Monday, 21 September 2020

माहेर पणाला गेलेल्या आणि तिथेच अडकून पडलेल्या काकू

 सोसायटी मधील एक काकूंचा फोन आला "अगं आज घरी एखादी चक्कर मारशील का?"एरवी हे वाक्य खूप सहज होत मी सुद्धा लगेच उठून गेले असते कारण बाजूच्याच बिल्डिंग मध्ये जायचं होत . काकूंची सून गरोदर होती ५ वा महिना सुरु होता . भावाच्या मुलाच्या लग्नाला माहेरी गेलेल्या काकू लॉकडाऊन  मुळे माहेरच्याच झाल्या होत्या. काकूंचे "चक्कर मारशील का" हे वाक्य  आज खरचं चक्कर आणणारे होते .मला मात्र काकूंनी हक्काने फोन केला होता आणि तिला काहीतरी खावंसं वाटतं असेल किंवा काही त्रास होत असेल हे विचारून मला फक्त फोन वर समाचार दे एवढंच त्यांचं म्हणणं होत. तसं त्याही फोन करून विचारू शकणारच होत्या पण सुनेची रोजची वाक्य ठरलेली होती  "आई मी ठीक आहे तुम्ही काळजी   करू नका. "त्यामुळे मला फक्त खात्री करण्यासाठी समाचार घेण्याचे काम सोपवले होते.

माझ्यासाठी मात्र हे एक संकटच होत . मी जाणे हे लॉक डाउन च्या काळात सुनबाई ला कितपत आवडेल ह्यात शंका होतीच. काकूंचा मात्र रोज एक फोन येत होता माहेरी भावाच्या सुनेचे कौतुक करता करता न थकणाऱ्या काकू आज मात्र धर्मसंकटात पडलेल्या दिसल्या आज सून बाईची आवडती डिश केली होती पण तिला खायला डिजिटल माध्यम आज उपयोगाचं नव्हतं . तंत्रज्ञान कितीही  पुढारलेले असले तरी गरोदर सुने ची आवडती डिश आज आपण पोहचवू शकत नाही  ह्याची आमच्या मॉडर्न म्हणणाऱ्या काकूंना खंत होतीच आणि  त्यांनी  माझ्याकडे व्यक्तही केली. त्यांचं धर्मसंकट आता कोरोना च्या जाळया सारखे माझयापर्यंत येऊन पोहचलं होत  कोरोना मुळे काय करो आणि काय करोना ह्यामध्ये मी अडकले होते.

आणि एका कोरोनामय दुपारी जय्यत तयारी करून (मास्क ,गॉगल ,हॅन्ड ग्लोव्हस ,सॉक्स ) घालून मी निघाले ,बाजूच्या बिल्डिंग मध्ये हो ! ५ मजले चढत जाणे लिफ्ट चा वापर असूनही करायचा नव्हता ,दमछाक होऊन पोहचले ,दारावरची घंटी वाजवावी की कडी वाजवावी ह्या द्विधा मनःस्थिती मी होते. शेवटी कडी वाजवली दार उघडायला बराच वेळ लागला कारणहि तसेच होते ,दुपारच्या कोरोनामय उन्हात कोण आले असेल ?म्हणून नक्कीच प्रश्नवाचक चिन्ह सगळ्यांच्या चेहऱयावर निर्माण झालं होत . काकूंच्या सुनेनेच दरवाजा उघडला ते एक बरं झालं माझं काम थोडं सोपं झालं . माझं पूर्ण पॅकिंग बघून कोण असेल ???असा प्रश्न पडला असावा  मी लगेच तो दूर केला ,आणि येण्याचे कारण पण सांगितले . घरात ये आधी बस थोडा वेळ मग गप्पा मारू असे आमचे नाते होते पण मी घरात जाणार नाही आणि ती घेणार नाही असा अवघड स्तिथीत समाचाराची देवाण घेवाण झाली आणि सगळे क्षेम कुशल जाणून घेतले आणि काकूंना कळवते म्हणून काढता पाय घेतला .दुसऱ्या दिवशी सुनबाईनी काकुनी जी डिश बनवली ती स्वतः बनवली ती खाली आणि भरलेली प्लेट आणि रिकामी प्लेट  त्याचा फोटो facebbok वर शेयर केला आणि मला टॅग केले .

