Tuesday 13 October 2020

मुलाखत : स्वतःचे विश्व शून्यातून स्थापन करणाऱ्या व्यक्तिमत्वाची.( शिरीष शांतीकुमार खंडारे,औरंगाबाद )

मुलाखत : स्वतःचे विश्व शून्यातून स्थापन करणाऱ्या व्यक्तिमत्वाची.(  श्री शिरीष शांतीकुमार खंडारे,औरंगाबाद )


आयुष्यात एक प्राथमिक गरज म्हणून नोकरी-व्यवसाय करणारे अनेकजण असतात. परंतु स्वतःला काय आवडतं हे जाणून त्यामध्येच वैयक्तिक आवड जोपासत डोळ्यांसमोर निश्चित उद्दिष्ट ठरवून व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण घेणे, त्यानुसार मार्ग आखत योजनाबद्ध सुरुवात करणे, व्यवसायाचा नियोजनपूर्वक टप्प्या-टप्प्यांत विस्तार, नवनवीन आव्हानांच्या शोधात स्वतःतील कौशल्यगुणांना वाव देत राहणे हे सर्वांनाच जमते असे नाही. . त्यांनी केलेले मार्गदर्शन हे समाजातील युवक पिढी साठी खूप महत्वाचे आहे. एक सुदृढ पिढी व्यवसायात उतरावी आणि स्वतः बरोबर समाजाची प्रगती व्हावी ह्यासाठी त्यांनी मोलाचे सल्ले दिले आहेत . अतिशय सुंदर आणि सोप्या शैलीत आपले म्हणणे मांडण्याची श्री शिरीष भाऊंची पद्धत वाखाणण्यासारखी आहे . ज्याप्रमाणे नदी समुद्राला जाऊन मिळते आणि आपला रस्ता स्वतः निर्माण करते   त्याचप्रमाणे यशस्वी उद्योजक श्री शिरीष शांतीकुमार खंडारे ,औरंगाबाद ह्यांनी आपला व्यवसायचा रस्ता स्वतः निर्माण करून  त्याचबरोबर "हाय टेक" चा ठसा सर्वत्र उमटवला. नदीच्या प्रवासावर हिंदी कवी श्री प्रमोद तिवारी ह्यांनी  लिहलेल्या ओळी त्यांच्यासाठी सार्थ ठरतात  



प्रचलित गतियों से बचना

अपना पथ खुद ही रचना

अपनी रचना में तुमको छलकेंगी गंगा जमुना

अपना पथ अपना होगा,अपना रथ अपना होगा

अपनीही होगी फिर रफ़्तार

अपनी कश्ती........  अपनी पतवार, नदिया

धीरे धीरे बहना नदिया घाट घाट से कहना


१) आपल्या व्यवसायाची कल्पना आपल्याला कशी सुचली ?

- स्वतःचा व्यवसाय करायचा हे इंजिनीरिंग करतांना डोक्यात होते परंतु नक्की काय करायचे हे माहिती नव्हते .औरंगाबाद शहर सोडायचे नाही हे माझे निश्चित होते.  आजोळी मामांचा व्यवसाय मी लहानपणा पासून बघत होतो. पालकांकडून व्यवसाय चालू करण्यासाठी पूर्ण पाठिंबा होता. परंतु नक्की काय करता येईल ह्याची दिशा ठरत नव्हती. दीड वर्ष  मी औरंगाबादला बजाज ऑटो मध्ये नोकरी केली, तिथे कर्मचारी वर्गाचा संप सुरु होता त्यामुळे सामान उचलण्यापासून ते कस्टमर ला पोहचवण्यापर्यंतचे काम मला करावे लागत होते. पण इतका सगळा अनुभव गाठीशी पडला हे मला चांगलेच फावले. नोकरी करत असताना मला खूप चांगली संधी चालून आली. मला अशी पोस्ट मिळणार होती ज्यासाठी लोकांना १०-१० वर्षे वाट पहावी लागली असती, पण ते नाकारून मला स्वतःच व्यवसायच करायचा आहे असे मी ठाम ठरवले होते. एम बी ए करतांना एका मित्रासोबत नवीन व्यवसाय करण्याच्या कल्पना जुळून आल्या आणि "हाय टेक" च्या प्रवासाला सुरवात झाली .


२) उद्योजक होण्यासाठी आपली मुख्य प्रेरणा शक्ती कोणती होती?

माझ्याकडे आईचे सगळेच भाऊ व्यवसायात होते त्यामुळे मी लहानपानपासून ते बघतच होतो तसेच बाबांची शिस्त प्रियता आणि काटकसर हे माझ्या व्यवसायाच्या सुरवातीला खूप मोलाचे ठरले. बाबा मला त्यांच्यासमोर बसवून व्यवसायात गुंतवलेला पैसा काढायचा नाही किंवा होणार खर्च हा कर्ज काढून फेडायचा नाही असे एक ना अनेक अनमोल धडे देत होते.. मी माझा व्यवसाय चालू केला तेव्हा ते रोज संध्याकाळी मला दिवसभराचा आढावा विचारत असे .सगळे व्यवहार पारदर्शक ठेवण्याबाबतीत त्यांचा कटाक्ष असायचा. चैनीच्या गोष्टी वर पैसा खर्च करणे हे त्यांना पटत नसे. मला दिलेल्या पॉकेट मनी मधूनच माझी कपडे ,सिनेमा , सहली ह्या गरजा पूर्ण करायच्या वरखर्च बाबांकडून मिळत नसे त्यामुळे एक काटकसर करण्याची सवय मनाला लागली .  उधार घेतलेले पैसे हे बचत मधून  फेडता यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त उधारी करायची नाही हि शिस्त खूप उपयोगी पडली. व्यवसायात गेलेली गुंतवणूक आम्ही अजूनही वैयत्तिक कामासाठी वापरत नाही खूपच निकडीचे प्रसंग उद्भवला तरच ती वापरण्यात येते त्याची परतफेड हि कालांतराने केली जाते. हि बाबांनी शिकवलेली शिस्त व्यवसायात खूप उपयोगी पडली. माझे बाबा  माझे प्रेरणा स्रोत होते


3) आपण आपल्या कंपनीचे नाव  "हाय टेक"कश्यावरुन ठेवले? 

कंपनीचे नाव ठेवण्यामागे एकच उद्देश होता आपण जे मार्केट मध्ये उत्पादन देतोय ते ह्या नावावरून ओळखले जावे. ह्या नावातून लोकांना परिचय व्हावा. आम्ही आमचे उत्पादन हे दारोदारी जाऊन न विकता कस्टमर च्या प्रश्नाला गुणवत्ता पूर्वक उपाय सुचवणे हेच आमचे ध्येय आहे त्यामुळे हाय -टेक ह्या छताच्या खाली आमच्या अनेक कंपन्या चालतात.माझ्याकडे भांडवल खूप नसल्यामुळे मी उत्पादन करू शकत नव्हतो म्हणून मी ट्रेडिंग पासून सुरवात केली .माझ्या कौशल्याचा पूर्णतः उपयोग व्हावा असे मला काहीतरी सुरु करायचे होते. सगळ्यात पहिली कंपनी हाय टेक एंटरप्राइज म्हणून निर्माण झाली. कस्टमरला आलेल्या कुठल्याही समस्येचे निराकरण करणे आणि नवीन येणारे तंत्रज्ञान वापरून त्याला सोडवणे ह्यालाच कन्सेप्ट सेल्लिंग असे म्हणतात हे आम्ही मुख्यकरून करतो . ह्यासाठी बाजारात येणारे नवीन नवीन तंत्रज्ञान आम्ही अमलात आणतो आणि  कालांतराने कालबाह्य झालेले तंत्रज्ञान आम्ही काढून टाकतो.  हाय टेक कंपनी  सोलुशन देणे तथा कन्सेप्ट सेल्लिंग ह्या नावाने मार्केट मध्ये नावाजलेली गेली . माझ्या कंपनीचे स्वरूप समजणे हे थोडे अवघड आहे . कारण आम्ही प्रॉडक्ट विकत नाही . 


४) आपल्या कंपनीसाठी आपण निधी कसा वाढवला?

मी नोकरी करत असताना माझी मासिक आय १२५० रुपये होती. ते पैसे मी जमा करत होतो. लग्न होईपर्यंत बाबांकडून मला मासिक पॉकेटमनी १०० रुपये मिळत होता तेच पैसे मग मी महिन्यातून एक दोन सिनेमा किंवा कधी कधी डोसा खाण्यात घालवीत असे तसेच वर्षभरात काही ड्रेस मी ह्याच पॉकेट मनी मधून विकत घेत  होतो . २४,००० रुपये, हि व्यवसायात केलेली माझी पहिली गुंतवणूक माझ्या जमा खर्चातून आली होती.आजही आम्ही कंपनीचे पैसे वेतन म्हणून  उचलतो . कालांतराने ही वेतनराशी वाढत गेली एवढेच पण व्यवसायामध्ये गुंतवलेला आणि झालेला नफा आम्ही त्यातच गुंतवतो . आजच्या तारखेला माझ्या कंपनीचा टर्न ओव्हर १५० करोड एवढा आहे. हा इथपर्यंत पोहचण्यासाठी मला बरेच वर्ष कठोर परिश्रम घ्यावे लागले. 


५) आपल्या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारची संस्कृती अस्तित्वात आहे आणि आपण ती कशी स्थापित केली?

