Wednesday, 17 June 2020

माझी आई गेलीय सात समुद्र पार

कविता वाचण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगते. माझ्या बघण्यातील सुखवस्तू कुटुंब ,आई बाबा दोघेही आय टी कंपनी मध्ये नोकरीला . अतिशय गोंडस ,निरपराध ,४ वर्षाची मुलगी खूप गुणी . पण आई सात समुद्र पार गेल्यापासून सगळं नूरच बदलला ,तिच्या भावनांना  न्याय देण्याचा प्रयत्न कवितेतून केला आहे

ए आई तू खूप आनंदी होतीस ,जेव्हा तुला लंडनला जायचं होतं 
तुझ्या करिअरच आभाळ तुला सात समुद्र पार बोलावत होत 
माझ्या पंखांमध्ये बळ असतं तर घेऊन आले असते परत तुला  
नको ते खेळणे ,नको ते कपडे ,तुझ्या मिठीत येऊ दे एकदा मला 
मोबाईल वरून रोज व्हीओडीओ कॉल करते ,बोल बोल म्हणतेस 
रोज काहीतरी आमिष दाखवून, "लवकर येते पिलू" म्हणून सांगतेस
खरंच आलीस तरी वेगळं काही जाणवणार  नाही आता 
मला आजीकडे सोपवून रोज ऑफिसला जातेस ,त्याचा नाही राग 
आजी तर मला आवडतेच ,पण मला हवास वाटतो तू दिलेला घास 
सगळे खेळणे आहे माझ्याजवळ ,पण तरी हेवा वाटतो त्या कामवालीच्या पोराचा 
काहीच नाहीय खेळायला ,पण माय माय म्हणताच साद  येतो आईचा 
मी रडेल म्हणून न सांगताच निघून गेलीस ,आजीनेच समजूत माझी काढली 
रोज निदान संध्याकाळी येतेस  म्हणून दिवस तरी निघून जायचा
आता तूच सांग संध्याकाळचा एकटेपणा ,घालवायचा  तरी कसा ? 
रात्र तर मला नकोशीच झालीय ,स्वप्नातील परी पण खोटी वाटायला लागलीय 
एकदा अस वाटत येऊनच बघावं लंडनला ,मला सोडून जावंच कस वाटलं तुला? 
छोट्या छोट्या गोष्टींवरून आता खूप रडायला येत ,सगळाच खेळ  निरस होऊन जातो 
बाबा पण सारखा कामच करतो ,दया आली  माझी की थोडावेळ जवळ घेऊन बसतो 

एक प्रश्न विचारावासा वाटतो ग तुला ? असच सोडून जायचं होत तर 
या जगात आणलास कशाला ???

एकदा तरी नक्की या माझं नवीन घर पहायला

एकदा तरी नक्की या माझं नवीन घर पहायला 
किती छान सजवयलय या निर्जीव जीवाला
कौतुक करता करता तोंड  थकत नाही माझं 
डोक्यावर मात्र वाहतोय इ एम आय  च ओझं  
पार्किंग मध्ये खाली कार उभी आहे माझी ऐटीत 
पैशाच्या या झाडाला वाढवतोय नात्यांच्या मातीत 
हवा उजेड भरपूर येतोय दार खिडक्यांमधून 
सुंदर दृश्य सुद्धा दिसत बघा बालकनीमधून 
आईबाबांचा मात्र  श्वास कोंडतोय या शांततेमधून 
ते मात्र जाणवत नाही या भौतिकतेच्या पडद्याआडून 
आईच देव देव आणि  मंदिर आता खूप लांब राहिलय 
चार भिंतीतच तीच सगळं विश्व येऊन थांबलय 
सगळंच घर कस आधुनिकतेनी भरभरून  नटलंय 
आईने जपून ठेवलेली  संस्कृती  उंबरठयावर आलीय 
गावी घरी आलेला पाहूणा ढेकर देऊन जायचा 
तेव्हा समाधानाने बाबांचा चेहरा उजळून निघायचा 
दर रविवारी घेऊन जातो सगळ्यांना  महागड्या हॉटेलला 
तिच्या हातची प्रेमळ चव नाहीच येत त्या जेवणाला 
त्यांचा मुळीच आरोप नाही माझ्या या घराला 
पण खरंच मी पात्र आहे या कौतुकाला?

मृत्यू ...