वा !!काकूंना आनंद झाला की सुनेने बनवून का होईना खालले ,सुनेला आनंद झाला आता सासूबाई परत कोणाला पाठवणार नाही  मलाही आनंद झाला खाली प्लेट का होईना पण त्यात मला टॅग केले .social media वरचे एक टॅग माझ्या नावाने ऍड झाले . 

कागदाची युनिव्हर्सिटी

 माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच  जणू या कागदातूनच विविध वळणे घेत घेत पार पडतो आहे . ह्या अक्षरांच्या आणि अंकाच्या सुबक भासणाऱ्या रस्त्यावरचे  पहिले वळण म्हणजे पहिली ते दहावी.   ह्या वळणावर प्रत्येक  वर्गाची  गुणपत्रिका  आणि विविध स्पर्धा परीक्षेचे प्रमाणपत्र ही  जमा पुंजी एकत्र  करत  मुक्काम पुढे जात होता. हे बालपणीचे विश्व खूप छान भासत  होते  सगळीकडे कौतुकाचा पाऊस होता , नातेवाईकांकडून कागदाच्याच  बक्षीसाची शाल पांघरली जात होती आणि सुट्टींमधील विविध शिबिरांचे प्रशंसापत्र ह्याची प्रचिती म्हणजे जणू काही उन्हाळ्यात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसेच! असे हे तिन्ही ऋतूंचे बालपण लवकरच सरले  . बारावीचा निकाल लागला पुस्तकांच्या  पानांवरील बारीक  बारिक अक्षरांमधुन वळण घेत "करिअर" ह्या रस्त्यावरचा टप्पा सुरक्षित पार पडला होता .म्हणून आईने  एका कागदावर छापून आलेल्या  अंकांसाठी   चिवडा , पेढा आणि  मटकी ह्याची पार्टी दिली तेही कागदी प्लेट मधूनच !अशी  आमची सोबत ऐन रंगात आली होती माझी कागदाला आणि कागदाची मला .

 इंजिनीरिंगला प्रवेश मिळाला दुसरे वळण सुरु झाले ,रस्ता थोडा अवघड होता.पण कागदाशिवाय पर्याय नव्हता. आमची सोबत  सबमिशन, जर्नल्स, पेपर्स आणि पुन्हा गुणपत्रिका अशी पूर्ण होत गेली. खरंच चार वर्षाचा तो प्रवास कागदाशिवाय अपूर्णच होता. 

 रस्ता संपत नव्हता ,प्रवास सुरूच होता.  दिवसांचे रकाने भरत ,चाकोरीचे कागद रंगवले  जात होते .
रस्त्यावर तिसरे वळण आले नागमोडीच ते. अनुभवांची साठवण कागदांसोबत  होतीच कागद कागद खेळता खेळता कागद हा  आयुष्याचा अविभाज्य भाग बनून बसला.  M.E चा कागद अक्षरशः स्वप्नांची पूर्तता होऊन पदरात पडला. 

अखंड फाईल मधून जाणारा हा प्रवास मुक्कामावर पोहचणारच होता . हाकेच्या अंतरावर Ph.D ची पदवी असतांना हा अंगवळणी पडलेला कागदांचा रस्ता अचानक बदलायला युनिव्हर्सिटी ने मजबूर केले  . कोरोना मुळे  एक नवीन क्रांती शिक्षण क्षेत्रात सुरु झाली होती .प्रत्यक्ष न येता कागद  डिजिटल रूपाने  जमा करण्याची पद्धत सुरु झाली होती .  

 डिजिटल मार्ग पत्करणे हे मलाच नव्हे तर टेबल वर  फाईलचा गठ्ठा जमा करून मागे  बसणाऱ्या  युनिव्हर्सिटी मधील प्रत्येकाला अनोखा होता . फाईल मध्ये दबून  गेलेली चष्म्याची चौकडी आता कॉम्पुटर  वर स्थिरावली होती .क्लिक करुन  सगळं काही साच्यात बसवू पहात होती . बाहेरूनच ग्रीन दिसणारी युनिव्हर्सिटी आता खऱ्या अर्थाने आतमधून सुद्धा गो ग्रिन होणार होती  . 