आमच्याकडे मुक्त आणि पारदर्शक कार्य पद्धती आहे. अगदी लोवर स्टाफ सुद्धा माझ्यापर्यंत विनाप्रयास पोहचू शकतो. जिथे जिथे समस्या आली  तिथे तिथे मी स्वतः जाऊन ते प्रश्न सोडवतो किंवा स्टाफ ला प्रोत्साहन देतो. एका परिवार मधील सदस्य म्हणून आम्ही सगळे वावरतो. बरेचदा स्टाफ च्या खाजगी समारंभाला मी स्वतः सहपरिवार हजेरी लावतो परंतु आता कामाच्या व्यापात हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. एकंदर निरोगी असे वातावरण आपल्या कंपनी मध्ये आहे.आमच्या काही सहली जातात तसेच कर्मचारीसाठी लागणारे इन्शुरन्स आम्ही देतो. कंपनीच्या turn ओव्हर हा सुद्धा सगळ्या कर्मचारी ला माहिती असतो कोणापासून काहीही लपवून ठेवलं जात नाही . 


६) उद्योजक असण्याने आपल्या कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम झाला आहे?आपल्या दिवसाचे नियोजन काय असते ?

एक उद्योजक म्हणून मलाही परिवारासाठी पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही ह्यासाठी मी माझी धर्मपत्नी सौ. नीता खंडारे हिला श्रेय देऊ इच्छितो. मी जर ठरवलं असतं की मला १० ते ५ ची नोकरी करून आनंदी आयुष्य जगायचं आहे तर माझ्यामधील कर्तृत्व मी कधीच बाहेर काढू शकलो नसतो. मी कधीही पैसा हे लक्ष ठेऊन काम केलं नाही . मला कामावर प्रेम होत आणि मी ते करत गेलो पैसा हा त्याबरोबर  मिळत गेला. त्यामुळे हे सगळं उभं करतांना थोड्याफार प्रमाणात माझ्या परिवाराला कष्ट सहन करावे लागले हे मी नाकारू शकत नाही.कॉलेज मधील दिवसांपासून मी लवकर उठतो . सकाळचा १ घंट्याचा वेळ हा माझा वेळ असतो ज्यामध्ये मी फिटनेस संबंधी क्रिया करतो. सकाळचा वेळ मुलांसोबत आणि परिवारासोबत घालवतो जेवण करून १०:३० पर्यंत ऑफिस ला पोहचतो . जवळपास १० ते १२ तास काम मी अजूनही करतो . गेली २0 वर्ष रविवार हा माझ्यासाठी,परिवारासाठी  मी राखून ठेवलेला दिवस आहे . ह्यादिवशी ऑफिस संबंधी कुठलहि काम मी करत नाही.

माझ्या यशामध्ये माझी पत्नी नीता खंडारे हिचा मोलाचा वाटा  आहे . सौ नीता ह्यांनी  बी कॉम ची पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले आहे. लग्नानंतर २ वर्षांनी एम कॉम ला ऍडमिशन घेऊन मराठवाडा विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवले आहे. मुले मोठी झाल्यानंतर एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीचा अनुभव घेऊन त्या आता स्वतःच्या दोन शाळा औरंगाबाद इथे चालवतात . पूर्ण दिवस वेळ देऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी शाळा प्री स्कूल पर्यंतच मर्यदित ठेवली आहे. तसेच माझी मुलगी शौरी हिने बी टेक एम बी ए ची पदवीधर शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे आणि एक कर्मचारी म्हणूनच ती आता मला कंपनीच्या कामात मार्केटिंग च्या क्षेत्रात काम करते आहे . माझा मुलगा सोम हा नुकताच १० ची परीक्षा ९४. २ टक्के घेऊन उत्तीर्ण झाला आहे. पैंटिंग हा छंद सांभाळत तो पुढचे शिक्षण पूर्ण करत आहे  



७)आपल्या कंपनीच्या इतर कुठे कुठे शाखा आहेत?त्या आपण कशा व्यस्थापित करता?

सुरवातीपासून माझे असे धोरण होते की सगळे स्वतः करण्यापेक्षा काम वाटली गेली पाहिजे आणि त्या कामांचे हक्क आणि जबाबदारी त्या व्यक्ती कडे पूर्णतः असली पाहिजे त्यामुळे खूप लोक जोडली गेली .त्यामुळेच मी माझ्या कंपनीचा विस्तार करू शकलो . सगळीकडे मीच धावायचं असे जर झाले असते तर कंपनीचा सर्वांगीण विकास हा मला शक्य झाला नसता . औरंगाबाद सोडून पुणे ,नाशिक,बंगलोर तसेच उत्तरांचल मधील रौद्रपूर इथे आमची कंपनी ची शाखा आहेत . मी स्वतः तिथे महिन्यातून एकदा किंवा काही ठराविक काळानंतर भेट देतो तिथले सगळे व्यस्थापन तिथली स्थानिक टीम पार पडते . तिथला सगळा  आढावा माझ्यापर्यंत पोहचतो . आणि मी औरंगाबाद च्या ऑफिस मधून सगळे व्यवस्थापन करतो. 


८) आपली सर्वात मोठी भीती काय आहे आणि आपण भीतीचे व्यवस्थापन कसे करता?

व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे माझ्याकडे वेळ खूप कमी असतो . त्या वेळामध्ये नात्यागोत्यातील काही समारंभला हजेरी लावणे, फॅमिली साठी वेळ देणे मित्रांना भेटणे, नातेवाईकांकडे जाणे हे सगळे बसवणे अवघड होते. त्यामुळे सगळ्यानांच न्याय देणे शक्य होत नाही. ह्या गोष्टीसाठी मला किंवा इतर माझ्या आप्त लोकांना त्रास सहन करावा लागतो.नातेवाईक, मित्र की व्यवसाय ह्यामधून एक निवडणे हे खूप कठीण असतं. जो निर्णय मला सर्व बाजूनी योग्य वाटतो तो मी घेतो, तसे अमलात आणतो. वेळेचं यवस्थापन करणे आणि सगळ्या गोष्टींना न्याय देणे ही माझ्यासाठी भीती ची एक गोष्ट ठरते .


९) आपले आदर्श काय आहेत?

आदर्श म्हणायचे झाले तर काटकसर आणि शिस्त ह्यामध्ये माझे बाबा माझे आदर्श आहेत त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. माझे सासरे ह्यांच्याकडून मी उत्साह टिकवायचा कसा हे शिकलो आणि बरीच पुस्तक त्यामध्ये रतन टाटा ह्यांचे आत्मचरित्र, महाभारत असा अनेक पुस्तकांचा उल्लेख करता येईल.माझ्या यशामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा पुस्तकांचा आहे. मी आजही माझ्या लायब्ररी मध्ये नवीन नवीन पुस्तके ठेवतो हा कोरोनाचा कालावधी माझ्यासाठी नवीन शिकण्याची ,नवीन पुस्तके वाचण्याची संधी घेऊन आला होता . सोशल मीडिया वर असणारे फायनान्स , राजकारण , व्यवस्थापन ह्या संबंधी चे बरेच व्हिडीओ मी बघितले त्यामधून शिकलो . शिव खेरा , टी .टी रंगराजन , अनिल लांबा ह्यांची पुस्तके मला सगळ्यात जास्त प्रोत्साहित करतात . स्वतःला उत्साहित ठेवण्यामध्ये मला पुस्तकांची खूप मदत होते . शिकण्यासाठी कधीही थांबायचं नाही  हा माझा मूलमंत्र आहे 


१०) यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही प्रकारची पद्धत किंवा सूत्र आहे जो आपण सर्वांना सांगू इच्छिता?

मी दिवसभर जे काम करतो ते एकच लक्ष ठरवून करतो काम झाल्यावर मनाला शांतता मिळायला पाहिजे आणि काम केल्याचा आनंदही .माझे मन नेहमीच  काहीतरी नवीन करण्यासाठी, नवीन शिकण्यासाठी धडपडत असते आणि त्यामुळे मला ह्या व्यवसायामध्ये स्थिर राहण्यासाठी बळ मिळत गेलं, आजही मी माझा उत्साह टिकवून आहे .मला काम करण्याचा दबाव हा कधी वाटला नाही मी माझे काम मनापासून जगतो . मी  शासकीय महाविद्यालय औरंगाबाद इथे रोबोकॉन नावाची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते तिथल्या मुलांना लागणारे सर्व साहित्य आणि मार्गदर्शन हे मी माझ्या कंपनी कडून दरवर्षी करतो . आणि पहिल्या तीन मध्ये ही टीम बक्षीस जिंकत आली आहे. समाजातील कुठल्याही मुलाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्यास मी कधीही मार्गदर्शन करायला तयार आहे. 


११) व्यवसायातील आपला सर्वात समाधानी क्षण कोणता आहे?

एक सगळ्यात मोठ्या कंपनी कडून मला कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता जी बाजारात एक नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाते तसेच ह्या जानेवारी मध्ये इकॉनॉमिक टाइम्स मधून भारतात असणाऱ्या १०८ ग्रोविंग (growing) कंपनी मध्ये नामांकन झाले होते तो आमच्या सगळ्यांसाठीच एक अद्भुत क्षण होता.हा अवॉर्ड मिळाला त्याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती एक दिवस अचानक एक मेल इनबॉक्स मध्ये आला ,आजकाल खोटे मेल बरेच येतात म्हणून दुर्लक्षच केलं पण सहज इकॉनॉमिक टाइम्स च्या वेबसाईट वर बघतिलयावरच खात्री पटली . स्टॅटीस्टिका नावाची एक जागतिक कंपनी आहे ती सगळ्या बिसनेस चा रेकॉर्ड गोळा करते ज्यामध्ये कस्टमर कडून घेतलेला फीडबॅक ला जास्त प्राधान्य दिले जाते आणि मग नामांकन ठरते . हि प्रक्रिया बरीच बारकाईने केली जाते हे आम्हाला नंतर कळले.  त्यांच्या पातळीवर उतरणे हि एक अवघड बाब होती पण आमची कंपनी नामांकित झाली हि खरंच एवढ्या वर्षाची मेहनत फळाला आली  असे वाटते. 


१२) यशस्वी उद्योजक बनू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन पदवीधरांना तुम्ही कोणता सल्ला द्याल?