माणसाचं काय आयुष्य असतं??
 
ना जन्म स्वतःच्या हातात आहे ना मरण
कसा हा प्रकृतीचा अजब गजब नियम
चालता फिरता, प्रवासाचं अचानक थांबणं
काल नवीन कपड्यात बघितलेल्या व्यक्तीला
आज पांढऱ्या कपड्यात गुंडाळून नेणं

चार लोक उचलून नेतात  त्या अबोल देहास
रडण्याचे, हुंद्क्याचे आवाज चिरती आसमंतास
थोडी दूरपर्यंत सोबत हि लोकांच्या गर्दीची
पुढच्या प्रवासाची  वाट मलाच माझी ठरवायची 
लाकडावर ठेवलेल्या शरीराला सोबत न मिळे कुणाची

घर ,दार ,नाते,पैसा सगळे  जिवंतपणाचे खेळ हे
आज यातले काहीच सोबत नाही घेता आले
देहाला जळताना पाहून शांत सगळे उभे राहिले
आज मध्ये अडवायला सुद्धा कोणीच नाही आले
आज खरं जीवनाचे दर्शन मला झाले

आयष्याच्या गणिताचा अंत हा शून्यातच झाला
बेरीज वजाबाकी करून जीव हा पुरता थकला
उभ्या जीवनात बहराला माझ्या जरी निशिगंध
तरी शेवटी ललाटी लिहलेला असा हा अंत 
काय म्हणावे याला हा शेवट कि आहे आरंभ

  ज्या देहाच्या मागे धावलो तोच नश्वर होता
मला एक दिवस नेणारा मृत्यू हाच शाश्वत होता
आत्म तत्व सोडून देहाला सत्य समजणारा माझा मूर्खपणा होता !!

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

घेतले मी पहिल्यांदा हातात जेव्हा तुला 
आनंदाच्या  अश्रूंची साथ होती भावनांना 
तुझ्या बंद पापण्यातूनही ओढ बघण्याची सरे 
तुझे ते निरागस रूप मज लोभस भासे  
सुखावून गेले मी तुझ्या एकाच स्पर्शाने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

तुझ्या बालपणीच्या आठवणीत मी नेहमीच रमते 
भात खाऊ घालण्यापासून ,सगळे क्षण पुन्हा आठवते 
पाहिलं पाऊल तू ठेवलस ,अवघ जग मी जिंकलं 
जगण्याचा अर्थ गवसला ,तुझ्या बोबड्या शब्दाने 
सुगंध दरवळला ,तुझ्या खळखळून हसण्याने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

संध्याकाळी तक्रार करते तुझी ,कोर्टात बाबांच्या 
लाडिक रागावणं ,उगाचंच रुसणं ,फुगणं ,समजावणं 
हे असूनही  तुझ्या मस्तीने ,रुचकर होतोय प्रवास जगण्याचा 
गोष्टींकडे नावीन्याने बघण्याचा दृष्टिकोन आज उमगला 
सजीवतेचे मर्म पुन्हा उभे राहिले  फक्त तुझ्या येण्याने,


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 
तुझ्या पंखात मी काय बळ देऊ बाळा ??
आज तूच मला जाणिवांचे पंख देऊन उडण्यास शिकवले 
"आई "ह्या नात्याची   ओळख  झाली आज नवीन रूपाने 


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

हळुवार तुझी चाहूल का दरवळतो मज उर ......

अजून चार दिवस बाकी होतेआपल्या  भेटीला
हे कसे समजवावे या व्याकुळ  वेड्या मनाला
पाहुण्यांच्या गर्दी मधूनही मला टिपणारी नजर तुझी
सुंदर तयार झाल्यावर हसून मिळालेली दाद नजरेची

 स्पर्शानेच  व्यक्त व्हावे असं काही जरुरी नाही
डोळ्यांची भाषा बोलायला  शब्दांची गरज  नाही
आजूबाजूला असणारा तुझा भास देखील आहे पुरेसा
तुझ्या असण्याने दिवसभरचा थकवा होतो  नाहीसा

तू केलेली तारीफ मला नकळत वेडावून सोडते
तुझ्या तोंडून परत परत तेच ऐकावेसे वाटते
गोऱ्या गालावर सगळी लाली एकवटून जाते
आधीच लाल झालेली माझी कळी अधिकच खुलते