काहीहीअसो ही शेवटची पदवी डिजिटल रूपाने समोर येईल आणि कागद म्हणजेच सगळं काही असं मानणाऱ्या माझ्या सारख्या असंख्य लोंकाना कागदवाचूनहि सगळं निभावत ह्याची जाणीव होईल .
बालपणात निरागसपणे भेटलेला कागदाला स्वार्थी पणाचा वास कधी चिकटला कळलंच नाही.

सक्षम साठी होमस्कूलिंग चा पर्याय निवडताना हाच विचार आला, प्रशंसापत्र ह्या रूपाने कागदाशी मैत्री न करता तोच कागद मोरपीस बनून आला तर आयुष्य सुंदर होईल.

Saturday, 18 July 2020

होमस्कूलिंग आणि परीक्षा

जेव्हा सक्षमच्या सगळ्या सोसायटी मधल्या मित्रांची परीक्षा असते तो काळ म्हणजे सगळीकडे शुकशुकाट पसरलेला असतो. एक शांतता सगळीकडे विखुरलेली  असते .कोपऱ्यात कुठेतरी बॅट , बॉल ,स्टंप धूळ खात पडलेले असतात ज्या सायकल वर पायडल मारून शर्यत लावली जाते ती सायकल पार्किंग मध्ये निपचित पडलेली असते .सोसायटी चे प्ले ग्राउंड एकदम सामसूम झालेले असते रोज मुलांच्या होणाऱ्या  किलबिलाटाची जागा  आता फक्त झोक्याच्या हवेने हलणाऱ्या आवाजाने घेतलेली असते. समस्त आई वर्ग हा वेगळ्या काळजीत गढलेला दिसतो सकाळचे मॉर्निंग walk असेल किंवा भाजी घ्यायला आलेला आई लोकांचा गोळका  असेल समस्त चिंता वाहून ह्या वावरत असतात त्यासाठी एकच असलेलं कारण म्हणजे सगळ्या मुलांची  नुकतीच  सुरु झालेली  परीक्षा. परीक्षेच्या काळामध्ये घरचे वातावरण बदललेले असते ,टेलिव्हिजन च्या आवडत्या सिरीयलस  आजी डोळे बारीक करून ,हळू आवाजात ऐकत असते ,आई काम लवकर उरकून रिविजन घेण्यात मग्न असते ,बाबा आपला आपला चहा स्वतः करून घेत असतात कारण काहीतरी वेगळं घडणार असतं  किंवा त्याला नको तेवढं महत्व देऊन आपण ओझं वाहत असतो. 
होमस्कूलिंग आणि परीक्षा ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास मी विविध पैलू उलगडून करायचा प्रयत्न केला.मला सापडलेले उत्तर मांडण्याचा प्रयत्न सक्षम च्या  निरागस विश्वातून करते आहे .  ते पैलू प्रश्न  स्वरूपाने समोर आले ते असे ... एवढे सुंदर ,वेगवेगळे आयुष्य बाहेर बघायला मिळत असताना आपण का ४ रूम च्या बंदिस्त कप्प्यामध्ये शिकावं ?आणि तेही केवळ परीक्षेसाठी त्यापेक्षा जगातील निरनिराळे  अनुभव घ्यायचे,स्वतः अनुभवायचे आणि आपले इवलुएशन करायचे असे झाले तर ?शिक्षण म्हणजे फक्त शाळा हे समीकरण थोडं बाजूला ठेऊन निसर्गात जाऊन शिकलो तर ? 
आजूबाजूचेच उदाहरण घ्या ना शाळा आहे म्हणून आपण कितीतरी परिवारातील कार्यक्रम जगायचे सोडून देतो पण परीक्षा पेक्षाही जास्त महत्वाचे आहे ते ४ वेगवेगळया स्वभाव असलेल्या लोकांना भेटणं  फक्त परीक्षा हे आयुष्य जगण्याचे अंतिम ध्येय असूच शकत नाही त्यापेक्षा सहज कुठल्याही वातावरणात सामावून जाणे हा धडा आपल्यासाठी जास्त महतवाचा असू  शकतो. जिथे जाऊ तिथल्या प्रकृती  सोबत  एकरूप होणे हा बदल स्वतःमध्ये घडवणे हि एक परीक्षा असू  शकते.  ह्याबाबतीत शहरातल्या मुलांपेक्षा मी छोट्या गावतल्या मुलांना खूप नशीबवान समजते कारण पुस्तकी म्हणजे कोणीतरी आधीच लिहून ठेवलेल्या एखाद्या धड्यापेक्षा स्वतः काहीतरी बनवून गिरवलेला ,अजमावलेला धडा हा जास्त आनंददायी असू शकतो.एखाद्या पहिलीतल्या मुलाला जस झाड दाखून पान ,फळ ,फुल हे त्याचे विविध अंग आहे आणि परीक्षेत ते विचारतात म्हणून खूप महत्वाचे आहे असे सांगून  फक्त डोळ्यासमोर काही मार्कांसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हे त्या मुलासाठी अंतिम ध्येय असू शकते ह्याच्या विरुद्ध  त्यापेक्षा बी पेरल्यापासून झाड मोठं होई  पर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवने आणि त्याचे संवर्धन करणे हे आपले अंतिम ध्येय आहे हे शिक्षण एक सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मदत करते ज्याची आता सगळ्यात जास्त गरज आहे. शाळेची परीक्षा आणि जीवनाची परीक्षा ह्यामध्ये किती हा दुरावा . जीवनात पहिले अनुभव येतात ,त्याबद्दलचे असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात  आणि मग काय वाईट ,काय चांगले हे पडताळून बघून मग योग्य ते निर्णय घ्यावे  लागतात. पण शाळेच्या परीक्षेत मात्र ह्याच्या विरुद्ध ,सर्वात आधी वेगवेगळ्या  विषयाचे ज्ञान डोक्यात  फिट्ट बसवायचे मग पुन्हा त्याला आठवून कागदावर उतरवायचे आणि त्यावरून मूल्यमापन ठरवायचे. 
दोन अनुभव मला ह्यामध्ये नमूद करावेसे वाटतात पहिला  हा माझा स्वतःचा आहे ,इतक्यात परीक्षा म्हणजे काय ह्यावर घरात बरेच संवाद होत होते . मी सक्षम पुढे मांडलेला प्रश्न.... आपण  तुझी परीक्षा घ्यायची का ?इतक्यातच तू सायकल चालवायला शिकलास ना मग आपण एक टेस्ट घेऊया . मला निरुत्तर करणारे त्याचे उत्तर ... "नको इतक्यात ..अजून मला बरेच शिकायचे आहे ... मला परीक्षा कधी द्यायची हे मी ठरवेल आणि तुला सांगेल  !!". होमस्कूलिंग मध्ये परीक्षा देण्याचा हक्क हा मुलांकडे अबाधित राहतो.मला माझ्यामध्ये असलेल्या क्षमता तपासून बघायच्या आहेत असं जेव्हा तो ठरवेल  तेव्हाच इवलुएशन करायचं  हे होमस्कूलिंग मध्ये जमतं .