कुठल्याही व्यवसायामध्ये सफल होण्यासाठी  मेहनत ,प्रामाणिकपणा आणि उत्साह ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत असे मला वाटते. जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही आणि कुठल्याही गोष्टीसाठी शॉर्टकट हा नसतोच . जर तुम्हाला असं आढळल कि एखादी गोष्ट मेहनत न करता मिळतेय किंवा फुकट मिळते आहे म्हणजे समजावं त्या गोष्टीत काहीतरी गडबड आहे. हार्ड वर्क आणि त्याचबरोबर स्मार्ट वर्क हा यशस्वी होण्याचा  मूलमंत्र असू शकतो .सगळ्यात महत्वाचा सल्ला मला द्यावा  वाटतो तो म्हणजे मेहनतीला दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही. कुठलीही गोष्ट तुमच्या आरोग्यापेक्षा मोठी असू शकत नाही ."जान है तो जहाँन है ". आरोग्याशी  तडजोड करून काहीही मिळवू शकत नाही. व्यायाम, योगा, प्राणायाम आणि योग्य आहार याकडे दुर्लक्ष करू नका.


१३) जगभ्रमंती ह्याबद्दल तुमचे काय मत आहे ?तुम्ही कुठे कुठे फिरून आला आहात ?

सहल आणि जगभ्रमण करणे हा  आमच्या  परिवाराचा आवडता छंदच आहे.  मी आई बाबांसोबत धार्मिक सहली ला बरेचदा जात होतो . कंपनीच्या निमित्ताने आता बरेच जग स्वतः पहिले आहे . कुठेही गेलो तरी आम्ही तिथे फिरण्यासाठी लोकल साधनांचा वापर करतो जेणेकरून तिथली संस्कृती जवळून बघता यावी. मागे चीन ला गेलो तेव्हा तिथल्या लोकांची कार्यक्षमता पाहून मी भारावून गेलो . जगात कुठेही गेलो तरी मला तिथले कामाचे क्षेत्र ,तिथली संस्कृती अभ्यास करायला आवडते आणि ती आपल्याला भारतात आणता येईल का ह्याची मी आवर्जून दखल घेतो . मी पूर्ण यूरोप फिरलो आहे ,चीन जपान ,कोरिया ,थायलंड ,मलेशिया असे अनेक देशात मी भ्रमण  केले आहे.माझा जगभ्रमंतीचा अनुभव उल्लेख करतांना मला चीन चा अनुभव नमूद करावासा वाटतो , तिथे शाकाहारी जेवण मिळवणे हे सगळ्यात अवघड काम होते मी रोज माझ्यासोबत आणलेला नास्ता हॉटेल मध्ये बनवून खात होतो ऑफिस मधील एक सहकारी मला रोज जेवणासाठी विचारात होता पण मी फक्त फळे आणि जूस घेतो हे त्याला लक्षात आले. त्यानी मला शाकाहारी जेवण मिळावं  म्हणून खूप प्रयत्न केले .आणि एक बुद्ध लोकांचा समूह होता जो वेगान होता तिथून माझ्यासाठी जेवण मागवून आणले. 


१४)कंपनी मध्ये इतके लोक काम करतात त्यापैकी कधी वाईट अनुभव आले का ?

तसे खूप वाईट अनुभव कधी आले नाहीत ह्याला कारण म्हणजे मी दाखवलेला विश्वास . तरीही काही ओळखीची लोक मला  असे भेटले ज्यांनी माझ्या चांगलेपणाचा गैरफायदा घेतला . एक जरुरत असलेल्या युवक तरुणाला मी कंपनी मध्ये ठेऊन घेतले होते त्याचा कामाचा परफॉर्मन्स हा चांगला नव्हता तरीही आज ना उद्या सुधारेल म्हणून मी त्याला शिकवत गेलो पण काही दिवसांनी मला त्याचा   कंपनी सोडून जातोय असा एकई-मेल आला आणि काही दिवसात समजले कि तो आपल्या स्पर्धक असलेल्या कंपनी साठी नोकरी करतोय . ह्या घडणाऱ्या गोष्टींवरून विश्वास ठेवण्यात मी स्वतःला आणि येणाऱ्या कर्मचारीला पारखून घ्यायला शिकलो. 


१५) आपल्या समाजातील मुलांचा कल  हा स्वतःचा व्यवसाय न करता नोकरी कडे जास्त आहे ह्या संबंधी आपले काय मत आहे?

हो , हे खरं आहे . एक म्हणजे मेहनत करायला आजची पिढी तयार नसते आणि गावात राहिलो तर मुलगी मिळणार नाही भीती जास्त असते. मला मुलांपेक्षा त्यांच्या आई वडिलांना सल्ला द्यावासा वाटतो की जर तुमच्या मुलाची व्यवसाय करण्याची तयारी असेल तर त्याला प्रोत्साहन द्या जास्तीत जास्त काय होईल की थोडेफार पैस्यांचे नुकसान होईल पण त्याला एक प्रयत्न नक्की करू द्या त्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे ठरेल . त्याचबरोबर शहरात जाऊन कमी वेतन ची नोकरी करणाऱ्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा गावामध्ये स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या मुलाला मुलगी द्या. हि मानसिकता बदलणे आज समाजासाठी खूप आवश्यक आहे . 


-पूजा वैभव परतवार 

(खराडी, पुणे )

9766426536

Friday 9 October 2020

जगणं आणि शिकणं हे वेगळं कसं ?

 जगणं आणि शिकणं हे वेगळं कसं ?


माझा मुलगा सक्षम आता त्याचे वय वर्षे ६.५ त्याचा जन्म  होण्याच्या आधीपासून त्याला  वाढवण्याच्या अनेक आखीव रेखीव चौकटी आम्ही आखल्या होत्या . आपण त्याला ते सगळं द्यायचा प्रयत्न करायचा जे आपल्याला भेटू शकले नाही  त्यामध्ये  शिक्षण ह्याचे बांधलेले ठोकताळे अधिक होते .  तो ३ वर्षाचा झाला तेव्हापासून आम्ही त्याच्यासाठी बेस्ट काय काय करता येईल ह्याची यादी लिहायला घेतली. अनेक दिवस बेस्ट शोधण्यासाठी  प्रयत्न देखील केले .  उच्च सुविधा आणि ख्यातनाम असलेली शाळा शोधण्यासाठी आम्ही अनेक उंबरठे पालथे देखील घातले . पण बेस्ट शिक्षण द्यायचं म्हणजे काय काय द्यायचं ह्याची यादी जुळून येत नव्हती . मग आजूबाजूच्या  अनुभवी पालकांकडून बेस्ट म्हणजे काय ते आपल्या मुलांना काय देतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,त्याने पाहिजे तसे समाधान झाले नाही .  पॅरेंटिंग चे कार्यशाळा ला हजेरी लावली पण तरीही मनाला पटेल अशी  बेस्ट ची यादी तयार होत नव्हती . 

 सक्षमला वाढवतांना आयुष्यात कुठेही कुठल्याही गोष्टीसाठी  कमी पडू द्यायचं  नाही हा  आमचा निष्कर्ष किंवा निर्धार होता. मग आपणच ह्या प्रश्नाचे उत्तर शोधूया आणि त्यानुसार यादी बनवूया असे ठरवले. आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या पालकांचे निरीक्षण करण्यास सुरुवात  केली . समाजातील सगळ्या स्थरातील पालक बघितले त्यांच्या सुद्धा मुलांना बेस्ट देण्याच्या व्याख्या समजून घेतल्या .  middle class लोकांची धडपड पहिली ,higher क्लास लोकांचा मुलांना दिलेला टॅबलेट पासून एअर कंडिशनर गाड्या ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली.  अगदी कामवाली बाई सुद्धा तिच्या मुलाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करते हे आढळून आले . तिचे बेस्ट म्हणजे मुलांना पोटभर जेवायला देणे .त्यासाठी ती खूप धडपड करते असे दिसले.हे मुलांना बेस्ट देणं समाजातील वेगवेगळ्या स्थरातील लोंकांप्रमाणे  बदललं . पण हे पालकांच्या दृष्टिकोनातून बेस्ट होत ज्याला हे बेस्ट द्यायचं होत, त्याच्या अपेक्षा मात्र शून्य होत्या . हे सगळे बघत असतांना जाणवले   हा पॅरेंटिंगचा रस्ता सक्षमला  मोठं कसं  करावं ह्या विषयापेक्षा आपलयाला  आई बाबा म्हणून मोठं कसं होता येईल ह्याचा   जास्त आहे. तो त्याचा मोठा होतो आहे अनुभवानी समृद्ध होतो आहे त्याचा तोच शिकतोय .

 आपण आपल्या  स्टेटस ला शोभेल अशी शाळा शोधत होतो पण खरं म्हणजे त्याच्यासाठी शाळा हे एक बंधन आहे  त्याच्या निरागस खेळण्यावर आक्रमण आहे . शाळा ह्या पद्धतीला विरोध नसून त्याचे झालेले बाजारीकरण हा प्रगतीला धोका आहे ह्याची खात्री पटली.शाळेतील साधा स्पोर्ट डे पण एका चकचकित  कागदाचे वेष्टन देऊन पालकांसमोर जाहिरात करून मांडला जातो. त्याचा गाभ्यात न पोहचता आपण त्या रंगीत  कागदावर भाळतो. हा स्पोर्ट डे मुलांना मजबूत बनवण्यासाठी नसून एक स्पर्धात्मक जीवन जगण्याची नांदी आहे.म्हणूनच आम्ही ते झगमगाट असलेलं किंवा तसं दाखवलं जाणारं शाळा ह्या प्रकरणावर पूर्ण विराम दिला आणि  आम्ही आमची स्वतःची होमस्कूलिंग ची आड वाट निवडली.  


