरी आभासी  माध्यमांचा वापर करून त्या मारल्या हि जातात .एकटेपणा काहीवेळासाठी कमीही होत  असेल कदाचित    पण त्यामध्ये भावनिक जवळीक कुठेही दिसत नाही . समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हाव  भाव टिपण्याचे सुख मिळत नाही. दिलखुलास हा शब्द  त्या गप्पांसाठी फोल ठरतो. कॉलेजमधे शिकवतांना शिकवण्याबरोबरच विदयार्थ्यांच्या चेहऱ्याचा पाट्या वाचणं माझा आवडता छंद  होता.एक इंजिनीरिंगचा  विद्यार्थी जो मला नेहमीच सगळ्यांमध्ये वेगळा वाटायचा ,दिसायला साधारण होता ,अभ्यासात जेमतेम पण मला वेगळं काय जाणवलं असेल तर त्याला आभासी विश्वात रमण्यापेक्षा समोर दिसणाऱ्या जिवंत व्यक्तींसोबत रमायला जास्त आवडायचं . त्याचे बाकी मित्र कॅंटीनमध्ये मोबाइल किंवा लॅपटॉप शी खेळत असतांना हा मात्र कँटीन मध्ये काम करणाऱ्या राजू सोबत गप्पा मारायचा . चक्क वडा पावमध्ये चटणी घालून प्लेट नेऊन द्यायचा . मी त्याला अस करतांना बरेचदा बघितलंय. लॅब असिस्टंट किंवा चपराशी लोकांच्या मुलांच्या  नावासकट शाळा, त्यांचे छंद ह्याची  खडानखडा माहिती ह्या पठ्याला  होती.तो नुसता गप्पाच मारायचा अस नाही संकटकाळी त्यांच्या मदतीला सुद्धा धावून जाताना मी नोटीस केलय.ऑफिसमधले कर्मचारी ,गेटवरचा सकाळचा आणि रात्रीचा सेक्युरिटी गार्ड देखील  त्याला नावाने आवाज द्यायचे. एक वेगळी जवळीक त्यांची मला जाणवली . बाकी मित्र त्याला वेड्यात काढतांना देखील मी ऐकलंय काय तर म्हणे हा संध्याकाळी आजी आजोबांच्या पार्कमध्ये जाऊन बसतो आणि गप्पा करतो. एकमेकांना मेसेजेस पाठवण्यात ,फेसबुक च्या पोस्ट वर कंमेंट्स लिहण्यात ,सेल्फी काढण्यात जेव्हा बाकी लोक मला मश्गुल दिसतात त्या सगळ्यांमध्ये जिवंत लोकांच्या भावनांची कदर करणारा हा नक्कीच वेगळा भासतो . फायनल सबमिशन घेताना तो वेळेवर हजर राहू शकला नाही ,तेव्हा तो आजारी आहे हे मला सेक्युरिटी वाले काका, कॅन्टीनचा राजू आणि एक आजोबा येऊन सांगून गेले ह्यावरून मला त्यानी नुसते जपलेले च नाही तर निभावलेले नातेसंबंध काय होते ह्याचा धडा समजला. 

व्हाट्स अप किंवा फेसबुक ह्यांच्या आहारी जाऊन आपण खर् च  काय गमावून बसलोय हे कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. आज आभासी जग हे केवळ व्यक्त होण्याचं माध्यम  आजच्या पिढीसाठी झालय म्हणून हि पिढी निकोप वाढू शकेल का ह्यावर प्रश्न  चिन्ह निर्माण झालय.आवकशकतेपेक्षा जास्त वापर केल्याने ह्याचे दुष्परिणाम लवकरच घातक ठरतील. 

पास आऊट होऊन तो एका चांगल्या स्वाफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला लागला . कॉलेजमध्ये मार्कलिस्ट घ्यायला आला असताना माझी त्याच्याशी गाठ पडली ,"अजूनही वडा पाव मध्ये चटणी  भरतोस का ??  "माझा गमतीने विचारलेला प्रश्न.पण त्यानी दिलेलं उत्तरा वर मला विचार करायला भाग पडलं 
"वडा पाव मध्ये चटणी भरणं त्यासारखी मज्जा कंपनीमध्ये नाही मॅडम त्या निमित्ताने   एकावेळी अनेक लोकांशी संवाद साधता यायचा ,लॅपटॉप वरच्या आभासी जगातून पलीकडले जे विश्व दिसते  त्यामध्ये माणुसकीचे रंग भरता   येत नाही   "       

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...