 


दुसरा अनुभव म्हणजे सुप्रिया जोशी ,मुंबई  एक होमस्कूलर आई दोन्ही मुली शाळेत जात असतांना ,result डे च्या दिवशी सगळ्या मैत्रिणींच्या आई बेंच वर बसून पेपर बघत असत ,५ मार्क कुठे कमी पडले ह्याची सविस्तर चर्चा शिक्षकांसोबत  होत असे ,पण सुप्रिया ताई मात्र ती गुंडाळी हातात घेऊन घरी परत येत असे ,मालविका (सुप्रिया ताईंची  मोठी मुलगी )नेहमी म्हणायची आई तू कधीच टीचर सोबत बोलत नाही ??असे का ??ते बरं दिसत नाही ??तू निदान बेंच वर बसायचं नाटक  तरी करत जा. तेव्हा त्यांचे मालविका साठी सुंदर उत्तर "बेटा ही कागदाची गुंडाळी तुझे भविष्य ठरवू शकत नाही.तुझ्यामध्ये असणाऱ्या स्किल्स ह्या मी ओळखते  ".आज मालविका शाळेत न जाता कुठल्याही डिग्री शिवाय USA च्या MIT युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत आहे. फक्त तिने स्वतःसाठी एक पोर्टफोलिओ बनवला प्रत्येक  वर्षी तिने आत्मसात केलेल्या तिच्या आवडीच्या क्षेत्रातल्या निरनिराळ्या स्किल्स त्यामध्ये नमूद केल्या . तिचे मूल्यमापन तिनेच केले . कुठलीही शाळा किंवा युनिव्हर्सिटी हे तुमच्यामधील स्किल्स ला मार्क देऊन मोजू शकत नाही. 