 ज्या शिक्षणाच्या आणि जगण्याच्या साच्यातून आपण गेलो आहे तो बदलणं आमच्यासाठी एक आव्हान होत .  शिकण्यासाठी शाळा हेच एक माध्यम आहे, फक्त पुस्तकं वाचून आणि परीक्षा देऊन च शिक्षणाची पूर्तता होते ह्या चौकटी तुन आम्हाला बाहेर यायला स्वतःला unlearn करायला बराच कालावधी लागला आणि अजूनही पूर्णपणे जमले असे नाही . जगणे आणि शिकणे हे वेगळे नाहीच मुळी. शिकणे आणि जगणे हि एक सोबत सोबत चालणारी क्रिया आहे ह्याचा सुंदर अनुभव गाठीस पडतोय. जसं नैसर्गिक पणे  बोलायला, खायला, खेळायला चालायला शिकता येत  तितकंच सहज लिहायला आणि वाचायला ही शिकता येत. 



कुठलंही लक्ष्य साधायचं नसल्यामुळे शिक्षणाचा प्रवास अनुभवता येतोय आणि हा प्रवासच त्याची मिळवलेली पुंजी बनेल  हे नक्की. अनुभवानी समृद्ध होणारी वाट सक्षमला स्वतःचा पोर्टफोलिओ बनवायला मदत करेल ह्याचा विश्वास वाटायला लागला आहे. आता सगळे बेस्ट  देण्याचे सामर्थ्य असून देखील अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठी पण कष्ट कसे घ्यावे लागतात ह्याची पायाभरणी आम्ही करतो आहे आणि मला सांगताना आनंद होतो  हेच आमचे बेस्ट आहे.

Monday 21 September 2020

माहेर पणाला गेलेल्या आणि तिथेच अडकून पडलेल्या काकू

 सोसायटी मधील एक काकूंचा फोन आला "अगं आज घरी एखादी चक्कर मारशील का?"एरवी हे वाक्य खूप सहज होत मी सुद्धा लगेच उठून गेले असते कारण बाजूच्याच बिल्डिंग मध्ये जायचं होत . काकूंची सून गरोदर होती ५ वा महिना सुरु होता . भावाच्या मुलाच्या लग्नाला माहेरी गेलेल्या काकू लॉकडाऊन  मुळे माहेरच्याच झाल्या होत्या. काकूंचे "चक्कर मारशील का" हे वाक्य  आज खरचं चक्कर आणणारे होते .मला मात्र काकूंनी हक्काने फोन केला होता आणि तिला काहीतरी खावंसं वाटतं असेल किंवा काही त्रास होत असेल हे विचारून मला फक्त फोन वर समाचार दे एवढंच त्यांचं म्हणणं होत. तसं त्याही फोन करून विचारू शकणारच होत्या पण सुनेची रोजची वाक्य ठरलेली होती  "आई मी ठीक आहे तुम्ही काळजी   करू नका. "त्यामुळे मला फक्त खात्री करण्यासाठी समाचार घेण्याचे काम सोपवले होते.

माझ्यासाठी मात्र हे एक संकटच होत . मी जाणे हे लॉक डाउन च्या काळात सुनबाई ला कितपत आवडेल ह्यात शंका होतीच. काकूंचा मात्र रोज एक फोन येत होता माहेरी भावाच्या सुनेचे कौतुक करता करता न थकणाऱ्या काकू आज मात्र धर्मसंकटात पडलेल्या दिसल्या आज सून बाईची आवडती डिश केली होती पण तिला खायला डिजिटल माध्यम आज उपयोगाचं नव्हतं . तंत्रज्ञान कितीही  पुढारलेले असले तरी गरोदर सुने ची आवडती डिश आज आपण पोहचवू शकत नाही  ह्याची आमच्या मॉडर्न म्हणणाऱ्या काकूंना खंत होतीच आणि  त्यांनी  माझ्याकडे व्यक्तही केली. त्यांचं धर्मसंकट आता कोरोना च्या जाळया सारखे माझयापर्यंत येऊन पोहचलं होत  कोरोना मुळे काय करो आणि काय करोना ह्यामध्ये मी अडकले होते.

आणि एका कोरोनामय दुपारी जय्यत तयारी करून (मास्क ,गॉगल ,हॅन्ड ग्लोव्हस ,सॉक्स ) घालून मी निघाले ,बाजूच्या बिल्डिंग मध्ये हो ! ५ मजले चढत जाणे लिफ्ट चा वापर असूनही करायचा नव्हता ,दमछाक होऊन पोहचले ,दारावरची घंटी वाजवावी की कडी वाजवावी ह्या द्विधा मनःस्थिती मी होते. शेवटी कडी वाजवली दार उघडायला बराच वेळ लागला कारणहि तसेच होते ,दुपारच्या कोरोनामय उन्हात कोण आले असेल ?म्हणून नक्कीच प्रश्नवाचक चिन्ह सगळ्यांच्या चेहऱयावर निर्माण झालं होत . काकूंच्या सुनेनेच दरवाजा उघडला ते एक बरं झालं माझं काम थोडं सोपं झालं . माझं पूर्ण पॅकिंग बघून कोण असेल ???असा प्रश्न पडला असावा  मी लगेच तो दूर केला ,आणि येण्याचे कारण पण सांगितले . घरात ये आधी बस थोडा वेळ मग गप्पा मारू असे आमचे नाते होते पण मी घरात जाणार नाही आणि ती घेणार नाही असा अवघड स्तिथीत समाचाराची देवाण घेवाण झाली आणि सगळे क्षेम कुशल जाणून घेतले आणि काकूंना कळवते म्हणून काढता पाय घेतला .दुसऱ्या दिवशी सुनबाईनी काकुनी जी डिश बनवली ती स्वतः बनवली ती खाली आणि भरलेली प्लेट आणि रिकामी प्लेट  त्याचा फोटो facebbok वर शेयर केला आणि मला टॅग केले .

वा !!काकूंना आनंद झाला की सुनेने बनवून का होईना खालले ,सुनेला आनंद झाला आता सासूबाई परत कोणाला पाठवणार नाही  मलाही आनंद झाला खाली प्लेट का होईना पण त्यात मला टॅग केले .social media वरचे एक टॅग माझ्या नावाने ऍड झाले . 

कागदाची युनिव्हर्सिटी

 माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच  जणू या कागदातूनच विविध वळणे घेत घेत पार पडतो आहे . ह्या अक्षरांच्या आणि अंकाच्या सुबक भासणाऱ्या रस्त्यावरचे  पहिले वळण म्हणजे पहिली ते दहावी.   ह्या वळणावर प्रत्येक  वर्गाची  गुणपत्रिका  आणि विविध स्पर्धा परीक्षेचे प्रमाणपत्र ही  जमा पुंजी एकत्र  करत  मुक्काम पुढे जात होता. हे बालपणीचे विश्व खूप छान भासत  होते  सगळीकडे कौतुकाचा पाऊस होता , नातेवाईकांकडून कागदाच्याच  बक्षीसाची शाल पांघरली जात होती आणि सुट्टींमधील विविध शिबिरांचे प्रशंसापत्र ह्याची प्रचिती म्हणजे जणू काही उन्हाळ्यात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसेच! असे हे तिन्ही ऋतूंचे बालपण लवकरच सरले  . बारावीचा निकाल लागला पुस्तकांच्या  पानांवरील बारीक  बारिक अक्षरांमधुन वळण घेत "करिअर" ह्या रस्त्यावरचा टप्पा सुरक्षित पार पडला होता .म्हणून आईने  एका कागदावर छापून आलेल्या  अंकांसाठी   चिवडा , पेढा आणि  मटकी ह्याची पार्टी दिली तेही कागदी प्लेट मधूनच !अशी  आमची सोबत ऐन रंगात आली होती माझी कागदाला आणि कागदाची मला .

 इंजिनीरिंगला प्रवेश मिळाला दुसरे वळण सुरु झाले ,रस्ता थोडा अवघड होता.पण कागदाशिवाय पर्याय नव्हता. आमची सोबत  सबमिशन, जर्नल्स, पेपर्स आणि पुन्हा गुणपत्रिका अशी पूर्ण होत गेली. खरंच चार वर्षाचा तो प्रवास कागदाशिवाय अपूर्णच होता. 

 रस्ता संपत नव्हता ,प्रवास सुरूच होता.  दिवसांचे रकाने भरत ,चाकोरीचे कागद रंगवले  जात होते .
रस्त्यावर तिसरे वळण आले नागमोडीच ते. अनुभवांची साठवण कागदांसोबत  होतीच कागद कागद खेळता खेळता कागद हा  आयुष्याचा अविभाज्य भाग बनून बसला.  M.E चा कागद अक्षरशः स्वप्नांची पूर्तता होऊन पदरात पडला. 

अखंड फाईल मधून जाणारा हा प्रवास मुक्कामावर पोहचणारच होता . हाकेच्या अंतरावर Ph.D ची पदवी असतांना हा अंगवळणी पडलेला कागदांचा रस्ता अचानक बदलायला युनिव्हर्सिटी ने मजबूर केले  . कोरोना मुळे  एक नवीन क्रांती शिक्षण क्षेत्रात सुरु झाली होती .प्रत्यक्ष न येता कागद  डिजिटल रूपाने  जमा करण्याची पद्धत सुरु झाली होती .  

 डिजिटल मार्ग पत्करणे हे मलाच नव्हे तर टेबल वर  फाईलचा गठ्ठा जमा करून मागे  बसणाऱ्या  युनिव्हर्सिटी मधील प्रत्येकाला अनोखा होता . फाईल मध्ये दबून  गेलेली चष्म्याची चौकडी आता कॉम्पुटर  वर स्थिरावली होती .क्लिक करुन  सगळं काही साच्यात बसवू पहात होती . बाहेरूनच ग्रीन दिसणारी युनिव्हर्सिटी आता खऱ्या अर्थाने आतमधून सुद्धा गो ग्रिन होणार होती  . 