झोपेत असताना तुला बघण्याचे सुखच वेगळे आहे
तुझ्या स्वप्नात येण्याची मला परवानगी हवी आहे
तू स्वप्न पाहावे आणि मी त्यामध्ये रंग भरावे
पहाटे जाग  येताच समोरही तू मलाच बघावे 

तुझ्यासोबत मिरवण्याचा आनंदच वेगळा आहे
हातात हात घालून चालतांना आसमान ठेंगणे आहे
 प्राजक्ताचा सडा पडावा  ,आणि मातीला सुगंध सुटावा
तसाच तुझा हळुवार स्पर्श मला शहारून सोडावा 

एक गमंत सांगू तुला

एक गमंत सांगू तुला ...खरंच खूप आवडतोस तू मला

हल्ली मोबाइल -लॅपटॉप मधून नसते सवड तुला
इनबॉक्स ला मिळालाय माझ्या वाटचा वेळ सगळा 
आपल्या वायरलेस प्रेमाचा रंगच मुळी  निराळा 
 तरी तू प्रेमाचा टाकलेला एक कटाक्ष पुरा झाला

एक गमंत सांगू तुला... खरंच खूप आवडतोस तू मला

मुद्दाम माझ्यासाठी असं काही खरेदी करीत  नाहीस
पाडव्याची साडी संक्राती ला घेतोस हे काही थोडे नाही
नाही घेऊन गेलास तरी  चालेल रोज बागेत फिरायला
दोघात एकच प्लेट भेळ ऑर्डर करतोस ना खायला

म्हणून ...... खरंच खूप आवडतोस तू मला

पावसामध्ये दोघांनी चिंब भिजावं अशी अपेक्षा नाही
लॉंग ड्राईव्ह ला नेणारा तू काही फिल्मी नवरा नाही 
पावसावरचं गाणं लागतोस जेव्हा तू गुणगुणायला 
स्वतःहून सर्दीचा काढा  आणून देतोस  प्यायला

म्हणून ..... खरंच खूप आवडतोस तू मला

घराच्या दारावर तुझ्या नावाची असेल जरी पाटी
कवितेतील शब्द माझे असतील पण लिहिले  तुझ्यासाठी
अर्थ आलाय तू येण्यामुळे माझ्या निःशब्द भावनेला
अजून काय सांगू ..... खरंच तू खूप आवड्तोस मला

आणि गावे रिकामी झाली ...

त्या समस्त पाखरांसाठी जी दाण्याच्या शोधामध्ये आपले घरटे सोडून उडाली


अख्या  गावाने हिंडणारी छोटी मुले बघा किती मोठी झाली
आई बापाला ओसरीत सोडून एकटीच पक्ष्यासारखी  उडून गेली
मोठं असलेलं घर सोडून, मोजक्या ४ रूमचा फ्लॅट थाटून  विसावली
गाव ओस पडली आणि शहरातल्या गर्दीत अजून गर्दी झाली

घड्याळाचे काटे तुला इथे हळू फिरल्यासारखे वाटतात
गावातील वेशीच्या भिंती तुझ्यासाठी मोडलेल्या ठरतात
पण इथल्या मनातील आपुलकीला अजून तडा गेलेला नाही
नजर तेवढी  बदलली ,मातीला  गंध तसाच आहे अजूनही

आईची साडी ,बाबांचा सदरा जीर्ण झालाय फाटून फाटून
तरी कृत्रिमपणाचा रंग नाही  इथे कपड्याला चिकटून
गल्लीतल्या क्रिकेट ची मज्जाच काही और होती
मित्रांसोबत जमलेली मैफिल नेहमीच  सुंदर रंगत होती

शहरी चहूबाजूंनी प्रदूषण असतांना  तू गाडी हाकतो
ट्रॅफिक च्या गोंधळात कित्येक तास तू असेच लोटतो
गावी न परतण्यासाठी तू रस्त्यातील खड्डे  दाखवतो
तो रस्ता मात्र तुझी आणि  सायकलची आठवण काढतो

शहरातल्या दिखावू , उसन्या  झगमगाटाला तू भुललास
भावनांना  पैश्यांच्या तराजूत तोलून बघायला लागलास
तू परततांना आईचे अश्रू तेवढ्याच मायेने वाहत राही
 तुझं बालपण गेलेलं गावं बोलवतंय तुला अजूनही 

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...