ए जिंदगी कब तक इन अंको से भरी कागज पर हमे आजमाते रहोगी?
जो अंकपत्र पाने के  लिये पुरी जिंदगी मेहनत कि 
वही कागज वास्तविक जीवन  में  पर्ची बन कर रह जाता  है
 वास्तविक रूप मे  सामने आने  वाले सवाल कुछ और हि होते है  
कब तक हम  ऐसेही  झुलते रहेंगे कागज  और असली एहसास  के बीच 
कागज कि कमाई और एहसास  कि रुहाई अब सिखा दे एक साथ में 

Wednesday, 17 June 2020

माझी आई गेलीय सात समुद्र पार

कविता वाचण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगते. माझ्या बघण्यातील सुखवस्तू कुटुंब ,आई बाबा दोघेही आय टी कंपनी मध्ये नोकरीला . अतिशय गोंडस ,निरपराध ,४ वर्षाची मुलगी खूप गुणी . पण आई सात समुद्र पार गेल्यापासून सगळं नूरच बदलला ,तिच्या भावनांना  न्याय देण्याचा प्रयत्न कवितेतून केला आहे

ए आई तू खूप आनंदी होतीस ,जेव्हा तुला लंडनला जायचं होतं 
तुझ्या करिअरच आभाळ तुला सात समुद्र पार बोलावत होत 
माझ्या पंखांमध्ये बळ असतं तर घेऊन आले असते परत तुला  
नको ते खेळणे ,नको ते कपडे ,तुझ्या मिठीत येऊ दे एकदा मला 
मोबाईल वरून रोज व्हीओडीओ कॉल करते ,बोल बोल म्हणतेस 
रोज काहीतरी आमिष दाखवून, "लवकर येते पिलू" म्हणून सांगतेस
खरंच आलीस तरी वेगळं काही जाणवणार  नाही आता 
मला आजीकडे सोपवून रोज ऑफिसला जातेस ,त्याचा नाही राग 
आजी तर मला आवडतेच ,पण मला हवास वाटतो तू दिलेला घास 
सगळे खेळणे आहे माझ्याजवळ ,पण तरी हेवा वाटतो त्या कामवालीच्या पोराचा 
काहीच नाहीय खेळायला ,पण माय माय म्हणताच साद  येतो आईचा 
मी रडेल म्हणून न सांगताच निघून गेलीस ,आजीनेच समजूत माझी काढली 
रोज निदान संध्याकाळी येतेस  म्हणून दिवस तरी निघून जायचा
आता तूच सांग संध्याकाळचा एकटेपणा ,घालवायचा  तरी कसा ? 
रात्र तर मला नकोशीच झालीय ,स्वप्नातील परी पण खोटी वाटायला लागलीय 
एकदा अस वाटत येऊनच बघावं लंडनला ,मला सोडून जावंच कस वाटलं तुला? 
छोट्या छोट्या गोष्टींवरून आता खूप रडायला येत ,सगळाच खेळ  निरस होऊन जातो 
बाबा पण सारखा कामच करतो ,दया आली  माझी की थोडावेळ जवळ घेऊन बसतो 

एक प्रश्न विचारावासा वाटतो ग तुला ? असच सोडून जायचं होत तर 
या जगात आणलास कशाला ???