काहीहीअसो ही शेवटची पदवी डिजिटल रूपाने समोर येईल आणि कागद म्हणजेच सगळं काही असं मानणाऱ्या माझ्या सारख्या असंख्य लोंकाना कागदवाचूनहि सगळं निभावत ह्याची जाणीव होईल .
बालपणात निरागसपणे भेटलेला कागदाला स्वार्थी पणाचा वास कधी चिकटला कळलंच नाही.

सक्षम साठी होमस्कूलिंग चा पर्याय निवडताना हाच विचार आला, प्रशंसापत्र ह्या रूपाने कागदाशी मैत्री न करता तोच कागद मोरपीस बनून आला तर आयुष्य सुंदर होईल.

Saturday 18 July 2020

होमस्कूलिंग आणि परीक्षा

जेव्हा सक्षमच्या सगळ्या सोसायटी मधल्या मित्रांची परीक्षा असते तो काळ म्हणजे सगळीकडे शुकशुकाट पसरलेला असतो. एक शांतता सगळीकडे विखुरलेली  असते .कोपऱ्यात कुठेतरी बॅट , बॉल ,स्टंप धूळ खात पडलेले असतात ज्या सायकल वर पायडल मारून शर्यत लावली जाते ती सायकल पार्किंग मध्ये निपचित पडलेली असते .सोसायटी चे प्ले ग्राउंड एकदम सामसूम झालेले असते रोज मुलांच्या होणाऱ्या  किलबिलाटाची जागा  आता फक्त झोक्याच्या हवेने हलणाऱ्या आवाजाने घेतलेली असते. समस्त आई वर्ग हा वेगळ्या काळजीत गढलेला दिसतो सकाळचे मॉर्निंग walk असेल किंवा भाजी घ्यायला आलेला आई लोकांचा गोळका  असेल समस्त चिंता वाहून ह्या वावरत असतात त्यासाठी एकच असलेलं कारण म्हणजे सगळ्या मुलांची  नुकतीच  सुरु झालेली  परीक्षा. परीक्षेच्या काळामध्ये घरचे वातावरण बदललेले असते ,टेलिव्हिजन च्या आवडत्या सिरीयलस  आजी डोळे बारीक करून ,हळू आवाजात ऐकत असते ,आई काम लवकर उरकून रिविजन घेण्यात मग्न असते ,बाबा आपला आपला चहा स्वतः करून घेत असतात कारण काहीतरी वेगळं घडणार असतं  किंवा त्याला नको तेवढं महत्व देऊन आपण ओझं वाहत असतो. 
होमस्कूलिंग आणि परीक्षा ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास मी विविध पैलू उलगडून करायचा प्रयत्न केला.मला सापडलेले उत्तर मांडण्याचा प्रयत्न सक्षम च्या  निरागस विश्वातून करते आहे .  ते पैलू प्रश्न  स्वरूपाने समोर आले ते असे ... एवढे सुंदर ,वेगवेगळे आयुष्य बाहेर बघायला मिळत असताना आपण का ४ रूम च्या बंदिस्त कप्प्यामध्ये शिकावं ?आणि तेही केवळ परीक्षेसाठी त्यापेक्षा जगातील निरनिराळे  अनुभव घ्यायचे,स्वतः अनुभवायचे आणि आपले इवलुएशन करायचे असे झाले तर ?शिक्षण म्हणजे फक्त शाळा हे समीकरण थोडं बाजूला ठेऊन निसर्गात जाऊन शिकलो तर ? 
आजूबाजूचेच उदाहरण घ्या ना शाळा आहे म्हणून आपण कितीतरी परिवारातील कार्यक्रम जगायचे सोडून देतो पण परीक्षा पेक्षाही जास्त महत्वाचे आहे ते ४ वेगवेगळया स्वभाव असलेल्या लोकांना भेटणं  फक्त परीक्षा हे आयुष्य जगण्याचे अंतिम ध्येय असूच शकत नाही त्यापेक्षा सहज कुठल्याही वातावरणात सामावून जाणे हा धडा आपल्यासाठी जास्त महतवाचा असू  शकतो. जिथे जाऊ तिथल्या प्रकृती  सोबत  एकरूप होणे हा बदल स्वतःमध्ये घडवणे हि एक परीक्षा असू  शकते.  ह्याबाबतीत शहरातल्या मुलांपेक्षा मी छोट्या गावतल्या मुलांना खूप नशीबवान समजते कारण पुस्तकी म्हणजे कोणीतरी आधीच लिहून ठेवलेल्या एखाद्या धड्यापेक्षा स्वतः काहीतरी बनवून गिरवलेला ,अजमावलेला धडा हा जास्त आनंददायी असू शकतो.एखाद्या पहिलीतल्या मुलाला जस झाड दाखून पान ,फळ ,फुल हे त्याचे विविध अंग आहे आणि परीक्षेत ते विचारतात म्हणून खूप महत्वाचे आहे असे सांगून  फक्त डोळ्यासमोर काही मार्कांसाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हे त्या मुलासाठी अंतिम ध्येय असू शकते ह्याच्या विरुद्ध  त्यापेक्षा बी पेरल्यापासून झाड मोठं होई  पर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवने आणि त्याचे संवर्धन करणे हे आपले अंतिम ध्येय आहे हे शिक्षण एक सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मदत करते ज्याची आता सगळ्यात जास्त गरज आहे. शाळेची परीक्षा आणि जीवनाची परीक्षा ह्यामध्ये किती हा दुरावा . जीवनात पहिले अनुभव येतात ,त्याबद्दलचे असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात  आणि मग काय वाईट ,काय चांगले हे पडताळून बघून मग योग्य ते निर्णय घ्यावे  लागतात. पण शाळेच्या परीक्षेत मात्र ह्याच्या विरुद्ध ,सर्वात आधी वेगवेगळ्या  विषयाचे ज्ञान डोक्यात  फिट्ट बसवायचे मग पुन्हा त्याला आठवून कागदावर उतरवायचे आणि त्यावरून मूल्यमापन ठरवायचे. 
दोन अनुभव मला ह्यामध्ये नमूद करावेसे वाटतात पहिला  हा माझा स्वतःचा आहे ,इतक्यात परीक्षा म्हणजे काय ह्यावर घरात बरेच संवाद होत होते . मी सक्षम पुढे मांडलेला प्रश्न.... आपण  तुझी परीक्षा घ्यायची का ?इतक्यातच तू सायकल चालवायला शिकलास ना मग आपण एक टेस्ट घेऊया . मला निरुत्तर करणारे त्याचे उत्तर ... "नको इतक्यात ..अजून मला बरेच शिकायचे आहे ... मला परीक्षा कधी द्यायची हे मी ठरवेल आणि तुला सांगेल  !!". होमस्कूलिंग मध्ये परीक्षा देण्याचा हक्क हा मुलांकडे अबाधित राहतो.मला माझ्यामध्ये असलेल्या क्षमता तपासून बघायच्या आहेत असं जेव्हा तो ठरवेल  तेव्हाच इवलुएशन करायचं  हे होमस्कूलिंग मध्ये जमतं .

 


दुसरा अनुभव म्हणजे सुप्रिया जोशी ,मुंबई  एक होमस्कूलर आई दोन्ही मुली शाळेत जात असतांना ,result डे च्या दिवशी सगळ्या मैत्रिणींच्या आई बेंच वर बसून पेपर बघत असत ,५ मार्क कुठे कमी पडले ह्याची सविस्तर चर्चा शिक्षकांसोबत  होत असे ,पण सुप्रिया ताई मात्र ती गुंडाळी हातात घेऊन घरी परत येत असे ,मालविका (सुप्रिया ताईंची  मोठी मुलगी )नेहमी म्हणायची आई तू कधीच टीचर सोबत बोलत नाही ??असे का ??ते बरं दिसत नाही ??तू निदान बेंच वर बसायचं नाटक  तरी करत जा. तेव्हा त्यांचे मालविका साठी सुंदर उत्तर "बेटा ही कागदाची गुंडाळी तुझे भविष्य ठरवू शकत नाही.तुझ्यामध्ये असणाऱ्या स्किल्स ह्या मी ओळखते  ".आज मालविका शाळेत न जाता कुठल्याही डिग्री शिवाय USA च्या MIT युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत आहे. फक्त तिने स्वतःसाठी एक पोर्टफोलिओ बनवला प्रत्येक  वर्षी तिने आत्मसात केलेल्या तिच्या आवडीच्या क्षेत्रातल्या निरनिराळ्या स्किल्स त्यामध्ये नमूद केल्या . तिचे मूल्यमापन तिनेच केले . कुठलीही शाळा किंवा युनिव्हर्सिटी हे तुमच्यामधील स्किल्स ला मार्क देऊन मोजू शकत नाही. 

ए जिंदगी कब तक इन अंको से भरी कागज पर हमे आजमाते रहोगी?
जो अंकपत्र पाने के  लिये पुरी जिंदगी मेहनत कि 
वही कागज वास्तविक जीवन  में  पर्ची बन कर रह जाता  है
 वास्तविक रूप मे  सामने आने  वाले सवाल कुछ और हि होते है  
कब तक हम  ऐसेही  झुलते रहेंगे कागज  और असली एहसास  के बीच 
कागज कि कमाई और एहसास  कि रुहाई अब सिखा दे एक साथ में 

Wednesday 17 June 2020

माझी आई गेलीय सात समुद्र पार

कविता वाचण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगते. माझ्या बघण्यातील सुखवस्तू कुटुंब ,आई बाबा दोघेही आय टी कंपनी मध्ये नोकरीला . अतिशय गोंडस ,निरपराध ,४ वर्षाची मुलगी खूप गुणी . पण आई सात समुद्र पार गेल्यापासून सगळं नूरच बदलला ,तिच्या भावनांना  न्याय देण्याचा प्रयत्न कवितेतून केला आहे

ए आई तू खूप आनंदी होतीस ,जेव्हा तुला लंडनला जायचं होतं 
तुझ्या करिअरच आभाळ तुला सात समुद्र पार बोलावत होत 
माझ्या पंखांमध्ये बळ असतं तर घेऊन आले असते परत तुला  
नको ते खेळणे ,नको ते कपडे ,तुझ्या मिठीत येऊ दे एकदा मला 
मोबाईल वरून रोज व्हीओडीओ कॉल करते ,बोल बोल म्हणतेस 
रोज काहीतरी आमिष दाखवून, "लवकर येते पिलू" म्हणून सांगतेस
खरंच आलीस तरी वेगळं काही जाणवणार  नाही आता 
मला आजीकडे सोपवून रोज ऑफिसला जातेस ,त्याचा नाही राग 
आजी तर मला आवडतेच ,पण मला हवास वाटतो तू दिलेला घास 
सगळे खेळणे आहे माझ्याजवळ ,पण तरी हेवा वाटतो त्या कामवालीच्या पोराचा 
काहीच नाहीय खेळायला ,पण माय माय म्हणताच साद  येतो आईचा 
मी रडेल म्हणून न सांगताच निघून गेलीस ,आजीनेच समजूत माझी काढली 
रोज निदान संध्याकाळी येतेस  म्हणून दिवस तरी निघून जायचा
आता तूच सांग संध्याकाळचा एकटेपणा ,घालवायचा  तरी कसा ? 
रात्र तर मला नकोशीच झालीय ,स्वप्नातील परी पण खोटी वाटायला लागलीय 
एकदा अस वाटत येऊनच बघावं लंडनला ,मला सोडून जावंच कस वाटलं तुला? 
छोट्या छोट्या गोष्टींवरून आता खूप रडायला येत ,सगळाच खेळ  निरस होऊन जातो 
बाबा पण सारखा कामच करतो ,दया आली  माझी की थोडावेळ जवळ घेऊन बसतो 

एक प्रश्न विचारावासा वाटतो ग तुला ? असच सोडून जायचं होत तर 
या जगात आणलास कशाला ???

एकदा तरी नक्की या माझं नवीन घर पहायला

एकदा तरी नक्की या माझं नवीन घर पहायला 
किती छान सजवयलय या निर्जीव जीवाला
कौतुक करता करता तोंड  थकत नाही माझं 
डोक्यावर मात्र वाहतोय इ एम आय  च ओझं  
पार्किंग मध्ये खाली कार उभी आहे माझी ऐटीत 
पैशाच्या या झाडाला वाढवतोय नात्यांच्या मातीत 
हवा उजेड भरपूर येतोय दार खिडक्यांमधून 
सुंदर दृश्य सुद्धा दिसत बघा बालकनीमधून 
आईबाबांचा मात्र  श्वास कोंडतोय या शांततेमधून 
ते मात्र जाणवत नाही या भौतिकतेच्या पडद्याआडून 
आईच देव देव आणि  मंदिर आता खूप लांब राहिलय 
चार भिंतीतच तीच सगळं विश्व येऊन थांबलय 
सगळंच घर कस आधुनिकतेनी भरभरून  नटलंय 
आईने जपून ठेवलेली  संस्कृती  उंबरठयावर आलीय 
गावी घरी आलेला पाहूणा ढेकर देऊन जायचा 
तेव्हा समाधानाने बाबांचा चेहरा उजळून निघायचा 
दर रविवारी घेऊन जातो सगळ्यांना  महागड्या हॉटेलला 
तिच्या हातची प्रेमळ चव नाहीच येत त्या जेवणाला 
त्यांचा मुळीच आरोप नाही माझ्या या घराला 
पण खरंच मी पात्र आहे या कौतुकाला?

मृत्यू ...

माणसाचं काय आयुष्य असतं??
 
ना जन्म स्वतःच्या हातात आहे ना मरण
कसा हा प्रकृतीचा अजब गजब नियम
चालता फिरता, प्रवासाचं अचानक थांबणं
काल नवीन कपड्यात बघितलेल्या व्यक्तीला
आज पांढऱ्या कपड्यात गुंडाळून नेणं

चार लोक उचलून नेतात  त्या अबोल देहास
रडण्याचे, हुंद्क्याचे आवाज चिरती आसमंतास
थोडी दूरपर्यंत सोबत हि लोकांच्या गर्दीची
पुढच्या प्रवासाची  वाट मलाच माझी ठरवायची 
लाकडावर ठेवलेल्या शरीराला सोबत न मिळे कुणाची

घर ,दार ,नाते,पैसा सगळे  जिवंतपणाचे खेळ हे
आज यातले काहीच सोबत नाही घेता आले
देहाला जळताना पाहून शांत सगळे उभे राहिले
आज मध्ये अडवायला सुद्धा कोणीच नाही आले
आज खरं जीवनाचे दर्शन मला झाले

आयष्याच्या गणिताचा अंत हा शून्यातच झाला
बेरीज वजाबाकी करून जीव हा पुरता थकला
उभ्या जीवनात बहराला माझ्या जरी निशिगंध
तरी शेवटी ललाटी लिहलेला असा हा अंत 
काय म्हणावे याला हा शेवट कि आहे आरंभ

  ज्या देहाच्या मागे धावलो तोच नश्वर होता
मला एक दिवस नेणारा मृत्यू हाच शाश्वत होता
आत्म तत्व सोडून देहाला सत्य समजणारा माझा मूर्खपणा होता !!

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

घेतले मी पहिल्यांदा हातात जेव्हा तुला 
आनंदाच्या  अश्रूंची साथ होती भावनांना 
तुझ्या बंद पापण्यातूनही ओढ बघण्याची सरे 
तुझे ते निरागस रूप मज लोभस भासे  
सुखावून गेले मी तुझ्या एकाच स्पर्शाने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

तुझ्या बालपणीच्या आठवणीत मी नेहमीच रमते 
भात खाऊ घालण्यापासून ,सगळे क्षण पुन्हा आठवते 
पाहिलं पाऊल तू ठेवलस ,अवघ जग मी जिंकलं 
जगण्याचा अर्थ गवसला ,तुझ्या बोबड्या शब्दाने 
सुगंध दरवळला ,तुझ्या खळखळून हसण्याने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

संध्याकाळी तक्रार करते तुझी ,कोर्टात बाबांच्या 
लाडिक रागावणं ,उगाचंच रुसणं ,फुगणं ,समजावणं 
हे असूनही  तुझ्या मस्तीने ,रुचकर होतोय प्रवास जगण्याचा 
गोष्टींकडे नावीन्याने बघण्याचा दृष्टिकोन आज उमगला 
सजीवतेचे मर्म पुन्हा उभे राहिले  फक्त तुझ्या येण्याने,


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 
तुझ्या पंखात मी काय बळ देऊ बाळा ??
आज तूच मला जाणिवांचे पंख देऊन उडण्यास शिकवले 
"आई "ह्या नात्याची   ओळख  झाली आज नवीन रूपाने 


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

हळुवार तुझी चाहूल का दरवळतो मज उर ......

अजून चार दिवस बाकी होतेआपल्या  भेटीला
हे कसे समजवावे या व्याकुळ  वेड्या मनाला
पाहुण्यांच्या गर्दी मधूनही मला टिपणारी नजर तुझी
सुंदर तयार झाल्यावर हसून मिळालेली दाद नजरेची

 स्पर्शानेच  व्यक्त व्हावे असं काही जरुरी नाही
डोळ्यांची भाषा बोलायला  शब्दांची गरज  नाही
आजूबाजूला असणारा तुझा भास देखील आहे पुरेसा
तुझ्या असण्याने दिवसभरचा थकवा होतो  नाहीसा

तू केलेली तारीफ मला नकळत वेडावून सोडते
तुझ्या तोंडून परत परत तेच ऐकावेसे वाटते
गोऱ्या गालावर सगळी लाली एकवटून जाते
आधीच लाल झालेली माझी कळी अधिकच खुलते

झोपेत असताना तुला बघण्याचे सुखच वेगळे आहे
तुझ्या स्वप्नात येण्याची मला परवानगी हवी आहे
तू स्वप्न पाहावे आणि मी त्यामध्ये रंग भरावे
पहाटे जाग  येताच समोरही तू मलाच बघावे 

तुझ्यासोबत मिरवण्याचा आनंदच वेगळा आहे
हातात हात घालून चालतांना आसमान ठेंगणे आहे
 प्राजक्ताचा सडा पडावा  ,आणि मातीला सुगंध सुटावा
तसाच तुझा हळुवार स्पर्श मला शहारून सोडावा 

एक गमंत सांगू तुला

एक गमंत सांगू तुला ...खरंच खूप आवडतोस तू मला

हल्ली मोबाइल -लॅपटॉप मधून नसते सवड तुला
इनबॉक्स ला मिळालाय माझ्या वाटचा वेळ सगळा 
आपल्या वायरलेस प्रेमाचा रंगच मुळी  निराळा 
 तरी तू प्रेमाचा टाकलेला एक कटाक्ष पुरा झाला

एक गमंत सांगू तुला... खरंच खूप आवडतोस तू मला

मुद्दाम माझ्यासाठी असं काही खरेदी करीत  नाहीस
पाडव्याची साडी संक्राती ला घेतोस हे काही थोडे नाही
नाही घेऊन गेलास तरी  चालेल रोज बागेत फिरायला
दोघात एकच प्लेट भेळ ऑर्डर करतोस ना खायला

म्हणून ...... खरंच खूप आवडतोस तू मला

पावसामध्ये दोघांनी चिंब भिजावं अशी अपेक्षा नाही
लॉंग ड्राईव्ह ला नेणारा तू काही फिल्मी नवरा नाही 
पावसावरचं गाणं लागतोस जेव्हा तू गुणगुणायला 
स्वतःहून सर्दीचा काढा  आणून देतोस  प्यायला

म्हणून ..... खरंच खूप आवडतोस तू मला

घराच्या दारावर तुझ्या नावाची असेल जरी पाटी
कवितेतील शब्द माझे असतील पण लिहिले  तुझ्यासाठी
अर्थ आलाय तू येण्यामुळे माझ्या निःशब्द भावनेला
अजून काय सांगू ..... खरंच तू खूप आवड्तोस मला

आणि गावे रिकामी झाली ...