एकदा तरी नक्की या माझं नवीन घर पहायला

एकदा तरी नक्की या माझं नवीन घर पहायला 
किती छान सजवयलय या निर्जीव जीवाला
कौतुक करता करता तोंड  थकत नाही माझं 
डोक्यावर मात्र वाहतोय इ एम आय  च ओझं  
पार्किंग मध्ये खाली कार उभी आहे माझी ऐटीत 
पैशाच्या या झाडाला वाढवतोय नात्यांच्या मातीत 
हवा उजेड भरपूर येतोय दार खिडक्यांमधून 
सुंदर दृश्य सुद्धा दिसत बघा बालकनीमधून 
आईबाबांचा मात्र  श्वास कोंडतोय या शांततेमधून 
ते मात्र जाणवत नाही या भौतिकतेच्या पडद्याआडून 
आईच देव देव आणि  मंदिर आता खूप लांब राहिलय 
चार भिंतीतच तीच सगळं विश्व येऊन थांबलय 
सगळंच घर कस आधुनिकतेनी भरभरून  नटलंय 
आईने जपून ठेवलेली  संस्कृती  उंबरठयावर आलीय 
गावी घरी आलेला पाहूणा ढेकर देऊन जायचा 
तेव्हा समाधानाने बाबांचा चेहरा उजळून निघायचा 
दर रविवारी घेऊन जातो सगळ्यांना  महागड्या हॉटेलला 
तिच्या हातची प्रेमळ चव नाहीच येत त्या जेवणाला 
त्यांचा मुळीच आरोप नाही माझ्या या घराला 
पण खरंच मी पात्र आहे या कौतुकाला?

मृत्यू ...

माणसाचं काय आयुष्य असतं??
 
ना जन्म स्वतःच्या हातात आहे ना मरण
कसा हा प्रकृतीचा अजब गजब नियम
चालता फिरता, प्रवासाचं अचानक थांबणं
काल नवीन कपड्यात बघितलेल्या व्यक्तीला
आज पांढऱ्या कपड्यात गुंडाळून नेणं

चार लोक उचलून नेतात  त्या अबोल देहास
रडण्याचे, हुंद्क्याचे आवाज चिरती आसमंतास
थोडी दूरपर्यंत सोबत हि लोकांच्या गर्दीची
पुढच्या प्रवासाची  वाट मलाच माझी ठरवायची 
लाकडावर ठेवलेल्या शरीराला सोबत न मिळे कुणाची

घर ,दार ,नाते,पैसा सगळे  जिवंतपणाचे खेळ हे
आज यातले काहीच सोबत नाही घेता आले
देहाला जळताना पाहून शांत सगळे उभे राहिले
आज मध्ये अडवायला सुद्धा कोणीच नाही आले
आज खरं जीवनाचे दर्शन मला झाले

आयष्याच्या गणिताचा अंत हा शून्यातच झाला
बेरीज वजाबाकी करून जीव हा पुरता थकला
उभ्या जीवनात बहराला माझ्या जरी निशिगंध
तरी शेवटी ललाटी लिहलेला असा हा अंत 
काय म्हणावे याला हा शेवट कि आहे आरंभ

  ज्या देहाच्या मागे धावलो तोच नश्वर होता
मला एक दिवस नेणारा मृत्यू हाच शाश्वत होता
आत्म तत्व सोडून देहाला सत्य समजणारा माझा मूर्खपणा होता !!

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

घेतले मी पहिल्यांदा हातात जेव्हा तुला 
आनंदाच्या  अश्रूंची साथ होती भावनांना 
तुझ्या बंद पापण्यातूनही ओढ बघण्याची सरे 
तुझे ते निरागस रूप मज लोभस भासे  
सुखावून गेले मी तुझ्या एकाच स्पर्शाने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

तुझ्या बालपणीच्या आठवणीत मी नेहमीच रमते 
भात खाऊ घालण्यापासून ,सगळे क्षण पुन्हा आठवते 
पाहिलं पाऊल तू ठेवलस ,अवघ जग मी जिंकलं 
जगण्याचा अर्थ गवसला ,तुझ्या बोबड्या शब्दाने 
सुगंध दरवळला ,तुझ्या खळखळून हसण्याने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

संध्याकाळी तक्रार करते तुझी ,कोर्टात बाबांच्या 
लाडिक रागावणं ,उगाचंच रुसणं ,फुगणं ,समजावणं 
हे असूनही  तुझ्या मस्तीने ,रुचकर होतोय प्रवास जगण्याचा 
गोष्टींकडे नावीन्याने बघण्याचा दृष्टिकोन आज उमगला 
सजीवतेचे मर्म पुन्हा उभे राहिले  फक्त तुझ्या येण्याने,


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 
तुझ्या पंखात मी काय बळ देऊ बाळा ??
आज तूच मला जाणिवांचे पंख देऊन उडण्यास शिकवले 
"आई "ह्या नात्याची   ओळख  झाली आज नवीन रूपाने 


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...