त्या समस्त पाखरांसाठी जी दाण्याच्या शोधामध्ये आपले घरटे सोडून उडाली


अख्या  गावाने हिंडणारी छोटी मुले बघा किती मोठी झाली
आई बापाला ओसरीत सोडून एकटीच पक्ष्यासारखी  उडून गेली
मोठं असलेलं घर सोडून, मोजक्या ४ रूमचा फ्लॅट थाटून  विसावली
गाव ओस पडली आणि शहरातल्या गर्दीत अजून गर्दी झाली

घड्याळाचे काटे तुला इथे हळू फिरल्यासारखे वाटतात
गावातील वेशीच्या भिंती तुझ्यासाठी मोडलेल्या ठरतात
पण इथल्या मनातील आपुलकीला अजून तडा गेलेला नाही
नजर तेवढी  बदलली ,मातीला  गंध तसाच आहे अजूनही

आईची साडी ,बाबांचा सदरा जीर्ण झालाय फाटून फाटून
तरी कृत्रिमपणाचा रंग नाही  इथे कपड्याला चिकटून
गल्लीतल्या क्रिकेट ची मज्जाच काही और होती
मित्रांसोबत जमलेली मैफिल नेहमीच  सुंदर रंगत होती

शहरी चहूबाजूंनी प्रदूषण असतांना  तू गाडी हाकतो
ट्रॅफिक च्या गोंधळात कित्येक तास तू असेच लोटतो
गावी न परतण्यासाठी तू रस्त्यातील खड्डे  दाखवतो
तो रस्ता मात्र तुझी आणि  सायकलची आठवण काढतो

शहरातल्या दिखावू , उसन्या  झगमगाटाला तू भुललास
भावनांना  पैश्यांच्या तराजूत तोलून बघायला लागलास
तू परततांना आईचे अश्रू तेवढ्याच मायेने वाहत राही
 तुझं बालपण गेलेलं गावं बोलवतंय तुला अजूनही 

कागदावर शिंपलेली ओल्या भावनांची कविता

निःशब्द होत्या मनातल्या भावना माझ्या 
लिहतांना कवितेतील ओळी  तुझ्यासाठी 
आठवतेय तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण कवितेसाठी 
घेतले  काही खास  आठवणींचे मोती ओवण्यासाठी  

भेटलास असा ,जसा ठरवून नकार माझ्यासाठी 
टीव्हीवर वर्ल्ड कपचा सामना आणि होती समोर मी 
उगाच बोलत होतास ,ध्यानीमनी फक्त सुरु होत  क्रिकेट 
तेव्हा कुठे होते ठाव तुला घेणार मीच तुझी  विकेट 

योगायोग घडला असा एकच मैत्रीण भेटावी तुला आणि मला 
का नकार देतोय पूजाला अस विचारावं तिने तुला?
सहजच लावलेला फोन माझा ,बरंच काही घडवून गेला 
तुझ्या हाकेमध्ये  माझा होकार मिसळून गेला 

कधी भेटावं बागेतल्या बाकावर ,कधी पाणीपुरीच्या गाडीवर 
कधी भेटावं लपून कधी घरच्यांचं अवचित्य साधून 
छान  होते ते  दिवस आता जाणवतंय मागे बघून 
तेच क्षण सोबत असतात जीवनाच्या प्रवासातून 

तुझ्या चुका मी ,माझ्या तू सांभाळून घ्याव्या 
संसाराच्या कडू गोड आठवणी सोबत घेऊन चालाव्या 
जगात उत्कृष्ट आणि  परिपूर्ण असं  काहीच नाहीये 
आणि हे तर तू आणि मी मांडलेलं संसाराचं गणित आहे  

भाजीत कमी झालेलं मीठ तू चालवून घेतलस 
आखूड झालेल शर्ट देखील मी आणलय म्हणून घालून घेतलास 
कधी कधी निरर्थक असलेली माझी बोलणी ऐकून घेतलीस 
हीच मला तुझ्याकडून मिळालेली  प्रेमाची पावती होतीस  

बऱ्याच गोष्टी शिकाव्या तुझ्याकडून असा आहेस तू 
पैश्यांपुढे कधीही  नाते श्रेष्ठ हे दाखवून देतोस तू 
तू ठरवलेल्या रस्त्यावर न डगमगता चालतोस तू 
म्हणून माझ्यासाठी नवराच नाही पण एक मित्र आहेस तू 

तुझ्या येण्याने सुरेल झाली माझी मैफिल हि 
हवीशी वाटे मला अबोल संध्याकाळ जरी  
सुगंध दरवळतो फुलांचा जीवनात असा कि 
कसे सांगू या कवितेच्या ओळींमधूनी 


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

घेतले मी पहिल्यांदा हातात जेव्हा तुला 
आनंदाच्या  अश्रूंची साथ होती भावनांना 
तुझ्या बंद पापण्यातूनही ओढ बघण्याची सरे 
तुझे ते निरागस रूप मज लोभस भासे  
सुखावून गेले मी तुझ्या एकाच स्पर्शाने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 

तुझ्या बालपणीच्या आठवणीत मी नेहमीच रमते 
भात खाऊ घालण्यापासून ,सगळे क्षण पुन्हा आठवते 
पाहिलं पाऊल तू ठेवलस ,अवघ जग मी जिंकलं 
जगण्याचा अर्थ गवसला ,तुझ्या बोबड्या शब्दाने 
सुगंध दरवळला ,तुझ्या खळखळून हसण्याने 

आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

संध्याकाळी तक्रार करते तुझी ,कोर्टात बाबांच्या 
लाडिक रागावणं ,उगाचंच रुसणं ,फुगणं ,समजावणं 
हे असूनही  तुझ्या मस्तीने ,रुचकर होतोय प्रवास जगण्याचा 
गोष्टींकडे नावीन्याने बघण्याचा दृष्टिकोन आज उमगला 
सजीवतेचे मर्म पुन्हा उभे राहिले  फक्त तुझ्या येण्याने,


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने ..... 
तुझ्या पंखात मी काय बळ देऊ बाळा ??
आज तूच मला जाणिवांचे पंख देऊन उडण्यास शिकवले 
"आई "ह्या नात्याची   ओळख  झाली आज नवीन रूपाने 


आज मी, मला तुझ्यात पाहते अगदी नव्याने .....

लग्नाचे आमंत्रण

लग्नाची रेशीमगाठ अशी हि कोण बांधे न कळे
जिनेंद्र अश्विनी चालू करिती नवं जीवनाचे सोहळे
संगई परिवार  जोडिती नाते डोणगावकरांशी  शी वेगळे
२५ नोव्हेम्बर, शनिवार १ वाजताचा मुहूर्त हा जुळे
अमृत मंगल कार्यालय सुभाष रोड ,बीड मधले  गाठले
शैला , गिरीश सव आरती   स्वागतास आपुल्या उभे हे ठाकले 
स्वरूची भोज लग्नानंतर घेऊन आपण आम्हास आनंदावे
हेच आग्रहाचे आमंत्रण  संगई परिवाराचे समजावे
फक्त आपले आशीर्वाद   नवं दाम्पत्यासाठी घेऊन यावे

Tuesday 2 June 2020

सुई दोरा आणि आमची शिक्षणाची गुंफण ....

सध्या lockdown मध्ये मुलांना शाळेत  पाठवायचा धोका पालकांना जाणवतोय ,त्यामुळे आता शाळेची पूर्ण फी भरून शाळा online  (डिजिटल)चालू होते आहे ,पण परत पालकांना संभ्रम आहे की मुले एवढा वेळ लॅपटॉप किंवा मोबाइल  समोर कसे टिकतील ??? मग सुरु होतोय प्रवास ह्याला काहीतरी दुसरा पर्याय आहे का हे शोधण्याचा  ???मलाही बरेच दिवसात ह्या विषयावर बरेच फोन आले . आम्हाला एक वर्ष शाळेत पाठवायचं नाही त्याचे किंवा तिचे होमस्कूलिंग करायचे आहे ....त्यासाठीच हा ब्लॉग लिहावासा वाटतोय. 

एक वर्ष शाळेतून काढून मुलांना घरी ठेवणे म्हणजे होमस्कूलिंग नव्हे ,आपला होमस्कूलिंग कडे बघण्याचा हा दृष्टिकोन मुळातच चुकीचा आहे.होमस्कूलिंग म्हणजे स्वअध्ययन ,स्वतः ,स्वतः साठी निवडलेला मार्ग.   होमस्कूलिंग  हे काही एक किंवा दोन वर्ष करायची समायोजन (adjustment )नाही .... हा  एक आयुष्यात मुलांना वेगळ्या वाटेने घडवण्याचा जीवनभराचा संपूर्ण पूर्ण प्रवास आहे. ह्यामध्ये फक्त शाळेत न जाणारा एकटा मुलगा किंवा मुलगी समाविष्ट असते असं नाही ,त्याच्या भवती घरातील प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बदलतं असते.पण हा प्रवास घरी सगळे  एकमताने  आनंदाने अनुभवू शकतात. त्यासाठी थोडी मनाची तयारी करावी लागते . आपण आपल्या मुलाला जन्म दिला आहे त्याची पालनपोषण करण्याची जबाबदारी हि आपलीच आहे ती शाळेवर किंवा अजून कोणावर ढकलून आपण त्यामधून सुटू शकत नाही. पण म्हणजे याचा अर्थ त्याला मांडीवर घेऊन बसून सतत शिकवणे असा नाही किंबहुना तो त्याचा स्वतःच शिकतो त्याला आवडणाऱ्या गोष्टींपर्यंत तो पोहचतो तिथे पोहचण्याचे मार्ग तो स्वतः शोधून काढतो पालक म्हणून आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या सोबत असणे एवढाच आहे.  

शिकणे ही  एक नैसर्गिक प्रक्रिया आहे  तेवढीच सहज जेवढे सहज जन्माला आलेला   बाळ बोलायला शिकतो. मुलगा जसजसा मोठा होऊ लागतो तश्या आपल्याला त्याच्या साठी काय वाटतं हे आपण कायम त्याला सांगायला जातो ,तू असं केलं म्हणजेच तुझं चांगलं होऊ शकतं हे आपण त्याच्या कोऱ्या पाटीवर  बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला सुद्धा स्वतःची विचार करण्याची एक शैली असू शकते किंवा तो अनुभवातून शिकू शकतो हे आपण मान्य करू शकत नाही. असाच एक आमचा अनुभव सुई दोरा आणि आमची शिक्षणाची गुंफण ....

विषय अगदी साधाच आज आम्ही (सक्षम माझा ६ वर्षाचा मुलगा आणि मी )दोघांनी मिळून पिशवी शिवली .सगळ्यात आधी लागणारे साहित्य जमवले  :-रुमाल ,सुई ,दोरा आणि सोबत खूप सगळे कुतुहूल. आज करण्यासाठी काही विशेष नव्हतं आणि असं काही विशेष नसलं कि आम्हाला अफलातून कल्पना सुचतात . आज सक्षम स्वतः एक रुमाल आणि सुई दोरा घेऊन आला आई आपण ह्याची पिशवी शिवू शकतो का ? डोळ्यात खूप सगळे कुतुहूल आणि शिकण्याची जिद्द दिसत होती ,छे !!! काहीपण काय त्यापेक्षा दुसरं काहीतरी कर ... पिशवी शिवून काय तुला शिंपी व्हायचंय कि काय?

  ह्याप्रमाणे झिडकारून न देता मी पण त्याच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये शामिल झाली,जणू ह्याआधी मी कधीही पिशवी शिवली नव्हती ....आणि खरंच जाणवलं आपण ती कशी वापरायची हेच शिकलो होतो पण शिवतांना असंख्य अडचणी येऊ शकतात हे नवीन होतंच .  रुमालाची नीट घातलेली घडी ,कैचीने कापून दिलेला चौकोनी आकार, हे सगळं त्याचे त्यानीच  ठरवलं मी फक्त तिथे हजर होती. त्याचा अंदाज घेऊन तो पुढे जात होता आता सुईमध्ये दोरा  घालण्याचा खेळ सुरु झाला एक डोळा बारीक करून मोठा करून त्याच्या हॅन्ड स्किल्स तो पडताळून पाहत होता ,मी पण त्याचीच कॉपी करत होते,पण तो सुई आणि दोरा एकमेकांमध्ये जाईना,बराच वेळ सुरु असलेला डाव अर्ध्यवार सोडून जायला त्याचे मन तयार होईना ,मग सुरु झाली शोधाशोध .... घरात असलेली कुठली पुंजी   वापरून हे काम पूर्ण करता येईल ,बरीच अवजारे आणली त्यामध्ये चाकू,टाचणी,सेप्टी पिन आणि बरेच काही .....   तो थकला पण हताश मात्र झाला नाही ,असंख्य गोष्टी पडताळून पाहण्यात गर्क होता हे करतांना फक्त आई आहे आजूबाजूला हा विश्वास त्याला होता .... मी शिकवावे अशी त्याची अपेक्षा नव्हती त्याला जरुरी होते  ते माझे तिथे असलेलं अस्तित्व,आणि मुलाच्या भावनिक आणि शारीरिक  विकासासाठी पालकांचा हा रोल खूप मोलाचा आहे. माझ्यासाठी दोरा सुईमध्ये पोहचला किंवा नाही हे महत्वाचं अजिबात नाही पण तो ज्या प्रक्रिया वापरून ध्येय पर्यंत चालत गेला  ते खूप कौतुकास्पद आहे आणि माझ्या दृष्टीने हेच स्वअध्ययन ...... सुई टोचली ,शिवण वाकडी गेली  पिशवीचे भोक मोठं झालं एवढं कि त्यातून सामान बाहेर येईल पण  सुंदर होता तो क्षण ... "एक दिवस पूर्ण फुकट घालवला ? " ...... नाही खरंच नाही 
 मनसोक्त  आज तयार झालेल्या पिशवीत आम्ही आयुष्याकडे पाहण्याच्या विविध कला शिकलो ,प्रश्नांचे उत्तरे काढायला शिकलो ..आणि एकमेकांसोबत असण्याचा सुंदर प्रवासाचे साक्षीदार होतो ... आणि तीच पिशवी घेऊन निघालोय पुढचा प्रवास करायला 

Tuesday 21 April 2020

माझ्या मनातली ती रिकामी बरणी

आज सकाळी उठून रोजच्यासारखीच गॅल्लरी मध्ये मॅट घेऊन गेली आज पण प्राणायाम करूनच दिवसाला सुरवात करायची असा निश्चय केला होता . Lockdown चे दिवस आता कुठे अंगवळणी पडायला सुरवात झाली होती . रोजचा दिवस कंटाळवाणा न वाटता काहीतरी नवीन शिकण्याची संधीच घेऊन येत होता. प्राणायाम करतांनाच एक सुंदर झुळूक  सुंगध घेऊन येत होती . परत परत तोच सुंगंध नाकाजवळ दरवळत होता. डोळे बंद करून मन एकाग्र करून आठवण्याचा खूप प्रयत्न केला आणि हो हा सुगंध खूप ओळखीचा होता .....खूप जवळचा होता अरेच्चा !!!हा तर आंब्याच्या मंजिऱ्या  चा  दरवळणारा सुगंध होता . समोर रो हाऊस मध्ये बरीच  आंब्याची झाडे आहेत,त्याला कैऱ्या आलेल्या दिसल्या होत्या पण हा सुंगंध खूप जवळून येत होता. आणि आठवलं ३ दिवसांपूर्वी मैत्रिणी कडून रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी  मागवून घेतली होती आणि quarantine च्या सूचनांप्रमाणे त्याला हात ही न लावता ती पेटी सुद्धा काही दिवस  quarantine   मध्ये एका बाजूला ठेऊन दिली होती.आंबे अजून कच्चे च आहेत असे समजून आम्ही त्याला उघडून पहिले नव्हते .  आज जणू हा सकाळी सकाळी दरवळणारा सुगंध त्या रसाळ पिकलेल्या   आंब्यांची आठवणच घेऊन आला होता . 



एरवी बाकी कुठल्याही ऋतूत न मिळणार हा फळांचा राजा त्याचे अस्तित्व तसेच टिकवून आहे.केवढी ही  त्या आंब्याला मिळालेली लोकप्रियता खरंच त्या राजाची  बातच निराळी.प्लम , ऑलिव्ह,पीच हि त्याच्याच जातीची फळ पण छे !!त्यांना हि उपमा कुठे ?त्याचा दरारा वेगळा !त्याचा रुबाब वेगळा !त्याचा ढंग वेगळा!त्याची ऐट काही औरच एकंदर आमचा लाडका आंबा खरचं सर्वांमध्ये वेगळा . आंब्याचे पाने सुद्धा एक मंगल कार्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते . आंब्याच्या डहाळ्या दाराला लावून चैत्र महिण्याची सुरवात होते ते गुढीपाढव्याला .  पातळ असलेली साल काढून केशरी लालसर रसाळ मधुर,सुगंधित बाहेर आलेला रस बघून मन कसं   बघूनच तृप्त   होऊन जातं . पुण्यामधली सुजाताची मँगो मस्तानी,खत्री बंधूचे मँगो आईसक्रीम ,दुर्वांकूरचा रस ,चितळे चे आम्रखंड ह्यांना लोकप्रिय करणारा हा आंबाच !!आज मी पण सकाळी सकाळी ह्या आंब्याच्या प्रेमात पडले . आतापर्यंत फक्त आंबा हा बाजारातून आणणे आणि खाणे एवढंच ठाऊक होतं पण lockdown मध्ये चक्क घरीच माच  टाकून आंबे पिकवण्याची हि पहिलीच वेळ . २ bhk मध्ये एका कोपऱ्यात हा माच आणि दरवळणारा सुगंध अनुभवण्याची माझी पहिलीच वेळ.एक सुंदर मोहर घरात आलाय आणि त्या चैत्राच्या सुगंधात मन न्हाहून निघतय.  

आता बघा ना ,कच्ची छोटुशी हिरवीगार कैरी झाडाला लटकलेली बघून तो तोडण्याचा मोह अजिबात आवरत नाही . तसंच  उन्हाळ्यात भेळ बरोबर मीठ लावलेली कैरी म्हणजे अप्रतिम combination. मला आजीची उन्हाळ्यात आवर्जून आठवण येते ती यासाठी कैरी बाजारात आली कि तिची लगबग चालू व्हायची ते वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी. उगाच नाही "लोणचं घाल त्याचं " हि म्हण रुजली. कैरीची चटणी ,कैरीचा तक्कु ,कैरीचे पन्ह एवढंच काय कैरीच्या आतमधली  कोय  वाळवून त्याची सुपारी ती करायची .केवढा तो उरक आणि केवढी ती हौस !!आज मी  हेच  सगळं करायला जाते पण तेवढा उसंत मिळत नाही आणि त्याला ती मज्जा पण येत नाही असं का झालं असेल?पदार्थ तेच पण आजीसारखी  चव मुळीच नाही . आजी आज या जगात नाही  पण तिच्या  सुरकुतलेल्या हातांनी बनवलेली लोणच्याची आठवण मनात ताजी आहे  .माझी रिकामी बरणी त्या लोणच्याची वाट पाहतेय आणि मन आजीची .....

भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...

    भावनांची जागा प्रोग्रामिंग घेतं तेव्हा ...  AI (artificial intelligence -कृत्रिम बुद्धिमत्ता ) हल्ली चॅट जिपीटी ची इतकी सवय झाली आहे ना ...